सायकल माझी बेस्ट साथीदार!

आजचा दिवस (३ जून) हा दिवस ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णी.
sonali kulkarni
sonali kulkarnisakal
Updated on

आजचा दिवस (३ जून) हा दिवस ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णी. त्यांनी अभिनयासोबतच सायकलिंगची आवड जोपासली. सायकल दिनाचे औचित्य साधून त्या सांगताहेत त्यांची बेस्ट साथीदार असलेल्या सायकलबद्दल...

मी पुण्याची आहे आणि त्यामुळे मला पुण्यात सायकलिंग करायची सवय आहे. शाळा व कॉलेजमध्ये असताना सायकलच माझी साथीदार असायची. माझ्या त्यावेळी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज चालू असायच्या. शाळा, आर.एस.पी, डान्स क्लास, गाण्यांचा क्लास यामुळे मला बससाठी थांबून राहणं शक्य नसायचं. कारण बस कधी येईल आणि मी वेळेवर पोहोचेन की नाही, याचा भरवसा नव्हता. त्यामुळे तेव्हापासून मी सायकलला अधिक पसंती दिली. कॉलेजमध्ये गेल्यावर नाटकंसुद्धा सुरू झाली. त्यामुळे सायकलच माझी बेस्ट साथीदार झाली.

काही वर्षांनंतर मी मुंबईत आले तेव्हा मी एका मेकॅनिककडून सायकल विकत घेतली होती. ती सेकेंड हॅन्ड होती. तेव्हापासून मी पुन्हा सायकलिंग करायला लागले. कोणत्याही कमी अंतराच्या प्रवासासाठी, उदाहरणार्थ भाजी आणणे, जिमला जाणे यासाठी मी सायकलच वापरायची. ती सेकंड हॅन्ड सायकल माझ्या आयुष्यात आल्यापासून मुंबईतसुद्धा माझी सायकलिंग करण्याची आवड जोपासली गेली; पण मुंबईत पूर आला होता तेव्हा ती सायकल गंजली. त्या वेळी माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं आणि माझं अफेअर चालू होतं.

आमच्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेला त्याने मला विचारलं होतं की, तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय? तेव्हा मी त्याला म्हटलं मला काही हिऱ्याची अंगठी, चॉकलेट्स किंवा गुलाबाची फुलं नकोत... मला फक्त एक सायकल घेऊन देशील का? मला खूप आवडेल. तेव्हा मला नचिकेतने माझ्या आयुष्यातली सर्वात पहिली नवीन सायकल घेऊन दिली होती. आता सायकल हा माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनला आहे.

मला शनिवार तसेच रविवारी किंवा सुट्ट्यांच्या दिवशी सायकलिंग करायला आवडतं. मुंबईमध्ये भररस्त्यात सायकलिंग थोडं जपून करावं लागतं. कारण आपल्याकडे रहदारीच्या समस्या आहेत आणि त्यात जर सायकलस्वार फिरायला लागले तर त्यात आणखी भर पडेल. त्याशिवाय आपल्यालाही धोका आहेच. म्हणून मी माझ्यासाठी सायकलिंगचे ट्रॅक्स निवडले आहेत. ज्या ठिकाणी खूप ट्रॅफिक नसतं आणि सायकल चालविल्याने ट्रॅफिक वाढणार नाही अशा ठिकाणी मी सायकलिंग करते. ज्या दिवशी शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाणाऱ्यांची लगबग नसते, अशा दिवशीच मी सायकलिंग करते.

सायकल चालवण्याच्या अनेक आठवणी आयुष्यभर मला पुरणार आहेत. परदेशात जाऊन मी सायकलिंग करत नाही. कारण तिकडे काम सांभाळून, सायकलिंग करणं जमलं नाही; पण इटलीमध्ये मात्र सायकलिंग केले. मी ज्यांच्याकडे राहायची, त्यांच्याकडे सायकल होत्या. त्यामुळे तिथे सायलिंगचा आनंद घेता आला.

मुंबईत एकदा रस्त्यात एक सायकलिस्ट भेटला. त्या वेळी मी खारला राहायची. मी सायकलवर वरळीला जात होते. ती व्यक्तीसुद्धा सायकलिंग करत होती. तो मला म्हणाला की, जरा थांब आपण फोटो काढूयात. मी म्हणाले, रस्त्यात थांबून फोटो काढण्यापेक्षा तू माझ्यासोबत सायकलिंग कर. तो माझ्यासोबत महालक्ष्मीपर्यंत आला आणि मग तिथे पोहोचल्यावर आम्ही सेल्फी काढला. या पहिल्या राईडनंतर आम्ही अनेकदा भेटलो.

मी खार येथे राहात असताना सायकलवरून बऱ्याच वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवल्या आहेत. माझ्या सासूबाई प्रभादेवीला राहायच्या. त्या वेळी घरात काही खास पदार्थ बनवला असेल, तर मला वाटायचं की तो सासूबाईंना द्यावा. त्यामुळे अनेकदा मी सकाळी दूधवाल्याच्याही आधी जाऊन त्यांच्या घरी पार्सल पोहोचवलं आहे. त्यामुळे माझ्या घरचे आणि काही मित्रमैत्रिणी मला कुरिअरवाली म्हणून चिडवायचे.

सायकलिंग करताना सुरक्षितता जास्त महत्त्वाची असते. आपण आता प्रत्येक ठिकाणी सायकलिंग ट्रॅकची अपेक्षा करायला लागलो, तर ते शक्य नाही. अजून तरी २५ ते ३० किलोमीटरपेक्षा अधिक मी सायकल चालवलेली नाही. जेव्हा ट्रायक्लोनमध्ये आम्ही भाग घेतो तेव्हा २५ किमी सायकलिंग करावं लागतं आणि सरावासाठी आम्ही सायकल चालवतो तेव्हा ते ३० किमी वगैरे होतं. २५ किमी चालवण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. तेवढा वेळ मी आत्तापर्यंत सायकलिंग केलं आहे. एकदा बीकेसीला चक्कर मारून यायचा विचार होता; पण रस्ता चुकले आणि थेट घाटकोपरलाच बाहेर पडले. त्या दिवशी अडीच तास वगैरे सायकलिंग झालं होतं.

सायकलिंग सोडून माझं फिटनेस राखण्यासाठी मी भरपूर चालते. आता अटीवो ट्रेंनिंग या टीमसोबत मी माझं पर्सनल वर्कआऊट करते. डॉ. सरिता डावरे या माझ्या लाईफस्टाईल गुरू आहेत. कौस्तुभ राडकर माझा कोच आहे. त्याच्यासोबत मी ट्रायक्लोन्सचे ट्रेंनिंग केले आहेत. मागच्या काही वर्षात मला एक-दोन दुखापती झाल्या होत्या. दुखापत होऊन व्यायाम करत राहण्यावर माझा विश्वास नाही. आपण फिट आणि ॲक्टिव राहणं आवश्यक आहे. त्याशिवाय खूप आनंदी राहते आणि चांगलं खाते. सायकल हे असं उपकरण आहे ज्याला फारसा खर्च नसतो. सायकल सांभाळायलादेखील सोपी असते. त्यात फक्त हवा भरावी लागते.

सायकलिंग केल्यामुळे आपण गतिशील आणि क्रियाशील राहतो. गुडघ्याला तसेच पाठीला छान व्यायाम मिळतो. ट्रेडमिलवर एक तास चालणं काहींना कंटाळवाणं वाटतं; पण आपण सायकलवर असलो की कंटाळा अजिबातच येत नाही. सायकलमुळे जवळच्या अंतरासाठी गाडी वापरावी लागत नाही, डिझेल, पेट्रोल लागत नाही. आपल्याला आसपासचे सर्व रस्ते किंवा गल्ल्या समजतात. सायकलने आपण अरुंद रस्त्यावरूनसुद्धा जाऊ शकतो. सायकलिंग हा एक मन प्रसन्न करणारा व्यायाम आहे. त्यामुळे मला सायकलिंग फार आवडतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.