- सोनाली लोहार, sonali.lohar@gmail.com
अगदी लहानपणापासूनच मुलांना न मागता प्रत्येक वस्तू हातात मिळत जाते. कुवतीच्या पलीकडे जाऊन पालक मुलांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या पूर्ण करत जातात. प्रश्न आर्थिक कुवत आहे की नाही, हासुद्धा नसतो. मुद्दा हा आहे की, या मुलांना ‘नाही’ या शब्दाचं महत्त्वच कधी कळत नाही. अशा परिस्थितीत भविष्यातील असंख्य नकार पचवायची ताकद मुलांमध्ये कशी विकसित होणार?
गेल्या आठवड्यात ठाणे शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. उच्च शिक्षणासाठी पैसे उभारण्यास आपण असमर्थ असल्याचे वडिलांनी स्पष्ट केलं व त्यावरून मुलीत आणि वडिलांत प्रचंड वाद झाले. पुढील तीनच तासांत त्या वादाची परिणती मुलीने गळफास लावून आत्महत्या करण्यात झाली. अतिशय धक्कादायक अशी ही घटना. पार्टीसाठी पालकांनी हजार रुपये दिले नाहीत म्हणून काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या एका १४ वर्षीय मुलीने केलेली आत्महत्याही मनाला असाच चटका लावून गेली. अशा घटना सर्वदूर घडत असतात. यात संबंधित पालकांची अवस्था किती दयनीय होत असणार, त्याची कल्पनाही करवत नाही.
या प्रकरणात खरोखरच पित्याची आर्थिक क्षमता नसणार, असती तर कोण बाप आपल्या पोटच्या गोळ्याच्या शिक्षणासाठी नाही म्हणेल बरं! पण तरीही, आई-वडिलांना प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली ढकलून स्वतःचे भविष्य घडवू पाहणाऱ्या मुलांविषयीही थोडं कुतुहल वाटतं. यातील किती मुलं भविष्यात ते कर्ज फेडणं, ही स्वतःची जबाबदारी समजतात? जे समजतात त्यांचे पालक भाग्यवानच; पण इतकंच पुरेसं आहे का? स्वतःचं अर्ध्याहून अधिक आयुष्य जर पालकांनी मुलांची अशी ओझी वाहण्यात घालवलं तर त्या पालकांना सांभाळणं ही संपूर्णतः आपलीच जबाबदारी आहे, असं यातील किती मुलांना वाटतं बरं?
खरंतर या सगळ्यात कुठेतरी दोष पालकांचाही असतो. अगदी लहानपणापासूनच मुलांना न मागता प्रत्येक वस्तू हातात मिळत जाते. कुवतीच्या पलीकडे जाऊन पालक मुलांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या पूर्ण करत जातात. प्रश्न आर्थिक कुवत आहे की नाही, हासुद्धा नसतो, मुद्दा हा आहे की या मुलांना ‘नाही’ या शब्दाचं महत्त्वच कधी कळत नाही! अशा परिस्थितीत भविष्यातील असंख्य नकार पचवायची ताकद मुलांमध्ये कशी बरं विकसित होणार?
परदेशात एक फार चांगली गोष्ट असते. अगदी तेराव्या-चौदाव्या वर्षापासून मुलांना आर्थिक स्वावलंबनाचे धडे मिळायला सुरुवात होते. थोडी मोठी झाली की ही मुलं लहानसहान नोकऱ्या करून स्वतःचा खर्च उचलायला लागतात. आई-वडिलांसोबत राहत असतील, तर अर्थार्जन सुरू झाल्यावर मुलांनी घराच्या खर्चातही आपला वाटा देणं हे गृहीत धरलं जातं. एका ठराविक वयानंतर तर त्यांनी स्वतंत्रच राहावं, ही अपेक्षा आई-वडीलच करतात. त्यामुळे ‘जन्माला घातलत नां, मग आता माझं आयुष्य घडवण्याची सगळी जबाबदारी तुमचीच!’ हा भाव या मुलांच्यात निर्माण होण्याची शक्यताच नसते.
भावनिक स्तरावर आपली समाजव्यवस्था ही परदेशाहून खचितच दृढ आहे, नात्यांचा ओलावाही नक्कीच जास्त खोल आहे; पण हेच भावनिक बंध कधीकधी आपल्या मुलांच्या मानसिक विकासासाठी घातकही ठरू शकतात. म्हणूनच मुलांच्या बाबतीत किती संरक्षित दृष्टिकोन असावा, याचाही सखोल विचार करायला हवा.
मला आठवतंय, लहानपणी वडिलांनी भाड्याची सायकल आणून त्यावर बसवलं. पेडलवर पाय कसा ठेवायचा, ब्रेक कुठे असतो, कसा मारायचा ते दाखवलं आणि म्हटलं, ‘‘चालव आता.’’ मी म्हटलं, ‘‘तुम्ही मागून धरा, मी पडेन.’’ ते म्हणाले, ‘‘नाही! तू प्रयत्न कर, पडलीस तरी हरकत नाही, पण उत्तम चालवशील.’’ दोन-तीनदा ढोपरं फोडून घेतली आणि सायकल चालवायला शिकले. ‘आधार नसला तर पडेन’ ही भावना तिथे संपली.
यापुढे जाऊन ‘सतत आधार शोधण्याऐवजी आपणच आधार बनू शकतो किंवा बनायला हवं’ ही भावना जेव्हा जन्म घेते तेव्हा मूल खऱ्या अर्थाने मोठं होतं, घडतं. कित्येक सर्वसामान्य कुटुंबात आज अशीही मुलं आहेत ज्यांना ही उमज फार लवकर आली. मी अगदी शाळकरी मुलांना लहान वर्गांच्या शिकवण्या करून स्वतःचा शाळेचा खर्च भागवताना पाहिलं आहे, युवकांना नोकऱ्या करून कुटुंबाला सावरत पार डॉक्टरेटपर्यंतचा प्रवास करतानाही पाहिलं आहे. ही उदाहरणं पाहिली की समाधानाने ऊर भरून येतो.
‘तुझ्या आयुष्याचा शिल्पकार तूच असशील, या प्रवासात तू जिंकशीलही, कदाचित हरशीलही आणि त्या परिणामांची जबाबदारीही संपूर्णतः तुझीच असेल. पडलास तर फक्त मागे वळून बघ, जखमांवर फुंकर घालायला आम्ही सदैव असूच. पण प्रवास थांबवू नकोस, सक्षम बन, आयुष्याशी हिंमतीने लढ,’ ही समज जर प्रत्येक पालकाने सुरुवातीपासूनच अपत्याला दिली तर आयुष्याचा खरा अर्थ त्याला लवकर समजेल.
(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.