आम्ही गंगा भागीरथी की आम्ही सौभाग्यवती की आम्ही कुमारी? संस्कृतीच्या नावावर आम्ही निवांत लचके तोडत राहतो स्वातंत्र्याचे आणि सन्मानाचे.
- सोनाली लोहार, sonali.lohar@gmail.com
आम्ही गंगा भागीरथी की आम्ही सौभाग्यवती की आम्ही कुमारी? संस्कृतीच्या नावावर आम्ही निवांत लचके तोडत राहतो स्वातंत्र्याचे आणि सन्मानाचे. मनाला पटो न पटो; पण साथ देत राहतो कुठल्या ना कुठल्या उन्मत्त विचारधारांची. खरंच इतकं कठीण आहे का विचार करणं? इतकं कठीण आहे का आपल्या बुद्धीच्या कसोटीवर निकष लावणं?
सध्या एकापाठोपाठ एक घडणाऱ्या विचित्र घटनांनी राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय. सगळं बघत आणि ऐकत असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात असंख्य प्रश्न आहेत, प्रचंड कोलाहल आहे. काय योग्य काय अयोग्य, काय नैतिक काय अनैतिक, कुठली श्रद्धा आणि कुठली अंधश्रद्धा, काय कायदेशीर काय बेकायदेशीर... प्रश्न अनेक; पण उत्तरे काही सापडत नाहीयेत. जिथे बघावं तिथे समाज माध्यमांवर रकानेच्या रकाने भरून गरळ ओतली जातेय, सार्वजनिक मंचांवर अर्वाच्य भाषेचा सर्रास वापर होतोय, राजकीय नेत्यांच्या समारंभात आयोजलेल्या अश्लील नृत्याच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नाचतेय, कुठे भरचौकात गोळ्या झाडल्या जात आहेत, कुठे मयत गावगुंडासाठी मेणबत्ती मोर्चे निघतात आणि कुठे उन्हाच्या झळीने भरसभेत माणसं तडफडून मरताहेत!
हे सगळं का? कोणामुळे? कोणासाठी? खरंतर प्रश्न हासुद्धा आहे की ‘या सगळ्या कोलाहलात मी कुठल्या बाजूचा/बाजूची?’ मी भाषणं देणाऱ्या शामियानातल्या थंडाईचा एक भाग, की मी बाहेर बसलेल्या अफाट गर्दीचाच अंश? ती बिनचेहऱ्याची गर्दी जिला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही, जिला स्वतःचा स्वतंत्र विचार नाही. ती गर्दी तिथे का होती? कोणी म्हणे श्रद्धेपोटी, कोणी म्हणे पोटातल्या भुकेपोटी. आजकाल म्हणे राजकीय समारंभासाठी गर्दीला आपल्या नेत्यांची नावही माहीत नसतात! तरीही आम्ही तिथे असतो, आम्ही घोषणाही देतो आणि आम्ही टाळ्याही वाजवतो!
मग आम्ही गोंधळतो आणि मन रमवत राहतो चर्चांमध्ये.. आम्ही गंगा भागीरथी की आम्ही सौभाग्यवती की आम्ही कुमारी? संस्कृतीच्या नावावर आम्ही निवांत लचके तोडत राहतो स्वातंत्र्याचे आणि सन्मानाचे. मनाला पटो न पटो; पण साथ देत राहतो कुठल्या ना कुठल्या उन्मत्त विचारधारांची. त्या विचारधारांमागे मेंढरासारखी जाणारी गर्दी कशावरून एक दिवस खोल दरीत पडून कपाळमोक्ष करून घेणार नाही?
इथे आमच्या खिशात लेकरांना खायला घालायला वीस रुपयेही नसतात आणि आम्हाला ‘वीस हजार कोटी कुठे गेले’ या प्रश्नात गुंतवून ठेवलं जातं. महिन्याअखेरीस पगारासाठी लाचार झालेल्या आम्हाला स्वातंत्र्यापूर्वी परकीय सत्तेसमोर कोण लाचार झालं होतं आणि कोण नाही हे सांगून पेटवलं जातं. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे पोटातली आग विसरून गर्दीही धडाडून पेटते. आम्हाला समजत इतकंच नाही, की पेटणारेही आम्हीच आणि जळून राख होणारेही आम्हीच असतो! शामियानातल्या मंडळींचं फारसं काहीही जात नाही हो! राजकारण करणारे वेगळे आणि समाजकारण करणारे वेगळे, हे समजण्याची गरज आहे आणि या दोहोंतल्या रेषाही दिवसागणिक पातळ होत चालल्या आहेत, हे समजण्याचीही!
आणि खरंच इतकं कठीण आहे का विचार करणं? इतकं कठीण आहे का आपल्या बुद्धीच्या कसोटीवर निकष लावणं? मध्ये एक मतप्रवाह असाही ऐकायला मिळाला की, गावखेड्यात परिस्थिती वेगळी असते, तिथे मंडळींना बौद्धिक आणि मानसिक आधाराची जास्त गरज असते. या गृहीतकाला संपूर्णतः छेद देणारं एक संभाषण अगदी कालंच शेजारच्याच घरात घडलं. चार घरची धुणीभांडी करणारी गावाहून आलेली अशिक्षित बाई आपल्या मालकीणीला सांगत होती, ‘‘अशी कशी मेली हो माणसं? ऊन्हं लागतात एवढंही समजेना का यांना? श्रद्धा असावी, मी पण करतेच की.
आपल्या मनात कोणी असावं आपल्यापेक्षा मोठं, म्हणजे माणूस दबून राहतो नं जरा; पण म्हणून आपल्याला कोणी सांगायला कशाला लागतं की काय चांगलं नि काय वाईट! देवाने कान, नाक, डोळे नि डोक्यात मेंदू दिलाय तो कशापायी! आपलं आपण मेहनतीने कष्टावं, पोरा-बाळांना खाऊ घालावं, शिकवावं नि मोठ्ठं करावं! माझा नवरा खूप दारू प्यायचा, मला कोणीपण सांगितलं नाही की त्याला सोड, माझं मीच त्याला सोडलं आणि आले इथे हिंमतीने पोरांना घेऊन!’
एक निरक्षर खेडूत बाई त्या अफाट गर्दीचा भाग होता होता वाचली आहे! जे तिला कळलंय तेही अक्षर वाचता येणाऱ्या सुशिक्षितांनाही थोडंफार कळावं, एव्हढीच माफक अपेक्षा!
(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.