सून मी सावरकरांची मी १०- ११ वर्षांची होते. माझी आई एके दिवशी सकाळी म्हणाली, चला आपल्याला तात्यारावांना बघण्याची संधी मिळणार आहे. आम्ही रेल्वेस्थानकावर गेलो. तात्याराव कोलकात्याकडे निघाले होते. नागपूर स्थानकावर त्यांचे दर्शन झाले. ते त्यांचे पहिले दर्शन. काळ पुढे सरकत राहिला अन् अचानक माझ्यासाठी स्थळ आले ते सावरकरांच्या पुतण्याचे. डॉ. नारायणराव हे तात्यारावांचे सख्खे लहान बंधू. त्यांचा मुलगा विक्रम. पसंतीचा कार्यक्रम झाला आणि माझी मॅट्रिकच्या परीक्षेनंतर आठव्या दिवशी मी स्वामिनी विक्रम सावरकर झाले.स्वामिनी सावरकर
तंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लक्षावधी भारतीयांच्या श्रद्धेचा विषय. मस्तक झुकावे असे त्यांचे कर्तृत्व. मी त्यांच्या कुटुंबात सून म्हणून प्रवेशले त्याही आधीपासून अर्थातच मी त्यांची भक्त. देशासाठी झटणाऱ्या या कुटुंबात सून म्हणून दाखल झाले ते नंतर. त्याआधीची एक आठवण मर्मबंधातली ठेव.
मी १०-११ वर्षांची शाळकरी मुलगी होते. माझी आई मनोरमा ऊर्फ वहिनी गोखले एके दिवशी सकाळी म्हणाली, चला आपल्याला तात्यारावांना बघण्याची संधी मिळणार आहे. १०, १२ जण रेल्वेस्थानकावर गेलो. तात्याराव कोलकात्याकडे निघाले होते. बहुधा मुंबईकडून जाणाऱ्या गाडीत ते होते. नागपूर स्थानकावर त्यांचे दर्शन झाले. आधीच त्यांच्या दर्शनासाठी गोतावळा जमला होता. त्यात आम्हीही. ते त्यांचे पहिले दर्शन.
नकळत हात जोडलेले अनेक. काळ पुढे सरकत राहिला अन् अचानक माझ्यासाठी स्थळ आले ते सावरकरांच्या पुतण्याचे. डॉ. नारायणराव हे तात्यारावांचे सख्खे लहान बंधू. त्यांचा मुलगा विक्रम एम.कॉम.पर्यंत शिक्षण झालेला. पसंतीचा कार्यक्रम झाला. ११ मे १९५८ ला माझी मॅट्रिकची परीक्षा झाली अन् लगेच आठव्या दिवशी मी स्वामिनी विक्रम सावरकर झाले. माझे वडील पांडुरंग गोखले. त्यांना सगळे विचारत होते की, तात्याराव लग्नाला येणार का? ते येऊ शकणार नव्हते. लग्नपत्रिका सावरकर लिपीत छापायची, हा त्यांचा आग्रह मात्र पाळला गेला होता. लग्न झाले अन् मुंबईला पोहोचताच मी माझे पती विक्रम आणि सासूबाई शांताताई यांच्यासमवेत तात्यारावांकडे गेले. तात्या आणि त्यांच्या पत्नी माई हे कुटुंबातल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान. माई आणि माझ्या सासूबाई एकमेकींवर प्रचंड प्रेम असलेल्या जावा. त्यांच्यात मी बसले होते आणि माझे पती तात्यांजवळ. मग आम्ही सगळेच त्यांच्या खोलीत गेलो. तात्यांचे कुटुंबातल्या प्रत्येकाची वास्तपुस्त करायचे कसब मला पहिल्यांदाच कळले. तुझ्या घरी कोण कोण, तू काय शिकली आहेस, सगळे रीतसर प्रश्न ते आस्थेने विचारत होते. मी सांगितले की, मला मराठीत प्रावीण्य मिळाले आहे. शाब्बास म्हणत त्यांनी भाषाशुद्धी विषयातले त्यांचे पुस्तक भेट दिले. आता सावरकरांच्या कुटुंबात आली आहेस, तर शुद्ध मराठीत बोल. इंग्रजी शब्द वापरू नकोस, हे आग्रहाने सांगितले. मी अर्थातच मान डोलवली. नंतर भेटीगाठी होत राहिल्या; पण एक प्रसंग मात्र मनावर कायमचा ठसला.
माझे पती विक्रम पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करायला आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’त रुजू झाले होते. वेतन कमी झाले होते. तशातच ते हिंदू महासभेचे काम करू लागले होते. पोप भारतात येऊन धर्मांतराच्या कामाला चालना देणार आहे, तरीही त्याचा सरकारी पातळीवर सत्कार करणार, अशी चर्चा सुरू झाली होती. माझ्या पतीने सहकाऱ्यांसह आंदोलन करीत विरोध केल्याने त्यांना अटक झाली. मला एक मुलगा होता अन् दुसऱ्या बाळंतपणासाठी मी नागपूरला माहेरी गेले होते. दुर्दैवाने माझे नवजात बाळ दगावले. मी दु:खात होते. अशा वेळी तात्यारावांकडून एक जण भेटायला आले. वास्तपुस्त करून झाल्यावर तात्यारावांनी पाठवलेले एक पाकीट त्यांनी मला सुपूर्द केले. उघडून बघा सांगताच त्यातले ३०० रुपये मला दिसले. अडचणीच्या काळात आधाराला दिलेली ती रक्कम होती. मला भरून आले. मी ती रक्कम कित्येक दिवस जपून ठेवली.
माझे सासरे नारायणराव यांचे तात्यारावांवर प्रचंड प्रेम. सावरकर बंधूंच्या जिव्हाळ्याच्या कथा तशाही प्रसिद्धच. गांधीहत्येनंतर अकारण सावरकर कुटुंबाला त्यात गोवले गेले. सावरकर सदनावर लोक चालून गेले. माझे मोठे दीर अशोक, पती हे घर सोडून दिवाभीताप्रमाणे दिवसभर इकडेतिकडे प्रवास करत फिरत. मी या ऐकलेल्या बाबी; पण खोल जखम करून गेलेल्या. त्या सुमारास माझ्या सासऱ्यांच्या डोक्यात कुणीतरी काठी घातली. ते मूर्च्छित होऊन पडले. कुणीतरी पोलिसांना सांगून त्यांना दवाखान्यात दाखल केले. नंतर ते पुन्हा दादरला रुग्णसेवा करू लागले; पण मस्तिष्कावरल्या त्या काठीमुळे असेल; पण ते भोवळ येऊन काही दिवसांत दवाखान्यात जागीच गेले. त्यांचे ते निधन तात्यारावांना लागले होते. ते माझ्या पतीला म्हणत, ‘‘अरे देशसेवा आम्ही केली, तुम्ही कष्टात जीवन काढलेल्या तुमच्या आईला सुख द्या...’’
लग्नकार्याची निमंत्रणे देणे ‘सणासमारंभाला एकत्र जमणे चालायचेच. एकदा माझी नणंद चपला हिच्यासमवेत मी गेले तर तात्यांनीच दरवाजा उघडला. रात्रीच्या फिरू नका, असे काळजीपूर्वक सांगताना त्यांच्यातला पिता जाणवला.
ते पर्व संपले. स्वातंत्र्यवीरांच्या निधनावेळी सुधीर जोशी मुंबईचे महापौर होते. त्यांनी ठराव करीत सर्वपक्षीयांच्या संमतीने सावरकर स्मारकासाठी भूखंड दिला. काँग्रेसच्या नगरसेवकांचाही दुजोरा होता. नंतर कित्येक कारणे आली अन् स्मारकाचे काम रखडले. सावरकर म्हणजे कष्ट आलेच.
समुद्राजवळचा तो भूखंड; पण तिथे खडक लागले. तात्यांचे स्मारकही खस्ता खात-खात उभे झाले. आज ते दिमाखाने उभे आहे. माझा मुलगा रणजित तिथे पदाधिकारी आहे.
‘अमर होय ती वंशलता
निर्वंश जिचा देशाकरिता’
अशा भावनेने देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या समुद्राला गवसणी घालत भारतात परतायचे होते, त्या सागराच्या साक्षीने उभे राहिलेले ते भव्य स्मारक आणि सावरकरांचे चरित्र पुढील पिढ्यांना देशभक्तीची प्रेरणा देत राहो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.