'आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, सकाळचे सहा वाजले आहेत...'

आकाशवाणी हा पंचाक्षरी शब्द माझ्या आयुष्यात जणू मंत्राप्रमाणे जादुई ठरला.
'आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, सकाळचे सहा वाजले आहेत...'
Updated on

“आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे सकाळचे सहा वाजले आहेत..."

माझ्यासह अनेकांच्या दिवसाची सुरूवात या आवाजाने झाली असेल, होत असेल. आकाशवाणी हा पंचाक्षरी शब्द माझ्या आयुष्यात जणू मंत्राप्रमाणे जादुई ठरला. आकाशवाणीवर लेखक-कलाकार म्हणून काही सादर करायला मिळणं हे कला-साहित्य संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक पिढीचं स्वप्न असतं तसं ते माझंही होतं. सुरुवातीला रत्नागिरी मग मुंबई आणि आता पुणे आकाशवाणी केंद्राने माझं हे स्वप्न सत्यात उतरवलं. अर्थातच सुरुवातीला जे रेडियो सेटशी होतं तेच किंवा त्याहून किंचित गहीरं नातं आकाशवाणी केंद्राशी जोडलं गेलं.

आज मी एकटा जरी या लेखाच्या सुरुवातीला हे वाक्य लिहीत असलो तरी माझ्यासारख्या शेकडो जणांच्या याच भावना असतील कारण अशा अनेक उमद्या कलाकारांना आकाशवाणी केंद्रावरील अनुभवीमंडळींनी आपलेपणानं तंत्रशुद्ध प्रशिक्षिण दिलं आणि त्यांच्यातला सादरकर्ता घडवला. जिल्हास्तरावर त्या त्या भागातले उत्तम कलाकार निवडून त्यांचे कार्यक्रम सादरकरणं आणि स्थानिक श्रोते आणि कलाकारांमध्ये दुवा होणं ही आकाशवाणीची महत्त्वाची ओळख आहे. अवघ्या महाराष्ट्रात 28 केंद्रआहेत. आणि या प्रत्येक केंद्रानं अनेक स्थानिक कलावंतांना ओळख मिळवून दिली आणि महाराष्ट्राच्या साहित्य-संस्कृती-कलेच्या नभंगण लखलखत्या सिताऱ्यांनी सजवलं.

आकाशवाणीचा शिक्का म्हणजे सर्वात मोठं शिफारस पत्र हा मी स्वतः अनेक वेळा घेतलेला अनुभव. याचं मुख्य कारण म्हणजे एकेका कार्यक्रमाची निर्मिती करताना त्यामागे कायस्वरूपी तसंच हंगामी कर्मचाऱ्यांनी घेतलेली जीवापाड मेहनत...आकाशवाणीच्या प्रत्येक केंद्रात संगीत-विभाग, नभो-नाट्य विभाग यांसारखे विविध विभाग आहेत.

शालेय कार्यक्रम, स्त्रियांसाठी कार्यक्रम, बालगोपालांसाठी कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, सैनिकांसाठी, युवकांसाठी कार्यक्रम असे वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित होत असतात. मनोरंजन आणि नावीन्य हा तर प्रत्येक केंद्राचा प्रधान हेतू असतोच, राष्ट्रीय पातळीवर विचार करायचा झाला तर, नवीनलेखक, कलावंत मिळविण्याकरिता अखिल भारतीय स्वरूपाच्या संगीत-स्पर्धा, श्रुतिका स्पर्धा वेळोवेळी आयोजित केल्या जातात. बालकलावंतही अशाच स्पर्धांतून निवडले जातात. आजवर अनेक नामवंत आणि जागतिक कीर्तीच्या कलावंतांच्या कारकिर्दीची सुरवात आकाशवाणीवरून झाली आहे. आज भारतातील ९९.३७% लोकांपर्यंत आकाशवाणीचं प्रसारण पोचतं. आकाशवाणीची एकूण २२९ प्रसारण केंद्रे आहेत. तसेच एकंदर २४ भाषांतून एकूण ३८४ वाहिन्या प्रसारित केल्या जातात.

आकाशवाणीवरून कार्यक्रमाचे नियोजन जेव्हा केले जाते तेव्हा कुटुंबातील आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी फक्त मनोरंजनात्मकच नाही तर ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रसारण करायचे हा पायाभूत विचार हाच असतो आणि कार्यक्रमांच्या सादरीकरणाचे स्वरूप हे संयत, समतोल, सकारात्मक, आणि परिमाणकारक असेच असावे हा आग्रह असतो. दुसरी एक खासियत म्हणजे, आकाशवाणीच्या किंत्येक कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष किंवा फोनवरून किंवा पत्रस्वरुपात श्रोते सहभाग नोंदवू शकतात, शंका विचारू शकतात, समस्या मांडू शकतात. त्यामुळे एका अर्थाने लोकशाही पद्धतीने सामाजिक संवादाचे देखील हे एक प्रभावी मध्यमआहे. आज समाजमाध्यमांचा सुळसुळाट झाला असल्याने याचे महत्त्व कदाचित तितकेसे जाणवणार नाही. एक काळ असा होता जेव्हा पत्र पाठवून ठराविक कार्यक्रमात आपल्या आवडीची गाणी वाजवायला सांगितले जायचे आणि ते गाणे वाजण्याची वाट पाहिली जायची.

मनोरंजन हा ही एक महत्त्वाचा घटक आहेच. भारतीय संगीत, लोकसंगीत, चित्रपटसंगीत, साहित्य, नाटक, कला आणि क्रीडा अशा मनोरंजनाच्या बहुविध घटकांवर आधारित कलात्मक मांडणी असलेले; संगीतसभा, कीर्तन, साहित्यसौरभ, चिंतन, रुपके, नभोनाट्य, चर्चा, भाषणे, मुलाखती, गीतमाला, वनितामंडळ, आपलीआवड, हवामेहेल, पिटारा, क्रिकेट सारख्या खेळाचे धाव ते समालोचन. असे अनेक कार्यक्रम प्रसारित केले जातात. या कार्यक्रमांची खासियत ही की, प्रसारणाच्या भाषाशैलीची दृश्यानुभव देण्याची विशेष क्षमता. या कार्यक्रमांची मांडणी, संहिता अशीच असते की ज्याला वेगळ्या दृश्यांची जोड भासत नाही. काम करता करता रेडीयो ऐकणे हा त्याचाच परिणाम आहे. या सगळ्या सादरीकणातही एक ठळकवैशिष्ट्य म्हणजे स्थानिक उद्घोषक आणि कलाकारांचा सहभाग!

आजवर आकाशवाणीने जनमानसात जे स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे, त्यामागे असलेल्या कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वक्तशीरपणा. कदाचित आपल्या अनेकांच्या लक्षातही येणार नसेल पण आजही असे कित्येक श्रोते आहेत, ज्यांच्या कामाचे वेळापत्रक हे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळेवर आधारित आहे. स्त्रियांसाठी भाषणे, परिसंवाद, गोष्टी, गाणी, मुलांसंबंधीची काळजी कशी घ्यावी, कुटुंबनियोजन, आरोग्यविषयक बाबी, घरकारभार, पोषण वगैरे विषयांवर आधारित कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. तर, ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी शेती, शिक्षण, आरोग्य वगैरें संबंधीची माहिती व ग्रामीण जनतेला रुचतील असे विविध उपक्रम, संवाद, चर्चा, नाटके इत्यादी कार्यक्रम सादर केले जातात.

तरुणाईला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने खासयुवक-युवतींसाठी आकाशवाणीने ‘युववाणी’ नावाचा कार्यक्रम २१ जुलै १९६९ पासून सुरू केला. तर कुमार आणि किशोरवयीन मुलांसाठी आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून २० ते ५० मिनिटांच्या कालावधीचे मुलांसाठीचे विशेष कार्यक्रम सादर केले जातात. जसे पुणे केंद्रावरून ‘बालोद्यान’ हा कार्यक्रम सादर होतो. तर इतर राज्यात स्थानिक भाषां मधून सामान्यत: आठवड्यातून दोन वेळा व काही केंद्रांवरून तीन वेळा असे कार्यक्रम सादर करण्यात येतात. काही केंद्रे हे कार्यक्रम स्थानिक बोली भाषेतूनही प्रसारित करतात. कामगारांच्या समस्य, त्यांचे हक्क अधिकार या काही महत्वाच्या घटकांवर आधारित कामगार श्रोत्यांसाठी आकाशवाणी विशेष कार्यक्रम प्रसारित करते. तर, सीमेवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून दक्ष असणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या जवानांकरिता आकाशवाणीच्या १२ प्रसार केंद्रांवरून दररोज विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. त्यांत लोक प्रिय संगीत, करमणूक इत्यादींचा समावेश असतो.

सैन्याच्या तुकड्या ज्या ज्या ठिकाणी असतील, त्या त्या ठिकाणी काही वेळा जवानांकरिता विशेष संगीत-सभा आयोजित केल्या जातात. जवानांना आपल्या कुटुंबियांकरिता आकाशवाणीच्या ह्या विभागाकडून निरोप पाठविण्याची सुविधा देखिल उपलब्ध करून देण्यात आलीआहे. विविध भारती-सेवांतर्गत ‘जयमाला’ ह्या नावाने विशेष कार्यक्रम दररोज प्रसारित होतो. दर शनिवारी चित्रपट जगातील एक सुप्रसिद्ध व्यक्ती: दिग्दर्शक, गायक, अभिनेता, निर्माता, संगीत-दिग्दर्शकवगैरे - ‘जयमाला’ कार्यक्रम सादर करते. भारतातील विविध जमातींचे संगीत आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आकाशवाणी ९१ जमातींच्या बोलीभाषांतून १७ प्रसार केंद्रांवरून आपल्या कार्यक्रमांचे प्रसारण करते.

आकाशवाणीने लोकसंगीताच्या ध्वनि मुद्रिकांचा एक मोठा संग्रह तयार केलाअसून, साहित्य समारोह, राष्ट्रीय कवि सभा, संगीत संमेलन, गौरव ग्रंथमाला इ. अनेक कार्यक्रमांद्वारा भारतीय जनतेला विभिन्न प्रादेशिक संस्कृतींचा परिचय करून देत आहे. वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रसारण करणाऱ्या आकाशवाणीने बदलत्या काळानुसार अनेक बदल स्वीकारले. कालानुरूप खाजगी FM, TV channels, mobile, इंटरनेट, अशीसंपर्काची, संवादाची, माहिती-मनोरंजन आणि ज्ञान प्रसाराची अनेक माध्यमे निर्माण झाली आहेत. मात्र तरीही आकाशवाणी स्वतःचे वेगळेपण जपून श्रोत्यांशी असलेले आपले नाते टिकवून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, आजही आकाशवाणी आपले ब्रीद वाक्य तंतोतंत पाळते. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ अशाच कार्यक्रमांची निर्मीती आणि प्रसारण करते. म्हणूनच आजवर रेडियोने आपल्या आवाजातली विश्वासार्हता आणि सामाजिक भान कायम राखले आहे.

इतकेच कायतर आता आकाशवाणीची सर्व केंद्र मोबाईलवर ही ऐकू येतात! पुणेकरांसाठी विशेष अभिमानाची बाब म्हणजे न्यूज ऑन एआयआर या एॅपवर पुणे केंद्र नंबर एकवर ऐकलं जातं!! हे सगळं सकारात्मक चित्र असलं तरी, स्थानिक पातळीवरील उमद्या कलाकार, उद्घोषक मंडळींना सामावून घेऊन त्यांना उचित मानधन देऊन, दर्जेदार लोखाभिमुख आणि प्रादेशिक वैशिष्ट्य वैविध्य जपत कार्यक्रमनिर्मिती करणाऱ्या पुण्यासह महाराष्ट्रातल्या सर्वच केंद्राना घरघर लागते की काय असा प्रश्न सर्वांच्या मनात उत्पन्न करणाऱ्या बातम्या गेले काही आठवडे कानावर येतायत पेपरमधून वाचायला मिळतायत. त्या म्हणजे एक राज्य एक केंद्रसारख्या धोरणाविषयीच्या बातम्या काही प्रमाणात या धोरणाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. सरकारचं हे धोरण मात्र अजिबातच स्वागतार्ह नाही. सर्वस्तरातून त्याला विरोध होतो आहे आणि तो रास्तच आहे

यामागचा हेतू काहीही असला तरी या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या इतक्या भाषांमधून सादर होणाऱ्या कार्यक्रमांतला गोडवा त्यातलं वैविध्य एका फटक्यात संपेल आणि मुख्य म्हणजे नवोदित स्थानिक कलाकारांना, उद्घोषकांना, एक राज्य एक केंद्र धोरणात नेमकी किती जागा मिळणार? त्यांचं अस्तित्वच धोक्यात नाही का येणार? स्थानिक घडामोडी, कार्यक्रम यांना प्राधान्य देऊन जे वेगळे पण आणि सर्वसमावेशकता जपली जाते ती संपुष्टात येणार. आणि एका छापाचे सरसकट मांडणीचे कार्यक्रम श्रोत्यांच्या माथी मारले जाणार! हे काही पटणारं नाही. आकाशवणीचा इतिहास आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची गौरवशाली परंपरा पाहता हा निर्णय बदलायला हवा असं जरूर वाटतं. या निर्णया विषयी वाचलं, त्यानिमित्ताने अनेक सहकलाकार, उद्घोषक स्नेहीमंडळी यांच्याशी बोलणं झालं. त्या सगळ्या संवादाचा सूर हाच होता, की आकाशवाणीनं पर्यायाने सरकारनं हा निर्णय मागे घ्यायला हवा. श्रोत्यांनीही याला विरोध केलाच आहे. सरकार सुज्ञ आहे असं आपण मानू कारण ते आपण निवडून दिलेल्या मंडळींनी स्थापन केलं आहे. आणि जर सरकार अविचारी, अहितकारक निर्णय घेत असेल तर विरोधी पक्ष आपलं म्हणणं लावून धरतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

काहीका असेना तुम्हालाही जर हा निर्णय पटत नसेल तर श्रोते, कलाकारवगैरे मंडळींनीही जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्यापासून राज्यापर्यंत राज्यपासून देशापर्यंत आणि उर्वरित जगभरात स्वतंत्र ओळखनिर्माण करून आपल्या मातीशी नाळ घट्ट जोडून ठेवण्याचं मोलाचं काम करणाऱ्या आकाशवाणीने आपली ओळख बदलून चालणार नाही.

- अक्षय प्रभाकर वाटवे

(लेखक, व्हॉइसओव्हरआर्टिस्ट)

9766991421

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.