अविरत संघर्षाची कहाणी

कुतुबुद्दीन ऐबकने दिल्लीत स्थापन केलेल्या गुलाम वंशाच्या राजवटीची अखेर झाल्यानंतर तिथे अल्लाउद्दीन खिलजी व घियासुद्दीन तुघलक यांनी आपल्या राजवटी स्थापन केल्या.
story of endless struggle after Qutbuddin Aibak ended Ghulam Dynasty rule Delhi Allauddin Khilji Ghiyasuddin Tughlaq established rule
story of endless struggle after Qutbuddin Aibak ended Ghulam Dynasty rule Delhi Allauddin Khilji Ghiyasuddin Tughlaq established ruleSakal
Updated on

कुतुबुद्दीन ऐबकने दिल्लीत स्थापन केलेल्या गुलाम वंशाच्या राजवटीची अखेर झाल्यानंतर तिथे अल्लाउद्दीन खिलजी व घियासुद्दीन तुघलक यांनी आपल्या राजवटी स्थापन केल्या. या दोन्ही राजवटींनी राज्यविस्तारासाठी दक्षिणेकडे मोहिमा सुरू केल्या. तिथेही त्यांना तिखट प्रतिकाराला आणि कडव्या संघर्षाला सामोरं जावं लागलं.

घियासुद्दीन तुघलकने वारंगळला प्रतापरुद्राकडे निरोप पाठवला, की बऱ्या बोलाने खंडणी सुरू कर नाहीतर संपूर्ण विनाशाला तयार हो. प्रतापरुद्राने तरीही खंडणी देण्यास नकार दिल्यावर त्याने आपला मुलगा उलुघखान याला मोठे सैन्य घेऊन वारंगळकडे पाठविले. प्रतापरुद्र व काकतीय सैन्याने पाच महिने कडवा संघर्ष केला.

पण अन्नधान्य संपून गेल्यामुळे किल्ल्याचे दरवाजे उघडून त्यांना शरणागती पत्करावी लागली. तुघलक सैन्याने वारंगळ शहर संपूर्णपणे उद्ध्वस्त केले, मंदिरे फोडली, कत्तली केल्या, फक्त ज्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला तेच वाचले.

उलुघखानाने प्रतापरुद्राला त्याच्या कुटुंबीयांसह कादिर खान व ख्वाजा हाजी यांच्या निगराणीत दिल्लीला पाठविले. नर्मदा नदीच्या तीरावर त्यांचा मुक्काम असताना प्रतापरुद्राने आत्महत्या केली. अशा रीतीने काकतीय वंशाचा अंत झाला व वारंगळ, सुलतानपूर या नव्या नावाने सल्तनतीच्या अमलाखाली आले.

चालुक्यांच्या साम्राज्यात सुभेदारी करणाऱ्या काकतीय वंशाच्या प्रतापरुद्र याने इ.स.११६३ मध्ये ओरगल्लू म्हणजेच सध्याच्या तेलंगणमधील वारंगळ येथे काकतीय राजवटीची स्थापना केली. इ.स. १३१० मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार मलिक कफूरने वारंगळवर हल्ला केला.

चार महिने चाललेल्या वेढ्यानंतर त्याने प्रचंड लूट केली आणि नियमित खंडणी देण्याच्या बोलीवर तो वेढा उठवून परत गेला. तेव्हाचा काकतीय राजा प्रतापरुद्र ( दुसरा ) याने खंडणी देणे लवकरच बंद केले. तोपर्यंत अल्लाउद्दीन खिलजीचा पंजाबचा सुभेदार खुसरोखान याने दिल्लीच्या गादीवर ताबा मिळविला होता. त्याला ठार करून घियासुद्दीन तुघलकने तुघलक राजवटीची सुरवात केली.

इ.स. १३२५ मध्ये उलुघखानने पिता घियासुद्दीन तुघलकचा व स्वतःच्या भावाचा खून केला आणि महंमद बिन तुघलक हे नाव धारण करून तो दिल्लीच्या तख्तावर बसला. त्याने वारंगळवरील स्वारीच्या वेळी मलबार, मदुराई हा कर्नाटकच्या दक्षिणेकडील प्रदेशही जिंकून घेतला होता. तिथे त्याने सारा वसुलीसाठी अधिकारी नेमले व कोणी उठाव करू नये म्हणून सैन्यही ठेवले.

काकतीय वंशाच्या प्रशासन पद्धतीत विविध प्रदेशांच्या प्रमुखांना फार महत्त्वाचे स्थान असे. या प्रमुखांची निवड अतिशय काळजीपूर्वक केली जात असे व त्यांना बरेच अधिकारही असत. प्रतापरुद्राने अशा ७५ नायकांची नेमणूक केली होती. तुघलकाची राजवट अतिशय जुलमी होती.

त्याने शेतकऱ्यांवर आधीच्या तुलनेत दहा ते वीस टक्के अधिक कर बसवला होता. कर न भरणाऱ्यांना कुठलीही सूट न देता कठोर शिक्षा केली केली जात असे. यामुळे अनेक शेतकरी शेती सोडून जंगलात पळून गेले.

या जुलमाला कंटाळून शेवटी नायकांनी बंड केले. इ.स. १३२५ मध्ये त्यांनी गोदावरी नजीकच्या प्रदेशात स्वतंत्र कारभार करायला सुरवात केली. १३३३ मध्ये या बंडाचे नेतृत्व कपाय नायक याच्याकडे आले. कपाय नायकाने तुघलकच्या सैन्याला वारंगळहून पळवून लावण्याचा निर्धार केला. त्याने सगळ्या नायकांना एकत्र केले व रणनीती आखली.

यानुसार ठिकठिकाणी तुघलकच्या सैन्याशी त्यांच्या चकमकी सुरू झाल्या. १३३६ मध्ये कपाय नायकाने वारंगळ येथे तुघलकाने नेमलेला प्रमुख मलिक मकबूल याचा पराभव केला. या लढाईत त्याच्याबरोबर ७५ नायकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी मुस्लीम सैन्याला वारंगळहून हाकलून दिले व वारंगळसह तेलंगणाच्या पूर्वेकडील प्रदेशाची तुघलकी राजवटीपासून मुक्तता केली. त्याने सुलतानपूर हे नाव बदलून वारंगळ हे मूळ नाव परत ठेवले आणि हिंदूंच्या राज्याची पुनर्स्थापना केली.

शेजार-पाजारच्या प्रदेशातील लोकांनाही त्याने इस्लामी आक्रमकांविरुद्ध लढण्यात मदत केली. कपाय नायकाने १३६८ पर्यंत तेलंगण प्रदेशावर राज्य केले. या प्रदेशातील लोकांना स्थैर्य मिळवून दिले. काकतीय वंशाचे राजे, तसेच त्यांनी नेमलेले नायक हे शूद्र मानल्या गेलेल्या बहुजन समाजातील जातींचे होते, ही विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट आहे.

मेवाड राजघराणे म्हणजे जाज्वल्य देशप्रेम आणि अतुलनीय शौर्य यांची शतकानुशतके चाललेली गाथाच. बाप्पा रावळ, राणा संग, महाराणा प्रताप अशा महावीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मेवाडची भूमी एकदाच पारतंत्र्यात ढकलली गेली. २५ वर्षांच्या आत मोहम्मद तुघलकाचा मोठा पराभव करून तिला पुन्हा स्वतंत्र करणाऱ्या मेवाडच्या एका सुपुत्राची ही कहाणी.

आपला काका जलालुद्दीन खिलजी याला ठार करून अल्लाउद्दीन खिलजी इ.स. १२९० मध्ये दिल्लीचा सुलतान झाला. इ.स.१३०३ मध्ये त्याने चितोडवर हल्ला करून चितोडच्या किल्ल्याला वेढा घातला. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर चितोडचा राजा रावळ रतनसिंग आपल्या सैन्यासह जिंकू किंवा मरू या निर्धाराने किल्ल्याबाहेर पडला.

घनघोर संग्रामानंतर राजपुतांची हार झाली. राणी पद्मिनी व इतर राजपूत स्त्रियांनी जोहार करून आपल्या सन्मानाचं रक्षण केलं. पण पहिल्यांदाच मेवाडची पवित्र भूमी मुसलमान अमलाखाली गेली. या लढाईच्या वेळी मारला गेलेला रावळ रतन सिंग याला मूलबाळ नव्हते.

मेवाड राजकारणाचे सर्व राजपूतही मारले गेले. बाप्पा रावळचा वंशज असलेल्या लक्ष्मणसिंहचा मुलगा अजयसिंग व त्याचा तान्हा पुतण्या हमीरसिंग हे राजघराण्याचे दोनच वंशज शिल्लक राहिले होते.

असे म्हणतात, की या अजयसिंगाचा मुलगा सज्जनसिंग महाराष्ट्रात जाऊन स्थायिक झाला होता. लहानग्या हमीरसिंगच्या सुरक्षेसाठी अजयसिंग त्याला कुंभलगढमधील केलवारा येथे घेऊन गेला. तिथून अजयसिंगने मुस्लिमांच्या ताब्यातील चितोडच्या किल्ल्यावर गनिमी हल्ले सुरू केले. त्याने हमीरसिंगला राजपूत परंपरेचे सर्व संस्कार दिले आणि युद्धकलेतही निपुण बनवलं.

१३२० साली अजयसिंगचा मृत्यू झाल्यानंतर मेवाडच्या गादीचा एकमेव वारस असलेल्या हमीरसिंगला मेवाडचा राजा घोषित करण्यात आलं. त्याने लहान वयातच आजूबाजूच्या प्रदेशात लुटालूट करणारा मुंजा बालेचा याला ठार केलं. त्यामुळे लोक त्याचा आदर करू लागले. अल्लाउद्दीन खिलजीने, त्याला लढाईत मदत करणारा कांतालिया संस्थानाचा राजा मालदेव यांच्याकडे मेवाडची हुकूमत सोपविली होती.

हमीरसिंगच्या वाढत्या प्रभावामुळे चिंतित झालेल्या मालदेवने त्याच्याशी नातेसंबंध जोडण्याची योजना आखली व आपली अल्पवयात विधवा झालेली कन्या सोनगारी हिच्याशी लग्न करण्याची हमीरसिंगला विनंती केली.

विधवांच्या पुनर्विवाहाची पद्धत त्या काळी फारशी प्रचलित नसतानाही दिलदार हमीरसिंगने विवाहला होकार दिला. पण विवाह संबंध जोडला की हमीरसिंग आपल्याविरुद्ध जाणार नाही हा मालदेवचा अंदाज चुकला. हमीरसिंगने आपल्या सासऱ्याविरुद्ध बंड करून इ.स. १३२६ मध्ये मेवाडच्या गादीवर कब्जा केला.

या वेळेपर्यंत दिल्लीतील खिलजी राजवट संपून तुघलक राजवटीला सुरवात झाली होती. ''वेडा महंमद'' म्हणून प्रसिद्ध असलेला अत्यंत लहरी आणि क्रूर असा महंमद बिन तुघलक गादीवर बसला होता. राजस्थानवर संपूर्ण कब्जा करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या महंमद तुघलकाने अजमेर, रणथंबोर, नागौर, शिवपुरी ही राजपूत राज्ये एकामागून एक पादाक्रांत करत चितोडवर हल्ला चढवला. राणा हमीरसिंगपेक्षा चौपट मोठं सैन्य असलेला धर्मवेडा, अहंकारी महंमद तुघलक विजयासाठी आतुर होता.

राणा हमीरसिंगकडे सैन्य कमी असलं, तरी तो युद्धकलेत व डावपेचात निपुण होता आणि अरवलीच्या दऱ्याखोऱ्यांशी पूर्णपणे परिचित होता. दोन्ही सैन्यांची नीमचजवळील सिंगोली येथे गाठ पडली. स्थानिक भिल्ल आणि चरण या आदिवासी जमातींची हमीरसिंगला साथ होती. त्यांनी सुलतानाच्या सैन्यावर गनिमी हल्ले करायला सुरवात केली.

हमीरसिंगनेही राजपुतांचा नेहमीचा धर्मयुद्धाचा हट्ट सोडून कूटयुद्धाचा अवलंब केला. दग्धभू (Scorched Earth) धोरण स्वीकारून त्यांनी शत्रूच्या सैन्याला दाणापाणी मिळणं अशक्य करून टाकलं. गावंच्या गावं रिकामी केली, शेतातलं पीक जळून टाकलं, विहिरींमध्ये विष टाकलं. अपरिचित जागा, खाण्यापिण्याचे हाल आणि अचानक होणारे गनिमी हल्ले यामुळे तुघलकच्या सैन्याचं मनोधैर्य खचू लागलं. ही योग्य वेळ येताच, हमीरसिंगने सुलतानाच्या सैन्यावर निकराचा हल्ला चढवला.

राजपूत सैन्याने सुलतानाच्या सैन्याचा पुरता विध्वंस केला. स्वतः महंमद तुघलक राजपुतांच्या हातात सापडला. तुघलक राजवटीने पाच लाख रुपये आणि रणथंबोर, नागौर, शिवपुरीची राज्ये देऊन सुलतानाची सुटका करून घेतली. अशा रीतीने संपूर्ण राजपुताना स्वतंत्र झाला. यानंतर तुघलक राजवटीने व दिल्लीतील नंतरच्या दोन राजवटींनी राजपुतांच्या वाटेला जाण्याचं धाडस केलं नाही.

आज आपल्याला अल्लाउद्दीन खिलजी आणि महंमद तुघलकाच्या विजयांचा इतिहास आवर्जून शिकवला जातो, पण राणा हमीरसिंगचा मात्र इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मागमूसही आढळत नाही. असं का ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.