गरज पालकांच्या समुपदेशनाची!

तणावग्रस्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण पुन्हा वाढत चाललं आहे. यंदा दहावी-बारावी निकालानंतर राज्यातील जवळपास १८ विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं.
students counseling
students counseling sakal
Updated on

तणावग्रस्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण पुन्हा वाढत चाललं आहे. यंदा दहावी-बारावी निकालानंतर राज्यातील जवळपास १८ विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं. पालकांच्या मनात ‘स्पर्धा’ डोकावते आणि त्यात मुलांची कसरत होते. खरं म्हणजे, मुलांपेक्षा पालकांच्याच समुपदेशनाची सध्या अधिक आवश्यकता आहे.

एनसीआरबीच्या २०२१ च्या माहितीनुसार भारतात १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या निकालानंतर जवळपास १८ विद्यार्थ्यांनी तणावापोटी आपलं जीवन संपवल्याचं पुढे आलं आहे. कोटामधल्या आत्महत्यांच्या बातम्या आपण वेळीवेळी वाचत असतो. ही सगळीच आकडेवारी अतिशय अस्वस्थ करणारी आहे.

या देशाची, आपल्या समाजाची पुढची पिढी, ज्यांच्या बळावर हा देश आणि आपला समाज चालणार आहे त्यांना आपण कुठल्या नैराश्याच्या गर्तेत ढकलतो आहोत याचा फार गांभीर्याने विचार करण्याची आज गरज आहे. हा मुद्दा फक्त दहावी, बारावी किंवा कोटामधल्या कोचिंग क्लासेसपुरता मर्यादित नाही.

जागतिक आरोग्य संस्थेनुसार भारतीय टिनेजर्स आणि तरुणाई यांच्यात नैराश्याची गंभीर समस्या आहे. कुटुंब व्यवस्था म्हणून, समाज म्हणून आपल्या मुलांना, तरुणांना पुरेसं पोषक आणि सुदृढ वातावरण द्यायला आपण कमी पडतोय का, याचाही आता विचार करायला हवा आहे.

एकीकडे प्रचंड लोकसंख्या, दुसरीकडे बेरोजगारी आणि वाढती महागाई, सोशल मीडियामुळे जगाचं प्रचंड एक्सपोजर या सगळ्या गुंतागुंतीत आपली मुलं अडकलेली आहेत. ती जन्माला येत नाहीत; तर पालकांच्या मनात स्पर्धा नावाचा अँटिना उभा राहतो. तो कुठल्या शाळेत जाईल, कोणत्या ब्रँडचे वस्तू वापरेल, कुठल्या हॉटेलात जेवेल, कुठल्या मॉलमध्ये किती शॉपिंग करेल या सगळ्याचा विचार करताना आणि त्यासाठी पैशांची तजवीज करताना आपल्या मुलांना या सगळ्या आधी जगण्याचा आनंद घ्यायला शिकवणं गरजेचं आहे हे लक्षात येत नाही.

अर्थात यात त्या पालकांचीही चूक नाहीय म्हणा. ते स्वतःही ‘रॅट रेस’ नावाच्या राक्षसाच्याच गुहेत मोठे झालेले आहेत. त्यांच्या पालकांनी पाजलेलं बाळकडूच ते त्यांच्याही मुलांना देताहेत. माणसांना जगण्यासाठी नक्की काय लागतं, याचा विचार किती पालक करतात? करू शकतात? चांगल्या शाळा-कॉलेजमध्ये शिकलं तर चांगली नोकरी मिळेल, चांगली नोकरी-चांगला पगार, घर, गाडी, उत्तम कपडे, परदेशी प्रवास, लग्नाच्या बाजारात उत्तम भाव हे सगळं मिळवून देईल.

हे सगळं एकदा मिळालं की आपलं मूल ‘सेटल’ होईल हा हिशेब आजच्या मुलांच्या आजी-आजोबांनी लावला होता, तोच आता त्यांचे आई-बाबा लावत आहेत. त्यात त्यांचीही चूक नाही म्हणा, वाढणाऱ्या महागाईत मनासारखं, सुखवस्तू आयुष्य जगायचं असेल तर या मार्गाला पर्याय त्यांना दिसत नाही. दाखवला जात नाही. समाजाकडून वेगळ्या मार्गांची अपेक्षाही केली जात नाही. मग ते तरी करणार काय?

मुलांनी प्रचंड मेहनत घ्यावी, प्रचंड मार्क मिळवावेत, खूप शिकून प्रचंड मोठी पॅकेजेस मिळवून आयुष्य सेटल करून टाकावं यासाठी सगळ्यांची धडपड सुरू आहे, हे खरंच; पण या सगळ्यात त्या मुलांवर येणाऱ्या ताणाचं करायचं काय, हे ना शाळांच्या लक्षात येतंय, ना पालकांच्या. मानसिक आरोग्य हा विषय अजूनही म्हणावा तसा ‘नॉर्मल’ झालेला नाही.

एकीकडे तरुणाईमध्ये थेरपी घेतो याला ग्लॅमर आहे; तर दुसरीकडे त्याविषयी प्रचंड शरम. आपलं पाल्य ताणात आहे हे अनेक पालकांच्या मुळात लक्षातच येत नाही. कारण मुलांमध्ये नैराश्य असू शकतं हेच अनेकांना माहीत नसतं. नैराश्य हा फक्त मोठ्यांच्या जगाचा आणि त्यातही शहरी मोठ्यांच्या जगण्याचा भाग आहे, असाच अजूनही अनेकांचा समज आहे.

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला ताण कमी व्हावा म्हणून ४१० समुपदेशकांची नियुक्ती राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने झालेली असली तरी त्याची माहिती विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोचलेली नाही, असा मोठा आक्षेप शिक्षण क्षेत्रातून घेतला जातोय. आत्महत्या करणाऱ्या मुलांमध्ये फक्त दहावी-बारावीची मुलं आहेत, असं नाही; तर नववीच्या मुलांचीही संख्या बरीच आहे. ताणाच्या या राक्षसावर वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात शाळा-कॉलेज अन् घरापासून होते.

आपल्या मुलांचं यश म्हणजे आपला मानसन्मान या भावनेतून पालक, शिक्षक आणि शाळांनी आधी बाहेर पडलं पाहिजे. शालेय जीवनात यश मिळालं तरच माणूस आयुष्यात यशस्वी होतो हे गृहीतक बाजूला ठेवून आपल्या मुलांना नेमकी कशात गती आहे, हे समजून घेतलं पाहिजे. शिक्षकांनी शोधलं पाहिजे. नऊ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात, असं हॉवर्ड गार्डनरने नोंदवले आहे.

जर सगळ्या मुलांची बुद्धिमत्ता एकाच प्रकारची नसते तर त्यांच्याकडून आपण एकाच प्रकारच्या निकालाची अपेक्षा करणं किती चुकीचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. बुद्धिमत्तेचे प्रकार फक्त बुद्धिमत्ता चाचणीसाठी समजून घ्यायचे नाहीयेत तर त्यावर आपल्या जगण्याचा पाया अवलंबून आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

शाळेत गणितात टॉप असलेला विद्यार्थी म्हणजेच फक्त हुशार विद्यार्थी आणि चित्रकला, संगीत, संवाद यांमध्ये निपुण असलेली मुलं हुशार चौकटीत मोडत नाहीत, असा विचार करणं हाच त्याच्यावर झालेला प्रचंड मोठा अन्याय असतो. ताणाचे मुद्दे अशा अनेक लहानसहान गोष्टींमधून तयार होत जातात. त्यांची पुटं चढत जातात आणि मग त्याखाली ते वाढीच्या वयातलं मन पार कोमेजून जातं.

आपल्याला जे उत्तम येतं आणि जे येत नाही यांच्याबाबत त्यांच्या मनात एक प्रचंड संघर्ष सुरू होतो. या संघर्षाला तोंड देण्यासाठीचं बळ प्रत्येकाकडे असेलच, असं नाही. काही मुलांना या सगळ्या ताणाला तोंड कसं द्यायचं, यातून मार्ग काढायचा कसा हेच समजत नाही. काहींना घरून मदत मिळते, काहींना तीही नाकारली जाते. त्यांच्याकडून फक्त आणि फक्त ‘रिझल्ट’ची अपेक्षा केली जाते.

या सगळ्यात त्या वाढणाऱ्या, हजारो प्रश्न मनात येणाऱ्या जीवाचे काय हाल होत असतील, याचा कधी विचार केला आहे का? पालकांच्या, शिक्षकांच्या अपेक्षा जर आपण पूर्ण करू शकलो नाही तर...? हा विचारच त्यांना आतल्या आत खाऊन टाकतो. अपेक्षा असाव्यात; पण किती आणि किती टोकदार हे ठरवणं आज आवश्यक आहे.

आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली जर मुलांची घुसमट होणार असेल तर यश मिळवून तरी उपयोग काय? खूप यशस्वी; पण नैराश्याने ग्रस्त आयुष्य आपल्या मुलांच्या वाट्याला का यावं? निदान तसं असू नये यासाठी तरी आपण प्रयत्न करणं लागतो.

आपल्यावर अपेक्षांचं ओझं आहे म्हणून मुलांवरही ते टाकलंच पाहिजे, असं नाही. मुलांना त्यांची ओझी ठरवू देणं, ती कमी-अधिक करण्याची तयारी ठेवणं, अपयश आणि यशाच्या व्याख्या नीट ठरवता येणं, त्या मुलांना शिकवणं, जगण्यासाठी नेमकं काय हवं यावर मुलांशी चर्चा करताना त्याविषयी पालक, शिक्षकांना पुरेशी स्पष्टता असणं आणि आपलं मूल आनंदी कसं राहील हे बघणं आज तरी नितांत गरजेचं आहे.

मला काम करताना अनेकदा वाटतं आपण मुलांच्या समुपदेशनाबद्दल इतका विचार करतो; पण अनेकदा त्यांच्यापेक्षा पालकांना समुपदेशनाची अधिक आवश्यकता असते. त्यामुळे राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेने पालकांच्या समुपदेशनासाठी खरं तर आता प्रयत्नरत व्हायला हवे आहे, तरच मुलांचे प्रश्न सोडवण्याच्या दिशेने आपल्याला एक पाऊल अधिक टाकता येईल.

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका ‘सायबर मैत्र’च्या संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.