नियती आणि व्यवस्थेच्या भोवऱ्यातला संघर्ष

कुठलीही आपत्ती ही माणसाचं जीवन उद्ध्वस्त करते. त्यात जर महापुरासारखं प्रचंड मोठं संकट असेल, तर मग कसे आणि किती हाल होतात याचं वर्णनच करता येत नाही.
tya madhyaratrinantar book
tya madhyaratrinantar booksakal
Updated on

- जे. आर. मराठे, saptrang@esakal.com

कुठलीही आपत्ती ही माणसाचं जीवन उद्ध्वस्त करते. त्यात जर महापुरासारखं प्रचंड मोठं संकट असेल, तर मग कसे आणि किती हाल होतात याचं वर्णनच करता येत नाही. मात्र लक्ष्मीकमल गेडाम यांनी ‘त्या मध्यरात्रीनंतर...’ या कादंबरीतून एका भळभळत्या वेदनेला शब्दरूप दिलं आहे. राज्यात काही वर्षांपूर्वी मोवाडला महापूर आला होता. त्या महापुरात मोवाड आणि आसपासच्या काही गावांचं प्रचंड नुकसान झालं होतं.

गेडाम यांनी या गावाचं आणि भोवतालच्या गावांची नावं आणि काही बाबी तशाच ठेवल्या आहेत. अनेक सत्यघटनांचा आधार घेऊन या कादंबरीच्या माध्यमातून एक खूप मोठं जग जिवंतपणानं उभं केलंय. या कादंबरीत काय नाही, तर सगळं काही आहे. सगळं म्हणजे मनुष्य स्वभावाचे नमुने, सरकारी यंत्रणा तसंच सावकारी पद्धत आणि सामान्य माणसाचा संघर्ष नातेसंबंधातला गुंता आणि परिस्थिती नावाचं या सगळ्यांना घेरून टाकणारं एक मोठं रहस्यचक्र. नियती आणि नशीब ही त्याची दुसरी नावं.

रमा आणि मुकुंद ही दोन मुख्य पात्र आणि त्यांचा मुलगा मुरली या सगळ्यांचा संघर्ष, त्यांनी त्यांच्यावर आलेल्या संकटाला दिलेले तोंड हे सगळं या कादंबरीत येतं. पूर आल्यावर नेमकी काय संकट येतात, ते बातम्या आणि लेख यातून कितीही समजलं, तरी त्यांची भीषणता आणि ज्यांच्यावर हे संकट कोसळतं म्हणजे त्यांची काय अवस्था काय होते हे कळत नाही, ते या कादंबरीतून कळतं.

पुरामुळं जे एकेकाळी सधन शेतकरी होते, त्यांच्या जमिनीची वाताहत झाल्यानं त्यांना दुसऱ्याच्या शेतावर मजूर म्हणून जावं लागणं हे किती भयानक आहे, ते यातल्या काही पात्रांच्या जीवनातून कळतं. रेशन दुकानातला भ्रष्टाचार गरीब माणसाच्या जीवावर कसा बेततो आणि एखादा प्रामाणिक अधिकारी त्या दुकानदाराला कसा धडा शिकवतो आणि गरीब माणसाची चूल कशी पेटेल याकडं लक्ष देतो, हे देखील यातून कळतं.

सरकारी यंत्रणा मदतीच्या बाबतीत काही काळानंतर किती निष्ठुर होते ते जसं जाणवतं, तसंच एखादा कर्तबगार जिल्हाधिकारी असेल, तर किती तडफेनं तो पुनर्वसनाचं काम मार्गी लावू शकतो याची कल्पना येते.

कादंबरी घडते ती सगळी ग्रामीण भागात. त्यामुळं तिथलं वातावरण आणि तिथली भाषा येणं अगदी स्वाभाविक आहे. पण इथं गेडाम यांनी ती ओढून ताणून आणली आहे, असं कुठंही वाटत नाही. शहरातल्या अधिकाऱ्यांचे प्रसंग मांडताना ही भाषा जितक्या सहजतेने नागरी होते, तितक्याच सहजतेनं बोली भाषेतील संवाद इथं येतात.

कादंबरीत सगळीकडं जाणवते ते संवेदनशीलता. गेडाम यांनी सगळ्या व्यक्तिरेखा सकारात्मक आणि त्यांची मांडणी संवेदनशीलतेनं केली आहे. त्यामुळं वाचक कथानकात गुंतून जातो. त्यातल्या पात्रांच्या संघर्षानं तो अस्वस्थ होतो. त्याचबरोबर प्रवाही भाषेमुळं त्याला कुठंही कंटाळा येत नाही.

महापुराने सगळं गाव संकटात टाकलं होतं. त्या संकटातून बाहेर येण्यासाठी सगळ्यांचाच संघर्ष सुरू होता. एका महापुराचा धक्का पुढची काही वर्षं लोकांच्या मनावर कोरला गेलेला असतो. एखाद्या वर्षी पाऊस जरा जोरात पडला तरी सगळ्यांचा जीव धास्तावतो. हे सगळं गेडाम यांनी या कादंबरीत नेमकेपणानं मांडलं आहे.

केंद्रीय मंत्र्यांचा पाहणी दौरा, सरकारी यंत्रणांचं वागणं हे सगळं थोडक्या शब्दांत गेडाम इथं मांडतात. महापुराच्या आपत्तीतली विदारकता दाहकता त्या मांडतातच पण जगण्यासाठीच्या संघर्षाचा माणसाची तीव्र इच्छा, जिद्द आणि या सगळ्याचा पाया म्हणजे आशावाद हे सगळं नेटकेपणानं कादंबरीतून व्यक्त होतं.

काडी काडी विस्कटून टाकणारा महापूर काय काय करतो, हे अक्षरशः संदर्भाच्या अनेक काड्या जुळवत त्याला नातेसंबंधाचा जोड देत एक मोठा परीघ गेडाम उभ्या करतात. माजी राजनैतिक अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची प्रस्तावना, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांचे आशीर्वादपर शब्द कादंबरीचा वेगळेपणा आणि कादंबरीची बलस्थानं नेमकेपणानं सांगतात.

गेडाम यांनी म्हणींचा केलेला चपखल वापर त्याचबरोबर बोलीभाषेतले अनेक शब्द, ग्रामीण भागातली गाणी, ग्रामीण भागात वापरले जाणारे वाक्प्रचार यामुळं कादंबरी वेगळ्या विश्वात नेते. मुकुंद आणि रमाचा संघर्ष, दवाखान्यात मुकुंदावर उपचार करताना त्यासाठी लागणारे पैसे उभे करताना रमाची होणारी धावपळ, हे सगळं अस्वस्थ करतं.

रमा आणि मुरलीचं माय-लेकरांचं नातं हे सारं हृदयाला भिडतं. ग्रामीण शहाणपण तसंच तिथली निरागसता, साधेपणा हीदेखील वाचकाला हळवी करते. कुठलाही प्रचारकी आव न आणता रमा आणि मुकुंद यांचं जीवन वाचकाच्या मनाचा ठाव घेतं. हे कादंबरीचं मोठं यश आहे.

पुस्तकाचं नाव : त्या मध्यरात्रीनंतर...

लेखिका : लक्ष्मीकमल गेडाम

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन, पुणे

(०२०- २५४४२४५५, ७३५०८३९१७६)

पृष्ठं : ३३६ मूल्य : ६०० रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.