Sahakartirtha Book : सहकारातील कर्तृत्वाची यशोगाथा

गुलाबराव पाटील हे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सहकार चळवळीत आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटविलेले व्यक्तिमत्त्व होते.
Sahakartirtha Book
Sahakartirtha BookSakal
Updated on

- मिलिंद जोशी

गुलाबराव पाटील हे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सहकार चळवळीत आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटविलेले व्यक्तिमत्त्व होते. सहकार चळवळ आज ज्या टप्प्यावरती उभी आहे, तो टप्पा गाठण्यासाठी गुलाबराव पाटील यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांनी दिलेले योगदान आहे. सहकार, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे लोकनेते म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल.

त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा ‘सहकारतीर्थ’ या पुस्तकातून उलगडते. पुस्तकाचं संपादन अभय कुलकर्णी यांनी केले असून गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टने ते प्रकाशित केले आहे. गुलाबरावांचा जन्म बेळगांव जिल्ह्यातील बेनाडी गावचा. त्या काळी हा भाग मुंबई इलाख्यात होता. कोल्हापूरमधून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सातारा येथे वकिली केली. त्याचवेळी लोकनेते यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचं त्यांच्याकडं लक्ष गेलं.

गुलाबरावांचा अफाट जनसंपर्क, अभ्यासूवृत्ती, त्यांचं संवादकौशल्य, त्यांना असलेली समाजाच्या प्रश्नांची जाण आणि त्यांचे नेतृत्वगुण पाहून प्रभावित झालेल्या चव्हाण आणि पाटील यांनी त्यांना सांगलीला आणलं. पुढं गुलाबरावांना सांगलीचं नगराध्यक्ष केलं.

सांगली जिल्हा सहकारी बोर्डाच्या कामाला त्यांनी लोकसहभागातून चालना दिली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते सोळा वर्ष अध्यक्ष होते. बँकेच्या ठेवी चार लाखांवरून पंधरा कोटींपर्यंत नेण्याची ऐतिहासिक देदीप्यमान कामगिरी त्यांच्या कार्यकाळात झाली.

त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने बँकेच्या कार्याला दिशा दिली. लहान-मोठे उद्योजक निर्माण केले. गरीब, मध्यमवर्गीय आणि शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्या कष्टकरी वर्गाला त्यांनी आर्थिक पत मिळवून दिली. गरजू शेतकऱ्यांना वेळेवर अर्थपुरवठा करून त्यांच्या आर्थिक गरजा भागवल्या.

दुग्ध व्यवसायांसारखे शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. सहकारात संस्थात्मक कार्याचा आदर्श वस्तुपाठ गुलाबरावांनी निर्माण केला. राज्य सहकारी संघाचे ते दहा वर्ष अध्यक्ष होते.

पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळाचे ते सहा वर्ष अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे ते दोन वर्ष अध्यक्ष होते. तसेच दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी संघाचे ते पाच वर्ष सरचिटणीस होते. या संपूर्ण काळात त्यांनी सहकारी चळवळीला बळ, गती आणि दिशा दिली.

याचकाळात त्यांना अनेक अभ्यास दौऱ्यामुळे परदेशांत भेटी देण्याचा योग आला. तिथे कोणते नवे प्रयोग केले जातात याचाही अभ्यास त्यांनी केला आणि त्याची अंमलबजावणी आपल्या देशात आणि विशेषत: राज्यात व्हावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. ही त्यांच्या कर्तृत्वाची गाथा या पुस्तकात वाचण्यास मिळते.

गुलाबराव चार वर्ष राज्याच्या विधान परिषदेत कार्यरत होते. त्या काळात त्यांनी सहकाराचा महत्त्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी उत्तम प्रकारे पक्षाची बांधणी केली. त्या वेळी इंदिरा गांधी पक्षाचे नेतृत्व करीत होत्या. गुलाबराव बारा वर्ष राज्यसभेचे सदस्य होते.

त्यांचं इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आणि व्यासंगामुळे त्यांची भाषणे गाजली. त्यांनी या काळात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या राजीनाम्यानंतर गुलाबरावांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होतं. नरसिंहराव त्या वेळी निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते. त्यांनीही त्यांच्याच नावाची शिफारस केली होती. पण ती संधी कशी हुकली. ते देखील या पुस्तकात आहे.

गुलाबराव हे पुरोगामी आणि स्पष्ट विचाराचे, निष्कलंक चारित्र्याचे, वैचारिक बैठक पक्की असणारे, सकारात्मक दृष्टिकोनातून राजकारण आणि समाजकारणाकडं पाहणारे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी जन्मभर तत्त्वनिष्ठ राजकारण आणि समाजकारण केलं.

सामान्य माणसाला सहकारी चळवळीचा पाया मानले. पक्ष संघटनेत कार्यकर्त्याला केंद्रस्थानी ठेवलं म्हणून त्यांचं नेतृत्व आणि कार्य समाजाच्या लक्षात आहे. त्यांनी सहकारी चळवळीला कायम लोकशाही चळवळ मानलं. त्यात सरकारांचा हस्तक्षेप असता कामा नये.

चळवळीतील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी योग्य ती कडक पावलं उचलली पाहिजेत असे त्यांचे विचार होते. त्यावर आज चिंतन होणं आवश्यक आहे. १९७० मध्ये सातारा येथे सहकारी कार्यकर्ते परिषद झाली.

दहा हजार कार्यकर्ते या परिषदेला उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण त्या वेळी देशाचे अर्थमंत्री होते. यशवंतराव मोहिते यांनी सहकार चळवळीची श्वेतपत्रिका जाहीर केली होती. जिल्हा बँकांच्या ऐवजी तालुका बँका काढायच्या असा यशवंतराव चव्हाण यांचा विचार होता.

त्या वेळी गुलाबरावांनी ग्रामीण जीवनात परिवर्तन घडविण्यात जिल्हा बँकेनी दिलेले योगदान आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केलं आणि असा निर्णय यशवंतराव चव्हाण यांनी घेऊ नये, असं भाषणात सांगितलं.

ते त्यांनी इतक्या प्रभावीरीत्या सांगितलं, की चव्हाण यांनीही ते मान्य केलं आणि जिल्हा बँकांचा पाया मजबूत असल्याचं आपल्या भाषणात जाहीर केलं. व्यासंगी, चतुःरस्र, सहकार क्षेत्रासाठी क्रांतिकारी निर्णय घेऊन दीपस्तंभ ठरलेल्या गुलाबरावांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व या पुस्तकात उलगडलंय. राजकारणी, सहकार क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आणि उदयोन्मुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल, असं हे वाचनीय पुस्तक आहे.

पुस्तकाचं नाव : सहकारतीर्थ

संपादन : अभय कुलकर्णी

शब्दांकन : सुकृत करंदीकर

प्रकाशन : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट (०२३३-२२११०१३, ९८२२०५८१६६, ९९२२९५९००९)

पृष्ठं : २००

मूल्य : २५० रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.