गांधीजी-मंडेलांपासून दूर गेलेला आजचा दक्षिण आफ्रिका

‘बाबा, मला दक्षिण आफ्रिकेत आता राहायचं नाही. इथं मला कोणतंही भवितव्य नाही. मी दुसऱ्या कोणत्या तरी देशात जाऊन शिक्षण घेईन आणि तिथंच राहीन...’
mahatma gandhi and nelson mandela
mahatma gandhi and nelson mandelasakal
Updated on
Summary

‘बाबा, मला दक्षिण आफ्रिकेत आता राहायचं नाही. इथं मला कोणतंही भवितव्य नाही. मी दुसऱ्या कोणत्या तरी देशात जाऊन शिक्षण घेईन आणि तिथंच राहीन...’

‘‘बाबा, मला दक्षिण आफ्रिकेत आता राहायचं नाही. इथं मला कोणतंही भवितव्य नाही. मी दुसऱ्या कोणत्या तरी देशात जाऊन शिक्षण घेईन आणि तिथंच राहीन...’’

सोळा वर्षांच्या युवकाचा केपटाऊनमधल्या एका खासगी विद्यापीठात नोकरी करत असलेल्या त्याच्या वडिलांशी झालेला हा संवाद आहे.

या दौऱ्यात त्यांच्याकडेच माझी व्यवस्था होती. आम्ही ‘प्रसाद’ या छोट्याशा भारतीय शाकाहारी हॉटेलमध्ये भोजनासाठी भेटलो असताना त्यांनी हा किस्सा मला सांगितला.

‘‘का रे? तू असं का म्हणतोस?’’

‘‘कारण, हे पाहा, पात्रतापरीक्षेत मला ९५ टक्के गुण मिळाले; पण कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना आरक्षण असल्यानं त्यांच्यातील ५० टक्के गुण मिळवलेल्यांनाही चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळतो आणि चांगली नोकरीही मिळते. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी किंवा सरकारी रुग्णालयात नोकरी मिळण्यासाठी मी पात्र ठरेन इतका मी वर्णानं काळा होणं शक्य नाही.’’

त्यांचा मुलगा जपानला गेला, डॉक्टर झाला आणि आता तिकडेच राहतो. त्यांच्या मुलीलाही शिक्षणासाठी आणि पुढील करिअरसाठी दक्षिण आफ्रिका सोडायचा आहे.

‘‘इथं फक्त मी, माझी पत्नी आणि आमचा कुत्रा एवढेच जण राहू...लवकरच ती वेळ येईल,’’ माझे ते मित्र म्हणाले. त्यांनी डर्बनमध्ये एका सरकारी विद्यापीठात २५ वर्षं नोकरी केली होती. त्यांचा कामाचा दर्जा उत्तम होता. विद्यापीठाचे डीन होण्याचीही त्यांची पात्रता होती; पण तरीही बढती नाकारली गेली.

बढती नाकारण्यामागचं कारण सांगताना ते म्हणाले : ‘‘मी भारतीय होतो आणि ते पद एका कृष्णवर्णीय सहकाऱ्याला दिलं गेलं. त्यामुळेच मी केपटाऊनमध्ये खासगी विद्यापीठात आलो. ब्रिटिशांनी सव्वाशे वर्षांपूर्वी माझ्या पूर्वजांना मजूर म्हणून किंवा गुलामाप्रमाणे काम करवून घेण्यासाठी भारतातून दक्षिण आफ्रिकेत आणलं. दक्षिण आफ्रिकेत माझी ही पाचवी पिढी आहे. आमचं आता भारतात कुणी नाही. भारतीयांच्या नजरेत मी एक दक्षिण आफ्रिकी आहे. पण कट्टर कृष्णवर्णीय दक्षिण आफ्रिकींच्या नजरेत मी अद्यापही एक भारतीय, म्हणजे बाहेरचा आहे.’’

या मित्राच्या म्हणण्यानुसार, ‘इथल्या आरक्षणपद्धतीचा गोऱ्या लोकांवर फारसा परिणाम होत नाही; कारण, दक्षिण आफ्रिकेतले ते सर्वांत श्रीमंत लोक आहेत. त्यांच्या हातात अर्थव्यवस्थेच्या नाड्या आहेत. त्यांचा एक पाय दक्षिण आफ्रिकेत, तर दुसरा पाय युरोप किंवा अमेरिकेत असतो. त्यामुळे वंशद्वेषाचा फटका फक्त भारतीय वंशाच्याच लोकांना बसतो.’

‘‘तुम्ही याला वंशद्वेषाचा उलटा प्रवाह म्हणाल का?’’ मी त्यांना विचारलं.

‘‘अर्थातच, तसंच आहे हे,’’ त्यांनी उत्तर दिलं : ‘‘पण आम्ही काहीही करू शकत नाही. आम्हाला इथं आवाजच नाही. आमच्यासमोर दोनच पर्याय आहेत - गप्प बसणं किंवा देश सोडून जाणं.’’

हे सर्व सांगून झाल्यावर त्यांनी एक कबुलीही दिली. ते म्हणाले : ‘‘या परिस्थितीबद्दल मी सर्व दोष कृष्णवर्णीयांनाच देत नाही. आम्ही भारतीयही दोषी आहोत. अनेक भारतीयांना वाटतं की, वांशिक दृष्टिकोनातून आपण कृष्णवर्णीयांपेक्षा उच्च आहोत. उदाहरणार्थ : माझ्या आईनं आमच्या घरातल्या कृष्णवर्णीय नोकरांना कधीही माणसाप्रमाणे वागणूक दिली नाही. ती त्यांना ‘काले लोग’ म्हणून हिणवत असे. ती सहा-आठ महिन्यांनी त्यांना काढून टाकत असे आणि नव्या नोकरांना नेमत असे. कृष्णवर्णीयांमध्ये दारिद्र्याचं प्रमाण प्रचंड असल्यानं तेही हतबल होते.’’

जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, डर्बन आणि केपटाऊनच्या नुकत्याच केलेल्या दहा दिवसांच्या माझ्या दौऱ्यात मी अनेक चर्चा केल्या. या चर्चांमधून दक्षिण आफ्रिकेतल्या सध्याच्या परिस्थितीचं खरं रूप उघड झालं.

सर्वच कृष्णवर्णीयांचं भारतीयांबाबतचं मत कलुषित नाही. भारतीयांनी शिक्षणाच्या आणि कष्टाच्या जोरावर जे यश मिळवलं आहे त्याचं त्यांना कौतुक आहे. मात्र, कृष्णवर्णीय समाजातला एक छोटा; पण कट्टर असलेला गट द्वेषी बनला आहे. भारतीय वंशाचे श्रीमंत उद्योगपती असलेल्या गुप्ता बंधूंनी माजी अध्यक्ष जेकब झुमा (२००९ ते २०१८) यांच्याबरोबर हातमिळवणी करत भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं, त्यानंतर परिस्थिती आणखीच बिघडली. भारतीयांच्या विरोधात कायमच विखारी बोलणाऱ्या कट्टरतावादी कृष्णवर्णीयांच्या ‘इकॉनॉमिक फ्रीडम फायटर्स’ पक्षानं झुमा आणि गुप्ता ही दोन नावं एकत्र आणत ‘झुप्ता’ हा शब्द प्रचलित केला. झुमा यांना भ्रष्टाचारप्रकरणात जुलै २०२१ मध्ये अटक झाली, तेव्हा फिनिक्स आणि इतर काही भागांमध्ये दंगली उसळून त्यात भारतीयांना लक्ष्य केलं गेलं.

या बदललेल्या परिस्थितीमुळे चिंता वाटण्याचं कारण म्हणजे, कधीकाळी भारताचे दक्षिण आफ्रिकेशी दृढ ऐतिहासिक संबंध होते. महात्मा गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेत २१ वर्षं (१८९३ ते १९१४) वास्तव्य होतं आणि त्यांनी गोऱ्या सत्ताधीशांकडून भारतीयांना होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सत्याग्रहाची चळवळ सुरू केली होती. वर्णभेदाच्या विरोधातील चळवळीचे नेते नेल्सन मंडेला यांनी गांधीजींपासूनच प्रेरणा घेतली होती आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचं नावही (आफ्रिकन नॅशनल काँग्रेस) ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ या नावावरूनच घेतलं होतं; पण आता परिस्थिती बदलली आहे. मंडेला यांच्या मंत्रिमंडळात सहा भारतीय मंत्री होते. सध्या एकही नाही. भारतीयांना आता राजकारणात उतरण्याची इच्छा नाही; कारण, अल्पसंख्य असल्यानं त्यांना निवडून येण्याची अजिबात खात्री वाटत नाही. दक्षिण आफ्रिकेच्या ६० कोटी लोकसंख्येत भारतीयांचं प्रमाण फक्त २.६ टक्के आहे.

भारतीयांच्या विरोधात प्रचारमोहीम राबवताना कृष्णवर्णीय कट्टरतावाद्यांनी आणखी एक प्रकार सुरू केला आहे. ‘गांधीजी हे वंशद्वेषी होते,’ असा चुकीचा प्रचार ते करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेतल्या आपल्या वास्तव्याच्या सुरुवातीच्या काळात वयानं तरुण असलेल्या आणि अनोळखी प्रदेशात आलेल्या गांधीजींनी कृष्णवर्णीयांबद्दल काही पूर्वग्रहदूषित टिप्पणी केली होती हे खरं आहे; पण कृष्णवर्णीयांबद्दलची त्यांची मतं नंतर बदलली आणि त्यांनी न्यायासाठीच्या त्यांच्या लढ्याला दक्षिण आफ्रिकेत राहत असतानाच पाठिंबा देण्यासही सुरुवात केली होती. भारतात परतल्यानंतर, जीवनाच्या अखेरीपर्यंत गांधीजींनी कृष्णवर्णीयांच्या चळवळीला पाठिंबा दिला होता. दु:खाची बाब म्हणजे, दक्षिण आफ्रिकेला कृष्णवर्णीय, गोरे, भारतीय आणि इतर वंशाच्या नागरिकांना समान अधिकार असलेला ‘रंगीबेरंगी देश’ बनवण्याच्या नेल्सन मंडेला यांच्या स्वप्नावरही कट्टरतावादी कृष्णवर्णीय टीका करतात. मी ज्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्यापैकी अनेकांनी सांगितलं की, दक्षिण आफ्रिकेत १९९४ पासून सत्तेवर असलेला आफ्रिकन नॅशनल काँग्रेस हा पक्ष आता भ्रष्टाचारानं अत्यंत बरबटला असून गटातटांत विभागला गेला आहे. वाढत्या गुन्हेगारीवर आणि बिगरकृष्णवर्णीयांबाबत वाढत जाणाऱ्या रोषावर नियंत्रण ठेवण्याची ताकद आता त्या पक्षात राहिलेली राहिलेली नाही.

जोहान्सबर्गच्या जवळच असलेल्या ‘लेनाशिया’ या मोठ्या भारतीय वसाहतीत मी गेलो होतो, त्या वेळी आणखी एक अस्वस्थ करणारी बाब मला आढळून आली. भारतातील मुस्लिमविरोधी ध्रुवीकरणाचं हिंदुत्वाचं राजकारण दक्षिण आफ्रिकेतील भारतीय समुदायातही जातीयतेच्या भिंती उभारत आहे. ‘इथल्या भारतीय वंशाच्या मुस्लिम तरुणांना, स्वत:ची ‘भारतीय’ ही ओळख नकोशी वाटते,’ असं मला एकानं सांगितलं. गांधीजींच्या काळापासून आतापर्यंत केवढा इतिहास बदलला आहे, याचं मला आश्‍चर्य वाटलं. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींच्या नेतृत्वाखाली सर्व जाती-धर्मांचे, सर्वभाषक भारतीय एकत्र आले होते. वंशद्वेषविरोधी लढ्यातही सर्व सामाजिक स्तरांमधील भारतीयांनी भाग घेतला होता. उदाहरणार्थ : मूळ गुजरातच्या असलेल्या अहमद काथर्दा यांनी मंडेला यांच्याबरोबर २६ वर्षं तुरुंगात व्यतीत केली होती. गांधीजींचे निकटचे सहकारी तंबी नायडू, ज्यांना ‘सत्याग्रहींमधील सिंह’ म्हणून ओळखले जात असे, यांनी अस्पृश्‍यतेच्या विरोधात चळवळ उभी केली होती. त्यांचे नातू आणि मंडेला यांचे खंदे पाठिराखे प्रेमा नायडू यांनी १९८२ मध्ये - जोहान्सबर्गमधील ज्या तुरुंगात गांधीजींना बंदिस्त केलं होतं - त्याच तुरुंगात एक वर्ष काढलं आहे. या तुरुंगाचं आता ‘मंडेला-गांधी संग्रहालया’त रूपांतर करण्यात आलं आहे. प्रेमा नायडू यांनी मला तिथं नेलं होतं. ‘‘सर्व जाती-धर्मांच्या भारतीयांमधील एकता आपण जोपासणं आवश्‍यक आहे, त्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेतील भारतीय, कृष्णवर्णीय, गोरे आणि इतर वंशीयांमधील एकताही कायम राखायला हवी. गांधीजी आणि मंडेला यांनी आपल्याला हेच शिकवलं आहे,’’ असं त्या म्हणाल्या.

गांधीजींची नात इला गांधी या सध्या ८२ वर्षांच्या आहेत. मी त्यांना डर्बनमधल्या त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांनीही हाच एकतेचा आणि ऐक्याचा संदेश मला ऐकवला. गांधीजींनी १९०३ ला स्थापन केलेल्या ‘फिनिक्स आश्रमा’च्या विश्‍वस्त मंडळाच्या त्या प्रमुख आहेत. गांधीजींनी जोहान्सबर्गनजीक १९१० मध्ये स्थापन केलेल्या ‘टॉलस्टॉय फार्म’ या दुसऱ्या आश्रमालाही मी भेट दिली. काही दशकांपूर्वी या आश्रमाची पूर्णपणे मोडतोड करण्यात आली होती. मात्र, मोहन हिरा, इस्माईल वादी आणि इतर सज्जन व्यक्तींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तो आता पुन्हा उभारण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त मी रवांडा आणि केनिया या देशांनाही भेटी दिल्या. (यासंदर्भात ता. २० नोव्हेंबर रोजी याच सदरात प्रसिद्ध झालेला रवांडावरील माझा लेख वाचावा.) या भेटीतून मी काय शिकलो? थोडक्यात सांगायचं तर, आपण भारतीयांनी आफ्रिकेला जरा गांभीर्यानं घ्यायला हवं. आफ्रिका खंडातल्या सर्व ५४ देशांशी सर्वसमावेशक सहकार्याचे संबंध निर्माण करायला हवेत. सध्याच्या बदलत्या जागतिक संदर्भात, आफ्रिकेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, समानतेच्या आधारावर आणि कृष्णवर्णीयांबद्दलच्या वांशिक पूर्वग्रहाचा कोणताही मागमूस न ठेवता, आपण जनतेदरम्यानचा संवाद वाढवायला हवा. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मुंबईत ‘गांधी-मंडेला सेंटर फॉर इंडिया-आफ्रिका फ्रेंडशिप’ची स्थापना केली आहे. आम्हाला शुभेच्छांची गरज आहे!

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून, ‘फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()