जर्मनीतल्या गावात मऱ्हाटमोळा डाळभात

जर्मनीतल्या गावात मऱ्हाटमोळा डाळभात
Updated on

ऱ्हाईन नदी काठाजवळच्या गावातली, बाराव्या-चौदाव्या शतकातली पेंटिंग्ज घरांच्या भिंतीवर चितारलेली आणि सातशे वर्षे जपलेली पाहता-पाहता अचानक जर्मनीच्या दौऱ्यात दोन दुर्मीळ गोष्टी पाहता आल्या. गटेनबर्ग म्युझियममध्ये तेराशे सालापासूनची जर्मन प्रिंटिंग हिस्टरी सांगणारा पहिला प्रिंटिंग प्रेस पाहता-पाहता तिथला मित्र अभिजित श्रोत्री म्हणाला, ‘‘चल तुला अस्सल मऱ्हाटमोळं जेवण इथं फ्रॅंकफुर्टजवळच्या गावात खिलवतो.’’ 

‘हॉटेल हिमालया शेरपा’मध्ये शिरताच... ‘या या काय खाणार डाळभात, उसळ, चपाती,’ असं स्वच्छ मराठीत बोलत सूरज सोनार सामोरा आला. त्याच्याबरोबर जेवता-जेवता त्याची स्टोरी ऐकून चक्रावलोच. 

सूरज २००३ मध्ये पुणे विद्यापीठातून एम.बी.ए. झालेला. त्यापूर्वी हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेला. सिम्बायोसिसमध्ये शिकलेला. ‘पुणं’ पाठ असलेला. ११ वर्षांची त्याची कार्पोरेट क्षेत्रातली उमेदवारी. 

सूरजचे वडील बहादूर सोनार हे ३६ वर्षे भारतीय सैन्यात होते. ते पुण्यात स्थायिक झाले. सूरजला उद्योग सुरू करायचा होता; पण पुणंही सोडायचं नव्हतं. शिकत असताना चतुःश्रुंगी पायथ्याशी चायनीज गाडीचा उद्योग त्यानं करून पाहिला. पण, कुठल्याही गोष्टीत स्थिरता नव्हती. दरम्यान, डिग्रीनंतर लग्न झालेले. चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलांची जबाबदारी वाढलेली. पैसे उभे करायच्या हेतूने २०१४ च्या एप्रिलमध्ये जॉबसीकर व्हिसावर जर्मनीत आला. 

सूरज सांगतो, ‘‘मार्केटिंग फिल्डमध्ये कामाच्या शोधात खूप फिरावं लागलं. बोलबच्चनगिरी करावी लागली. ३०० युरोत १८ तास काम केलं. पण, काम टिकेना. जागा मिळेना. भाडे देणे परवडायला हवे. मग जर्मन मराठी कट्टाचा संस्थापक अजित रानडेने गुरुद्वारात खाणं-राहणं मोफत होऊ शकेल, असं सुचवलं. तेही केलं. पण, गुरुद्वारातूनही बाहेर पडावं लागलं. महिनाभर एका रेस्टॉरंटमध्ये रोज १८ तास काम करूनही पैसे देण्याचं नाव नाही. फॅमिली नव्हती. त्यामुळे एकट्याचं निभावायचं. तरी इथला खर्च आणि घरी पण पैसे पाठवायला हवेत ना?’’

सूरजनं स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करायचं ठरवलं. शाकाहारी प्रवाशांमध्ये रेस्टॉरंट लोकप्रिय करता येईल, हा विचार करून मटकी, हरभरा उसळी करून जिणू नेपाळी मसाला वापरून पदार्थ चविष्ट केले. अर्थात, नॉनव्हेज पदार्थही ठेवले. अडीअडचणी, संकटे, वेळप्रसंगी उपाशी राहण्याची वेळ आली. पण, आता तो स्थिरावलाय. कुटुंबाला जर्मनीला घेऊन जाण्याच्या बेतात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.