वेगवेगळ्या प्रदेशात पक्षीनिरीक्षण करताना, जे पक्षी आपण शोधत असतो, ते गवसतच नाही. इतर काही दुर्मिळ पक्षी दिसतात. वालपराईतही तेच घडले. एका पक्ष्याची प्रतीक्षा करीत असताना नजर आकाशाकडे गेली आणि एक छोटा गरुड प्रजातीचा पक्षी घिरट्या घालताना दिसला...
वन्यजीव छायाचित्रण म्हणजे भरपूर चिकाटी आणि शारीरिक परिश्रम, नशिबाचा खेळ आणि म्हणूनच वन्यजीव छायाचित्रण म्हणजे अनिश्चितता. याचाच प्रत्यय आम्हाला अलीकडेच केलेल्या वालपराई-अण्णामलईस वन्यजीव छायाचित्रण दौऱ्यात आला. वालपराई-अण्णामलईस हा प्रदेश वन्यजीव छायाचित्रणाकरिता खूप परिचित किंवा प्रसिद्ध नाही आणि म्हणूनच आम्ही येथे छायाचित्रणाकरिता जायचे ठरवले. नवीन प्रदेशात दौरा आखणे म्हणजे नेमके कुठले पक्षी दिसतील, याची शाश्वती नसते. त्यामुळेच बरेच जण नवख्या ठिकाणी जाणे टाळतात.
विमानाने आम्ही सकाळीच कोचीला पोहोचलो. खरेतर कोईम्बतूर विमानतळ वालपराईला जाण्याकरिता जास्त जवळ आहे; परंतु कोचीवरून जाताना काही ठिकाणी थांबून पक्षीनिरीक्षण करण्याचा बेत होता. वाटेतच नाश्ता व दुपारचे जेवण करून संध्याकाळी उशिरा वालपराईला पोहोचायचे ठरले. नाश्ता केल्यावर आम्हाला वाटेत हत्तींचा कळप दिसला. त्यात लहान पिल्लेसुद्धा होती. त्यानंतर डॉलर बर्ड (काळा नीलपंख) अगदी जवळून दिसला. त्याची सुंदर छायाचित्रे टिपता आली. हा पक्षी जवळून पाहायला मिळणे फारच कठीण असते. त्यानंतर वाकचोच सातभाई (इंडियन स्किमीटर बॅबलर)चे छान छायाचित्रण झाले. एकंदरीत सुरुवात तर छान झाली होती. मात्र त्यानंतरचे दोन दिवस अत्यंत नीरस गेले. फारसे पक्षी दिसलेच नाहीत. मात्र, लायन टेल्ड मकाऊचे सुंदर छायाचित्रण करता आले.
हा अत्यंत देखणा माकड प्रजातीतील प्राणी केवळ वालपराई व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातच शिल्लक आहे. या लायन टेल्ड मकाऊकरिता जवळ-जवळ तीन तास वाट पाहावी लागली. त्यादरम्यान सहजच आकाशाकडे नजर गेली तेव्हा एक छोटा गरुड प्रजातीचा पक्षी घिरट्या घालताना दिसला. वालपराईतील झाडे उंच होती. त्याच्या वर हा घिरट्या घालत होता. सर्वांनी त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त केले. त्यानंतर त्याची ओळख पटली. हा होता अत्यंत दुर्मिळ लेग्गीस हॉक इगल. ठरवून शोधायचा म्हटलं, तरी हा सापडायचा नाही व आम्हाला मात्र अनपेक्षितपणे गवसला होता. त्या निराशजनक दोन दिवसांत या ‘लेग्गीस हॉक ईगल’मुळे चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर छोटा मत्स्य गरुड (लेसर फिश ईगल) हा अजून एक दुर्मिळ पक्षी दिसला. तुरेवाला सर्प गरुड, मखमली शिलिंद्री असे पक्षी पाहता आले.
तिसऱ्या दिवशी अण्णामलईस (टॉपस्लीप)ला गेलो. वालपराई ते टॉपस्लीप हा प्रवास अत्यंत नयनरम्य होता. वर-वर जाणारी ४१ वळणे-घाटांचा रस्ता ज्यांना हेर पिन म्हणतात, निव्वळ अप्रतिम नजारा होता. तिथेही पाहिजे ते पक्षी न दिसल्यामुळे शेवटच्या दिवशी मध्यरात्री वालपराईवरून निघून आम्ही मुन्नार गाठले. येथे मात्र उपलब्ध असलेल्या अल्पावधीत आम्ही १४-१५ पक्ष्यांचे छायाचित्रण केले. त्यानंतर थत्तेक्कड गाठले. येथे लापणात बसून काही पक्ष्यांचे छायाचित्रण केले व या वालपराई-अण्णामलईस दौऱ्याची सांगता केली.
- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.