पश्चिम रेल्वेच्या इतिहासाचा साक्षीदार

पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटमधील इमारतीने यंदाच्या जानेवारीत १२५ व्या वर्षात अर्थात शतकोत्तर रौप्य वर्षात पदार्पण केले.
history of Western Railway
history of Western Railwaysakal
Updated on

- सुमित ठाकूर

पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटमधील इमारतीने यंदाच्या जानेवारीत १२५ व्या वर्षात अर्थात शतकोत्तर रौप्य वर्षात पदार्पण केले. ऐतिहासिक ओळख जपलेली ब्रिटिश काळातील मुख्यालयाची इमारत आजही मुंबईची साक्षीदार म्हणून थाटात उभी आहे. इमारतीच्या निर्मितीत ब्रिटिश वास्तुविशारदांसह भारतीय अभियंत्यांचा मोलाचा हातभार लाभला आहे.

बॉम्बे बडोदा आणि मध्य भारत रेल्वेचे (बीबी ॲण्ड सीआय) एकत्रीकरण करून पश्चिम रेल्वेची स्थापना करण्यात आली. बीबी ॲण्ड सीआय रेल्वे कंपनीची स्थापना १८५५ मध्ये झाली होती आणि १८६० मध्ये तिचे कामकाज सुरू झाले. रेल्वेच्या बांधकामासाठी मुंबईला पहिली पसंती होती.

अमेरिकेतील गृहयुद्धामुळे ब्रिटनला कापसाच्या नवीन पुरवठादारांची गरज होती आणि त्यासाठी भारताचा पर्याय सर्वोत्तम होता. बैलगाड्यांद्वारे वाहून नेल्या जाणाऱ्या कापसाच्या गाठी अनेकदा पाऊस आणि धुळीमुळे खराब होत असत. त्यामुळे रेल्वे मार्गाची आवश्यकता भासत होती. दुसरीकडे बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांना त्यांच्या राज्यासाठी मुंबईपर्यंत पसरलेले रेल्वेचे जाळे हवे होते.

कर्नल जॉन पिट केनेडी एक रेल्वे अभियंता आणि बीबी ॲण्ड सीआय रेल्वे कंपनीच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी त्या वेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांना पटवून दिले, की मुंबईला गुजरातशी जोडणारी दुसरी रेल्वे गरजेची आहे. १८५१ मध्ये केनेडी यांनी बीबी ॲण्ड सीआयची स्थापना केली. कर्नल पीटी फ्रेंच रेल्वे कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. कर्नल जॉन पिट केनेडी व्यवस्थापकीय संचालक होते.

पश्चिम क्षेत्राला मुंबईशी जोडण्याचा प्रस्ताव १८५५ मध्ये मंजूर करण्यात आला होता; परंतु काम पूर्ण होण्यास एक दशक लागले. कंपनीने १८६० मध्ये सुरत आणि अंकलेश्वरजवळील उत्रानदरम्यान एक छोटा विभाग सुरू केला. १८६४ मध्ये त्याचा मार्ग मुंबईपर्यंत वाढवण्यात आला.

२८ नोव्हेंबर १८६४ रोजी मुंबईतील ग्रँट रोड रेल्वे स्थानकावरून अहमदाबादला पहिली ट्रेन रवाना झाली. बीबी ॲण्ड सीआयने त्यांचे जाळे १८७१ मध्ये दिल्लीपर्यंत नेले. त्याच वेळी बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांनीही १८६२ मध्ये दाभोई ते मियागाम असा नॅरोगेज ट्रॅक बांधला.

मुंबई किल्ल्याच्या आत संत थॉमस कॅथेड्रलकडे जाणाऱ्या गेटवरून १८७० मध्ये चर्चगेट स्थानकाचे नाव ठेवण्यात आले. १८७३ मध्ये कुलाब्यापर्यंत मार्ग वाढवण्यात आला. १८७६ ​​मध्ये चर्चगेट स्थानकासाठी स्विस चॅलेट म्हणून ओळखली जाणारी अत्यंत सुंदर इमारत बांधली गेली. १८८८ मध्ये वांद्रे स्थानकासाठी एक आकर्षक इमारत बनवण्यात आली. कुलाबा स्थानकाची इमारत १८९६ मध्ये बांधण्यात आली. १९२८ मध्ये विद्युतीकरण झालेली चर्चगेट-बोरिवली असा पहिला मार्ग होता.

बीबी ॲण्ड सीआय यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर सुरुवातीला सुरतमध्ये त्याच्या मुख्यालयाची स्थापना करण्यात आली. १८६३ मध्ये ते मुंबईत लालबाग-परळ भागात हलवण्यात आले. मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेत बीबी ॲण्ड सीआय मुख्यालय ग्रँट रोडवरील धनजी स्ट्रीटवर आणि नंतर फोर्टमधील मेडोज स्ट्रीटवर हलवण्यात आले. शेवटी १८९९ मध्ये स्वतःची इमारत बांधण्यापूर्वी ते फोर्ट भागातील ब्रॅडी हाऊसमध्ये नेण्यात आले. कर्नल जॉन पिट केनेडी यांनी २० एप्रिल १८५४ रोजी सरकारला पत्र लिहून सुचवले, की बीबी ॲण्ड सीआयसाठी वेगळे टर्मिनस आणि कार्यालय बनवून अतिरिक्त खर्च करू नये.

जीआयपी आणि बीबी ॲण्ड सीआय कंपन्यांचे टर्मिनस एकाच ठिकाणी असू शकतात. भायखळ्यापासून प्रस्तावित टर्मिनसपर्यंतच्या मार्गाला लागून बीबी ॲण्ड सीआयसाठी अतिरिक्त लाईन्स टाकल्या जाऊ शकतात. जीआयपीचे एजंट (आजचे महाव्यवस्थापक) यांनी त्याला सहमती दर्शवली नाही. कारण, जीआयपी रेल्वेद्वारे (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस) बांधल्या जाणाऱ्या इमारतीत फक्त एका कंपनीचे मुख्यालय सामावले जाऊ शकत होते.

१८८३ मध्ये बीबी ॲण्ड सीआय रेल्वेच्या एजंटनी सरकारला पत्र लिहून सुचवले, की एक सुसज्ज इमारत तीन लाख रुपयांमध्ये बांधणे शक्य आहे आणि त्यासाठी योग्य जागेची गरज आहे. सरकारने दोन जागांचा पर्याय ठेवला. सरकारी स्थापत्य अभियंता जॉन अॅडम यांनी १८८४ मध्ये इमारतीसाठी एक डिझाईन केली. त्यांनी याआधी शहरात अनेक इमारती बांधल्या होत्या. त्यांची ही योजना आणि आराखडा १८८५ मध्ये बोर्डाकडे पाठवण्यात आला; परंतु अनेक पत्रव्यवहार करूनही काहीही निष्पन्न झाले नाही.

शेवटी १८८९ मध्ये चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या बाहेर बीबी ॲण्ड सीआय कंपनीला एक मोठा भूखंड देण्यात आला. सुरुवातीला अनेक डिझाईन्स आणि आराखडे नाकारल्यानंतर शेवटी बीबी ॲण्ड सीआयच्या मुख्यालयाच्या डिझाईनचे काम प्रसिद्ध वास्तुविशारद फ्रेडरिक विल्यम स्टिव्हन्स यांना सोपवण्यात आले. हे डिझाईन सेलर होमसारखे (आत्ताचे महाराष्ट्र पोलिस मुख्यालय) असावे, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्याचे डिझाईन स्टिव्हन्स यांनीच केले होते.

फ्रेडरिक विल्यम स्टिव्हन्स यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकासारखे आशियातील सर्वात मोठे टर्मिनस उभारण्याचे काम केले. महापालिका, रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम, जीपीओ, ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कार्यालय इत्यादी इमारतीही त्यांनीच उभारल्या. स्टिव्हन्स यांना गॉथिक शैलीतील स्थापत्यशैलीविषयी नितांत प्रेम होते. त्यांनी वेनेशियन गॉथिक आणि भारतीय सेर्सेनिक शैलीचे बेमालूम मिश्रण केले आहे.

मुंबईचे वातावरण आणि हवामान यांच्याशी जुळवून घेणारी ती शैली होती. सुरुवातीला पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी ४,७५,००० रुपये मंजूर करण्यात आले होते. वास्तुविशारदाचे शुल्क म्हणून अधिकचे ५०,००० रुपये देण्यात आले होते. हे पैसे पुरेसे नाहीत असे स्टिव्हन्स यांनी सांगितले. त्यामुळे या रकमेत वाढ करून ऑगस्ट १८९३ मध्ये ५,७५,००० रुपये मंजूर करण्यात आले.

१ ऑगस्ट १८९३ ला स्टिव्हन्स यांनी ५.२५ आणे प्रतिघनफूट दराने १७.५१ लाख घनफूट घनसामग्रीचा आराखडा मंजुरीसाठी सादर केला. बोर्डेड फ्लोअरचा खर्च कमी येईल; पण ते अग्निरोधक नसेल. त्यामुळे काँक्रीट फ्लोअरचा वापर करावा, असेही त्यांनी सुचवले. सविस्तर आराखड्यासह स्टिव्हन्स यांनी ५.९६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. पायाची खोली वाढवल्यामुळे अंदाजपत्रकातील खर्चात वाढ झाली होती. समुद्र जवळ असल्याने पाया १५ फूट ८.२५ इंच खोदण्यात आला होता.

बांधकामाचे पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार, स्टेबलिंग, अग्निशमन सेवा, फर्निचर, लॉनमधील कारंजे, हायड्रॉलिक लिफ्ट, गॅस लायटिंग इत्यादींसाठी त्यांनी अतिरिक्त १.८३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. एजंटने अग्निशमन सेवेसाठी पैसे द्यायला नकार दिला. भारतात आगीचा धोका फार कमी आहे, असे त्यांचे मत होते. एवढेच नाही तर हायड्रॉलिक लिफ्टवरील खर्चातही कपात करण्यात आली.

कारण, जे लिफ्टचा वापर करणार होते ते युरोपियन दिवसातून एकदाच इमारतीत चढत होते आणि व्यायाम म्हणून चालत जाणेच पसंत करत होते. तथापि, एक मॅन्युअल लिफ्ट मंजूर करण्यात आली. शेवटी ८३,४२६ रुपयांचा अतिरिक्त खर्च मंजूर केला गेला आणि एकूण मंजूर अंदाजपत्रकाची रक्कम ७,५२,५५६ रुपये झाली.

स्टिव्हन्स यांनी निवासी अभियंता म्हणून रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य यांची नियुक्ती केली. वैद्य यांनी स्टिव्हन्स यांच्यासोबत महापालिका इमारत आणि इतर प्रकल्पांमध्येही काम केले होते. स्टिव्हन्स यांनी वैद्य यांचे सहाय्यक म्हणून रंगनाथ देशमुख यांची नियुक्ती केली. स्टिव्हन्स यांचा मुलगा चार्ल्स फ्रेडरिक स्टिव्हन्स हाही त्यांच्यासोबत मुख्य सहाय्यक म्हणून काम करत होता.

चार्ल्स स्टिव्हन्स ‘आर्ट डेको’ शैलीच्या इमारतींसाठी ओळखले जात. त्यात प्रसिद्ध ‘रिगल’ सिनेमागृहाचा समावेश होतो. रावसाहेब वैद्यांनी स्टिव्हन्स यांच्यासोबत शिकाऊ म्हणून दीर्घकाळ काम केले होते. वैद्य यांनी त्यांच्यासोबत रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम, व्हिक्टोरिया टर्मिनस, बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि बीबी ॲण्ड सीआय मुख्यालयासाठी पर्यवेक्षक म्हणून काम केले.

१८९३ मध्ये जमशेदजी टाटा यांनी वैद्य यांना ‘ताजमहाल पॅलेस’ हॉटेलसाठी आराखडा सादर करण्यास सांगितले होते. त्याचे प्रस्तावित निर्मितीमूल्य दोन लाख होते. बीबी ॲण्ड सीआय इमारतीचे काम मे १८९४ मध्ये सुरू झाले आणि जानेवारी १८९९ ला संपले. इमारतीसाठी ७,५०,००० रुपये खर्च आला.

इमारतीच्या घुमटाची खूण महत्त्वाची ठरली

२७६ फुटांचा पश्चिमेचा दर्शनी भाग आणि १६० फुटी सेंट्रल टॉवरची इमारत आकर्षक दिसत होती. पायथ्यापासून शंभर फुटांपर्यंत चौरस असलेला सेंट्रल टॉवर अद्वितीय होता. त्यानंतर एक अष्टकोन आणि सर्वात वर घुमट. मुंबईत प्रवेश करणाऱ्या जहाजांसाठी घुमटाची खूण महत्त्वाची ठरली. पश्चिमेकडील कॅरिएज पोर्चच्या कमानीत कर्नल फ्रेंच आणि कर्नल केनेडी यांचे पुतळे बसवण्यात आले.

गुजरातमधील काठियावाड विभागातील खाणींमधून पोरबंदर चिरे आणण्यात आले. कुर्ला येथील दगडांचा वापर खांबांच्या पायासाठी करण्यात आला. लाल दगडांपासून कमानी बनवण्यात आल्या. जिन्याच्या लांब पायऱ्यांसाठी निळ्या बेसॉल्ट खडकाचा वापर करण्यात आला. घुमट, खांब हे पोरबंदर दगडांपासून बनवण्यात आले.

नव्या कार्यालयाचा आतील भाग आकर्षक होता. वीस चौरस किमीचा मुख्य हॉल दोन्ही बाजूंच्या कॉरिडॉरला जोडलेला होता. मुख्य वैद्यकीय अधिकारी, वाहतूक व्यवस्थापक आणि वाहतूक पर्यवेक्षक यांच्या विभागांसाठी खालच्या मजल्यावर जागा देण्यात आली. नंतर चर्चगेटच्या इमारतीत हलवण्यात आलेले सिझन तिकीट ऑफिसही तिथेच होते.

दुसरा मजला सरचिटणीस, एजंट, पोलिस अधीक्षक, अभियंता विभाग आणि बोर्ड रूमसाठी होता. त्याचप्रमाणे ऑडिट डिपार्टमेंट, ग्रंथालय आणि अधिकाऱ्यांची टिफीन रूमही होती. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर एका वर्षाच्या अंतरानेच वास्तुविशारद फ्रेडरिक विल्यम स्टिव्हन्स आणि निवासी अभियंता रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य यांचे निधन झाले.

मलिरेयाच्या तापाने ५ मार्च १९०० रोजी स्टिव्हन्स यांचे निधन झाले तेव्हा ते ५४ वर्षांचे होते. मुंबईतील शिवडी स्मशानभूमीत त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. निधनाच्या काही काळ आधीच त्यांनी फ्लोरा फाऊंटनजवळ चार्टर्ड बँक कार्यालयाचे काम केले होते. १९०५ मध्ये वेल्सचे राजकुमार आणि राजकुमारी शहराला भेट देणार होते. त्यांच्या भेटीचा उत्सव साजरा करण्यासाठी बीबी ॲण्ड सीआयच्या इमारतीला रोषणाई करण्यात आली होती.

१५ नोव्हेंबर १९०५ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या आधी अचानक आग लागली आणि इमारत जळून खाक झाली. अग्निशमन दल येईपर्यंत इमारतीचा मध्य भाग आगीच्या विळख्यात सापडला होता. त्यामुळे केवळ इमारतीचेच नुकसान झाले, असे नाही तर घुमटात ठेवलेली अमूल्य ऐतिहासिक कागदपत्रेही जळाली.

सेंट्रल ब्लॉक, बोर्ड आणि सेंट्रल रूम पूर्णपणे जळून गेल्या. फ्लोअरिंगचे अनेक भाग मोडून पडले. घुमट काळा पडला. खांब, कमानी आणि पोरबंदर दगडांचे नुकसान झाले. त्यानंतर इमारतीची डागडुजी करण्यासाठी चार्ल्स फ्रेडरिक स्टिव्हन्स यांना पाचारण करण्यात आले. इमारतीचा जीर्णोद्धार करण्यासाठी तीन लाख रुपये खर्च आला. १९२७ मध्ये मुख्यालयाच्या इमारतीचा विस्तार करण्यात आला.

बीबी ॲण्ड सीआयच्या अखत्यारीत १९०० पासून ४४ उपनगरीय रेल्वेगाड्या धावत होत्या. रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण सुरू होऊन वांद्रे आणि माहीम विभाग १९१७ मध्ये पूर्ण झाले. मध्य मुंबई आणि बोरिवलीदरम्यानच्या मार्गाचे १९१७ पर्यंत चौपदरीकरण झाले. शहराचा आकार वाढल्यामुळे विस्ताराची गरज भासू लागली. १९२० मध्ये बीबी ॲण्ड सीआयला चर्चगेट ते कुलाबा मार्ग बंद करण्यात आला.

ग्रँट रोडच्या थोडेसे अलीकडे बेलासिस रोडवर बीबी ॲण्ड सीआयने नवीन टर्मिनसची निर्मिती केली. १८ डिसेंबर १९३० रोजी त्याचे उद्‍घाटन झाले. त्याच महिन्यात ३१ तारखेला कुलाबा स्थानक बंद करण्यात आले आणि उपनगरीय टर्मिनस म्हणून चर्चगेटची निर्मिती करण्यात आली. १९२८ मध्ये बीबी ॲण्ड सीआयचे विद्युतीकरण सुरू करण्यात आले. चर्चगेट-बोरिवली मार्गावर सर्वात आधी विद्युतीकरण झाले. त्यानंतर १९३६ मध्ये बोरिवली-विरार मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले.

(लेखक पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.