क्रिकेट सोडून मला काहीच येत नाही!

लंडन शहराच्या मध्याला संघ राहत असलेल्या सेंट जेम्स कोर्ट भागात ताज हॉटेलमध्ये जडेजाला निवांत भेटलो. जडेजाची कहाणी अजब आहे, ती सोप्या भाषेत मांडायचा प्रयत्न करतो.
Sunandan Lele writes about Ravindra Jadeja journy to be a grate cricketer
Sunandan Lele writes about Ravindra Jadeja journy to be a grate cricketeresakal
Updated on
Summary

लंडन शहराच्या मध्याला संघ राहत असलेल्या सेंट जेम्स कोर्ट भागात ताज हॉटेलमध्ये जडेजाला निवांत भेटलो. जडेजाची कहाणी अजब आहे, ती सोप्या भाषेत मांडायचा प्रयत्न करतो.

‘लंडन में बडी गर्मी चल रही है... लिंबूशरबत पिते है... आ जाओ सर,’ एका कॉमन मित्राकडून असा संदेश जेव्हा मला रवींद्र जडेजाने पाठवला, तेव्हा मला सुखद धक्का बसला. कारण साधं आहे. जडेजाला १९ वर्षांखालचं क्रिकेट खेळत असल्यापासून मी भेटलो आहे; त्याचं आंतरराष्ट्रीय पदार्पण कसं झालं, त्याचं वार्तांकन केलंय. पण दर वेळी मैदानात किंवा पत्रकार परिषदेत भेटल्यावर हसून ओळख देणाऱ्या जडेजाशी शांतपणे बसून भेटायचा, गप्पा मारायचा योग आला नव्हता. टी-२० मालिका संपवून एकदिवसीय मालिकेच्या दोन सामन्यांसाठी संघ लंडनला आला आणि जडेजाने निरोप पाठवला. लंडन शहराच्या मध्याला संघ राहत असलेल्या सेंट जेम्स कोर्ट भागात ताज हॉटेलमध्ये जडेजाला निवांत भेटलो. जडेजाची कहाणी अजब आहे, ती सोप्या भाषेत मांडायचा प्रयत्न करतो.

जामनगरची क्रिकेटपरंपरा

गुजरात राज्यातल्या सौराष्ट्र भागातील जामनगर हे रविंद्र जडेजाचं गाव, ज्याचं अगोदरचं नाव नवानगर होतं. कच्छचं आखात आणि कच्छचं रण याच्याजवळ जामनगर वसलेलं आहे. म्हणायला गेलं तर जामनगरची क्रिकेटपरंपरा अचाट आहे.

रणजितसिंह आणि दुलिपसिंह हे महान माजी खेळाडू याच जामनगरचे होते. सौराष्ट्र रणजी संघालाही जामनगर क्रिकेटने अव्याहत चांगल्या खेळाडूंचा पुरवठा केला आहे, त्याच जामनगरमध्ये जडेजा घडला.

रवींद्र जडेजाच्या वडिलांचं नाव अनिरुद्धसिंह आणि आईचं नाव लता. रवींद्रला दोन मोठ्या बहिणी आहेत, ज्यांचं नाव नयना आणि पद्मिनी आहे. रवींद्र शेंडेफळ. अनिरुद्धसिंह सुरक्षा कर्मचारी होते, ज्यांना कायमस्वरूपी नोकरीही नव्हती. आई लता शासकीय रुग्णालयात काम करायची म्हणून जडेजा कुटुंबाला एका खोलीचं घर तरी मिळालं होतं. तसं बघायला गेलं तर आईच्या पगारावर कुटुंब चालायचं, वडिलांची कमाई झाली तर बोनस समजली जायची. घरच्या बिकट परिस्थितीमुळे आई सतत त्रस्त असायची आणि मुलांनी काही त्रास दिला तर अगदी फोडून काढायची.

आठ-नऊ वर्षांचा असल्यापासून रवींद्रला क्रिकेट खेळाची आवड लागली. रणरणत्या उन्हातही तो सतत खेळत असायचा. वडील अचानक देवाघरी गेल्यावर आईवरचं दडपण अजून वाढलं. एकीकडे लहान वयाच्या रवींद्रला अभ्यासात जास्त गती नव्हती आणि दुसरीकडे तो फक्त क्रिकेट खेळताना दिसत होता. मोठी बहीण नयनाने त्या वेळी स्थानिक क्रिकेट प्रशिक्षक महेंद्रसिंह चौहान ह्यांच्याकडे रवींद्रला सोपवण्याचा विचार केला. महेंद्रसिंह माजी पोलिस होते आणि क्रिकेटर होते. ते एका छोट्या मैदानावर क्रिकेटचं प्रशिक्षण द्यायचे, ज्याला स्थानिक लोक ‘क्रिकेट बंगलो’ म्हणून ओळखायचे.

महेंद्रसिंह चौहान नुसते अत्यंत शिस्तप्रिय प्रशिक्षक नव्हते, तर थोडे भडकू माथ्याचे होते. प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूने काहीही गैरवर्तन केलं, तर ते सरळ श्रीमुखात भडकावून द्यायचे. कधीकधी बॅट किंवा स्टंपचा रट्टापण घालायला मागेपुढे बघायचे नाहीत. रवींद्र जडेजाने सांगितलं की, सरांनी एकदा सामना चालू असताना गोलंदाजी करताना योग्य टप्पा दिशा ठेवली नाही म्हणून विकेटवर मला सणसणीत चपराक दिली होती. त्यांची प्रशिक्षणाची पद्धत वेगळी होती. फिरकी गोलंदाजाने चेंडू वळवायला जास्त मेहनत करायला हवी, असा त्यांचा आग्रह असायचा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, फिल्डिंग सर्वोत्तम व्हायलाच हवी, यावर त्यांचं बारीक लक्ष असायचं. फिटनेस चांगला राहावा म्हणून जामनगरच्या उन्हाची पर्वा न करता आम्हाला ते मेहनत करायला लावायचे. सगळ्याला कमालीची शिस्त होती आणि कोणी गल्लत केली, तर वय कोणाचं काहीही असो, त्याला सरळ मार खावा लागायचा.

नयनाताई सर्वस्व

रवींद्र जडेजाची जडणघडण होण्यामागे मोठी बहीण नायनाचं खूप मोलाचं योगदान होतं. रवींद्र १४-१५ वर्षांचा असताना घरात काम करताना अपघात होऊन आई लता ह्यांना खूप भाजलं. एक आठवडा मृत्यूशी त्या झगडल्या. आईचं कृपाछत्र हरपल्यावर नयनाताई रवींद्रची जणू पालक झाली. आईच्या जाण्याचा वाईट परिणाम रवींद्रच्या मनावर होऊ नये म्हणून नयनाने त्याची खूप काळजी घेतली. रवींद्रला दुःख विसरायला क्रिकेट हा एकाच उपाय असल्याचं नयना जाणून होती, म्हणून तिने रवींद्रचं क्रिकेटशी असलेलं नातं सुटू दिलं नाही.

सतराव्या वर्षी रवींद्र जडेजाला मोठी संधी मिळाली, जेव्हा १९ वर्षांखालच्या भारतीय संघात त्याची रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारासोबत निवड झाली. त्यानंतर जडेजाच्या खऱ्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली. ‘‘मला क्रिकेट सोडून काहीच येत नव्हतं. क्रिकेट माझं जीवन झालं होतं. म्हणून जेव्हा मी पहिली कार घेतली, त्याच्या मागेही मी Life is cricket असा स्टिकर लावला होता,’’ रवींद्र जडेजाने आठवणी जागवताना सांगितलं.

आयुष्य बदललं

२००८ मध्ये आयपीएल सुरू झाली आणि पहिल्याच वर्षी जडेजाची लॉटरी लागली. राजस्थान रॉयल्स संघात जडेजा निवडला गेला आणि निवडणारा माणूस होता खुद्द शेन वॉर्न. पहिली आयपीएल राजस्थान रॉयल्स संघाने जिंकली आणि वॉर्नच्या नजरेत रवी जडेजा रॉक स्टार झाला. ‘‘सुखानंतर मोठं दुःख आलं. एका संघाकडून खेळत असताना दुसऱ्या संघाशी खेळण्याची बोलणी करणं मला खूप महागात पडलं. माझ्यावर बंदी घालण्यात आली आणि मी उद्‍ध्वस्त झालो. क्रिकेट न खेळायची शिक्षा मला खल्लास करून टाकणारी होती. त्या कठीण काळात परत नयनाताईने मला सावरलं,’’ रवींद्र सांगत होता.

धोनीच्या पंखाखाली

कसंतरी करून फिटनेसवर लक्ष देत आणि सरावात मन रमवत जडेजाने तो कठीण काळ काढला. बंदी संपल्यावर त्याचं नशीब परत उजळलं, कारण स्वतः महेंद्रसिंह धोनीने जडेजाला चेन्नई सुपर किंग्ज संघात दाखल करून घेतलं. जडेजाने धोनीचा विश्वास खेळाडू म्हणून संपादला आणि भारतीय संघाचे दरवाजे त्याच्याकरिता उघडले. धोनीनेच जडेजाला नंतर योग्य वेळी कसोटी पदार्पणाची संधी दिली.

परिपक्व खेळाडू

जगातील सर्वोत्तम फिल्डर म्हणून त्याचं नाव आदराने घेतलं जातं. त्याच्या दिशेला चेंडू जाताना दिसला तरी फलंदाज धाव घ्यायची हिम्मत करत नाहीत, असा जडेजाचा दबदबा आहे. फलंदाज म्हणून त्याने स्वतःची क्षमता जाणली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणं त्याला शक्य झालं आहे. थोडीशी मदत मिळणाऱ्या विकेटवर जडेजाची फिरकी खेळताना फलंदाज गोंधळून जाताना दिसतात. एकंदरीतच सातत्याने योग्य कामगिरी करून गेल्या काही वर्षांत जडेजा तीनही क्रिकेट संघांचा अविभाज्य घटक बनला आहे. घरची परिस्थिती कठीण असून, केवळ अविश्रांत मेहनत आणि क्रिकेटवर प्रेम करून रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव कमावलं आहे. ‘‘मला अजून काही वर्षं टॉप लेव्हलचं क्रिकेट खेळायचं आहे. माझं वय वाढतं आहे हे जाणून मी आहार आणि व्यायामाची शिस्त वाढवली आहे. क्रिकेट माझं सर्वस्व आहे आणि त्याच्या जवळ राहायला मी काहीपण करू शकतो,’’ निरोप घेताना रवींद्र जडेजा म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.