टेबलाबाहेरचे टेबल टेनिस

ऑलिंपिक स्पर्धा सुरू झाल्या की क्रीडाप्रेमी म्हणून मला खूप आनंद होतो. याचं कारण असं आहे की विविध खेळातील सर्वोत्तम खेळाडूंचा खेळ, त्यांचं कौशल्य सगळंच अनुभवता येतं.
Manika Batra
Manika BatraSakal
Updated on

ऑलिंपिक स्पर्धा सुरू झाल्या की क्रीडाप्रेमी म्हणून मला खूप आनंद होतो. याचं कारण असं आहे की विविध खेळातील सर्वोत्तम खेळाडूंचा खेळ, त्यांचं कौशल्य सगळंच अनुभवता येतं. नेमबाजी असो की तिरंदाजी, हॉकी, बॅडमिंटन टेबल टेनिस या सर्व खेळातील सर्वोत्तम खेळाडू बघता येतात ज्याची मजा और असते. आपण जास्तीत जास्त वेळा क्रिकेट, टेनिस, फुटबॉलचे अनेक सामने थेट प्रक्षेपणातून बघतो. जागतिक बॅडमिंटन स्पर्धा किंवा ऑल इंग्लंड स्पर्धेची पातळी माहीत असल्याने त्या स्पर्धांद्वारे अत्युच्च बॅडमिंटन आपल्याला बघायला मिळते. तसे बाकीचे खेळ आपण त्याच उत्कटतेने बघत नाही कारण बऱ्याच वेळेला त्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण होताना दिसत नाही. त्यामुळं मनात असले तरी त्याचा पाठपुरावा करता येत नाही. म्हणूनच जेव्हा मनिका बत्राला चांगले खेळताना बघता आले आणि अचंत शरतने चीनचा महान खेळाडू मा लाँग विरुद्ध भन्नाट खेळ करून एक गेम जिंकून त्याला घाम फोडला ते अनुभवता आले. नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले आणि भारतीय संघाकरता टोकियो ऑलिंपिकची सुंदर सांगता झाली. पाठोपाठ झालेल्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत तर भारतीय खेळाडूंनी खरोखरच कमाल कामगिरी करून दाखवली. पाच सुवर्णपदकांसह एकूण १९ पदके जिंकून आपल्या अ‍ॅथलिस्ट मंडळींनी सगळ्यांना आनंद साजरा करायला संधी दिली.

टोकियो ऑलिंपिकमधील टेबल टेनिसचे सामने चालू असताना एक गोष्ट चांगलीच खटकली ती म्हणजे मनिका बत्रा खेळत असताना कोर्टवर कोणीच प्रशिक्षक दिसला नाही. वरकरणी साधी दिसणारी ही बाब प्रत्यक्षात किती खोल आणि गंभीर होती हे थोडा अभ्यास केल्यावर समजले.

भारतीय टेबल टेनिस महासंघ आणि मनिका बत्रा यांच्यातला वाद नुसता चव्हाट्यावर आला नाही तर आता हे प्रकरण थेट न्यायालयात गेले आहे.

नाकाला मिरची झोंबली

मूळची दिल्लीची मनिका बत्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू लागल्यावर तिनं दिल्ली सोडून टेबल टेनिस प्रशिक्षणाकरता पुण्याला यायचं ठरवलं तिथंच ठिणगी पडली. इतकी वर्ष प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाला हा बदल अमान्य होता. दिल्लीची मुलगी एकदम पुण्याला शिफ्ट होतेच कशी ? ही खरी नाकाला मिरची झोंबली. मग खेळाडूला खाली खेचण्याकरता प्रयत्न केले गेले. प्रशिक्षणात मन रमवलेल्या मनिकाने बोलण्यापेक्षा टेबल टेनिस टेबलवरच्या कामगिरीने उत्तर देण्याचा मार्ग पसंत केला. पुण्यात दाखल झाली तेव्हा मनिका बत्राचे जागतिक मानांकन ७९ होते.

पुण्यात राष्ट्रीय खेळाडू सन्मय परांजपेने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या आवारात चालू केलेल्या ‘इंडिया खेलेगा’ अकादमीत मनिकाने प्रशिक्षण आणि मेहनत चालू केली. २०२१मधल्या राष्ट्रीय स्पर्धेत मनिका बत्राने पहिल्या दोन गेम्स गमावून नंतर जोरदार पुनरागमन करताना आपल्या खेळात बदल करून पुढच्या चार गेम्स जिंकल्या आणि राष्ट्रीय विजेतेपदावर हक्क सांगितला. पाठोपाठ कतार देशातील दोहा गावामध्ये झालेल्या स्पर्धेत चांगली कामगिरी करून मनिकाने आपले टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील प्रवेशाचे स्थान पक्के केले. चांगल्या कामगिरीचा आनंद होता पण लक्ष टोकियो ऑलिंपिककडे होते. त्याचवेळी मार्च महिन्यात चुकीची घटना घडली. टेबल टेनिसचे भारतातील राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदिप रॉय यांनी मनिकाला भेटून सामना हरण्याची विनंती केली. मनिकाने तो सामना गमावला तर रॉय ज्या मुलीला प्रशिक्षण देत होते तिचे ऑलिंपिकला जाणे नक्की होण्याची शक्यता होती.

मनिकाने त्या विनंतीला ठाम नकार देताना झालेली घटना टेबल टेनिस महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर लगेच घातली असेही मनिका बत्राचे म्हणणे आहे. स्थानिक पातळीवरील खेळात अशा चुकीच्या घटना होतात ज्याला सामना निश्चिती म्हटले जात नाही. एक नक्की झाले की अगोदरच चांगले संबंध नसलेल्या मनिका आणि सौम्यदिप रॉय यांच्यातील वाद अजून वाढले. झाल्या प्रसंगातून मनिकाचा सौम्यदिप यांच्यावरचा विश्वास पार उडाला आणि तिने निर्णय घेतला की ऑलिंपिक स्पर्धेत सामना खेळताना ती सौम्यदिप यांना प्रशिक्षक म्हणून बसायला नकार देणार. हेच कारण होते की मनिका बत्रा टोकियो ऑलिंपिक मध्ये खेळत असताना कोर्टवर कोणीही प्रशिक्षक दिसला नाही. अर्थातच टेबल टेनिस महासंघाने याबाबतीत नमते न घेण्याचेच ठरवले.

परांजपेंच्या मार्गात अडथळे

पुण्याला शिफ्ट झाल्यापासून मनिका बत्राला सन्मय परांजपे प्रशिक्षण देत आहे. एकीकडे राष्ट्रीय असू देत किंवा स्थानिक टेबल टेनिस बिरादरी असो, सन्मय परांजपे चालवत असलेल्या अकादमीला किंवा तो देत असलेल्या मनिका बत्राच्या प्रशिक्षणाला कोणी जास्त किंमत देत नाही उलट टीकेची धार वाढत चालली आहे. दुसऱ्या बाजूला कामगिरीचा आलेख बघायला गेला तर पुण्यात दाखल होताना मनिका बत्राचे जागतिक मानांकन ७९ होते ते आता ५६वर आल्याचे दिसत आहे. म्हणजेच मनिकाच्या खेळात सुधारणा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

तसे बघायला गेले तर वैयक्तिक खेळात सर्वोच्च स्तरावर खेळणार्‍या खेळाडूला त्याच्या विचारानुसार आणि निवडलेल्या कार्यपद्धतीनुसार तयारी करायचा मूलभूत अधिकार आहे. बॅडमिंटनचे उदाहरण घेतले तर पीव्ही सिंधूचे अगोदरचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद होते आणि नंतर तिने वेगळ्या प्रशिक्षकाबरोबर काम करायचे ठरवले ज्याला ना भारतीय क्रीडा प्राधिकरणाने किंवा स्वत: गोपीचंदने आक्षेप घेतला. मग मनिका बत्राला टोकियो ऑलिंपिकला तिचा प्रशिक्षक बरोबर नेण्याचा हक्क कसा नाही ? सन्मय परांजपेचे प्रशिक्षक म्हणून जाणे भारत सरकारने मान्य केले तरी टेबल टेनिस महासंघाने त्याची कागदपत्रांची पूर्तता वेळेवर केली नाही, ज्याने सन्मयला परांजपे टोकियोला गेला पण त्याला योग्य अधिस्वीकृतीपत्र मिळाले नाही. ज्याने तो सामना बघायला कसाबसा जात होता पण कोर्टवर सामना चालू असताना प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करू शकत नव्हता. मनिका बत्राने पहिल्या दोन सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून अपेक्षा वाढवल्या. तिसऱ्या फेरीत वरचढ प्रतिस्पर्धी आणि टेबल टेनिस महासंघातील राजकारण यामुळे तिला एकाग्रता राखता आली नाही आणि ती पराभूत झाली.

परतल्यावर चौकशी समिती

ऑलिंपिकहून परतल्यावर भारतीय टेबल टेनिस महासंघाने राष्ट्रीय प्रशिक्षकाला कोर्टवर सामना चालू असताना बसू न देण्याच्या निर्णयाची मनिकाला कारणे विचारली. मनिकाने राष्ट्रीय प्रशिक्षकाने मार्च महिन्यात केलेल्या कृत्याचे कारण सांगितले, जे महासंघाने प्रथम दर्शनी गांभीर्याने घेतले नाही उलट कोणतीही चौकशी न करता मनिकाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे जाहीर केले. एव्हाना माध्यमांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या होत्या आणि नंतर टेबल टेनिस महासंघाने प्रथम पाच सदस्यांची चौकशी समिती नेमली. आता त्याच समितीचे सदस्य कमी करून आणि काही बदलून तीन सदस्यांची समिती नेमल्याचे कानावर आले.

दरम्यान, आपल्या हाती ठोस पुरावे आहेत, असे सांगत आता मनिका बत्राने थेट न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने क्रीडा मंत्रालयाला भूमिका स्पष्ट करायला सांगितले आहे. मनिकाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने नाराज झालेल्या महासंघाने प्रशिक्षण शिबिरात हजर असलेल्या खेळाडूंचाच विचार पुढील भारतीय संघात केला जाईल असा फतवा काढला. कोणताही उच्चं स्तरावर खेळणारा खेळाडू चांगले प्रशिक्षण सोडून महासंघाच्या प्रशिक्षण शिबिरात दाखल होत नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण नियमावर बोट ठेवून महासंघाने मनिका बत्रा प्रशिक्षण शिबिराला हजर राहिली नसल्याचे कारण सांगत तिला संघातून काढून टाकले आहे. एकंदरीत हा सगळा प्रकार मला टेबलाबाहेरचे टेबल टेनिस वाटत आहे.

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण या प्रकारावर काय भूमिका घेते हे बघायला लागेल. तसेच मनिका बत्रा आणि तिचा प्रशिक्षक सन्मय परांजपेलाही हे कळणार आहे की ‘ पाण्यात राहून माशांशी सतत वैर’ करून राहता येईल की नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.