अखेर जाग आली

निवड समितीचं काम करताना अजित आगरकर सडेतोड असल्याची एक कहाणी मुंबई क्रिकेटमध्ये चवीनं बोलली जाते. ही कहाणी दीड-दोन वर्षांपूर्वीची आहे.
Ajit Agarkar
Ajit Agarkarsakal
Updated on

एक जमाना होता की, शहरात काही मोजकीच सिनेमा थिएटर असायची. एका थिएटरमध्ये एकच सिनेमा दाखवला जायचा. मोजके सिनेमा हॉल असताना लोक रांगा लावून चांगले सिनेमे बघायला कौतुकानं जायचे. दादा कोंडकेंचे सिनेमे एकाच थिएटरला कित्येक काळ ‘हाउस फुल’ची पाटी बाळगत चालू असायचे. जमाना बदलला, मल्टिप्लेक्स आली.

एकाच इमारतीत, एकाच मजल्यावर चार छोटी-मोठी सिनेमा थिएटर आणि त्यात चार वेगवेगळे सिनेमा प्रदर्शित व्हायला लागले. गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्म आले. ‘ओटीटी’ म्हणजे ओव्हर द टॉप. अर्थ अगदी साधा आहे तो म्हणजे, इंटरनेटच्या माध्यमातून सरळ सिनेमा किंवा मालिका तुमच्या टीव्हीच्या डोक्यात उतरते आणि तुम्ही घरबसल्या सिनेमा किंवा मालिकांचा आनंद घेऊ शकता.

विविध विषयांवरच्या मालिका, जगातल्या विविध भाषांमधील दर्जेदार सिनेमे यांसह भन्नाट दृक-श्राव्य खजिना रसिक प्रेक्षकांना सादर करण्यासाठी १९९७ मध्ये नेटफ्लिक्सची सुरुवात झाली. २०१६ मध्ये नेटफ्लिक्सने भारतात प्रवेश केला. मालिका, सिनेमा तयार करणाऱ्‍या लोकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म अर्थकारण सबळ करणारं माध्यम ठरू लागलं. ४ ते ८ भागांच्या चांगल्या दर्जेदार डॉक्युमेंटरीला हेच ओटीटी प्लॅटफॉर्म करोडोंनी पैसे देऊ लागले. याच ओटीटी प्लॅटफॉर्मची किंवा एकंदरीतच सोशल मीडियाची नशा कोणाला कधी चढेल सांगता येत नाही.

आज हे सगळं सांगण्यासाठी खास कारण आहे. २०२२ सालच्या अखेरीला माध्यमांचा एक प्रतिनिधी एका व्यक्तीच्या घरी गेला. त्यानं त्या व्यक्तीला सांगितलं की, एक मोठा ओटीटी प्लॅटफॉर्म तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्रात एक भन्नाट मालिका करू इच्छितं.

तुम्ही जर तुमच्याजवळ असलेला अनुभवांचा खजिना मोकळा केलात, तर अफलातून मालिका बनवली जाऊ शकते. तुम्हाला भरपूर प्रसिद्धीबरोबर प्रचंड मोठी रक्कम मिळू शकते. झालं मग. त्या व्यक्तीला माध्यमाच्या प्रतिनिधीने सांगितलेल्या प्रकल्पाची भुरळ पडली. मनातील गोष्टी गप्पांच्या ओघात बोलताना त्या व्यक्तीने काही गुपितं फोडली.

गुगली असा होता की, ते स्टिंग ऑपरेशन होतं. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मोठ्या रकमेची भुरळ घालून त्या माध्यमाच्या प्रतिनिधीने खासगीत बोललेली गुपितं लपवलेल्या कॅमेऱ्‍यातून रेकॉर्ड करून थेट टीव्ही चॅनेलवर दाखवली. मग हलकल्लोळ झाला.

कारण साधं होतं, स्टिंग ऑपरेशन झालेली व्यक्ती भारतीय क्रिकेट वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा होती. मग काय, व्हायचा तोच गदारोळ झाला. चेतन शर्मांनी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजीनामा दिला. त्यानंतर तब्बल चारपेक्षा जास्त महिन्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अजित आगरकरची नेमणूक निवड समिती अध्यक्ष म्हणून केली.

२६ कसोटी आणि १९१ एक दिवसीय सामने खेळलेला अजित आगरकर विचारांनी स्पष्ट आणि बोलण्यात सडेतोड आहे. खेळातून निवृत्त झाल्यावर आगरकरने मुंबई क्रिकेट निवड समितीत काम केलं आहे. कधी कॉमेंटरी तर कधी आयपीएल संघासाठी साहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे. अजित आगरकरला निवड समिती अध्यक्ष बनून नव्या भारतीय संघाची जडणघडण करायचं आव्हान आवडणार आहे.

निवड समितीचं काम करताना अजित आगरकर सडेतोड असल्याची एक कहाणी मुंबई क्रिकेटमध्ये चवीनं बोलली जाते. ही कहाणी दीड-दोन वर्षांपूर्वीची आहे. भारतीय संघातून खेळून आलेल्या एका खेळाडूला रणजी करंडकाचा सामना चुकवायचा होता. मुंबई संघासाठी तो सामना महत्त्वाचा होता म्हणून त्या खेळाडूची संघाला जास्त गरज होती.

‘माझ्या मांडीच्या स्नायूला थोडी दुखापत झाली आहे... दुखापत उग्र स्वरूप धारण करू नये म्हणून काळजी घ्यावी वाटते आहे... म्हणून हा एक सामना मी खेळणार नाहीये,’ असा संदेश त्या खेळाडूनं निवड समितीला दिला होता. अजित आगरकरनं जेव्हा जरा खोलात जाऊन चौकशी केली, तेव्हा तो खेळाडू मांडीच्या दुखापतीनं नव्हे, तर ३१ डिसेंबरची मजा करायची म्हणून सामना चुकवायचा विचार करत असल्याची कुणकूण आगरकरला लागली.

खमक्या स्वभावाच्या आगरकरने मग त्या नाठाळ खेळाडूला मैदानावर यायचे आदेश देताना ‘आपण फिटनेस टेस्ट करूयात... जर दुखापत गंभीर असेल तर मी बीसीसीआयला कळवतो, जेणेकरून तुला अजून चांगले उपचार मिळतील,’ असा संदेश दिला. मग काय झालं, स्वाभाविक आहे, पोलखोल होणार समजल्यावर त्या खेळाडूनं ३१ डिसेंबर पार्टीचा विचार रद्द करून गुपचूप रणजी खेळायला तयारी दाखवली. सांगायचा मतलब असा की, वरून शांत दिसणारा अजित आगरकर कामाला आणि विचारांना स्पष्ट आहे.

आगरकरला पूर्ण कल्पना आहे की, तो निवड समिती अध्यक्ष बनत असताना भारतीय संघासाठी कात टाकण्याचा काळ सुरू झाला आहे. कसोटी संघातील शुबमन गिल सोडून बाकी महत्त्वाचे फलंदाज वयाची पस्तिशी पार करून गेले आहेत. आगरकरनं पदभार घेण्याअगोदर निवड समितीच्या इतर सदस्यांनी मिळून संघात बदल करायचे संकेत दिले, जेव्हा चेतेश्वर पुजाराला वगळून ऋतुराज गायकवाडला संघात घेतलं गेलं.

वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्‍या क्रमांकाच्या जागेवर ऋतुराज गायकवाड खेळताना दिसायची शक्यता वाढली आहे. प्रथम श्रेणीच्या तसंच आयपीएल स्पर्धेत कमालीची सातत्यपूर्ण कामगिरी करून ऋतुराज गायकवाडनं जसा कसोटी संघात आपला हक्क सांगितला, तसाच हक्क बाकीचे तरुण खेळाडू चांगली कामगिरी करून सांगतील, असा विश्वास वाटतो.

अजित आगरकरच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या निवड समितीच्या बैठकीत भारतीय टी-२० संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीला जागा न देता समितीनं नव्या दमाच्या खेळाडूंची निवड करून संघाची दोरी हार्दिक पंड्याच्या हाती सोपवली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्‍या टी-२० वर्ल्डकपची तयारी सुरू झाली असल्याचे शुभसंकेत निवड समितीनं दिले आहेत, असंच म्हणावं लागेल.

पुढील एक-दीड वर्षात भारतीय कसोटी संघात असेच लक्षणीय बदल आगरकरच्या निवड समितीला करावे लागणार आहेत. टप्प्याटप्प्यानं रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या जागेवर तरुण खेळाडूंनी हक्क सांगण्याची गरज आहे. पुढील काळात कसोटी संघाचा कप्तान म्हणून रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण असेल याचा शोध घेणं गरजेचं आहे.

शेवटचा मुद्दा १०० पेक्षा कमी दिवसांवर येऊन ठेपलेल्या एक दिवसीय वर्ल्डकप स्पर्धेचा आहे. सलग दहा वर्षं भारतीय क्रिकेट मोठ्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी तरसतं आहे. स्पर्धा तोंडावर आलेली असताना निवड समिती खूप मोठे बदल संघात करणार नाही असं वाटतं. तरीही रिषभ पंत इतक्यात तंदुरुस्त होणार नसल्यानं एक दिवसीय भारतीय संघाचा विकेट कीपर कोण असेल, हा मुख्य प्रश्न सोडवावा लागणार आहे.

मधल्या फळीतील फलंदाजीचा आणि वेगवान गोलंदाजांच्या जागेसाठी समर्थ पर्याय निवडण्याचं काम अजित आगरकरच्या निवड समितीला करावं लागणार आहे. जटिल प्रश्नांना उत्तरं शोधली तर अजित आगरकरच्या निवड समितीचं काम चांगलं होत असल्याची पावती लगेच मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.