सांगताना जरा त्रास होतोय पण सत्य हेच आहे, की २०२३ विश्वचषक स्पर्धा सुरू जरी ५ ऑक्टोबरला झाली असली, तरी खऱ्या क्रिकेटच्या सणाची सुरुवात आज म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यानं होणार आहे. ऑलिंपिक असो वा विश्वकरंडक फुटबॉल वा क्रिकेट विश्वकरंडक; सर्वांत मोठ्या जागतिक स्पर्धेसाठी चार वर्षांची प्रतीक्षा करावीच लागते. भारतात होत असलेला एकदिवसीय विश्वकरंडक म्हणजे ‘क्रिकेटचा महाकुंभ’ वाटतो मला.
क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट बघत असतात असा ५० दिवस चालणारा सोहळा. भारतातील दहा शहरांतील दहा मैदानांवर हा सोहळा रंग भरू लागला आहे. मोठ्या संगीत उत्सवात जसं चांगले कलाकार हजेरी लावत असतात पण दर्दी रसिकांना भीमसेन जोशी रंगमंचावर येण्याची ओढ असायची अगदी तशीच ओढ भारतीय क्रिकेटरसिकांना भारताच्या पहिल्या सामन्याची लागली आहे.
१९७५ मध्ये सुरू झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, भारत आणि वेस्ट इंडिज असे सहा प्रमुख संघ आणि सोबतीला पूर्व आफ्रिका आणि श्रीलंका यांना सहभागी करून घेतले होते. स्पर्धेतील सर्व सामने ६० षटकांचे होते. बदल किती होता याचं साधं उदाहरण देतो. पहिल्यांदाच विश्वकरंडक स्पर्धेत खेळताना भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडनं ३०० धावांचा टप्पा पार केला.
उत्तर देताना भारतानं संपूर्ण ६० षटके खेळताना ३ बाद १३२ धावा केल्या होत्या. सुनील गावसकरांनी सलामीला जाऊन १७४ चेंडू खेळून नाबाद ३६ धावा केल्या होत्या. त्याच २०१९ मधल्या विश्वविजेत्या इंग्लंड संघानं २०२३ च्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कष्टानं उभारलेल्या २८२ धावांचा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ३६.२ षटकांमध्ये धुव्वा उडवला. खेळात झालेला लक्षणीय बदल लक्षात यावा म्हणून फक्त हे उदाहरण दिलं.
मासा जसा सहजी पाण्यात मिसळतो तसं वेस्ट इंडिजचे खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमध्ये समरसून गेले. १९७९ चा विश्वकरंडकाचा अंतिम सामना हे त्याचं उदाहरण. व्हिव्हियन रिचर्डस् यांनी तडाखेबाज शतक केलं आणि कॉलिस किंग्ज यांनी तोडफोड फलंदाजी करून १० चौकार ३ षटकार मारून ६६ चेंडूत ८६ धावा केल्या. मोठ्या धावसंख्येसमोर इंग्लंडची गाळण उडायला ज्योएल गार्नरची भेदक गोलंदाजी कारण ठरली.
नंतरच्या काळात एकदिवसीय क्रिकेट सामने आणि अर्थातच विश्वकरंडक स्पर्धा ५० षटकांच्या व्हायला लागल्या. १९८३ मध्ये अंतिम सामन्यात भारतीय संघानं बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पराभूत करून धमाल उडवली. त्या सामन्यानंतर भारतीय संघानं प्रगतीची वाट पकडली तर वेस्ट इंडिज क्रिकेटची ‘वाट’ लागली.
२०२३ विश्वकरंडक स्पर्धेची सुरुवात धडाक्यात झाली आहे. गतविजेत्या इंग्लंडला न्यूझीलंड संघानं दिलेला मोठ्या पराभवाचा झटका सगळ्या संघांना खडबडून जागं करणारा आहे.
वेगळ्या शतकाची वाटचाल
क्रिकेटचा विश्वचषक सुरू असला, तरी भारतीय खेळविश्वात वेगळ्याच शतकाची पूर्ततेची शक्यता चर्चेत होती. हे शतक क्रिकेटचं नव्हतं, तर ‘एशियन गेम्स’मधल्या भारतीय खेळाडूंच्या १०० पदकांकडे होणाऱ्या वाटचालीचं होतं.
गतवेळी म्हणजेच २०१८ मध्ये इंडोनेशियात झालेल्या या स्पर्धांत भारतीय खेळाडूंनी ७० पदकांची मजल गाठली होती. २०२३ च्या स्पर्धांत १०० पदकांचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून तयारी केली गेली होती. हा लेख लिहीत असताना भारतीय खेळाडूंनी ८६ पदकांची लयलूट केली होती आणि स्पर्धेतील अजून काही खेळप्रकार बाकी होते.
नीरज चोप्रानं भालाफेक क्रीडाप्रकारात अशी काही उंची गाठली आहे, की आता नीरजकडून क्रीडाजगत फक्त सुवर्णपदकाचीच अपेक्षा ठेवतं. नीरज चोप्रानं सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या; वर त्यानं अन्नू रानीला सुवर्णपदक आणि किशोरकुमार जेनाला रौप्यपदकाला गवसणी घालायला प्रोत्साहन दिलं. नेमबाजी आणि धनुर्विद्या विभागात भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करणार हे सगळ्यांनाच माहीत होतं. खरी लक्षणीय प्रगती ‘ट्रॅक अँड फिल्ड’ खेळात झाली आहे.
बीडमधल्या शेतकरी कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या अविनाश साबळेनं ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत सुवर्णपदक मिळवून कमाल केली. तशीच मजल ५००० मीटर शर्यतीत पारुल चौधरीनं मारून दाखवली. पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर शर्यतीत भारतीय धावपटूंनी अव्वल स्थान पटकावलं, हा मोठा आनंदाचा भाग आहे. भारताच्या टेनिस, टेबलटेनिस आणि बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंनी दर्जेदार चिनी खेळाडूंना ‘एशियन गेम्स’मध्ये दिलेली टक्कर कायम लक्षात राहणार आहे.
स्वागतार्ह बदल
हा बदल अचानक घडलेला नाही. अगोदर खेळाडू कोणतीही सुविधा मदत मागायला गेले, तर त्यांना आधी काही तरी कमाल कामगिरी करून दाखवा मग मोठ्या तोंडाने मदत मागायला या, अशा प्रकारच्या लाजिरवाण्या सूचना केल्या जायच्या. गेल्या १० वर्षांत भारताच्या खेळ मंत्रालयानं आणि भारतीय खेळ प्राधिकरणानं तमाम खेळ महासंघांना योग्यवेळी मदत करताना त्यांच्या कामकाजावर अंकुश ठेवला.
खेळाडूंना तयारीसाठी पुरेसा अवधी देताना निष्णात प्रशिक्षक आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या. नेमबाजीसारख्या खर्चिक खेळात कष्ट करणाऱ्या खेळाडूंना काचकूच न करता सरावासाठी सामग्री पुरवली. सुविधा पुरवत असताना खेळाडूंवर अनावश्यक दडपण टाकलं नाही. हॉकीचं पुनरुज्जीवन करताना सुनियोजित कष्ट केले.
ज्या खेळाडूंची स्वतःच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी परिश्रम करायची तयारी आहे, त्यांना दर्जेदार प्रशिक्षणाचं भरपूर पाठबळ दिलं. यामुळे भारतीय खेळजगतात सकारात्मक बदल दिसत आहेत. परिणामी, सर्व खेळांतील प्रगती आशेचा किरण दाखवणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.