धोनीची बात न्यारी

दोन देशात आणि दोन भागात करायला लागलेली आयपीएल स्पर्धा नुकतीच संपली आणि चेन्नई सुपर किंग्ज् संघाने परत एकदा करंडकावर आपले नाव कोरले.
Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh DhoniSakal
Updated on

दोन देशात आणि दोन भागात करायला लागलेली आयपीएल स्पर्धा नुकतीच संपली आणि चेन्नई सुपर किंग्ज् संघाने परत एकदा करंडकावर आपले नाव कोरले. विशेष करून बाद फेरीच्या दोन सामन्यात विजय मिळवताना चेन्नई संघाने केलेला खेळ वाखाणण्याजोगा ठरला यात शंका नाही. कर्णधार महेंद्रसिंह धोनी फलंदाजी करताना फक्त एकदाच थोडा चमकला बाकी अपयशी ठरला. पण दुसर्‍या बाजूला त्याने संघाचे नेतृत्व करताना संघाला दाखवलेली दिशा कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरली. काय कारणे आहेत चेन्नई संघ इतका सातत्याने यशस्वी ठरल्याची, असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. त्याची उत्तरे देण्याचा तसेच धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून टी२० वर्ल्डकप दरम्यान काम करताना दिसणार आहे त्याच्या मागे काय विचार आहे ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो.

फरक विचारात आहे

मला आठवते २००८ मध्ये जेव्हा आयपीएल स्पर्धा सुरू झाली आणि श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपर किंग्ज् संघाची दोरी धोनीच्या हाती दिली होती तेव्हा सगळ्यांनी भुवया उंचावल्या होत्या. संघात कोणाला घेतले पाहिजे इथंपासून ते प्रशिक्षक कोणाला ठेवले जावे या करता धोनीने आग्रह धरला नव्हता पण त्याच्या बुद्धीला पटणारे पर्याय नक्कीच सुचवले होते. त्यावेळी संघात खेळणार्‍या सगळ्यांना उत्सुकता होती की धोनी सामना चालू होताना काय बोलणार, काय योजना सांगणार. धोनीने संघातील सर्वांना सामन्याअगोदर एकत्र करून एकच सांगितले की, ‘आपल्याला फेअर प्ले करंडक जिंकायचा आहे. आपण क्रिकेटची संस्कृती पाळत सभ्यतेने खेळून समोरच्या संघाचा आदर मिळवूयात आणि आदर्श निर्माण करूयात’. या बोलण्याचा परिणाम असा झाला की मोठ्या स्पर्धेत खेळून विजय मिळवायचे दडपण कुठच्या कुठे पळून गेले. पहिल्याच मोसमात चेन्नई संघाने अंतिम सामन्यात धडक मारली.

जास्त चर्चा नाही

धोनीचे स्पष्ट म्हणणे आहे की खेळाडूंची एकाग्रता मैदानावरील खेळाकरता राखून ठेवली पाहिजे. टीम मिटींग म्हणजे संघाच्या बैठकीत काथ्याकूट करून त्यात लक्ष एकाग्र करण्यात नाही. याच विचारांचा पाठपुरावा करताना धोनीने सामन्यांच्या योजना आखायच्या संघाच्या बैठका कधीच २० मिनिटांपेक्षा लांबवायच्या नाहीत असा आग्रह ठेवला. कित्येकवेळा धोनी फलंदाज किंवा गोलंदाजांच्या बैठकीला कर्णधार म्हणून पाच मिनिटे जातो आणि नंतर उठून जाताना सांगतो की, ‘तुम्ही तुमचा विचार करून योजना आखा आपण त्याचाच पाठपुरावा मैदानात करू. आणि समजा तुमची योजना चालली नाही तर काळजी करू नका माझ्याकडे पर्याय तयार असेल’. या विचार पद्धतीने संघातील सगळ्यांना आपापल्या जबाबदारीची जाणीव झाली आणि वैचारिक स्वातंत्र्यही मिळाले.

सातत्याची कमाल

बारा वर्षांच्या कालखंडात चेन्नई सुपर किंग्ज् संघ फक्त एकदा बाद फेरीत जाऊ शकलेला नाहीये. पाचवेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे आणि चारवेळा त्यांनी करंडकावर आपले नांव कोरले आहे. २०१५ मधल्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज्चे मालक श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपन यांनी संघ व्यवस्थापनाचा भाग असताना जुगार खेळायची मोठी चूक केली. चेन्नई संघाला पुढची दोन वर्ष स्पर्धेतून काढून टाकण्यात आले. तो धक्का पचवून स्पर्धेत परतल्यावर

धोनीने दोन वेळा विजेतेपदावर हक्क सांगितला ही लक्षणीय बाब मानावी लागेल. कामगिरीत इतके सातत्य कोणत्याच दुसर्‍या संघाला राखता आलेले नाहीये.

जसे संघाने सातत्य राखले तसेच संघ व्यवस्थापनातही सातत्य राखले गेले. पहिल्यापासून श्रीनिवासन यांनी काशीनाथ या आपल्या विश्वासू सहकार्‍याला संघाचा व्यवस्थापक म्हणून ठेवले. संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून स्टीफन फ्लेमिंग काम बघतात तसेच संघाचा इतर सपोर्ट स्टाफ पहिल्यापासून तोच आहे. धोनीने संघात बदल करणेही विचारपूर्वक टाळले आहे. बर्‍याचवेळा वयाने जास्त असलेल्या खेळाडूंचा संघ म्हणून चेन्नई संघाबाबत शंका घेतली गेली. धोनीने उत्तम सांघिक कामगिरी करून त्याला चोख उत्तर दिले आहे.

धोनीला का बोलावले?

टी-२० वि करंडक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली व्हावी याकरिता बीसीसीआयने विचार करून धोनीला मार्गदर्शक म्हणून संघासोबत राहायला राजी केले, त्या मागे तीन मुद्दे मला दिसतात.

1) धोनी पुस्तक वाचावे तसे टी२० क्रिकेट सामन्यातील परिस्थिती वाचतो. त्याच्या संघातील सहकार्‍यांना तो योग्य वेळी मार्गदर्शन करतो. गोलंदाजांना फलंदाज काय करायची शक्यता आहे याची पूर्वसूचना देतो. बहुतांशी वेळेला धोनीचे अंदाज बरोबर ठरतात असे स्वत: गोलंदाज सांगतात. धोनीचे हेच कौशल्य संघाला टी२० वर्ल्डकपमध्ये मार्गदर्शन करू शकेल असा बीसीसीआयचा अंदाज आहे.

2) धोनी यारों का यार आहे. कोणाच्याही गळ्यात गळे घालत नसला तरी धोनी सगळ्यांच्या जिवाभावाचा सखा आहे. खेळाडू त्याला मोठा भाऊ मानतात जणू. धोनीबरोबर सुख दु:खाच्या गोष्टी खेळाडू मनमोकळेपणाने करू शकतात. धोनी वेगळाच विश्वास खेळाडूंना खूप न बोलताही देतो याचे उदाहरण देताना ऋतुराज गायकवाड म्हणाला, ‘‘चेन्नई संघात दाखल झाल्यावर पहिल्या मोसमात मी चांगला खेळलो नाही. तसेच मला दुबईतील स्पर्धेच्या वेळी कोविडची बाधा झाली. मला माही भाई प्रत्यक्ष भेटून काहीच बोलले नाहीत, पण टीव्हीवर बोलताना ते इतकेच म्हणाल की, ऋतुराज एक मेहनती आणि दर्जेदार फलंदाज आहे. त्याला संपूर्ण पाठिंबा आम्ही देणार आहोत. मला खात्री आहे की चांगली कामगिरी करून दाखवेल. माही भाईंच्या त्या बोलण्याने मला खूप विश्वास मिळाला. हाच मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की धोनीशी बोलून खेळाडूंच्या मनात आत्मविश्वास जागू शकतो.

3) विराट कोहली आणि रवी शास्त्रीच्या दादागिरीला काहीसा शह देण्याकरता बीसीसीआयने धोनीला मार्गदर्शक म्हणून आणले आहे. यात धोनीबद्दल विराट कोहलीला असलेले प्रेम आणि धोनी कोणतेही राजकारण न करता फक्त संघाच्या भल्याकरता योग्य मार्गदर्शन करू शकेल हा विचारही आहे.

हातात बॅट किंवा ग्लोव्हज् न घेता धोनी भारतीय संघासोबत दिसणार आहे ज्याची कोणाच्या डोळ्यांना सवय नाहीये. भारतीय संघ पहिलाच सामना पाकिस्तानसमोर खेळणार असल्याने अपेक्षांचे वाढणारे ओझे कमी करायला आणि खेळाडूंना शांत राखून योग्य कामगिरी करायला प्रोत्साहित करायला महेंद्रसिंह धोनीचा मोठा हातभार लागू शकतो असाच जाणकारांचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.