मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार!

खेळाचा महाकुंभ म्हणजेच विश्वचषक फुटबॉल कतार देशात रंगत आहे, दुसरीकडं क्रिकेटप्रेमींना गेल्या काही दिवसांत आशिया खंडात झालेल्या सामन्यांच्या निकालांनी थक्क करून सोडलं आहे.
England Cricket Team
England Cricket TeamSakal
Updated on
Summary

खेळाचा महाकुंभ म्हणजेच विश्वचषक फुटबॉल कतार देशात रंगत आहे, दुसरीकडं क्रिकेटप्रेमींना गेल्या काही दिवसांत आशिया खंडात झालेल्या सामन्यांच्या निकालांनी थक्क करून सोडलं आहे.

क्रीडाजगताचे डोळे सध्या आशिया खंडाकडं लागले आहेत. एका बाजूला खेळाचा महाकुंभ म्हणजेच विश्वचषक फुटबॉल कतार देशात रंगत आहे, दुसरीकडं क्रिकेटप्रेमींना गेल्या काही दिवसांत आशिया खंडात झालेल्या सामन्यांच्या निकालांनी थक्क करून सोडलं आहे. फलंदाजांचे लाड आणि गोलंदाजांवर पराकोटीचा अन्याय करणाऱ्‍या खेळपट्टीवर इंग्लंड संघाने सकारात्मक खेळ करून अशक्यप्राय वाटणारा कसोटी निकाल मिळवून दाखवला आणि बांगलादेश संघानं भारतीय संघाला सलग दोन एक दिवसीय सामन्यांत सपशेल पराभूत करून मालिका जिंकली. गेल्या आठवड्यातील या दोनही घटना मनात वेगळ्या कारणासाठी घर करून राहिल्या.

बोले तैसा चाले

२०२२ म्हणजे या वर्षीच्या सुरुवातीला इंग्लंड संघानं कसोटी सामन्यात केलेली कामगिरी जरा सांगतो. पाच कसोटी सामन्यांत तीन सामने अनिर्णीत आणि दोन सामन्यांत सपाटून मार इंग्लंड संघानं खाल्ला होता. या वर्षीच्या मे महिन्यात इंग्लिश क्रिकेट बोर्डाने धाडसी निर्णय घेताना माजी न्यूझीलंड खेळाडू ब्रँडन मॅक्कुलमची फक्त कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली. त्याचवेळी ज्यो रूटने कप्तानी सोडली आणि बेन स्टोक्स नवा कप्तान झाला. त्यानंतर सात कसोटी सामने इंग्लंड संघ खेळला आहे, ज्यातील सहा कसोटी सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आणि फक्त एक गमावला. मिळवलेले सहा कसोटी विजय अगदी दिमाखदार होते हेसुद्धा विसरून चालणार नाही.

कसोटी क्रिकेटला आम्ही प्राधान्य देतो, कसोटी क्रिकेटचं स्थान आमच्यासाठी सर्वोच्च आहे, असं बोलणारे खूप आहेत; पण कसोटी क्रिकेटला झळाळी यावी यासाठी कृती करणारे कमी आहेत. बेन स्टोक्स - ब्रँडन मॅक्कुलम या जोडीने बोलण्याबरोबर कृतीतून कसोटी क्रिकेटसाठी जे काही गेल्या सहा महिन्यांत केलं, त्याची नोंद क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांत नक्कीच नोंदवली जाणार आहे.

यामागचं कारण असं आहे की, धडाडीचा खेळ करून इंग्लंड संघाने एकाहून एक सरस विजय संपादले. वेळप्रसंगी धोका पत्करून इंग्लंड संघाने कसोटी सामन्याचा निकाल लागावा म्हणून खेळ केला. असं करताना वेळ आली तर पराभव पत्करायची तयारी ठेवली. पाकिस्तानमधील पहिल्या कसोटी सामन्याकरिता जी खेळपट्टी तयार करण्यात आली होती त्याचं काय वर्णन करावं. खेळपट्टी तयार केली आहे, का मैदानावर २२ यार्डांचा रस्ता तयार केला आहे अशी शंका यावी इतकी खेळपट्टी निर्जीव बनवली गेली होती. बेन स्टोक्स आणि मॅक्कुलमने अंदाज घेतला आणि अत्यंत धाडसी निर्णय घेत पहिल्या दिवशी वादळी फलंदाजी करायला सांगून दिवसाच्या खेळात ५०० पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला.

विक्रमी वेळेत मोठी धावसंख्या उभारून इंग्लंड संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. पहिल्या डावात पाकिस्तान संघानेही चांगली फलंदाजी करून तोडीस तोड उत्तर दिलं. दुसऱ्‍या डावात परत वेगाने धावा जमवून इंग्लंड संघाचा डाव बेन स्टोक्स‍ने घोषित करताना पाकिस्तान संघाला विजयासाठी समान संधी दिली. भल्या भल्या कप्तानांनी कसोटी सामन्यात निकाल लागावा याकरता धाडसी निर्णय घेतला नाही, हे मी बघितलं आहे. त्याचबरोबर समोरच्या संघाला सामन्यात पुनरागमन करायची संधीच द्यायची नाही असाच प्रयत्न होताना अनुभवलं आहे. बेन स्टोक्सने दुसरा डाव घोषित केला तेव्हा पाकिस्तान संघाला चार सत्र फलंदाजीकरिता बाकी ठेवली आणि उगाच अवाच्या सव्वा धावफलकाची भीती दाखवली नाही. ज्या खेळपट्टीवर धावांचा धबधबा कोसळत होता, त्यावर अखेरच्या दिवशी पाकिस्तानचे सगळे फलंदाज बाद करून विजय मिळवणं खूप कठीण होतं. नव्या विचारांनी भारलेल्या इंग्लंड संघाने तोच चमत्कार करून दाखवला. म्हणून ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ हे वचन आठवलं. इंग्लंड संघ ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळत आहे ते बघता, तेच खरे तारणहार ठरणार आहेत.

फुटबॉलची विश्वकरंडक स्पर्धा सुरू असल्याने भारतीय संघ बांगलादेशला पोहोचल्याचा जास्त बोलबाला झाला नाही. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या शेवटच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी रचून भन्नाट विजय मिळवला तेव्हा लोकांना थोडी जाग आली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर सगळ्यांनी मेहदी हसन मिराजच्या जिगरी वृत्तीचं कौतुक करून भारतीय संघाला पुनरागमन कसं करायचं हे पक्कं माहीत असल्याचा दाखला दिला. जेव्हा दुसऱ्‍या सामन्यात भारतीय संघाचा परत पराभव झाला, तेव्हा चाहत्यांना राग आला.

पहिला सामना सुरू होण्याअगोदर संघासोबत नेलेल्या रिषभ पंतला मायदेशी पाठवणार असल्याचं सांगितलं गेलं. मग तो तंदुरुस्त नव्हता का, का त्याला न खेळवण्याचा अचानक निर्णय घेतला गेला? इतकंच नाही तर ईशान किशन संघात असूनही के. एल. राहुलला विकेट कीपिंग करायला दिली गेली. दुसऱ्‍या सामन्यातसुद्धा राहुलनेच विकेट कीपिंग केली. टी-२० विश्वचषक स्पर्धेत राहुलला फलंदाज म्हणून अपयश येऊनही संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर पराकोटीचा विश्वास दाखवला. बांगलादेशविरुद्ध राहुलला विकेट कीपिंग करायला देताना ईशान किशन आणि संजू सॅमसनला डावललं गेलं, जे संपूर्णपणे अनाकलनीय होतं. काही खेळाडूंना अपेक्षित कामगिरी न करूनही परत परत संधी दिली जाते. दुसरीकडे काही खेळाडूंना तांदळातून खडा बाजूला काढून ठेवावं तसं लांब ठेवलं जातं, ही गोष्ट खटकू लागली आहे. म्हणूनच या लेखाचा मथळा ‘मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार’ असा दिला आहे.

तर सुधारणा होणार कशी?

भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नाही तरीही कोणी काहीतरी चूक होते आहे, हे मान्यच करत नाहीये. दरवेळी सामन्यानंतर बोलताना बोलणारा खेळाडू किंवा प्रशिक्षक प्रांजळपणे कुठं काय चुकत आहे हे बोलत नाही. चूक मान्यच केली नाही तर सुधारणा होणार कशी, हा खरा मुद्दा आहे. कोंबडं झाकलं तरी उजडायचं राहात नाही, हे भारतीय संघ व्यवस्थापनाला कळणार कसं? २०२३ मधल्या मुख्य विश्‍व करंडकाला जास्त काळ राहिला नसताना भारतीय संघ अजून चाचपडत असल्याचं चित्र चिंता वाढवतं आहे. वर्क लोड मॅनेजमेंटचा मुद्दा सतत बोलून आणि खेळाडूंना बऱ्‍यापैकी विश्रांती दिली जात असूनसुद्धा खेळाडू दुखापतग्रस्त होण्याचं प्रमाण कमी होताना दिसत नाही.

बांगलादेशला गेलेल्या भारतीय संघातील रिषभ पंतला परत पाठवलं जाताना खरं कारण कळू दिलं जात नाहीये. दोन खेळाडूंना दुखापत झाली, तर कप्तान रोहित शर्माला दुसरा एक दिवसीय सामना खेळताना इजा झाली आहे. आता तरी ज्या खेळाडूंना संधी द्यायला पाहिजे, त्यांना दिली जाणार का? चांगल्या लयीत असताना राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाडला खेळवलं जाणार का? चांगला विकेट कीपर बॅट्‍समन संजू सॅमसनही आहे की. त्याला आर या पार संधी दिली जाणं गरजेचं आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती नेहमी सचोटीने काम करायच्या आणाभाका घेत असतात. म्हणून वाटतं की, हीच वेळ आहे, योग्य खेळाडूंना योग्य लयीत असताना योग्य न्याय देण्याची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.