स्पेन देशातील एल पाल्मर नावाच्या छोट्या खेड्यात वर्जिनिया आणि कार्लोस गोनसाल्वीस रहात होते. गोनसाल्वीस टेनिस अकादमी चालवत होते. या दाम्पत्याला २००३ मध्ये ५ मे रोजी मुलगा झाला, ज्याचं नाव कार्लोस अल्काराज ठेवलं. वडिलांच्या अकादमीत कार्लोसचं टेनिस खेळणं आपसूक सुरू झालं. लहान वयापासून त्याच्यात असलेली अंगभूत ताकद आणि ज्याला खेळात बॉल सेन्स म्हटलं जातं ते त्याच्यात भरभरून होतं.
खेळाची असलेली जाण अजून वाढावी, त्याला योग्य दिशा मिळावी म्हणून वडिलांनी विचार करून १५ वर्षांचा असलेल्या कार्लोसला स्पेनचा महान माजी खेळाडू जुआन कार्लोस फरेरोच्या इक्विलाइट टेनिस अकादमीत दाखल केलं. चाणाक्ष गुरूने योग्य शिष्याला हेरलं आणि एक अनोखा प्रवास सुरू झाला.
वडिलांच्या अकादमीत खेळाचे भरपूर धडे गिरवलेल्या कार्लोसला गुरू लाभल्यावर त्याची प्रगती झपाट्याने झाली. एव्हाना कनिष्ठ गटातील सामन्यांत त्याची दादागिरी सुरू झाली होती. जुआन फरेरोने ओळखलं की, कार्लोसला खेळाची पुढची पातळी गाठायला मोठ्या आव्हानांची गरज आहे. विचार करून मग कार्लोसला १६व्या वर्षीच मुख्य एटीपी स्पर्धेत उतरवून प्रोफेशनल खेळाडू म्हणून झगडायला फरेरोने भाग पाडलं.
शाळेतून महाविद्यालयात गेल्यावर विद्यार्थ्याची जशी धावपळ होते, तसंच कार्लोसचं झालं. पहिलं दीड वर्ष कार्लोस मोठ्या खेळाडूंना टक्कर देताना थोडा कमी पडत होता. त्यातल्या त्यात चांगली बाब अशी होत होती की, कार्लोसला खऱ्या उच्च टेनिसच्या खेळीची खोली लक्षात येत होती आणि तो त्याच बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला शक्य ते सर्व कष्ट करत होता.
स्पेन देशातील नावाजलेली माद्रिद ओपन स्पर्धा खेळताना अठराव्या वाढदिवसाला रफाएल नदालकडून पराभूत होऊनही कार्लोस खूष होता, कारण सर्वोच्च पातळीवरच्या टेनिसची खरी चव त्याला चाखायला मिळत होती. फरेरो प्रत्येक सामन्यानंतर विश्लेषण करून खेळातील सुधारणेचा सराव करून घेत होता. मग काय, व्हायचा तो परिणाम दिसू लागला.
२०२१ मध्ये कार्लोसने पहिली एटीपी स्पर्धा जिंकली. त्यापेक्षाही लक्षणीय गोष्ट म्हणजे, अमेरिकन ओपन स्पर्धेत कार्लोसने तिसऱ्या मानांकित स्टीफानो त्सीत्सीपासला पराभूत करताना ५ सेटपर्यंत लढत दिली. लोकांना कळून चुकलं होतं की, कार्लोस अल्काराज ग्रँड स्लॅम विजेतेपदापासून जास्त लांब नाहीये.
ताकदीबरोबर लवचिकता यावी याकडे कार्लोस अल्काराजच्या सराव आणि व्यायामादरम्यान जास्त लक्ष देण्यात आलं. कोणत्याही खेळाडूची नक्कल न करता सगळ्या चांगल्या खेळाडूंच्या खेळातील चांगले गुण अंगीकारण्याकडे ध्यान देण्यात आलं. त्याचा योग्य परिणाम कार्लोस अल्काराजच्या खेळातील प्रगतीत झालेला आढळतो.
त्याच्याकडे रफाएल नदालसारखी पळायचे कष्ट करायची तयारी आहे, त्याच्याकडे फेडररला कौतुक वाटेल असा बॅक हँड स्लाइसचा फटका आहे, तसंच जोकोविचला त्रास देईल असा जबरदस्त फोरहँडचा ताकदवान फटका आहे. कार्लोसची खासीयत म्हणजे, त्याच्याकडे खूप चांगला ड्रॉप शॉट आहे. दणकट फोरहँडला ड्रॉप शॉटचं लाभलेलं बळ कार्लोसला काय कामाला आलं, हे आपण सर्वांनी २०२३ विम्बल्डन अंतिम सामन्यात अनुभवलं आहे.
२०२२ हे वर्ष कार्लोसकरिता प्रगतीचा मार्ग दाखवणारं ठरलं. माद्रिद खुल्या स्पर्धेत कार्लोसने रफाएल नदालला लाल मातीच्या कोर्टवर हरवायची कमाल साधून दाखवली. पाठोपाठ उपांत्य सामन्यात त्याने नोवाक जोकोविचला पराभवाचा झटका दिला. तोच विश्वास उराशी बाळगत २०२२ मध्ये पहिल्या तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांत चमकदार कामगिरी केल्यावर अमेरिकन खुल्या स्पर्धेत कार्लोस अल्काराजने मोठी संधी साधली.
लसीकरणाला विरोध केलेल्या नोवाक जोकोविचला अमेरिकन प्रशासनाने स्पर्धेत खेळण्याची बंदी केल्याने कार्लोसने मान वर काढली. सिलिच, सिनर आणि अंतिम सामन्यात कॅस्पर रूडला पराभूत करून कार्लोस अल्काराजने अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. वयाची विशीही न गाठलेला कार्लोस जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला.
या वर्षाची सुरुवात चांगली झाली नव्हती. पायाच्या दुखापतीने कार्लोसला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठून जोकोविचविरुद्ध खेळताना स्नायू आखडू लागल्याने कार्लोसला सामना गमवावा लागला, तरीही विम्बल्डनच्या आयोजकांनी कार्लोस अल्काराजला प्रथम मानांकन दिलं, तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.
विम्बल्डनला पूर्ण तयारी करून उतरलेल्या कार्लोसने गवताच्या कोर्टवर खूप पटकन जुळवून घेतलं. समोर आलेल्या प्रत्येक चांगल्या प्रतिस्पर्ध्याला नेस्तनाबूत करत कार्लोस उपांत्य फेरीत पोहोचला. उपांत्य सामन्यात त्याने डेनिल मेदवेदेवसारख्या अनुभवी तगड्या खेळाडूला तीन सरळ सेटमध्ये पराभूत केलं, ते बघून अंतिम सामन्यात काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली.
वीसवर्षीय कार्लोस अल्काराज ३६ वर्षीय नोवाक जोकोविचसमोर कसा झुंजतो हे बघायला जग एकाग्र झालं. पहिल्या सेटमध्ये नोवाक जोकोविचने विम्बल्डन अंतिम सामन्यात भरगच्च प्रेक्षागृहाच्या सेंटर कोर्टवर कार्लोसच्या मनावर असलेल्या खेळण्याच्या दबावाचा फायदा घेत कोणालाही कळायच्या आत सेट ६-१ असा जिंकला.
अशी जबरदस्त सुरुवात केल्यावर नोवाकला रोखणं कठीण होतं; पण कार्लोसला दुसऱ्या सेटमध्ये सूर गवसला आणि त्याचं दडपण जोकोविचवर येऊ लागलं. दुसऱ्या सेटमध्ये अत्यंत मोक्याच्या क्षणी जोकोविचने चुका केल्या आणि सामना १-१ असा बरोबरीत आला.
कार्लोसला लय सापडू नये यासाठी जोकोविचने अत्यंत जाणीवपूर्वक सर्व्हिस करताना मान्य वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला. काही वेळा त्याने पहिली सर्व्हिस पडू नये याची काळजी घेतली की काय, असा संशय आला. तिसरा सेट कार्लोसने घेतला आणि त्यानंतर जोकोविचची पहिली सर्व्हिस पडेनाशी झाली. तरीही चौथा सेट घेत लढवय्या जोकोविचने २-२ बरोबरी केली.
पाचव्या सेटमध्ये कार्लोस अल्काराजने कौशल्य, दमसास आणि तोडीस तोड उत्तर तीनही प्रांतांत जोकोविचने उभअया केलेल्या आव्हानाला चोख उत्तरं दिली. दडपणाचा बोजा कार्लोस अल्काराजवरून जोकोविचकडे झुकला आणि तिथंच सामना फिरला. जबरदस्त ताकदवान फोरहँडच्या फटक्यांना फसव्या ड्रॉप शॉटची जोड देत कार्लोस अल्काराजने नोवाक जोकोविचला नामोहरम केलं आणि विम्बल्डनच्या सोनेरी करंडकावर आपलं नाव कोरलं.
हा सगळा अद्भुत खेळ अनुभवायला इंग्लंडच्या राजघराण्यातील व्यक्तींबरोबर स्पेनचे राजे फिलिप हजर होते. इतकंच काय ब्रॅड पीट, प्रियांका चोप्रा, जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारणारा डॅनियल क्रेग, अनुष्का शंकर, अॅरियाना ग्रँड, हयू जॅकमन आणि आपल्या रवी शास्त्रीसह अनेक जान्यामान्या हस्ती हजर होत्या.
वयाच्या विसाव्या वर्षी दोन ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झालेल्या कार्लोस अल्काराजने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. फेडरर निवृत्त झाला, नदाल दुखापतीने जायबंदी झाला आणि नोवाक जोकोविच ३६ वय पार करून गेल्यावर टेनिसजगतात आता कोण, या प्रश्नाला खूप चांगलं उत्तर कार्लोस अल्काराजच्या रूपाने मिळालं आहे.
तंदुरुस्ती राखत दुखापतींना दूर ठेवलं आणि खेळात सतत सुधारणेचा ध्यास ठेवला, तर कार्लोस अल्काराज खूप मोठी मजल मारेल, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.