रोपट्याचा वटवृक्ष होताना...

सचिन तेंडुलकरने निवृत्त होत असताना आपले विक्रम विराट कोहली मोडू शकतो, अशी ग्वाही दिली होती.
Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on

सचिन तेंडुलकरने निवृत्त होत असताना आपले विक्रम विराट कोहली मोडू शकतो, अशी ग्वाही दिली होती. विराटने एकदिवसीय सामन्यांतील ५०वे शतक झळकावत सचिनने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. यावर सचिनची प्रतिक्रिया मस्त होती. तो म्हणाला ‘‘मी केलेला विक्रम भारताच्या नावावर आहे आणि जोपर्यंत नवीन होणारा विक्रम भारताच्याच नावावर राहणार आहे, तो पर्यंत मी खूष आहे.’

बरीच बुजुर्ग माणसे असे नेहमी बोलताना ऐकायला येते की, पूर्वीसारखी मजा आता नाही. मला बरोबर वेगळे म्हणायचे आहे, की पूर्वी मजा होती यात शंका नाही. मात्र, आत्ताही मजा येते आहे हे नाकारून चालणार नाही. विषय क्रिकेटशी म्हणजेच विराट कोहलीशी निगडीत आहे. ज्या लोकांचा जन्म १९६०च्या आसपास झाला त्यांचे नशीब चांगलेच जोरावर आहे, असे मला वाटते.

कारण असे आहे की भीमसेन जोशी, पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया, पं. रविशंकर, अमजद अली खान, बिस्मिल्ला खाँ या दिग्गज कलाकारांच्या प्रत्यक्ष मैफलीला जाऊन त्यांच्या स्वर्गीय कलेचा आस्वाद या पिढीला घेता आला. शंकर पाटील, व. पु. काळे, पु. ल. देशपांडेंचे कथाकथन मांडी ठोकून प्रत्यक्ष ऐकता आले. तसेच, सुनील गावसकरांचा खेळ मैदानावर जाऊन बघता आला.

सचिन तेंडुलकरची प्रदीर्घ कारकीर्द पदार्पण ते निवृत्ती संपूर्ण एन्जॉय करता आली आणि आता विराट कोहलीची ध्येयासक्ती अनुभवायचे भाग्य लाभले आहे. म्हणूनच मनापासून वाटते, की एखाद्या लहानशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होताना बघणे, यासाठी नशीबच लागते जे आजच्या पिढीचे आहे.

गुणवत्ता आणि आत्मविश्‍वास

मी २००६मध्ये दिल्लीला एका सामन्याचे वार्तांकन करायला गेलो असताना स्थानिक पत्रकार मित्राने मला रेल्वेच्या मैदानावर नेले होते, एका तरुण फलंदाजाचा खेळ बघायला. थोड्या गोबऱ्या गालाचा आणि प्रचंड उत्साहाचा अंश दिसलेल्या त्या खेळाडूची फलंदाजी बघताना गुणवत्तेबरोबर जबरदस्त आत्मविश्वास जाणवत होता. त्या खेळाडूचे नाव होते विराट कोहली.

माझा मित्र खात्रीने सांगत होता, की कोहली नक्की भारतीय संघाकडून खेळणार. विराट कोहलीने १९ वर्षांखालच्या भारतीय संघाचे नेतृत्व करत १९ वर्षांखालचा वर्ल्डकप जिंकला होता, रवींद्र जडेजा त्याचा सहकारी खेळाडू होता. निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर खेळाडू हेरण्यात पटाईत होते.

विराट कोहलीने पोराटोरांच्यात खेळणे बंद करून लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले कसब अजमावले पाहिजे, या विचारांनी दिलीप वेंगसरकरांनी विराटला २००८मध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात घेतले. एक लक्षात घेतले पाहिजे, ते म्हणजे विराटला सुरुवातीच्या काळात लगेच यश मिळाले नाही. निवड समितीला अपेक्षित कामगिरी झाली नाही, म्हणून तो भारतीय संघातून बाहेर गेला.

सांघिक खेळाला महत्त्व

पुनरागमन केल्यावर बदललेला विराट कोहली सगळ्यांना दिसला. २०१०-११च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या विराटने चांगली चमक दाखवली आणि मग त्याला भारतीय संघात घेणे सोपे झाले. सतत काही ना काही केसांची रचना करणे आणि अंगावर टॅटू काढून घेण्याच्या आवडीमुळे विराट क्रिकेटबाबत किती गंभीर आहे याची शंका आली होती.

प्रत्यक्षात दंडावरच्या टाटूमध्ये विराटने आपल्या आई वडिलांचे नाव गोंदवून घेतले आहे, हे खूप कमी जणांना माहीत आहे. दक्षिण आफ्रिका दौरा संपत असताना वीरेंद्र सेहवागने कोहलीला कसोटी क्रिकेटचे मोल समजावले होते. फलंदाज एक दिवसीय क्रिकेटमधल्या धावांमुळे मानला जात नाही, तर त्याची कसोटीत कामगिरी कशी आहे या वरून मानला जातो, सेहवागने सांगितले होते.

२०११ विश्‍वचषक स्पर्धेत कप्तान धोनीने कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळायची संधी दिली. तेव्हापासून कोहलीचे धोनीबरोबर खास नाते जुळले आहे. सचिन तेंडुलकर आणि धोनी या दोन खेळाडूंना तो मनातून मानतो. २०११ विश्वचषक जिंकल्यावर कोहलीने सचिनला खांद्यावर उचलून घेतले होते आणि २०१३मध्ये सचिन निवृत्त झाल्यावर सचिननेच भारतीय संघाच्या फलंदाजीचा भार कोहलीच्या खांद्यावर दिला.

एका शाम्पूच्या जाहिरातीत एकत्र काम करत असताना अनुष्का शर्माबरोबर झालेल्या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले. विराट-अनुष्का एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. ‘‘अनुष्काने मला शांत रहायला शिकवले समजावले. माझी सर्व ऊर्जा क्रिकेटच्या मैदानासाठी राखून ठेवायला पाहिजे हा तिचा आग्रह होता. मी व्यायाम नेहमीच करायचो, पण आहारावरचे नियंत्रण अनुष्काने मला समजावले आणि मग माझ्या तंदुरुस्तीत लक्षणीय फरक पडला,’’ असे अनुष्काचे कौतुक करताना विराट म्हणतो.

धोनीने मोठ्या विश्वासाने नेतृत्व विराटकडे सोपवल्यावर त्याने पहिल्यांदा संघात व्यायामाची संस्कृती रुजवली. त्याहीपेक्षा महत्त्वाचे काम म्हणजे विराटने वेगवान गोलंदाजांकडे जातीने लक्ष दिले. भारतीय संघाचा वेगवान मारा जगात सर्वोत्तम हवा, यासाठी आग्रह धरला.

एक प्रसंग आठवतो, जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला असताना कप्तान म्हणून विराटला विमानात सर्वोत्तम जागा मिळाली होती. विराटने ती जागा सामन्यात गोलंदाजी करून थकलेल्या ईशांत शर्माला दिली. बुमराह, शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि ईशांत शर्माची वेगवान फळी निर्माण करून विराटने भारतीय संघाला परदेशात कसोटी सामने जिंकायला शिकवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.