राजाच्या दाताला कीड लागली तर...! (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar
Updated on

अनेक देशांतले राजकीय नेते व विचारवंत संशोधन व ज्ञान यांच्या आधारे, आगामी काळात काय करता येईल, यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक देशांत कधी ना कधी तरी सुवर्णयुग होतं; पण तिथल्या राजांनादेखील दोन हजार वर्षांपूर्वी दाताला कीड लागल्यावर वेदना सहन कराव्या लागत असत; म्हणून तिथले विचारवंत भविष्यात सुवर्णयुग आणण्याला प्राधान्य देतात!

युवाल हरारी हे जगप्रसिद्ध लेखक आहेत. ते "सेपियन्स' या ग्रंथामुळे प्रकाशझोतात आले. त्यांची इतर पुस्तकंही खूप गाजली आहेत. ते काही आठवड्यांपूर्वी मुंबईत आले होते. त्यांच्या एका उद्योजक मित्रानं त्यांच्यासाठी भोजन ठेवलं होतं व मुंबईच्या उच्चभ्रू वर्तुळातल्या सात श्रीमंत मित्रांना बोलावलं होतं. यजमान व त्यांचे पाहुणे मला ओळखत नव्हते; पण हरारींनी आमंत्रण दिलं म्हणून मी त्या भोजनाला गेलो होतो.
तिथं हरारींनी पाहुण्यांना भारताच्या भविष्याबद्दलच्या अपेक्षा विचारल्या. त्या सगळ्यांच्या सांगण्याचा सूर एकच होता व तो म्हणजे ः ""आम्हाला पुन्हा एकदा सुवर्णयुग हवंय.''

हरारींनी त्यावर विचारलं ः ""म्हणजे काय?''
ते म्हणाले ः ""दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी भारत एक महासत्ता होती. सर्वत्र वैभव होतं. तसं सुवर्णयुग आम्हाला पुन्हा हवं आहे.''
हरारी म्हणाले ः ""तुमच्या सुवर्णयुगातल्या मोठ्या राजाच्या दाताला कधी कीड लागली तर दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी काय उपाय होता? जर कुणा वैदूला राजाचा दात उपटून काढावा लागला असेल तर त्या काळात ऍनास्थेशिया नसल्यामुळे राजाचे काय हाल होत असतील? जर राजाला एखादा संसर्गजन्य रोग झाला तर अँटिबायोटिक्‍स नसल्यामुळे काय होत असेल? जर त्याला शरीराच्या एखाद्या भागात काही व्याधी झाली व तो भाग उघडायचा असेल अथवा कापायचा असेल तर राजाला किती वेदना होत असतील?''

हरारींनी पुढं आणखी विचारलं ः ""सध्या एखादा कामगार दाताला कीड लागली तर ऍनास्थेशिया वापरून सहज दात काढून घेऊ शकतो. अँटिबायोटिक्‍स औषधं घेऊन अनेक रोगांवर मात करू शकतो. शल्यक्रिया करून शरीर मोठ्या रोगांपासून वाचवू शकतो. मग हा साधा कामगार सुवर्णयुगात राहतोय की साध्या शारीरिक व्याधींसाठी प्रचंड वेदनांनी तळमळणारा तो राजा सुवर्णयुगात राहत होता?''
त्या उच्चभ्रू मंडळींकडं या प्रश्‍नांची उत्तरं नव्हती. मी हसत हा सगळा संवाद ऐकत होतो. हरारींनी भविष्यातल्या वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक बदलांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यापैकी कोणते बदल कधी होतील याचं गणित मी त्यांना मांडायला सांगितलं. त्यात त्या सात श्रीमंत उद्योजकांना फारसा रस नव्हता.
माझी वाचकांना नम्र सूचना आहे व ती म्हणजे, भारतात इसवीसनपूर्व 500 मध्ये अथवा सन 500-600 मध्ये काय झालं? सन 1750 भारताची आर्थिक महती किती होती? सन 1947 ला काय चुका झाल्या? सन 2004 ते 2014 या दशकात काय चुका झाल्या? या व तत्सम प्रश्‍नांकडं वर्तमानपत्रांत, सामाजिक माध्यमांतल्या चर्चांमध्ये, राजकीय नेत्यांच्या भाषणांमध्ये किती लक्ष दिलं जातं? व आपलं राष्ट्रीय लक्ष जो भूतकाळ निघून गेला आहे, त्याला किती महत्त्व देतं याचा अंदाज तुम्ही स्वतःच घ्यावा...

आता भारत सन 2020 पर्यंत, सन 2037 पर्यंत व सन 2047 पर्यंत एक महान राष्ट्र (महासत्ता नव्हे) होण्यासाठी हे प्रश्‍न विचारण्याची गरज आहे. 125 कोटी लोकांच्या देशात नवीन आर्थिक सिद्धान्त शोधून बहुतांश युवकांना रोजगार अथवा स्वयंरोजगार तातडीनं मिळण्यासाठी काय अभिनव योजना करता येतील? जगातला सर्वात विक्रमी असा पेटाफ्लॉप संगणक मोठ्या प्रमाणात भारतात विकसित करून जशी चीननं पेटाफ्लॉप संगणकांची साखळी केली आहे तशी साखळी आपण कशी करू शकू? विद्युत्‌चुंबकीय शक्ती, अंतराळामार्गे सौरशक्ती अशा मार्गांनी संपूर्ण देशासाठी स्वस्त ऊर्जा निर्माण करण्यात आपलं संशोधन किती पुढं जाऊ शकेल, असा विश्वास आपल्याला आहे? छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पूर्व महाराष्ट्र, बिहार अशा प्रदेशांत मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात? शेतीत उत्पादकता वाढवण्यासाठी येत्या पाच वर्षांत काय ठोस उपाययोजना करता येतील? या व अशा प्रश्‍नांवर वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर, टीव्हीच्या रात्रीच्या नऊच्या कार्यक्रमांत, राजकीय नेत्यांच्या भाषणांमध्ये किती गंभीरपणे, सातत्यानं व अभ्यासपूर्ण चर्चा होतात? आपलं राष्ट्रीय मन येत्या भविष्यकाळात सर्वसमावेशक व सर्वांगीण प्रगती करण्याबाबतच्या अभिनव विचारांमध्ये किती गुंतलं आहे?
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी एकदा इस्राईलच्या भेटीचा एक अनुभव त्यांच्या भाषणात सांगितला होता. ते तिथं असताना मोठा दहशतवादी हल्ला झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी वर्तमानपत्रं उघडली तर सर्वत्र एकच बातमी ठळकपणे होती व ती म्हणजे, एका शेतीतज्ज्ञानं नवीन शोध लावून वाळवंटी प्रदेशात बाग फुलवली होती. या तंत्राचा भविष्यात कसा वापर करता येऊ शकेल, याबाबतची ती बातमी आणि तिच्याविषयीची चर्चा वर्तमानपत्रात पहिल्या पानावर होती. डॉ. कलाम यांनी दहशतवादी हल्ल्याची बातमी शोधली. त्या बातमीला कोणत्याही वर्तमानपत्रात स्थान मिळालेलं नव्हतं.

माझाही इस्राईलमधला अनुभव अशाच प्रकारचा आहे. माझ्या तिथल्या मित्रांपैकी बहुतेक जण संसदेचे सदस्य आहेत अथवा होते. तीन जण केंद्रीय मंत्री होते. अशी राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या मित्रांचे आवडते विषय म्हणजे ऊर्जा, संरक्षण-उपकरणं व शेती या तीन क्षेत्रांत होणारं मूलभूत संशोधन व नजीकच्या भविष्यकाळात त्या संशोधनामुळे होणारे बदल. गेल्या दहा वर्षांत मला अनेकदा - अरब-इस्रायली संघर्षात समांतर राजनीतीतला अनुभव असल्यानं- मध्यस्थीची बोलणी करण्याची संधी मिळाली. दहा वर्षांत एकदाही एकाही इस्त्रायली नेत्यानं अथवा अधिकाऱ्यानं "त्यांनी आमच्यावर सन 1948 मध्ये आणि सन 1967 मध्ये हल्ला केला होता,' असं रडगाणं गायलेलं आठवत नाही. त्यांचा प्रश्‍न कायम एकच व तो म्हणजे आजची स्थिती जी आहे ती आहे. तीतून मार्ग काढून सामान्य लोकांचं जीवन सुसह्य होण्यासाठी दोन्ही बाजूंना मान्य होतील असे कोणते बदल येत्या तीन-चार वर्षांत करावेत, हाच विचार ते करताना आढळले.

हाच अनुभव मला स्वित्झर्लंड, स्वीडन, जर्मनी अशा अनेक देशांत येतो. मागची 50-60 वर्षं सोडली तर त्याआधीच्या हजार वर्षांचा युरोपचा इतिहास रक्तरंजित आहे. प्रत्येक देश इतिहासातली कोणती ना कोणती आठवण काढून "त्यांनी आमच्यावर निर्दयी हल्ला केला होता' असं पुराव्यासह सहजरीत्या मांडून दुसऱ्या देशासंबंधी बोलू शकतो; पण हे कधी त्यांच्या चर्चेत येत नाही, राजकीय नेत्यांच्या भाषणात येत नाही अथवा समाजमाध्यमांतूनही तो विषय चघळला जात नाही. तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलात रोजगार कसा निर्माण करायचा, ब्लॉकचेनचा वापर करून पारदर्शकता कशी आणायची, स्वच्छ ऊर्जेसाठी कोणती संशोधनकेंद्रं उभारायची आदी विषयांवर समाजात वादविवाद सुरू आहेत. याला अपवाद सर्बियाचा. त्यांना "अखंड सर्बिया' हा सर्वात महत्त्वाचा विषय वाटतो व कधी चारशे-पाचशे वर्षांपूर्वी तुर्की सुलतानानं केलेला हल्ला महत्त्वाचा वाटतो. परिणामी, युरोपीय देशांपैकी आज सात शकलं झालेला एकमेव देश म्हणजे सर्बिया.

सन 1995 मध्ये मलेशियात महाथीर मोहंमद यांनी व भारतात अब्दुल कलाम यांनी "सन 2020 पर्यंत देशात आमूलाग्र बदल करण्यासाठी पद्धतशीर पावलं उचलली पाहिजेत' असं आवाहन केलं होतं. गेल्या 25 वर्षांत दोन्ही देशांत खूप राजकीय उलथापालथ झाली आहे. परस्परांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. आज सन 2019 मध्ये म्हणजे सन 2020 ला एक वर्ष बाकी असताना दोन्ही देशांची तुलनात्मक स्थिती कशी आहे? इंटरनेटवर संपूर्ण माहिती मिळेल!

अनेक देशांतले राजकीय नेते व विचारवंत संशोधन व ज्ञान यांच्या आधारे, आगामी काळात काय करता येईल, यासाठी प्रयत्न करतात. अनेक देशांत कधी ना कधी तरी सुवर्णयुग होतं; पण तिथल्या राजांनादेखील दोन हजार वर्षांपूर्वी दाताला कीड लागल्यावर वेदना सहन कराव्या लागत असत; म्हणून तिथले विचारवंत भविष्यात सुवर्णयुग आणण्याला प्राधान्य देतात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.