जागो… जग उजियारा छाये!

राज कपूर यांची ही मनीषा तीनच वर्षांनंतर, दिग्दर्शनातून नव्हे, पण निर्मिती व अभिनयाद्वारे पूर्ण झाली. तो चित्रपट होता ‘जागते रहो’.
Sunil Deshpande writes about film director raj kapoor artist art
Sunil Deshpande writes about film director raj kapoor artist art sakal
Updated on
Summary

राज कपूर यांची ही मनीषा तीनच वर्षांनंतर, दिग्दर्शनातून नव्हे, पण निर्मिती व अभिनयाद्वारे पूर्ण झाली. तो चित्रपट होता ‘जागते रहो’.

- सुनील देशपांडे

प्रत्येक अभिजात कलाकृती दुसऱ्या एखाद्या अभिजात कलाकृतीचे प्रेरणास्थान बनत असते. इटालियन चित्रपट दिग्दर्शक व्हिटोरिओ डी सिका यांचा ‘बायसिकल थीव्ज’ हा चित्रपट बघून बिमल रॉय यांना ‘दो बिघा ज़मीन’ बनविण्याची प्रेरणा मिळाली. हा चित्रपट तयार करण्यासाठी ते स्वतः निर्माते बनले आणि याच ‘दो बिघा ज़मीन’चा प्रीमियर शो संपल्यानंतर राज कपूर भारावलेल्या अवस्थेत बिमलदांना म्हणाले, ‘‘काश, मै ऐसी फिल्म बना सकता!’’

राज कपूर यांची ही मनीषा तीनच वर्षांनंतर, दिग्दर्शनातून नव्हे, पण निर्मिती व अभिनयाद्वारे पूर्ण झाली. तो चित्रपट होता ‘जागते रहो’. त्या आधीच्या ‘आग’ (१९४८), ‘बरसात’ (१९४९), ‘आवारा’ (१९५१), ‘आह’ (१९५३), ‘बूटपॉलिश’ (१९५४) आणि ‘श्री ४२०’ (१९५४) या सहा चित्रपटांच्या निर्मितीनंतर १९५६ मध्ये झळकलेला ‘जागते रहो’ हा ‘आर.के. फिल्म्स’च्या परंपरेपासून ‘हटके’ चित्रपट होता. त्याचे दिग्दर्शक जसे राज कपूर नव्हते तसे संगीतकारदेखील त्यांचे ‘हक्का’चे शंकर जयकिशन नव्हते. या कलात्मक चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं शंभू मित्रा आणि अमित मोईत्रा या बंगाली जोडगोळीनं. तर संगीतकार होते बिमलदांच्या वर्तुळातले सलील चौधरी!

पन्नासच्या दशकात शंभू आणि अमित यांनी राज कपूरना ही कथा ऐकवली तेव्हा राज त्या कथेच्या प्रेमातच पडले. दिग्दर्शनाची जबाबदारी या दोघांवर सोपवून राज यांनी केवळ निर्मिती व अभिनय करण्याचं ठरवलं. हिंदीबरोबरच बंगालीतही ‘एक दिन रात्रे’ या नावानं हा चित्रपट बनवण्यात आला. देशविदेशात विविध मानसन्मान मिळवूनही सर्वसामान्य प्रेक्षकांना, विशेषतः ‘आर.के.’च्या चाहत्यांना आकर्षित करण्यात हा चित्रपट अपयशी ठरला.

‘जागते रहो’ची गोष्ट आहे जेमतेम एका रात्रीची. खरं तर अर्ध्याच रात्रीची. मध्यरात्रीपासून पहाट होईतोवरची. अस्ताव्यस्त पसरलेलं कोलकाता शहर. त्यातलाच एरवी गजबजलेला परंतु या घडीला शांत झालेला परिसर. मधूनच जाणारी एखादी ट्राम किंवा एखादं भटकं कुत्रं सोडल्यास त्या ऐसपैस रस्त्यावर सामसूम वातावरण. गस्तीवरच्या चौकीदारानं अधूनमधून तारस्वरात दिलेली ‘जागते रहो...’ अशी हाळी आणि तिला पलीकडून त्याच स्वरात मिळणारा प्रतिसाद एवढाच काय तो आवाज.

अशा वातावरणात चौकीदाराला रस्त्यावरच्या सार्वजनिक नळापाशी एक माणूस दिसतो. तो असतो कुणीएक गरीब, फाटका, खेडूत (राज कपूर). अंगात मळकट धोतर, तसलाच सदरा, गबाळा कोट... अस्ताव्यस्त केस आणि खुरटलेली दाढी. चेहऱ्यावर बावळटपणाचे किंवा भित्रटपणाचे भाव. कुणालाही दया यावी, किंवा रात्री त्या अवतारात पाहून भय वाटावं असं एकूण रूप. नळाला तोंड लावून पाणी प्यायचा प्रयत्न तो करतो, पण त्यात पाणी नसतं. चौकीदार त्याला हटकतो.

शिव्या घालून, धक्के मारून तिथून हाकलतो. बिचारा खेडूत भेदरून जातो. तहानेनं घसा कोरडा पडल्यानं त्याचा जीव कासावीस झालाय, पण प्यायला कुठंच पाणी मिळत नाही. आजूबाजूला एकाही घराचं दार उघडं दिसत नाही. रस्त्यावर कचऱ्यात पडलेले नारळ, रिकामी डबडी धुंडाळूनही पाण्याचा टिपूस त्याच्या हाती लागत नाही. मध्येच एक श्रीमंत मद्यपी (मोतीलाल) झोकांड्या देत `जिंदगी ख्वाब है..’ असं गात येतो. खेडूत त्याला हात जोडून पाणी मागतो पण तो याला दारू देऊ पाहतो. या धनिकाच्या खिशातून पडलेलं पैशाचं पाकीट खेडूत त्याच्या स्वाधीन करतो. तो मद्यपी त्याला बक्षीस देऊ पाहतो, पण याला पाण्याशिवाय काही नको असतं. पाण्यावाचून व्याकूळ अवस्थेत असतानाच त्याला एक भल्या मोठ्या इमारतीचं फाटक किंचित उघडं दिसतं. तो आत शिरतो. तिथल्या नळाला पाणी असतं पण यानं पाण्याचा घोट घेण्याच्या आतच तिथला चौकीदार ‘चोर... चोर...’ म्हणत ओरडतो. आवाज ऐकून इतरही रक्षक आरडाओरडा करत गोळा होतात. कोलाहल माजल्यानं रहिवासी जागे होतात. हा खेडूत त्यांना चुकवून इमारतीच्या जिन्यानं चढून वर जातो.

‘साधू मॅन्शन’ नावाची ही इमारत म्हणजे भलीमोठी चाळ असते. शे-सव्वाशे रहिवाशांना, नाना प्रकारच्या कुटुंबांना सामावून घेणारी. हा खेडूत जीव वाचवण्यासाठी आणि पाण्याचा एक घोट मिळवण्यासाठी त्या चाळीत शिरतो खरा, पण पुढल्या चार-पाच तासांत त्याला पाणी तर मिळत नाहीच, उलट रात्रीच्या अंधारात त्या ‘सभ्य’ वस्तीत चाललेली काळी कृत्यं बघून तो हतबुद्ध होतो. बाहेर ‘चोरा’ला पकडण्यासाठी गलका सुरू असतानाच हा खेडुत एका घरात शिरतो तर तिथं घरमालकाची मुलगी (स्मृती विश्वास) आणि तिचा प्रियकर (प्रदीप कुमार) लपूनछपून भेटताना त्याला दिसतात. हा प्रियकर घाबरून बाहेर पडल्यानंतर चाळकरी त्यालाच चोर समजून गलका करतात. प्रियकर पुन्हा घरात येऊन लपतो. जमाव घरात शिरल्यानंतर झालेल्या गोंधळाचा फायदा घेत तो खेडुत आणि प्रियकर पसार होतात.

आता खेडुत दुसऱ्या घरात घुसतो. तिथला रहिवासी (पहाडी सान्याल) जुगाराचं व्यसन असलेला. रेस खेळण्यासाठी तो पत्नीचे दागिने चोरत असताना पत्नी जागी होऊन दोघांचं भांडण जुंपतं. रस्त्यात भेटलेला तो श्रीमंत मद्यपीदेखील इथंच राहत असतो. दारू व नाचगाण्यापायी तो आपल्या सुशील पत्नीवर कसा अन्याय करतो, हे तो खेडूत पाहतो. याच चाळीतला एक दानशूर म्हणवला जाणारा व्यापारी स्वतःच्या जागेत बनावट नोटांचा छापखाना चालवत असतो आणि खाली राहणाऱ्या बोगस डॉक्टरची त्याच्या या धंद्यात भागीदारी असते. आणखी कुणाचा भेसळीचा धंदा तर कुणाचा हातभट्टीचा. सभ्यतेआड दडलेले हे भेसूर चेहरे आणि त्यांचे कारनामे पाहून या खेडूतावर सुन्न होण्याची वेळ येते. यातल्या काही जणांचे बेकायदा धंदे उघड होण्याची वेळ येते तेव्हा याच खेडुताला सापळ्यात अडकवण्याचा डाव ते खेळतात. बचाव करण्यासाठी चाळीच्या गच्चीवर गेलेल्या या खेडुताला पाणी दिसतं, पण तिथंही त्याला मारायला चाळकरी आणि गुंड सरसावतात तेव्हा तो माणूस प्रथमच आपलं सत्य स्वरूप उघड करतो.

अंगावर आलेल्या जमावावर लाठी उगारत तो म्हणतो, ‘‘खबरदार, पुढं याल तर! जो कुणी समोर येईल त्याचं टाळकं फोडीन. माझा गुन्हा तरी काय? मी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा, नोकरी शोधण्यासाठी शहरात आलो. तहानेनं छाती फुटायची वेळ आली म्हणून दोन घोट पाण्यासाठी या वस्तीत शिरलो, हाच माझा अपराध ना? तुम्ही सगळे माझ्या मागे असे लागलाय जणू काय मी माणूस नसून पिसाळलेला कुत्रा आहे.. मी तुम्हाला चोर वाटलो? या मोठ्या इमारतीत ज्या ज्या घरात मी गेलो, तिथं मी वेगवेगळ्या प्रकारचे चोर बघितले. पत्नीला बेइज्जत करणारे, पत्नीचे दागिने चोरणारे, दारूभट्टी चालवणारे, नकली नोटा छापणारे... तुम्हा शिकल्या सवरलेल्यांकडून मी कोणती शिकवण घ्यायची? चोरी केल्याशिवाय पैसा मिळवता येत नाही, ही शिकवण?’’

जमावाला चुकवत खाली उडी मारून तो एका घरात जातो तेव्हा पहाट होत आलेली असते. दार उघडून एक छोटी मुलगी (डेझी इराणी) निरागसपणे त्याची विचारपूस करते. तो घाबरून दार बंद करू पाहतो तेव्हा ही मुलगी म्हणते, ‘‘सकाळ झाल्यावर दरवाजे उघडायचे असतात. नाही तर प्रकाश कसा येईल... तुम्ही चोरी केली नाही ना? मग घाबरता कशाला?’’ तिच्या त्या निरागस बोलण्यानं तो खेडूत हमसून हमसून रडू लागतो...

चाळीत आलेले पोलिस खऱ्या गुन्हेगारांना पकडून नेतात. त्या गोड निरागस मुलीचा निरोप घेऊन खेडूत चाळीतून बाहेर पडतो. शेजारच्या मंदिरात एक स्त्री देवाला जलाभिषेक करत भूपाळी गात असते, ‘‘जागो... जग उजियारा छाये, मन का अंधेरा जाये, किरणों की रानी गाये, जागो हे मेरे मन प्यारे.... जागो मोहन प्यारे...’’ या गाण्यानंतर चित्रपट संपतो.

‘ब्लॅक कॉमेडी’ हा शब्दही फारसा परिचित नव्हता त्या काळात या प्रकारातला एक अप्रतिम चित्रपट बनवल्याबद्दल राज कपूरबरोबरच शंभू मित्रा आणि अमित मोईत्रा या दिग्दर्शकद्वयांचं कौतुक करावं लागेल. उपहास आणि उपरोध प्रकट करणारे अनेक प्रसंग आणि प्रतीकं त्यांनी वेधकपणे पेरली होती. यात पटकथाकार या नात्यानं या दोघांप्रमाणेच संवाद लेखक ख्वाजा अहमद अब्बास यांचाही मोलाचा वाटा होता. चाळीतले ‘चोर’ पकडण्याचे प्रसंग ‘फार्सिकल’ ढंगानं घेतल्यानं धमाल आणतात.

कथा कोलकाता शहरात घडणारी असली तरी पूर्ण चित्रीकरण चेंबूरच्या आर. के. स्टुडिओमध्ये करण्यात आलं. त्यासाठी चाळीचा भव्य सेट उभारण्यात आला होता. शेवटच्या प्रसंगात चाळीच्या भिंतीवर चढलेला खेडूत आपल्या कपड्यांमधल्या नकली नोटा खाली फेकून देतो आणि त्या खऱ्या नोटा असल्याचं समजून त्या गोळा करण्यासाठी चाळकऱ्यांची झुंबड उडते, ते दृश्य तर विलक्षण उतरले होते. (पुढे १९६३ मध्ये आलेल्या ‘इट्स अ मैड मैड मैड वर्ल्ड’ अमेरिकेच्या विनोदी चित्रपटातही असाच एक प्रसंग होता.) या प्रसंगात दाखवलेली चाळीची भव्य भिंत खास आर. के. स्टुडिओमध्ये बांधण्यात आली होती, जी नंतर अनेक वर्षे लोकांना बघण्यासाठी ठेवली गेली.

राज कपूर, मोतीलाल यांच्यासह इतर कलाकारांच्या बहारदार अभिनयानं बहार आणली होती. राजच्या भूमिकेला ‘आवारा’ किंवा ‘श्री ४२०’ सारखी मिश्किलतेची डूब नसली तरी त्यातला भोळसटपणा त्यानं प्रभावीपणे व्यक्त केला होता. शेवटी मंदिर-कन्येच्या अगदी छोट्या भूमिकेत चमकून गेलेल्या नर्गीसचा ‘आर.के.’सोबतचा हा शेवटचा चित्रपट.

आर. के. बॅनरच्या चित्रपटाला सलील चौधरी यांचं संगीत हा खरं तर एक दुर्मीळ योग. पण सलीलदांनी या संधीचं सोनं केलं. (पुढे बिमलदांनी दिग्दर्शित केलेल्या ‘यहूदी’ला उत्तम संगीत देऊन शंकर जयकिशन यांनीही ‘फिट्टंफाट’ केली.) ‘जिंदगी ख्वाब है’ (मुकेश), ‘ठन्डी ठन्डी सावन की फुहार’ (आशा भोसले) या गाण्यांवर खास सलीलदांचा ठसा होता, तर ‘कोई ना भाई कोई ना’ (रफी, बलबीर) या भांगडा गीतानेही रंगत आणली होती. शेवटची ‘जागो मोहन प्यारे’ ही तर लता-सलील यांच्या कामगिरीतली अलौकिक रचना.

या चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात वारंवार वाजणारी एक धून पुढे एका अजरामर गीताला जन्म देऊन गेली. राज कपूर जेव्हा जेव्हा पाण्याच्या जवळ जातो तेव्हा एक खास धून कानी येते. कविराज शैलेंद्र यांना हा तुकडा एवढा आवडला की त्यांनी त्यावर शब्द रचले, ‘आजा रे... परदेसी...’. त्यांच्याच आग्रहावरून सलीलदांनी पुढे ‘मधुमती’साठी हे गाणं तयार केलं. एखादी अभिजात कलाकृती दुसऱ्या तेवढ्याच अभिजात कलाकृतीचं प्रेरणास्थान बनते, असं आरंभी म्हटलं, त्याचंच हे आणखी एक रूप.

गेले वर्षभर ‘सप्तरंग'' पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या या पाक्षिक स्तंभातील हा शेवटचा लेख. ‘सकाळ''च्या संपादकांनी मला ही मालिका लिहिण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार आणि या सदरावर प्रतिक्रिया देणाऱ्या वाचकांना धन्यवाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.