जला दो इसे, फूँक डालो ये दुनिया...

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पाच-दहा वर्षांचा काळ देशवासीयांकरिता आशा-आकांक्षांनी भारलेला काळ होता.
Actor Gurudatta
Actor GurudattaSakal
Updated on
Summary

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पाच-दहा वर्षांचा काळ देशवासीयांकरिता आशा-आकांक्षांनी भारलेला काळ होता.

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पाच-दहा वर्षांचा काळ देशवासीयांकरिता आशा-आकांक्षांनी भारलेला काळ होता. या देशात पुन्हा सोन्याचा धूर निघेल अशी अवास्तव अपेक्षा कुणी बाळगली नव्हती. सर्वसामान्यांचं जगणं सुखाचं होईल, त्यांची स्वप्नं फळाला येतील, सर्वत्र भरभराट होईल एवढ्या माफक अपेक्षा लोकांनी ठेवल्या होत्या. मात्र, या अपेक्षांचा चक्काचूर तर होणार नाही, अशी भयशंका चाटून जाण्याजोगी परिस्थिती राज्यकर्त्यांनी व समाजाच्या ठेकेदारांनी निर्माण करून ठेवली. यात सुधारणा होण्याची शक्यता तर सोडाच; पण हा समाज उत्तरोत्तर विषमतेच्या, स्वार्थाच्या आणि विद्वेषाच्या खाईत लोटला जाईल, या भीतीने अनेकांना ग्रासलं. यात जसे सामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक होते; तसेच लेखक, कवी, कलावंतही होते. भ्रमनिरास झालेल्या त्याच पिढीचा एक प्रतिनिधी म्हणजे कवी विजय. १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यासा’चा नायक विजय. निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी कामगिरी गुरुदत्त यांनी ज्यात प्रभावीपणे पार पाडली तो हा ‘प्यासा’! अर्थात, हे यश एकट्या गुरुदत्त यांचं नव्हतं.

ढोबळपणाने सांगायचं तर गुरुदत्त यांच्याबरोबर पटकथा-संवाद लेखक अबरार अल्वी, छायालेखक व्ही. के. मूर्ती, गीतकार साहिर आणि संगीतकार एस. डी. बर्मन अशा पाच जणांचा ‘प्यासा’च्या यशात मुख्य वाटा होता. वहिदा रहमान, माला सिन्हा आणि रहमान यांचा प्रभावी अभिनय याही जमेच्या बाजू होत्या. पण, ‘टीम लीडर’ या नात्याने गुरुदत्त हेच या यशाचे शिल्पकार ठरतात.

पाहायला गेल्यास ‘प्यासा’च्या कथेत वेगळं काही नव्हतं. नायकावर प्रेम करणारी त्याची विधवा आई, त्याचे स्वार्थी भाऊ, त्याच्या कवितेवर जीव ओवाळून टाकणारी सहृदय वेश्या, एकेकाळची त्याची प्रेयसी आणि तिचा खुनशी नवरा हे सारे घटक आधी व नंतर अनेकदा पडद्यावर पहायला मिळाले. असं असूनही लेखक आणि दिग्दर्शक यांनी ज्या उत्कटतेने या कथेची मांडणी केली आणि त्याला कलात्मक छायाचित्रण व प्रभावी गीत-संगीत यांची जी जोड मिळाली, त्याने हा चित्रपट विलक्षण उंची गाठणारा ठरला. विशेष म्हणजे, प्रेक्षक आणि समीक्षक या दोन्ही वर्गांनी तो उचलून घेतला. वेळोवळी जाहीर केल्या गेलेल्या ‘ऑल टाइम क्लासिक’ चित्रपटांच्या यादीत ‘प्यासा’ला आवर्जून स्थान दिलं गेलं.

‘प्यासा’ची कथा कवी विजयची शोकांतिका मांडते. विजयच्या घरात खाण्याची ददात. दोन्ही भावांनी त्याचं नाव टाकलंय. भावांचा त्याच्याशी संवाद होतो तो अपमान करण्यापुरताच. एकट्या आईचीच त्याच्यावर माया; पण तिला ती व्यक्त करण्याचीही चोरी... कारण भावांच्या मते हा तिचा ‘कालिदास’! त्याच्या कवितांची हेटाळणी ‘शायरी खेती समझ कर सब गधे चरने लगे!’ या शब्दांत केली जाते. म्हणूनच विजय घरदार सोडून मित्राच्या खोलीवर राहतोय. कधीतरी आपल्या कवितांना प्रसिद्धी मिळेल, आपलं नाव होईल या आशेवर. एक संपादक महोदय त्याच्या कवितांचं बाड कचऱ्यात फेकून देतात, वर ‘अगर आप शायर हैं, तो मैं गधा हूँ’ म्हणत त्याचा पाणउतारा करतात. तर, घरी भावांनी त्याच्या कवितांची वही रद्दीत विकून टाकलेली.

वही शोधण्यासाठी विजय रद्दीवाल्याचं दुकान पालथं घालतो; पण कुणी एक स्त्री ती घेऊन गेल्याचं त्याला कळतं. निराश आणि भणंग अवस्थेत फिरत असताना रात्री एका ठिकाणी एक स्त्री त्याचीच गझल गुणगुणत असल्याचं त्याच्या कानी पडतं. आपली अप्रकाशित कविता तिच्या तोंडी कशी, या शंकेने तो हाक देत तिचा पाठलाग करतो. ती असते ‘गुलाबो’ (वहिदा रहमान) नावाची एक वेश्या. शरीर विकून पोट भरणारी; पण शायरीत विलक्षण रस असलेली. शायरीच्या प्रेमातूनच विजयची वही तिच्या हाती लागते. त्याच्या कवितांवर ती फिदा होते. पण, पाठलाग करणारा माणूस कवी विजय आहे, हे तिला माहीत नसतं. नेहमीचं ‘सावज’ असल्याचा समज होऊन ती त्याला जवळ करते; पण भ्रमनिरास झाल्यानंतर त्याला शिव्या घालत हाकलून देते. विजयची ओळख पटल्यानंतर मात्र ती त्याला आधार देते. आपल्या कवितेवर निस्सीम प्रेम करणारं कुणीतरी भेटल्याने तोही सुखावतो.

विजयचं हे पहिलं प्रेम नसतं. एकेकाळी कॉलेजमध्ये मीनाशी (माला सिन्हा) त्याचं प्रेम जमलेलं असतं; पण दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या विजयला सोडून ती एका श्रीमंत, बंगलेवाल्याशी लग्न करते. विजयच्या वैफल्याला या प्रेमभंगाचीही किनार असते. बऱ्‍याच काळानंतर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात त्याची मीनाशी गाठ पडते. मीनाचा पती प्रकाशक घोष याला त्या दोघांच्या पूर्वीच्या प्रेमाची कुणकुण लागते. तो कावेबाजपणे विजयला नोकरीवर ठेवतो आणि संधी मिळेल तेव्हा तिच्यासमोर त्याचा अपमान करतो. घोषबाबू आपला कवितासंग्रह प्रसिद्ध करतील या आशेवर विजय असतो; पण ‘हमारे मॅगझिन में नामी शायरों की नज्मे छपती हैं, किसी नौसिखिये की बकवास नहीं’ असं म्हणत घोष त्याचा पाणउतारा करतो.

आधीच निराश झालेल्या विजयला त्याच्या आईच्या मृत्यूची बातमी - तीही खूप उशिरा - कळते. तो मद्याच्या आहारी जातो. गुलाबो त्याला सावरण्याचा प्रयत्न करते, त्याच्यासाठी शरीरविक्रीचा व्यवसाय सोडते. कमालीच्या नैराश्यातून विजय रेल्वेखाली आत्महत्या करायला जातो. पण, त्याच्याऐवजी त्याचा पाठलाग करणारा एक भुरटा चोर रेल्वेखाली सापडून मरण पावतो. मेलेली व्यक्ती कवी विजय असल्याची बातमी शहरात पसरते. त्या धक्क्याने गुलाबो सुन्न होते. विजयच्या कवितांचं बाड प्रकाशक घोषकडे नेऊन त्याला त्या प्रकाशित करण्याची विनंती करते. विजयचा कवितासंग्रह प्रसिद्ध होतो आणि प्रचंड खपतो. इथून समोर येतं स्वार्थी आणि ढोंगी समाजाचं एक भेसूर रूप.

विजयच्या कवितासंग्रहाची तडाखेबंद विक्री झाल्याने प्रकाशक घोष मालामाल होतो. ज्यांनी विजयचं नाव टाकलं होतं ते त्याचे सख्खे भाऊ, मित्र आदींचा गोतावळा आता घोषकडे गोळा होतो. त्यांना पुस्तकाच्या नफ्यातला वाटा हवा असतो. विजयच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त घोष श्रद्धांजली सभा आयोजित करतो. विजयला ही बातमी कळते तसा तोही सभेच्या ठिकाणी जातो. (मधल्या काळात त्याला वेडा ठरवून इस्पितळात दाखल केलेलं असतं, जिथून सुटून तो बाहेर पडतो.) सभेला प्रचंड गर्दी लोटलेली. घोषचं त्यावेळचं भाषण म्हणजे ढोंगीपणाचा अस्सल नमुना असतो. विजयचा उल्लेख ‘शायरे आझम’ असा करत लोकांना उद्देशून तो म्हणतो, ‘‘विजयच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही! तुमच्या उपेक्षेमुळेच त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला. मी असतो तर त्याला डोक्यावर घेतलं असतं, त्याला सिंहासनावर बसवलं असतं....’’ हे ऐकून सुन्न झालेला विजय गाऊ लागतो, ‘ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया... ये इन्साँ के दुश्मन समाजों की दुनिया... ये दौलत के भूखे रिवाजों की दुनिया... ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है! जला दो इसे फूंक डालो ये दुनिया, मेरे सामने से हटा लो ये दुनिया, तुम्हारी है तुम ही सम्हालो ये दुनिया...’

साक्षात विजय त्या ठिकाणी प्रकटल्याचं पाहून सभेत हलकल्लोळ माजतो. तिथल्या चेंगराचेंगरीतून विजय कसाबसा वाचतो. आता दुसराच खेळ सुरू होतो. हा विजय नसून कुणी तोतया असल्याचं सिद्ध करण्याची चढाओढ लागते. त्याला ओळखणारे अन् ओळखायला नकार देणारे समोरासमोर येतात. समाजाचं हे भेसूर रूप पाहून विजय स्तंभित होतो. माणुसकीचा बळी घेणाऱ्‍या या महानगराचा तो कायमचा त्याग करतो. गुलाबो त्याची साथसंगत करते.

‘आर पार’, ‘मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाइव्ह’ आणि ‘सी.आय.डी.’ या तीन चित्रपटांनंतर गुरुदत्तने बनवलेला ‘प्यासा’ हा या माध्यमाविषयी त्याचा बदललेला दृष्टिकोन स्पष्ट करणारा होता. ‘प्यासा’ ही केवळ एका कवीची शोकांतिका नसून (त्याचा ऐनवेळी बदललेला शेवट ही व्यावसायिक तडजोड होती, ते सोडा) समाजाच्या झपाट्याने होत चाललेल्या ऱ्‍हासाचं विदारक चित्र आहे. संपूर्ण चित्रपटावर शोकार्ततेची, मूक आक्रोशाची एक छाया दिसते. ‘जिन्हे नाझ है हिंद पर वो कहाँ हैं’, ‘जाने वो कैसे लोग थे’, ‘तंग आ चुके हैं’ या विजयच्या तोंडी असलेल्या गीतांमधून ही छाया आणखी गडद होत जाते. तर, गुलाबोच्या भावना चित्रित करणाऱ्‍या ‘जाने क्या तूने कही’, ‘आज सजन मोहे’ या गीतांमधून एक समर्पणभाव दिसतो.

‘प्यासा’मधल्या निरंतर शोकार्ततेला कुणी ढासळत्या मूल्यव्यवस्थेचं प्रतिबिंब म्हटलं, तर कुणी नैराश्यवादाचा, आत्मगौरवाचा अनाठायी पुरस्कार करणारी पलायनवादी कलाकृती मानलं. अनेक दृश्यांत विजयचं दोन्ही बाहू पसरून उभं राहणं कुणाला येशू ख्रिस्ताशी जवळीक साधणारं वाटलं, तर कुणाला आत्मगौरवाची क्लृप्ती. मत-मतांतरं स्वीकारूनही ‘प्यासा’चं महत्त्व शेवटी मान्य करावंच लागतं. नायक विजयचं स्वतःच्याच श्रद्धांजली सभेत प्रकटणं, कवितेच्या माध्यमातून त्याचं जगासमोर कैफियत मांडणं, हाडामांसाचा माणूस समोर असताना लोकांनी त्याला ‘तोतया’ मानणं हा सगळा घटनाक्रम अक्षरशः अंगावर येणारा. विजयच्या टोकाच्या वागणुकीबद्दल मीना त्याला खडसावते, तेव्हा तो तिला म्हणतो, ‘‘माझी या लोकांविषयी कसलीच तक्रार नाही. कोणा व्यक्तीबद्दल मला राग नाही. माझी तक्रार आहे ती या समाजव्यवस्थेविषयी, जी माणसाकडून माणुसकी हिरावून घेते, स्वार्थासाठी भावाला भावापासून तोडते, मित्राला शत्रू बनवते. माझी तक्रार त्या संस्कृतीविरुद्ध आहे, जिथं माणूस मेल्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि जिवंतपणी त्याला पायदळी तुडवलं जातं. अशा वातावरणात मी राहू शकत नाही.’

विजयची ती व्यथा आज इतक्या वर्षांनीही मनाला तेवढीच भिडते. कदाचित म्हणूनच ‘सार्वकालिक उत्कृष्ट’ चित्रपटांमध्ये ‘प्यासा’ची गणना वेळोवेळी केली जाते.

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार व हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.