उष्णतेची लाट थंडपणे घेऊ नका !

सहसा थंड असणाऱ्या कॅनडाच्या काही भागांत आणि पश्चिम अमेरिकेच्या काही प्रदेशांत सध्या तापमानाचा पारा ५० अंश सेल्सियसवर गेला आहे.
Heat Wave
Heat WaveSakal
Updated on

सहसा थंड असणाऱ्या कॅनडाच्या काही भागांत आणि पश्चिम अमेरिकेच्या काही प्रदेशांत सध्या तापमानाचा पारा ५० अंश सेल्सियसवर गेला आहे. हवामान बदलाचं संकट आता अगदी पुढ्यातच उभं आहे, हे सांगायला हा बदल पुरेसा आहे. हे संकट अधिकाधिक गंभीर होत जाण्याची लक्षणे आहेत. यंदा ही उष्णतेची लाट इतकी तीव्र होती, की कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया येथील सुमारे ५०० लोकांचा तिने बळी घेतला आहे. तेथील अहवालांनुसार केवळ माणसंच नाही, तर पशुपक्ष्यांवरही याचे मोठे दुष्परिणाम दिसून आले आहेत. यामुळे आता वणवे पेटणे, जीवित आणि मालमत्तेस निर्माण झालेला धोका या नव्या अडचणी समोर उभ्या राहत आहेत. युरोपातदेखील यावेळी अशीच उष्णतेची लाट आली आहे आणि उपलब्ध अहवालांवरून आत्तापर्यंतचं हे उच्चांकी तापमान असेल, असं सांगितलं जातं. म्हणजे पुन्हा एकदा आपण उच्चांकी तापमानाचा मागील वर्षीचा आपलाच विक्रम मोडणार असं दिसतं!

परंतु दुर्दैवाने ही उष्णतेची लाट ही काही प्रासंगिक किंवा आपत्कालिन बदल एवढीच नाही. ‘वर्ल्ड वेदर अट्रीब्युशन इनिशिएटिव्ह’ या जागतिक संस्थेसोबत काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे, की ही उष्णतेची लाट म्हणजे मानवी क्रियांमुळे उद्भवलेल्या हवामान बदलाचा परिणाम असून, सर्वसामान्य नैसर्गिक परिस्थितीत अशी लाट उद्भवली नसती. संशोधन करताना त्यांच्या असे लक्षात आले, की इतिहासात आजपर्यंत नोंदवल्या गेलेल्या उच्चांकी तापमानापेक्षा ही उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपाची आणि गंभीर आहे. अशा लाटांची वारंवारिता ही एकेकाळी एक हजार वर्षांतून एकदा इतकी कमी होती;पण आता वाढत्या तापमानसोबतच ती वाढत चालली आहे. ५ ते १० वर्षांतून एकदा इतपर्यंत ती वाढण्याची शक्यता आहे.

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. हवामानबदल हा अपेक्षेपेक्षा अधिक वेगानं घडतो आहे आणि आपण पूर्णपणे बेसावध आणि हतबल आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे, तीव्र स्वरूपाचा आणि विषम असा पाऊस, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची वाढलेली वारंवारिता, तीव्र उष्णता आणि थंडी हे सर्व घटक जगावर परिणाम करत आहेत. विशेषतः गरीब नागरिकांवर. याचं कारण ही नैसर्गिक संकटं त्यांना अधिकाधिक हतबल, असहाय्य बनवत आहेत. अर्थात निसर्गाच्या या तडाख्यातून श्रीमंत, आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकही सुटलेले नाहीतच. उष्णतेच्या लाटेमुळे कॅनडामध्ये झालेले मृत्यू हे आपल्याला सतत या भीषण संकटाची आठवण करून देत राहतील. हे लिहित असतानादेखील, मला याचीच आठवण होत आहे आणि अजूनही आपल्याला पुढं काय वाढून ठेवलंय याचं पुरेसं गांभीर्य नाही. अजूनही आपले शब्द आणि कृती यात मोठी तफावत आहे. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञान तर उपलब्ध आहे; पण ते वापरण्यासाठी आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचे तंत्र मात्र उपलब्ध नाही. इथंच आपण कमी पडत आहोत.

जितका वेळ आपण घालवतोय, गोष्टी पुढे ढकलतोय, तितकी ही समस्या गुंतागुंतीची होत जाणार आहे. आता वाढत्या उष्णतेचंच उदाहरण घेऊया. या लाटेतून तरून जाण्यासाठी श्रीमंत आणि संपन्न नागरिक आता वातानुकूलन यंत्रांमध्ये अधिकाधिक पैसे गुंतवतील. यामुळे ऊर्जेच्या मागणीत वाढ होईल. आज अनेक देश जीवाश्म इंधनाधारित वीजनिर्मितीसाठी झगडत असतानाच हरितवायू उत्सर्जनामध्ये भर पडत आहे. उष्णता वाढवणाऱ्या आणि कमी करणाऱ्या या कृत्रिम यंत्रांमुळे ऊर्जेच्या मागणीत एकुणातच भरमसाठ वाढ होते. हे चित्र आपण शहरांमध्ये बघतच आहोत. दिल्लीच्या विज्ञान आणि पर्यावरण केंद्रात (सीएसई) माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनानुसार तापमानाने २७-२८ अंश सेल्सियसचा आकडा ओलांडला, की ताबडतोब वातानुकूलन आणि शीतलीकरण यंत्रणांची मागणी वाढते आणि विजेची मागणी प्रति डिग्री १९० मेगावॉटने वाढते. जितकी वीजनिर्मिती अधिक, तितकं उत्सर्जनही जास्त आणि याची परिणती होते तापमानवाढीत. हे दुष्टचक्र असंच चालू राहून आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उष्णता आणि ऊर्जा यांच्या परस्परसंबंधास अजून एक वेगळा आयाम आहे. तो म्हणजे औष्णिक स्वास्थ्य किंवा अस्वास्थ्य. आत्ताच्या आधुनिक घरांमध्ये आराम आणि चैनीची कितीतरी साधनं उपलब्ध आहेत. त्यापैकीच वातानुकूलन यंत्रणा हेही एक आहे. पण त्याच्या सततच्या वापरामुळं होतं काय, की तापमान फार वाढलेलं नसतानादेखील आपल्याला अस्वस्थ वाटतं, उकडतं. याचं कारण नैसर्गिक हवेचा आणि आर्द्रतेचा अभाव. पूर्वीच्या काळी बांधली जाणारी घरं वा इमारती या उष्णता, थंडी- वारा याला तोंड देण्यास सक्षम अशा बनवलेल्या असत, तशी रचना असे; परंतु ते निसर्गाच्या विरुद्ध जाणारं नव्हतं. खिडक्यांची रचना, घराचे रंग असे घटक लक्षात घेऊन त्या घरांची रचना केली जात असे. आज आपण याला `पॅसिव्ह आर्किटेक्चर’असं म्हणतो. पूर्वीच्या घरांभोवती भरपूर झाडं असत, यामुळे हवा नैसर्गिकरित्या थंड राहत असे, सावली मिळत असे. आज बंदिस्त जागा आणि घरे, काचेची तावदाने हे घटक आधुनिक स्थापत्यशास्त्राच्या केंद्रस्थानी आहेत आणि या जुन्या पद्धती मागास म्हणून आपण झुगारून दिल्या आहेत.

जितकी उष्णता जास्त तितका जलस्रोतांवर ताण अधिक ही वस्तुस्थिती आहे. पिण्यासाठी, सिंचनासाठी, वणवे आणि आग विझवण्यासाठी ही पाण्याची गरज सतत वाढते आहे. जलवाहतुकीसाठी वापरली जाणारी वीज आणि भूजलाचा वाढता वापर यामुळे आपण या दुष्टचक्रालाच बळ देत आहोत. यामुळेच स्थानिक जलस्रोतांचा वापर करण्याच्या नव्या पद्धती शोधून काढणे, पर्जन्यजलसंवर्धन हे मार्ग अवलंबायला हवेत. आज अतिउष्णता आणि अतिथंडी या दोन विरुद्ध टोकांच्या परिस्थितीशी सामना करायला आपण तयार असलं पाहिजे. अधिकाधिक गोष्टी कमीतकमी ऊर्जा वापरून पार पाडायच्या आहेत, हे सध्या आपल्यासमोरचं मोठं आव्हान आहे. उष्णतेनं होरपळलेल्या जगानं आज किमान हा एक तरी धडा घ्यावाच !

(सदराच्या लेखिका ‘ सेंटर फॉर सायन्स ॲन्ड अनव्हायर्नमेंट’च्या प्रमुख आणि पर्यावरणतज्ज्ञ आहेत )

(अनुवाद : तेजसी आगाशे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()