धडे कोरोनाकाळातले!

एका छोट्याशा विषाणूने अख्ख्या जगाला आपल्यासमोर झुकायला लावलं आहे, हे आपल्या ''सुशिक्षित'' समाजाने विसरता कामा नये. हा विषाणू संपूर्ण डीएनएसुद्धा नसून केवळ एक आरएनए आहे.
Corona
CoronaSakal
Updated on

एका छोट्याशा विषाणूने अख्ख्या जगाला आपल्यासमोर झुकायला लावलं आहे, हे आपल्या ''सुशिक्षित'' समाजाने विसरता कामा नये. हा विषाणू संपूर्ण डीएनएसुद्धा नसून केवळ एक आरएनए आहे. तरीही त्याने आपल्याला त्याच्यासमोर गुडघे टेकायची वेळ आणली आहे. आपण मास्क वापरायला कंटाळतो, जवळजवळ या विषाणूवर आपण मात केलीच आहे अशा आविर्भावात वावरतो. आपल्याकडे आज उपलब्ध असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून या विषाणूविरुद्धच्या लढाईत तगून राहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि तरीही आज अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास नकार दिलेला आहे. हा प्रश्न फक्त प्रगत विज्ञान किंवा शिक्षणाचा नाही, तर सार्वजनिक संस्थांमध्ये परस्पर विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे. जेणेकरून तज्ज्ञांचं ज्ञान आणि कौशल्य हे वैयक्तिक हितसंबंधांमध्ये भरडलं जाणार नाही.

इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे,

ती म्हणजे या विषाणूने एका प्रजातीमधून दुसऱ्या प्रजातीत असा वेगवान आणि पद्धतशीर प्रवास केला आहे. जंगली जनावरांपासून, बहुतकरून वटवाघुळांपासून तो माणसापर्यंत पोचलेला आहे. निसर्गापासून आपण वेगाने दुरावत चाललो आहे. पण त्यामुळेच आपण आणि असे विषाणू यातलं अंतर कमी कमी होत चाललं आहे.

वन्य अधिवासापासून ते आपल्या अन्न उद्योगपर्यंत सगळीकडे या विषाणूंचा संचार वाढला आहे आणि त्यांच्यामुळे होणारे आजार आपल्याला भविष्यातही सतावणार आहेत. त्याची कारणं समजून घ्यायला हवी. कोरोनाने अनेकांच्या आयुष्यात प्रचंड खळबळ माजवली आहे आणि अनेकांना वैयक्तिक हानीला सामोरं जावं लागलं आहे. ही गोष्ट आपण विसरून जाणं आपल्याला परवडणारं नाही. कोरोनाच्या नुकत्याच येऊन गेलेल्या दुसऱ्या लाटेत अंत्यसंस्कारासाठी ताटकळणारे हजारो मृतदेह आपण पाहिले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाला अशी कोणी ना कोणी व्यक्ती माहीत असेलच, जिने आपला जवळचा माणूस गमावला आहे, किंवा त्याचा जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. या अनुभवांवरून तरी सर्व देशांच्या शासनकर्त्यांना आरोग्यक्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची सुबुद्धी व्हावी.

रोग व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यासाठी सगळ्यांनीच झडझडून कामाला लागलं पाहिजे. रोग आल्यानंतर उपाय करायला लागण्याऐवजी स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छता, हवा प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पोषक आहार आणि स्थूलतेवर मात या उपायांच्या साहाय्याने रोगांना दूर ठेवणे हेच शहाणपणाचे आहे. पण ते तितकंसं सोपं नाहीये, आणि म्हणूनच आत्तापासून आपण परिस्थितीचा ताबा घ्यायला हवा. कोरोनाकाळात अविरत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची आयुष्य उध्वस्त झाली. स्वतःच असं काहीच उरलेलं नसताना त्यांनी मैलोनमैल पायपीट केली, थकून रुळांवर झोपलेले असतानाच मृत्यूनं त्यांना गाठलं. आपल्या सर्वांच्या सामूहिक आठवणीत ते कायम राहिले पाहिजेत, पण नुसतं तेवढंच नाही, तर त्याचा फायदा परिस्थिती सुधारण्यासाठी व्हायला हवा. सामान्यांचं जीवनमान सुधारणे, स्थलांतरित लोकांसाठीच्या सुविधा, स्थलांतर कमी व्हावं म्हणून सर्वच प्रदेशांचा विकास करणे यावर आता भर द्यायला हवा. हवामान बदलाचा सध्याचा प्रश्न बघता या विकासाचा वेग अजूनच वाढायला हवा. निसर्गधारीत रोजगार निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. परिसंस्थीय आणि आर्थिक सुरक्षा यांचा मेळ घालणं गरजेचं आहे.

जगभरातल्या गरीब नागरिकांना या परिस्थितीचे चटके जास्त बसले आहेत. त्यांनी आपल्याकडंच उरलंसुरलं सगळंच गमावलं. या विषाणूमय वर्षाने जगाला कित्येक वर्षं मागे नेलं आहे. जीवनमान सुधारण्यासाठी आणि विकासकामांसाठी जो काळ आपण खर्ची घातला, तो जणू पुसून गेला आहे आणि भूतो न भविष्यती अशी गरिबी पुन्हा आपल्या मानेवर येऊन बसली आहे.

लॉकडाऊनच्या काळात प्रदूषण घटल्यामुळे अनुभवायला मिळालेली स्वच्छ ताजी हवा, निळशार आकाश, ट्रॅफिकऐवजी ऐकू येणारा पक्ष्यांचा मधुर किलबिलाट या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. निसर्गाने थोडंस थांबून जणूकाही एक मोकळा श्वास घेतला. त्या कठीण काळातही त्याने आपल्याला आनंदच दिला. पुन्हा एकदा नवी ताजी सुरुवात करण्यासाठी स्वतःला आणि जगाला तयार करण्याचा जणू संदेश दिला.

अथक परिश्रम घेऊन एका वर्षातच आपल्याला लस उपलब्ध करून देणाऱ्या शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांच योगदान कधी न विसरता येण्यासारखं आहे. परंतु त्यांची गरीब श्रीमंत अशा सर्वांनाच समान उपलब्धता मिळवून देणं काही आपल्याच्याने शक्य झालं नाही. आपल्या विकासप्रक्रियेतल्या त्रुटी इथं प्रकर्षाने जाणवतात.

प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक नर्सचे निःस्वार्थ प्रयत्न आणि सेवा दखलपात्र आणि कौतुकास्पद आहेत. त्या काळात अन्न शिजवून ते लोकांपर्यंत पोचवणार्या प्रत्येकाचेच आपल्यावर उपकार आहेत. या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला आशा आणि ऊर्जा देतात. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की कोविड १९ विषाणूने जगाला आरसा दाखवला आहे. दुःख आणि आशा या दोन्हीमध्ये माणुसकीची एकजूट होण्याचं महत्त्व नव्याने समजावलं आहे. येथेच पुढच्या उज्ज्वल आणि सर्वसमावेशक जगाची पायाभरणी होऊ शकेल, ही आशा आहे.

(सदराच्या लेखिका ‘सेंटर फॉर सायन्स ॲड एनव्हायर्नमेंट’च्या प्रमुख आणि पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)

(अनुवाद : तेजसी आगाशे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.