प्रतिकारशक्तीवरच्या आघाताचं काय करायचं?

सध्या चालू असलेल्या महासाथीने आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतील, असे धडे दिले आहेत. सगळं संपायच्या आधीच सुधारणा करण्याची एक संधी आपल्याला उपलब्ध आहे.
Immunity
ImmunitySakal
Updated on

संपूर्णपणे अनपेक्षितरित्या आपल्याला सामोऱ्या आलेल्या एका नव्या जगात आपण आज जगत आहोत. केवळ एका आरएनएने, (लक्षात घ्या डीएनएदेखील नाही) आपल्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लावलाय आणि आपलं जगणं बदलून टाकलं आहे. या सर्व गोंधळात आपण आपलं लक्ष आता येऊ घातलेल्या नव्या संकटावर केंद्रित करायला हवे. आज ती गोष्ट कदाचित दखल घेण्याजोगीही वाटणार नाही, परंतु आपण कल्पनाही करू शकणार नाही इतका मोठा दुष्परिणाम ती गोष्ट आपल्या आरोग्यावर घडवून आणेल. ती म्हणजे ''प्रतिसूक्ष्मजैविक प्रतिरोध'' (Antimicrobial Resistance, AMR). ती जणू एक ''सायलेंट पँडेमिक''च आहे. कोरोना महासाथ किंवा हवामान बदलापेक्षाही भीषण असे हे संकट असेल. कल्पना करा, मानवी शरीराची स्वतःला बरे करण्याची शक्तीच नष्ट झाली, तर काय होईल? औषधे शरीरावर परिणाम करेंनाशी झाली, रोगांवर उपचार करण्याचा मार्गच नष्ट झाला तर काय स्थिती होईल? मघाशी उल्लेख केलेल्या ''एएमआर''मुळे नेमके हेच होऊ शकते.

सध्या चालू असलेल्या महासाथीने आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतील, असे धडे दिले आहेत. सगळं संपायच्या आधीच सुधारणा करण्याची एक संधी आपल्याला उपलब्ध आहे. आता जगाच्या प्राधान्यक्रमांमध्ये आरोग्य या घटकाला सर्वांत वरचे स्थान मिळाले आहे, ही एक जमेची बाजू. लशीची सर्वांना समान उपलब्धता या मुद्द्यावर सगळीकडेच भर दिला जात आहे. परस्परावलंबन, त्यातून येणारे सहकार्य आणि साहचर्य या गोष्टी आपण शिकत आहोत.

सार्वजनिक आरोग्याची गुणवत्ता उत्तम राखणे ही किती अत्यावश्यक बाब आहे, हेही आपल्या लक्षात येत आहे. गरिबांना या रोगापासून संरक्षण मिळाल्याशिवाय श्रीमंतदेखील या विषाणूपासून सुरक्षित होणार नाहीत. त्यामुळे सर्वसमावेशक आणि समान आरोग्यसुविधा असणे ही काळाची गरज आहे. रोगांना प्रतिबंध करून आळा घालण्याची गरज पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक पटींनी आज आपल्याला जाणवते आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची गरज कोविडने अधोरेखित केली आहे. पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छता हे दोन घटक आता भारत सरकारने आपल्या आरोग्य विभागाद्वारे केल्या जाणाऱ्या खर्चाच्या केंद्रस्थानी ठेवले आहेत.

दक्षिणेकडील देश तसेच अनेक श्रीमंत विकसित देशांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की आधी पर्यावरणावर रसायनांचा मारा करून आणि ते दूषित करून मग पुन्हा त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी श्रम आणि पैसा खर्च करणे हे नक्कीच व्यावहारिक आणि परवडणारे नाही.आपल्यासमोर इतरही अनेक आव्हाने आहेत; जगभरातील आरोग्यसुविधा बळकट करण्यापासून ते सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देण्यापर्यंत. यामुळेच आपल्याला आता असे नवे मार्ग शोधून ते निवडावे लागतील, ज्या मार्गाने याआधी कोणी चालले नसेल. प्रदूषणाशिवायचा विकास साध्य करण्याचे ध्येय आपल्याला ठेवायचे आहे. इथेच `प्रतिसूक्ष्मजैविक प्रतिरोधा’चे पर्यावरणीय आव्हान सामोरे येते.

कोरोना महासाथ आणि एएमआर हे दोन्ही आपल्या पर्यावरणाशी खालावत चाललेल्या नातेसंबंधांचे परिणाम आहेत. अन्नाचे उत्पादन आणि व्यवस्थापन करण्याच्या आपल्या पद्धतीत याचे मूळ दडलेले आहे. प्रतिसूक्ष्मजैविके आणि प्रतिजैविके यांचे अन्नातील वाढत्या प्रमाणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिक अन्नउत्पादन पद्धतीत प्रतिजैविकांचा वापर करून उत्पादन वाढवणे आणि रोगांना आळा घालणे याचा चुकीचा आणि अतिवापर सध्या होत आहे.

उत्पादकता वाढवण्यासाठी हे गरजेचेच आहे अशी एक सार्वत्रिक गैरसमजूत दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून कीटकनाशके आणि रसायनांचा शेतीमध्ये वापरदेखील याचाच एक भाग. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. पशुपालनामध्येदेखील कृत्रिम अनैसर्गिक औषधे आणि रसायनांचा वाढता वापर धोकादायक आहे. आपल्या रोजच्या आहारातही या सगळ्याचे प्रतिबिंब दिसून येते. उत्पादकता विरुद्ध शाश्वत विकास इतका हा सरळ आणि साधासोपा संघर्ष नाही. अन्न आणि पर्यावरणाशी निगडित आपण निवडलेला हा मार्ग आपल्याला ‘एएमआर’च्या संकटाकडेच घेऊन जातो. या संकटास प्रतिबंध करू शकणारे आणि परवडणारे असे धोरण आपल्याला आखावे लागणार आहे. जगात इतरही अनेक आव्हाने आ वासून समोर उभी असतानाच हेही आव्हान पेलण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. आरोग्यसुविधांची सर्वांना उपलब्धता हाच त्यासाठीचा राजमार्ग आहे. शेतकऱ्यांची जीवन सुरक्षा आणि अन्न उत्पादकतेत वाढ या दोन्ही गोष्टी एकाचवेळी साध्य कराव्या लागणार आहेत.

यामुळेच आता बदलासाठीचे पुढचे धोरण काय असेल, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. याला आपण ''संवर्धन धोरण'' असेही म्हणू शकतो. त्यानंतर विकास धोरण येईल. त्यात रसायने आणि प्रतिजैविकांच्या वापराशिवायच उत्पादकता वाढवण्याचे मार्ग शोधून काढावे लागतील. त्यानंतर पर्यावरणीय धोरण येईल, ज्यात औषध उद्योग व अन्य उद्योगातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन समाविष्ट असेल. प्रतिसूक्ष्मजैविकांचा मर्यादित वापर, औषधनिर्माणात अन्य पर्यायी पण प्रभावी उपाय शोधून काढणे आणि आरोग्यसुविधा मजबूत करतील असे प्रतिबंधात्मक घटक निर्माण करणे, हेच काही मार्ग आहेत. ''मेक ऑर ब्रेक'' या तत्त्वावर काम करणे आता गरजेचे आहे !

(लेखिका ‘सेंटर फॉर सायन्स ॲन्ड एनव्हायर्नमेंट’च्या प्रमुख आणि पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)

(अनुवाद : तेजसी आगाशे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()