अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि एनडी

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतंत्र कायदा व्हावा, यासाठी ते कायम आग्रही राहिले.
n. d. patil
n. d. patilsakal
Updated on
Summary

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतंत्र कायदा व्हावा, यासाठी ते कायम आग्रही राहिले.

डॉ. एन. डी. पाटील यांनी अंधश्रद्धेविरुद्ध रोखठोक भूमिका मांडली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतंत्र कायदा व्हावा, यासाठी ते कायम आग्रही राहिले. त्यांचे अंधश्रद्धेविरुद्ध मांडलेले काही विचार...

लोकाग्रहासाठी, लोकलाजेसाठी आणि लोकानुनयासाठी तत्त्वनिष्ठेची तिलांजली देणे डॉ. एन. डी. पाटील यांच्या तत्त्वात बसत नाही. कोल्हापूर मतदारसंघातून विजयी होताच जल्लोषी मिरवणूक शहरातून वाटचाल करत होती. दिवस होळीचा होता. चौकाच्या मध्यभागी त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी होळी रचली होती. कार्यकर्त्यांची मागणी होती की त्यांनी होळी पेटवावी. ती त्यांनी नाकारली. कार्यकर्ते नाराज झाले. एन. डी. पाटील यांनी जनसमुदायाला सांगितले, ‘‘मी होळी पेटवणार नाही. कारण ही गोष्ट माझ्या बुद्धीला पटत नाही. जे मला पटत नाही ते मी करणार नाही. कार्यकर्ते म्हणून नाराज असाल, तर मी तुमच्या वतीने पहिली घोषणा देतो, ‘एन. डी. पाटील मुर्दाबाद! आणि या घोषणा पुढे देत तुम्ही माझा निषेध करू शकता; पण मी होळी पेटवणार नाही.’’

इचलकरंजीच्या अंनिसच्या मेळाव्यात त्यांनी कामेरीच्या पुरोगामी शेतकऱ्याची गोष्ट सांगितली होती. त्यांनी गावात दवंडी दिली की उद्या त्यांच्या रानात ३३० कोटी देव कामाला येणार आहेत. बघायला या म्हणून निमंत्रण मिळालेलंच होतं. सगळे गावकरी त्याप्रमाणे गेले. या पट्ट्याने १० गायी नांगराला जुंपलेल्या होत्या आणि या १० गायी नांगर ओढत होत्या. प्रत्येक गायीच्या पोटात ३३ कोटी देव म्हणजे १० गायींच्या पोटातल्या देवांची संख्या ३३० कोटी होत होती. गायींच्या शरीरात ३३० कोटी देव आहेत हीदेखील अंधश्रद्धाच.

शंकराचार्यांचे दर्शन घेणाऱ्या इंदिरा गांधी जशा त्यांच्या टीकेचा विषय तसेच साधूबाबांचा पाय मस्तकावर धारण करणारे बलराम जाखरही तेवढेच अपराधी. त्यांची न मळलेली वाट संत गाडगे महाराजांची. गाडगेमहाराजांनी सांगितले होते, सव्वा रुपया दक्षिणा देत घातलेल्या या सत्यनारायणानं जर साधूवाण्याची नाव वर येत असेल तर कुणीही सत्यनारायण घालावा आणि मुंबईच्या समुद्रात बुडालेल्या रामदास आणि तुकाराम या बोटी वर काढून दाखवाव्यात. मी त्याला ११ लाख रुपये द्यायला तयार आहे. हात हवेत फिरवून मुठीतून मंत्र्यासाठी सोन्याची चेन काढून देणाऱ्या सत्य साईबाबांना त्याचं सांगणं असतं की त्यांनी जपानी बनावटीचं घड्याळ किंवा सोन्याची चेन काढून दाखवण्याचा चिल्लर चमत्कार करण्याऐवजी शेतकऱ्याला उपयुक्त असणारा ट्रॅक्टर हवेत हात फिरवून काढून दाखवा. त्यांनी सगळी उदाहरणं ‘सौ सुनारकी एक लुहारकी’ या पद्धतीची, एक घाव दोन तुकडे करणारी.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा ही त्यांची अखंड धडपड. आघाडी सरकारने नेमलेल्या ५१ कलमी किमान समान कार्यक्रमाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष असताना अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम त्यातील एक कलम म्हणून अंतर्भाव आणि कायदा करण्याची प्रक्रिया केवळ पाटील यांच्यामुळे घडली.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष असणाऱ्या डॉ. एन. डी. पाटील यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा अध्यादेश काढला, म्हणजे अंनिसचा अध्यक्ष हा राज्यमंत्री. या आमिषांच्या सापळ्यात डॉ. एन. डी. पाटील सापडणे शक्यच नव्हते, त्यांनी हे आमिष सहजतेने ठोकरून लावले. त्यांच्या दृष्टीने चळवळीची धार, प्रभावीपणा, एकसंधपणा अधिक मोलाच्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या होत्या. त्यांच्या विरोधामुळे राज्यपालांना ‘अंनिस’च्या अध्यक्षाला राज्यमंत्रिपद देण्याच्या अध्यादेशात दुरुस्ती करावी लागली. परिवर्तनाच्या वाटेवरचा ‘योद्धा संन्यासी’ ही त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघाली होती.

(प्रा. एन. डी. पाटील : व्यक्ती आणि कर्तृत्व’ या किशोर बेडकिहाळ आणि प्रा. सी. व्ही. पाटील यांनी संपादित ग्रंथातून साभार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.