थॉट ऑफ द वीक : स्वतःच्या सवयींत असे करा बदल 

थॉट ऑफ द वीक : स्वतःच्या सवयींत असे करा बदल 
Updated on

मागील लेखामध्ये आपण स्व-परिवर्तन कसे आणायचे ते समजून घेतले. स्व-परिवर्तन केल्यानंतर यश-अपयश पूर्णपणे आपल्या हातात असते. आपण एक ध्येय ठरवून त्यावर काम सुरू करतो. आपल्याभोवती अनेक गोष्टी घडत असतात. काही आपल्या नियंत्रणामध्ये, तर काही आपल्या नियंत्रणाबाहेर. जेव्हा नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी घडतात व त्याचा आपल्या योजनांवर परिणाम होतो, तेव्हा आपण एका विशिष्ट पद्धतीने विचार करतो. 
१. स्वतःला/ नशिबाला दोष देणे 
२. स्वतःच्या क्षमतेवर व निर्णयांवर संशय घेणे 

आजपर्यंत उभारलेले सर्व काही निरर्थक वाटते. आपल्याच बाबतीत असे का? हे टाळता आले असते का? आपण हा मार्ग/ ध्येय/ निर्णय घेऊन चुकलो का? असे अनेक प्रश्न मनात येतात. आलेले अपयश कायम असेच राहणार का? त्यातून येणारी भीतीही खूप मनात घर करून बसते. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी अनेक गोष्टी मदत करतात, पण अपयश आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला आपण इतके कवटाळून बसतो, की दुसरा विचार येत नाही. 

या चक्रातून बाहेर पडण्याच्या अनेक उपायांपैकी महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या सवयी. आपल्या दैनंदिन क्रिया आपले जीवन निश्चित करतात. आपण दररोज काय करतो, हेच आपल्या दीर्घकालीन जीवनशैलीचे निर्धारण करते. रोज जाणीवपूर्वक व अजाणतेपणे केलेली क्रिया सवय बनते. काही सवयी आपल्याला यशाकडे नेतात, तर काही आपल्या यशामध्ये येतात. आपल्या सवयी आणि त्या जागी कोणत्या नवीन सवयी आत्मसात करायच्या ते पाहू. 

सवय १ : स्वतःवरचा संशय 
ठरवल्याप्रमाणे घडले नाही, की आपल्याला स्वतःवर संशय येतो. तो नकारात्मक संवाद निर्माण करतो. स्वतःवर अविश्वास येतो व परिणामी सर्व निर्णय, आत्तापर्यंत केलेला विचार चुकीचा वाटायला लागतो. 
नवीन सवय १ : आत्मविश्वास 
आत्मविश्वास येण्यासाठी स्व-जागरूकता हवी. स्वतःला धीर द्या, सध्याची परिस्थिती म्हणजे आयुष्य नाही हे सत्य जाणून घ्या. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नक्की काय गरजेचे आहे? हा विचार प्रगती देतो. 

सवय २ : चालढकल 
काही गोष्टींवर तोडगा मिळत नाही असे वाटल्यास आपण ती पुढे ढकलतो. नंतर बघू, ही सर्वांत हानीकारक सवय. पुढे ढकलण्याने वेळ वाया जातो, तसेच ते तात्पुरते थोपवले जाते, पण त्यावर मार्ग काढला जात नाही. तसेच, न सोडविलेले प्रश्न आपली ऊर्जा व वेळ घालवतात. 
नवीन सवय २ : क्रियेची गती 
ज्या गोष्टी तुमच्या यशासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यांची चालढकल न करता त्यांना प्राधान्य देऊन त्यावर तोडगा काढणे अत्यावश्यक. नुसते विचार नाही, तर तो विचार कृतीत आणायला हवा. 

सवय ३ : परिस्थितीचा बळी बनून राहणे 
प्रतिकूल परिस्थितीचा बळी बनून राहण्यात काही लोकांना सुरक्षित वाटते. परिस्थितीचा बळी बनून राहिलात, तर तुम्हाला सुरवातीला सहानुभूती खूप मिळते, पण त्यावर उपाय मिळत नाही. 
नवीन सवय ३ : परिस्थितीची जबाबदारी घेणे 
बाह्य परिस्थिती आपण बदलू शकत नसलो, तरी परिस्थितीमुळे आपल्यावर होणारा परिणाम आपण बदलू शकतो. परिस्थितीची जबाबदारी घेणे म्हणजेच आपल्या नियंत्रणात असलेले पर्याय शोधणे. 

सवय ४ : सर्व काही मनाला लावून घेणे 
आपण अनेक कारणाने संवेदनशील बनतो. ही संवेदनशीलता एक माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारा एक उत्तम गुण आहे, पण एका मर्यादेनंतर तो आपल्याला खूप हळवा बनवतो. आपण प्रतिक्रिया, टीका खूप मनाला लावून घेतो व यशापासून लांब जातो. 
नवीन सवय ४ : वस्तुनिष्ठता 
आपल्याला दिलेली प्रत्येक प्रतिक्रिया, टीका मनाला लावून न घेता विचारात वस्तुनिष्ठता आणावी. ज्या गोष्टी पटतात, त्या आत्मसात करून पुढे चालत राहावे. कोण कसे व का वागले/ बोलले याची उत्तरे मिळविण्याचा अट्टहास सोडून आपल्या ध्येयाच्या मार्गावर चालत राहणे उत्तम. 

आनंदी आणि निरोगी आयुष्य जगण्याचा भाग म्हणजे आपल्या ज्ञानाचे किंवा प्रेरणेचे रोजच्या सवयीमध्ये रूपांतर करणे. चांगल्या सवयी तयार करणे हा आपला अनुभव सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे. लक्षात ठेवा- आपण आपल्या सवयींचे प्रतिबिंब असतो. स्वतःला कसे बनवायचे आहे हे आपल्या सवयीच ठरवतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.