अपेक्षांचा चक्रव्यूह असा भेदू !

अपेक्षांचा चक्रव्यूह असा भेदू !
Updated on

रेश्मा, ऑफिसमध्ये अनेक जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळत होती. एक दिवस तिला तिच्या टीमचे मूल्यांकन करायचे होते. त्यासाठी लागणारी पूर्ण तयारी झाली. एक एक करून ती टीम मेंबर्सशी चर्चा करून कामाचे मूल्यांकन व अभिप्राय देत होती. रेश्मा मॅनेजर असल्यामुळे, सर्वांना कामगिरीचे अभिप्राय व अपेक्षा सांगणे आवश्यक होते.

रेश्माने अभिप्राय खूप छान दिला. पण, अपेक्षा हव्या तशा तिच्याकडून सांगितल्या जात नव्हत्या. परिणामी, पूर्ण व स्पष्ट अपेक्षा न सांगितल्यामुळे टीम मेंबर त्यांच्या मतानुसार अपेक्षांची व्याख्या बनवत गेले. असेच वर्षभर चालू राहिले, रेश्माच्या  बॉसने रेश्माला बोलावून तिच्या टीमच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली व काही सुधारणा अपेक्षित आहेत, असे सांगितले. त्यावर रेश्माने अचानक प्रतिक्रिया दिली, ‘‘तुम्ही मला स्पष्ट व व्याख्येसहित अपेक्षा सांगितली, तर मला नक्की काय करायचे आहे ते समजेल.’’ तिला अचानक काहीतरी जाणवले. आपण जशी इतरांनी स्पष्ट व व्याखेसहित ‘अपेक्षा’ सांगावी, ही अपेक्षा करतो; तीच अपेक्षा आपण आपल्या टीमबरोबर पूर्ण करतो का? रेश्माला उत्तर मिळाले होते. तिने लगेच टीम मीटिंग घेतली व स्पष्ट, व्याख्येसहित अपेक्षा लिहून नमूद केल्या व त्या टीमपर्यंत पूर्ण पोचल्या, याची खात्री करून घेतली. परिणामी, सर्वजण अधिक क्षमतेने काम करू लागले व रेश्मालाही तिच्या बॉसकडून उत्तम कामगिरीची शाबासकी मिळाली.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रेशमासारखे आपणही असेच करतो. इतरांनी आपल्याला हव्या त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, हे वाटते व त्या अपेक्षांची व्याख्याही आपल्यासारखी असावी हे वाटते. यातून निर्माण झालेल्या अपेक्षापूर्तीचा संघर्ष विनाकारण मनस्ताप देतो. तुलना, अंधविश्वास यासारखे अनेक उगम व त्याचा परिणाम आपण जाणतो. आता या अपेक्षाभंगाचे उपाय पाहू :

वैचारिक स्पष्टता 
ज्याला आपण ‘thinking clarity’ म्हणतो. म्हणजे, अपेक्षा करणे व ती बोलून दाखविणे ही एक क्रिया आहे. ती क्रिया जर यशस्वी व्हावी, असे वाटत असेल तर त्या क्रियेमागची वैचारिक स्पष्टता आधी घ्यावी. अपेक्षांचा उगम व त्याची व्याख्या आधी आपल्या अंतर्मनामध्ये स्पष्ट झाली, की क्रियांमध्ये ती आपोआप येते.

अपेक्षांची व्याख्या
नुसती अपेक्षा न सांगता त्याची व्याख्याही सांगणे महत्त्वाचे. उदाहरणार्थ, आपण बऱ्याचदा ‘इतरांनी चांगले वागावे’ ही अपेक्षा करतो; पण ‘चांगले’ म्हणजे काय, याची व्याख्याही सांगणे आवश्यक. नाहीतर इतर लोक त्यांच्या व्याख्येप्रमाणे ‘चांगलेच’ वागतील. तसेच, इतर लोकांची तुमच्याकडून अपेक्षा असते, त्या वेळी त्यांची व्याख्या तुम्ही आधीच समजून घ्या.

पॅटर्न ओळखा
असे म्हणतात, की ‘झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवू शकत नाही...’ तुम्ही कितीही स्पष्ट व्याखेसहित अपेक्षा दिल्या, तरी त्या पूर्ण होतीलच, असे नाही. समोरच्या व्यक्तीला ती पूर्ण करायची इच्छा व काही कारणास्तव तयारी नसेल तर हा पॅटर्न ओळखणे आवश्यक आहे. एकदा पॅटर्न लक्षात आला, की अपेक्षांवर किती ऊर्जा व वेळ घालवायचा, हे तुमच्या हातात आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वीकार अपेक्षाभंगाचा
कित्येकदा सर्व काही करूनदेखील विशिष्ट व्यक्तींकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत. तसेच ती व्यक्ती स्वतःमध्ये सुधारणाही करत नाही. अशावेळी त्याचा स्वीकार करणे व पुढील निर्णय घेणे हाच उत्तम मार्ग. तुम्ही एका मर्यादेनंतर अपेक्षा पूर्ण होतील, या आशेवर बसला, तर फक्त तुमचा वेळ व ऊर्जा वाया जाते. परिस्थिती आहे तशी स्वीकारून पुढे वाटचाल करणे हा पर्याय प्रगती देतो.

सर्व उत्तरे जाणून घेण्याचा संघर्ष
अपेक्षापूर्तीसाठी तुमची जबाबदारी मर्यादित असते. तुम्ही वरील मुद्द्याप्रमाणे कितीही प्रामाणिकपणे  मांडली, तरी कधी कधी ती अपेक्षा विनाकारण अपूर्ण राहते.  स्वीकार करण्याआधी आपल्याला ‘आपले कुठे चुकले’, ‘समोरची व्यक्ती अशी का वागली’ हे  प्रश्न येतात; परंतु प्रत्येकवेळी तुम्हाला अपेक्षाभंगाचे उत्तर मिळेलच असे नाही. सर्व उत्तरे जाणून  घेण्याचा प्रयत्न अवश्य करावा; परंतु तो एका काळानंतर संघर्ष बनतो व तुमची शांतता भंग करतो. त्यामुळे हा संघर्ष टाळून पुढे जाणे हाच उत्तम पर्याय आहे.  

लक्षात ठेवा, अपेक्षा पूर्ण करण्याची तुमची जबाबदारी मर्यादित असते. समोरची व्यक्ती ती जबाबदारी उचलत नसेल, तर कोणताही पूर्वग्रह न बाळगता आहे तसे ‘सोडून द्यावे’ व पुढेपुढे जात राहावे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.