SUV Car : चलती का नाम, एसयूव्ही!

रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या वाहनांना सुरक्षेचे मानांकन (रेटिंग) देणाऱ्या एका जागतिक संस्थेच्या प्रमुखाने नुकतेच केलेले एक आवाहन चर्चेचे ठरले.
suv cars safety in india america accident hit and run case traffic rule rto transport
suv cars safety in india america accident hit and run case traffic rule rto transportesakal
Updated on

- प्रणित पवार

रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या वाहनांना सुरक्षेचे मानांकन (रेटिंग) देणाऱ्या एका जागतिक संस्थेच्या प्रमुखाने नुकतेच केलेले एक आवाहन चर्चेचे ठरले. ते म्हणाले होते, भारतात सध्याच्या काळात अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या फूल साईज ‘एसयूव्ही’ कार अमेरिकेत मात्र रस्ते सुरक्षेसाठी धोकादायक आहेत.

भारताने त्यांचा प्रसार करून अमेरिकेसारखी चूक करू नये... भारतात खरेच अशी परिस्थिती आहे? भारतातील रस्ते, चालकांचा वाहतुकीबाबतचा सेन्स आणि एकंदरीत मानसिकता पाहता इकडे सर्वच वाहने धोकादायक ठरू शकतात. मग ‘एसयूव्ही’च बदनाम का, असा प्रश्न पडतो.

बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचे मुंबईतील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरण काही वर्षांपूर्वी चांगलेच गाजले. पुण्यात जानेवारी २०१२ मध्ये एका मनोरुग्ण एसटी चालकाने नऊ जणांना चिरडले. वर्षभरापूर्वीही पुण्यातच पालिकेच्या बसचालकाने दुसऱ्या वाहनमालकाशी वाद झाल्याने रागाच्या भरात गाडी रिव्हर्स चालवून १० ते १५ वाहने उडवली. भारतातील काही राज्ये किंवा ठिकाणे अपवाद असतीलही; पण इकडे रस्ता सुरक्षेची शाश्वती देता येत नाही.

मग तुमची गाडी कोणतीही असो. वाहतुकीचे नियम आणि त्यांचे पालन केले गेले तर कोणतेही वाहन निरुपद्रवी ठरते हे कालातीत सत्य नाकारता येत नाही. एसयूव्ही अर्थात ‘स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल’ची अशी ठोस व्याख्या करता येत नाही.

सर्व परिस्थितीत सर्वांना सामावून घेणारी कार म्हणजे एसयूव्ही, जी चांगल्या रस्त्यांप्रमाणेच वाहनप्रेमींच्या भाषेत खडबडीत असे ‘ऑफरोडिंग’ रोडही लीलया तुडवते... (हो, कारण अशी ‘फोर बाय फोर’ ऑफरोड वाहने अगदी कुठूनही धावतात).

ज्या गाडीचा पुढील भाग (बोनेट) माणसाच्या अगदी छातीपर्यंत असतो, आत शिरताना जिला पायरीची (साईड फूट रेस्ट) गरज असते, चाक आकाराने मोठे आणि सस्पेन्शन व चेसी दमदार असते, अशा वर्णनाचे आधुनिक वाहन म्हणजे एसयूव्ही. काहींच्या मते मात्र पिकअप ट्रकवर कारची बॉडी बसवली की झाली एसयूव्ही. इंजिन, चेसी सर्व पिकअप ट्रकसारखेच; परंतु तिला कारचे स्वरूप येते.

भारतात मायक्रो/मिनी एसयूव्ही, सब कॉम्पॅक्ट, मिड साईज कॉम्पॅक्ट आणि फूल साईज असे एसयूव्हींचे अनेक प्रकार आहेत. गेल्या दशकभरात पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्यांमध्ये एसयूव्हींचा वाटा चार पटीने वाढला आहे.

सध्या भारतात विकली जाणारी प्रत्येक दुसरी कार एसयूव्ही किंवा एमपीव्ही (मल्टिपर्पज व्हेईकल) श्रेणीतील असल्याने, त्यांच्या वाढीचा दर हॅचबॅक किंवा सेदानपेक्षा अधिक आहे. म्हणूनच बहुतांश वाहन उत्पादक कंपन्या एसयूव्ही वाहने सादर करण्यात व्यस्त आहेत; परंतु ‘ग्लोबल न्यू कार ॲसेसमेंट प्रोग्राम’चे (जीएनसीएपी) अध्यक्ष डेविड वार्ड यांनी अमेरिकेतील एसयूव्ही कारच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारताला इशारा देऊन सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे.

‘रस्ते अपघातांच्या यादीत नेहमीच अग्रस्थानी असलेल्या भारताने एसयूव्हीसाठी अमेरिकेचा मार्ग अवलंबू नये. एसयूव्ही गाड्या इतर लहान कार, पादचारी आणि सायकलस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे,’ असा दावा वार्ड यांनी केला आहे.

ते पुढे म्हणतात, की विविध देशांत कार कंपन्या बाजारात आणत असलेल्या फूल साईज एसयूव्ही रस्ते सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. कारण अशा कार उंच आणि अधिक शक्तिशाली असतात. त्यातून रस्त्यावरील अन्य व्यक्तींना जीवघेणी दुखापत होण्याचा धोका वाढतो.

पादचारी किंवा सायकलस्वाराला ९० सेंटीमीटर उंच बोनेट असलेल्या कारने धडक दिल्यावर ते जास्त घातक ठरते. १० सेंटीमीटर उंच बोनेट असलेल्या कारच्या धडकेच्या तुलनेत त्यांना गंभीर दुखापत होण्याचा धोका ३० टक्के अधिक असतो. मध्यम आकारापेक्षा मोठ्या आकाराच्या एसयूव्हींनी गंभीर दुखापतीचा धोका एक तृतीयांशने वाढला आहे, असा मुद्दाही त्यांनी मांडला आहे.

डेविड वार्ड यांचा इशारा दखलपात्र असला तरी भारतात फक्त एसयूव्हीच रस्ते सुरक्षेसाठी धोकादायक का? इतर वाहनांसह निष्काळजी चालकही अपघातांना कारणीभूत ठरतात, हे विविध घटनांवरून लक्षात येते.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी दीड लाख प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. याची सरासरी काढल्यास दररोज ४२२ मृत्यूची नोंद होते. रस्ते अपघात टाळण्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि सामाजिक संस्था पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबवतात, जनजागृती करतात...

अपवादात्मक स्थितीत त्याचे सकारात्मक परिणाम जाणवताना दिसत नाहीत. रस्ते वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे महाभाग आपल्याला पावलोपावली आढळतात. त्यामुळे साहजिकच भारतात रस्ते अपघातांची कारणे कायम ठरलेली असतात.

दारू ढोसून वाहन चालवणे, सलग तासन् तास  ड्रायव्हिंग करणे, वेगमर्यादा ओलांडणे, सीट बेल्ट न लावणे, विनापरवाना वाहन चालवणे, लेन कटिंग करणे, विरुद्ध दिशेने वाहने हाकणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे इत्यादी कुकर्मे भारतातील अपघातांची महत्त्वाची कारणे आहेत.

वाहनचालक नियम पायदळी तुडवतात, हे सर्वश्रुत असले तरी सर्वसामान्य नागरिकांचे रस्त्यावरील वर्तनही काही वेळा बेजबाबदार ठरते. पदपथ असतानाही रस्त्याचा वापर करणे, महामार्गांवरील पादचारी पुलांचा वापर न करता रस्ता ओलांडणे, कानाला हेडफोन लावून किंवा मोबाईलवर बाता ठोकत रस्ता पार करणे आणि महामार्गांवरून चालणे असा नियमभंग त्यांच्याकडूनही होत असतो.

सध्याच्या काळात सर्वसामान्य माणूसच बेदरकार आणि बेफिकीर होत आहे. नियम हे पाळण्यासाठी नसतातच, असे गृहित धरून त्याचे सार्वजनिक ठिकाणी वावरणे हे इतरांच्या दृष्टीने धोकादायक ठरणारे आहे. तिथे फक्त ‘एसयूव्ही’ कशी जबाबदार ठरणार, हा कळीचा मुद्दा आहे.

  एसयूव्हीचा इतिहास मोठा रंजक आहे. सर्वांत जुनी एसयूव्ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान तयार केल्याचे बोलले जाते. ‘कुरोगेन टाईप ९५’ ही जपानी एसयूव्ही १९३६ ते १९४४ या काळात लष्करासाठी तयार केली गेली होती. ‘योन्की’ हे तिचे टोपणनाव जिचा अर्थ ‘ऑल व्हील ड्राईव्ह’ असा होता.

१९३४ मध्ये ‘ओपल गेलांडेस्पोर्टवॅगन’ नावाची पहिली ‘क्रॉसओव्हर युटिलिटी व्हेईकल’ (सीयूव्ही) श्रेणीतील कारची निर्मिती झाली. १९३६ मध्ये ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी तिच्यावर अधिक काम करून ती एसयूव्हीत रूपांतरित केली गेली.

‘कोमांडुरवॅगन’ अशी ओळख असलेली फोक्सवॅगनची ‘टाईप ८७’ कार ही त्यांच्या ‘बीटले’ मॉडेलचे फोर-व्हील ड्राईव्ह व्हर्जन होते. वजनाने हलकी ऑफरोड पॅसेंजर कार म्हणून जर्मन लष्कराने तिला ओळख दिली होती.

‘टाईप ८७’ ही आधुनिक काळातील एसयूव्ही होती. १९४० ते १९४५ या कालावधीत ‘दी व्हिलीज एमबी’ कारची निर्मिती करण्यात आली. ही पहिली एसयूव्ही नाही. मात्र, भविष्यातील एसयूव्ही वाहनांसाठी ती प्रेरणास्रोत होती.

यूएस आर्मी ट्रक १.४ टन ‘फोर बाय फोर’ असे तिचे टोपणनाव होते. भारताबद्दल बोलायचे तर, आपल्याकडे १९९१ मध्ये बाजारात आलेली टाटा कंपनीची ‘सिएरा’ ही पहिली एसयूव्ही ऑफरोडिंग कार ठरली. सिएरा टाटाच्याच ‘टोल्कोलाईन’ पिकअप ट्रकच्या आधारे निर्मित केलेली कार होती.

एसयूव्ही लोकप्रिय का?

भारदास्त आकार, रचना हे एसयूव्ही  लोकप्रिय  होण्याचे प्राथमिक कारण आहे. मोठे टायर, आकर्षक फ्रंट ग्रील, अधिक उंची, मोठा व्हीलबेस आणि रस्त्यावरील दमदार कामगिरी आदी सर्व गोष्टी ‘एसयूव्ही’ला अधिक रुबाबदार बनवतात.

त्यामुळे अशा कारचे रस्त्यावरील अस्तित्व ठळकपणे जाणवते. गेल्या एका वर्षात देशात विकल्या गेलेल्या एकूण प्रवासी वाहनांपैकी (पॅसेंजर्स व्हेईकल्स) ५० टक्के एसयूव्ही श्रेणीतील असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (एसआयएएम) संस्थेेने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारतात सुरुवातीला ऑफरोडिंग करणारेच अशा वाहनांच्या प्रेमात होते. आता मात्र दैनंदिन वापरासाठीही एसयूव्हींना प्राधान्य दिले जात आहे. 

अमेरिकेतील अपघातांची स्थिती

डेविड वार्ड यांनी अमेरिकेत एसयूव्हींची वाढती संख्या, त्यातून वाढलेले अपघात आणि झालेल्या मृत्यूच्या आधारे भारताला इशारा दिला असला तरी तेथील परिस्थितीवर नजर टाकल्यास तेथे २०२२ मध्ये ६० लाख ‘फूल साईज एसयूव्हीं’च्या  विक्रीची नोंद झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे २०२१ पेक्षा हा आकडा १५ टक्के अधिक होता.

अमेरिकेत सध्याच्या घडीला ८० टक्के कार एसयूव्ही आहेत. अमेरिकेतील ‘इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ हायवे सेफ्टी’ने नुकतेच देशातील अपघातांचे विश्लेषण केले. त्या आधारे सामान्यत: ४० इंचांहून अधिक उंच बोनेट असलेल्या एसयूव्ही किंवा पिकअप ट्रकमुळे झालेल्या अपघातांत बोनेटची उंची कमी असलेल्या वाहनांच्या तुलनेत ४५ टक्क्यांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

कोरोना टाळेबंदी शिथिल झाल्यापासून अमेरिकेत एकूणच पादचाऱ्यांच्या मृत्यूतील वाढ ही अन्य वाहतूक अपघातांपेक्षा अधिक आहे. २०२१ मध्ये पादचाऱ्यांच्या मृत्यूचा आकडा १३ टक्क्यांनी वाढून ७,३४२ वर पोहोचला, जो १९८१ नंतर सर्वाधिक आहे.

सायकलस्वारांच्या मृत्यूचा आकडा ५ टक्क्यांनी वाढून ९८५ वर पोहोचला आहे, जो १९७५ नंतर सर्वाधिक आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाने म्हटले आहे. २०२२ मध्ये रस्ते अपघातात १.६८ लाख नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात निम्म्याहून अधिक पादचारी आणि दुचाकीस्वार होते...

परिस्थिती एकंदर गंभीर आहे; पण ‘नजर हटी और दुर्घटना घटी’चा मंत्र बरेच काही शिकवून जातो. एक चूक होत्याचे नव्हते करून टाकते. गोल गोल चाकांचा अत्याधुनिक रथ हाकताना सर्वात महत्त्वाचे ठरते ते प्रत्येक गोष्टीचे नियंत्रण... ‘सारथी’कडे ते कसब असेल तेव्हाच आपण म्हणू शकतो, चलती का नाम गाडी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.