- संजय करकरे
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक वाघीण तोंडात प्लास्टिकची बाटली घेऊन चालत असल्याचा व्हिडीओ प्रचंड गाजला. सचिन तेंडुलकरनेही तो रिपोस्ट करून ‘वाघाकडून आपल्याला शिकायला पाहिजे’ असा संदेश दिला. एका व्हिडीओमुळे जगप्रसिद्ध झालेली ही वाघीण आहे ‘नयनतारा’... तिच्या कृतीमुळे प्लास्टिकच्या बाटल्यांच्या अतिवापराचा संदेश देशभरात गेला हे महत्त्वाचे...
यंदाच्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ माजवून दिली. प्लास्टिकची बाटली पाण्यातून काढून, तोंडात घेऊन जाणाऱ्या एका वाघिणीचा हा व्हिडीओ आहे. हजारो लोकांनी तो बघितला. सचिन तेंडुलकरसारख्या महान क्रिकेटपटूने तो व्हिडीओ रिपोस्ट करून ‘वाघाकडून आपल्याला शिकायला पाहिजे’ असा संदेश दिला.
एका व्हिडीओने जगप्रसिद्ध झालेली ही वाघीण आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निमढेला या बफर क्षेत्रातील ‘नयनतारा’. गाईड व काही छायाचित्रकारांनी तिला हे सुरेख नाव दिले आहे. डोळ्यात निळसर रंगाची झाक असणारी ही वाघीण खूपच सुंदर दिसते. नाजूक सडपातळ बांधा, डोळ्यात अल्लडतेची झाक आणि बिनधास्त असणारी ही वाघीण अद्याप आपल्या आईपासून स्वतंत्र झालेली नाही.
२०२२ च्या पावसाळ्यात भानुसखिंडी परिसरात दिसणाऱ्या वाघिणीच्या पोटी ‘नयनतारा’चा जन्म झाला. भानुसखिंडी वाघीण, ‘आंबा’ या नावानेही ओळखली जाते. व्याघ्र प्रकल्पाच्या दप्तरी ती ‘टी १६’ या नावाने ओळखली जाते. या वाघिणीचे हे चौथे बाळंतपण होते. या वेळी चार पिल्लांना तिने जन्म दिला.
या परिसरातील जबरदस्त धाक असणारा ‘छोटा मटका’ या नर वाघापासून ही सर्व पिल्ले झाली आहेत. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात या सर्व पिल्लांनी या बफर क्षेत्रात पर्यटकांना भरपूर दर्शन देऊन खूश केले होते. आता यंदाही ही १८-२० महिन्यांची पिल्ले दर्शन देत असल्याने बफरचे हे गेट पर्यटकांनी गजबजलेले असते.
पाण्यात बाटली धरून ते बाहेर काढत असल्याचा व्हिडीओ नागपुरातील युवा वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर याने काढला आहे. तो या व्हिडीओबद्दल सांगतो, ‘३१ डिसेंबरच्या संध्याकाळच्या सफारीत मी काही मेक्सिकोतील पर्यटकांना घेऊन या क्षेत्रात आलो होतो. या परिसरातील जांभूळडोह पाणवठ्याजवळ ही सर्व पिल्ले होती. दोन पिल्ले एका ठिकाणी; तर हे मादी पिल्लू पाण्याजवळ होते. ते चालत बंधाऱ्यावर आले.
बंधाऱ्यातील पाणी पीत असताना ‘नयनतारा’ला पाण्यावर तरंगणारी प्लास्टिकची बाटली दिसली. तिने काडीच्या साह्याने बाटली जवळ आणण्याचा प्रयत्न केल्यासारखे मला वाटले. मग बाटली तोंडात धरण्याचा तिने प्रयत्न केला. ते जमले नाही. मग व्यवस्थित तोंड आडवे करून तिने तोंडात बाटली धरली. हे करत असताना मला हा क्षण व्हिडीओने टिपावा असे वाटले.
पाण्यातील बाटली तोंडात धरून ही वाघीण मग आमच्या जिप्सीच्या दिशेने बंधाऱ्यावरून चालत आली. नंतर समोर येऊन तिने बाटली खाली टाकली. या वेळी मी व्हिडीओ तसेच काही फोटोही टिपले. या घटनेनंतर मी नागपूरला होतो. आजारीही होतो. हा व्हिडीओ काही दिवस बघितला नव्हता.
वेळ मिळाल्यावर फेब्रुवारी महिन्यात मी तो समाजमाध्यमांवर टाकला. पहिल्या दिवशी सर्वसाधारण प्रतिक्रिया आल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी ओरिसातील वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी तो व्हिडीओ ट्विटरवर टाकला. त्यानंतर तो प्रचंड वेगाने व्हायरल झाला.’
दीप पुढे सांगतो, ‘संबंधित व्हिडीओचा दृष्टिकोन आपण प्लास्टिककडे कसे बघतो आणि त्याकडे वाघ कसा बघतो, असे झाले. परिणामी बॉलीवूडपासून राजकीय नेते या सर्वांनी त्या व्हिडीओला आणखी पुढे नेले. सचिन तेंडुलकर अनेक वेळा ताडोबात येतो. त्याचीही ‘नयनतारा’ ही आवडती वाघीण आहे. साहजिकच त्याने या व्हिडीओला समाजमाध्यमांवर टाकले.
मग तो व्हिडीओ आणखी पसरला. दिल्लीमध्ये झालेल्या कंटेंट क्रिएटर्सच्या एका कार्यक्रमात तो दाखवला गेला. तिथे ‘स्वच्छ भारत अभियान’संदर्भात तो व्हिडीओ दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. जे माणसे करू शकत नाही, ते एका प्राण्याने केले, अशा स्वरूपाचा सकारात्मक संदेश या व्हिडीओच्या माध्यमातून संपूर्ण देशात गेला.
त्यानंतर खूप उलटसुलट चर्चा झाली. काही टीकाही झाली; मात्र माझ्या मते प्लास्टिक बाटल्यांबाबत एक सकारात्मक संदेश त्याद्वारे दिला गेला.’ या घटनेनंतर व्याघ्र प्रकल्पाने स्वच्छता मोहीम राबवली आणि विविध ठिकाणी साफसफाई केली.
‘नयनतारा’सोबत असणाऱ्या दोन नर पिल्लांचा संबंध या परिसरात झालेल्या दोन माणसांच्या मृत्यूंमध्येही असल्याने साहजिकच हे वाघाचे कुटुंब चर्चेत आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला, तर तेथील कोअर क्षेत्रात अद्याप एक गाव जंगलात आहे. या पूर्वी पाच गावांचे कोअर क्षेत्रातून पुनर्वसन झाले आहे. हे गाव आता पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असून त्यातील काही घरे आणि कुटुंबे जंगलाच्या बाहेर गेली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ९२ गावे आहेत. या गावांमध्ये सुमारे २३ हजारांवर कुटुंबे, ४० हजारांहून अधिक गुरे, गावकऱ्यांची शेती, शाळा आणि अन्य व्यवस्था आहे.
या बफर क्षेत्राला लागूनच असलेल्या जंगल क्षेत्रात २०१४ नंतर पर्यटन सुरू झाले. सध्या १४ पर्यटन प्रवेशद्वार या बफर क्षेत्रात आहे. म्हणजेच १४ प्रवेशद्वारांतून पर्यटक या बफर क्षेत्रातील जंगलात वन्यप्राणी तसेच वाघाच्या दर्शनासाठी फिरतात.
संपूर्ण देशात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असा आहे की ज्यामध्ये बफर क्षेत्राचे पर्यटन कमालीचे यशस्वी ठरले आहे आणि त्याला कारण आहे, या परिसरात दिसणारे वन्यप्राणी आणि खासकरून वाघ. या व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी साधारण दोन लाखांहून अधिक पर्यटक भेटी देत असून या जंगलातील ११५ हून अधिक वाघ पर्यटकांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाले आहेत.
व्याघ्र प्रकल्पातील जंगलातील संरक्षण कुट्यांवर स्थानिक तरुण कार्यरत असतात. त्यासोबतच प्राथमिक कृती दल, शीघ्र कृती दल, वनरक्षक व त्यांचे सोबती हे जंगलात पायी अथवा वाहनांद्वारे गस्त घालत असतात. या सर्वांचा कमी-अधिक प्रमाणावर जंगलात वावर असतो. त्यासोबतच बफर क्षेत्रात गुरांची चराई करणारे गुराखी, जंगलात वनउपज गोळा करण्यासाठी जाणारे स्थानिक ग्रामस्थ यांचाही वावर असतो.
या सर्वांचे ‘फूट प्रिंटस’ जंगलात विविध ठिकाणी दिसतात. म्हणजेच या सर्वांकडून राहून गेलेल्या अथवा टाकलेल्या, तुटलेल्या चपला व बूट, सायकलचे टायर, प्लास्टिकच्या बाटल्या, टोपी व गुटक्याचे प्लास्टिकचे कागद बफर क्षेत्रात बरेच वेळा दिसतात. ज्या क्षेत्रात पर्यटन आहे तिथे गाईडकडून अथवा जिप्सीचालकाकडून या गोष्टी उचलल्या जातात.
अनेक वेळा सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहीम राबवून गावकऱ्यांनी टाकलेल्या या वस्तू उचलण्याची अनेक व्याघ्र प्रकल्पांत प्रथा आहे. कोअर क्षेत्रात गावकऱ्यांचा मर्यादित वावर असल्याने या गोष्टी येथे कमी प्रमाणात बघायला मिळतात. या क्षेत्रात गाड्यांतून पर्यटन करणाऱ्या पर्यटकांकडूनही काही वेळा अशा गोष्टी टाकल्या जाण्याची शक्यता असते; मात्र जिप्सीमधील गाईड अनेक वेळा याबाबत पर्यटकांना सूचना करत असतो.
ताडोबात प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी आहे. येथे प्रवेशद्वारावर काचेच्या बाटल्या दिल्या जातात. बाटली परत केली; तर पाण्याचे पैसे वजा करून तिची अनामत रक्कम दिली जाते. हे सर्व करूनही बफर क्षेत्रात पाण्याची बाटली कशी आली, हा प्रश्न आहे. गावकरी अथवा कुठल्या तरी रोजंदारी अथवा गुराख्याने या प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करून ती तिथे टाकली असावी, हे स्पष्ट आहे आणि तीच ‘नयनतारा’ने उचलली होती.
वाघाला विशेषतः अप्रौढ पिल्लांना अशा आगळ्यावेगळ्या वस्तूंचे कायमच आकर्षण असते. लाकडाचा ओंडका, काडीचा तुकडा, टायर, वन कर्मचाऱ्यांचा डबा अथवा त्यांच्या पिशव्या पळवल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या वस्तूंबाबत कुतूहल असणाऱ्या युवा वाघांना मग त्या तोंडात धरून खेळायला अथवा त्याला चावत बसायला आवडते. मार्जार कुळातील प्राण्यांना ही सवय आहे. जे जंगलात वारंवार जातात, त्यांना या प्राण्यांची ही सवय माहीत आहे.
त्यामुळे ‘नयनतारा’ वाघिणीने तोंडात पाण्याची बाटली धरली याबाबत मला आगळेवेगळे वाटले नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने मग त्या कृतीचे इंटरप्रिटेशन केले, हे मात्र खरे. प्लास्टिकच्या बाटल्यांच्या अतिवापराचा संदेश ‘नयनतारा’च्या माध्यमातून संपूर्ण देशभरात गेला, हेही तितकेच महत्त्वाचे...
sanjay.karkare@gmail.com
(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.