बेलाऱ्याचा दादा

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव बफर क्षेत्राचा दादा असलेला ‘झायलो’ वाघ आकाराने मोठा आणि अतिशय देखणा आहे.
xylo tiger
xylo tigersakal
Updated on

- संजय करकरे

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव बफर क्षेत्राचा दादा असलेला ‘झायलो’ वाघ आकाराने मोठा आणि अतिशय देखणा आहे. कधी काळी तो पाळीव जनावरे मारत असला तरीही नीलगाय, रानडुक्कर आणि चितळसारख्या प्राण्यांनाही त्याने आपली शिकार केली आहे. आपले क्षेत्र राखण्यासाठी तो भरपूर चालतो आणि पोहतोही उत्तम. बलदंड आणि पीळदार शरीराच्या ‘झायलो’ने पळसगाव वनपरिक्षेत्रातील मदनापूर, बेलारा, कोलारा, पळसगाव आणि सिरकडा पर्यटन क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.

देशातील व्याघ्र प्रकल्पांत दिसणाऱ्या वाघांच्या नावात कमालीची विविधता पाहायला मिळते. व्याघ्र प्रकल्पाच्या दप्तरी वाघांना क्रमांक दिले जातात. T या इंग्रजी अक्षरांपासून ते असतात. मात्र स्थानिक जिप्सी चालक, गाईड तसेच त्या परिसरात जंगलात फिरणारे छायाचित्रकार आपापल्या परीने या वाघांच्या सवयी, त्यांच्या अंगावरील पट्टे, त्यांच्या चेहऱ्यावरील खुणा, तसेच त्यांचा मूळ परिसर ध्यानात घेऊन त्यांना विविध नावे देत असतात.

मला तर कधी कधी असे वाटते, की त्या त्या राज्यातील संस्कृतीची झलक या वाघांच्या नावात बघायला मिळते. उदाहरण सांगायचे झाल्यास राजस्थानातील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांची नावे उस्ताद, शेरखान, फतेह किंवा लैला अशी आहेत. मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पातील वाघ-वाघिणी छोटा मुन्ना, बन्नो, बमनी दादर, कनकटी, चांदनी व कॉलरवाली अशा नावांनी ओळखले जातात.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पातील वाघांमध्ये ऐश्वर्या, पाटलीण बाई, जुनाबाई, शर्मिली, छोटी तारा, माया, सूर्या व बारस अशी साधी-सरळ नावे दिलेली दिसतात. अर्थात बऱ्याच वेळा चित्रविचित्र नावेही सर्व ठिकाणी बघायला मिळतात. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘बीएमडब्ल्यू’ नावाने एक नर वाघ २००६ नंतर बघायला मिळत होता. बीएमडब्ल्यू गाडीचे नाव त्याच्या चेहऱ्यावरील इंग्रजी ‘BMW’ आद्याक्षरावरून ठेवले होते.

मात्र आजच्या कथेतील वाघाचे नाव चक्क एका गाडीची उपमा देत ठेवले आहे. त्या गाडीचे नाव आहे ‘झायलो’. हे नाव त्या वाघाच्या एकूण आकारावरून पडले. महेंद्रा कंपनीची ‘झायलो’ गाडी काही वर्षांपूर्वी रस्त्यावर धावत होती. त्या वाघाचा आकार लहान वयातच चांगला मोठा असल्याने काही छायाचित्रकारांनी त्याला झायलो गाडीचीच उपमा देत हे नाव ठेवले.

अर्थात त्याच्या चेहऱ्यावरही ‘XY’ असेही काळ्या पट्ट्याने लिहिलेले वाटते. आज हा वाघ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव बफर क्षेत्राचा दादा आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या नोंदीत या वाघाला ‘T १७८’ हा क्रमांक मिळाला आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी या सुप्रसिद्ध बफर क्षेत्रात २०१९ च्या सुमारास ‘छोटी मधू’ वाघिणीच्या पोटी ‘झायलो’चा जन्म झाला. या वाघिणीला त्यावेळेस तीन पिल्ले झाली होती. त्यात दोन माद्या व एका नराचा समावेश होता. या तिन्ही पिल्लांचा पिता या व्याघ्र प्रकल्पातील सुप्रसिद्ध ‘बजरंग’ हा वाघ होता.

या ‘बजरंग’ वाघाने त्याच्या एकूण आयुष्यात सुमारे ४० हून अधिक पिल्लांना जन्म दिल्याचे यापूर्वीच मी त्याच्यावर लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. २०१९ च्या सुमारास पाच-सहा महिन्यांची ही तिन्ही पिल्ले मी आगरझरी आणि देवाडा परिसरात त्यांच्या आईसोबत बघितल्याचे मला आठवते, पण ती मोठी होऊन जंगलाच्या दुसऱ्या भागात आपले अस्तित्व निर्माण करतील याची त्यावेळेस कल्पना नव्हती.

या तीन पिल्लांमधील एक मादी पिल्लू आकाराने काहीसे लहान असल्याने त्याला त्यावेळेस ‘नॅनो’ असे नाव दिले गेले होते. आकाराने मोठा असलेला नर पिल्लू ‘झायलो’ नावाने ओळखला जाऊ लागला. दुसरे मादी पिल्लू ‘बेला’ या नावाने नंतर ओळखले गेले. २०२१ मध्ये ही सर्व पिल्ले वेगवेगळी झाली आणि विखुरली गेली.

त्यातील ‘नॅनो’ वाघीण व्याघ्र प्रकल्पाच्या काठावरील भामडेळी गावातील एका शेतात लावण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाच्या तावडीत सापडली आणि तिचा मृत्यू झाला. ‘बेला’ आणि ‘झायलो’ हे दोन्ही वाघ व्याघ्र प्रकल्पाच्या बेलारा आणि सिरकडा या परिसरात दाखल झाले. हा परिसर ते जिथे लहानाचे मोठे झाले त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला आहे.

२०२२ च्या उन्हाळ्यात ‘झायलो’ची या परिसरात एन्ट्री झाल्यावर तो सर्वप्रथम तेथे असणाऱ्या ‘दागोबा’ नावाच्या नर वाघाला भिडला. तरणाबांड ‘झायलो’ने पहिला दणका त्याला दिला. वयाने मोठा आणि आकारानेही चांगला दणकट असलेल्या ‘दागोबा’ला नव्या नवख्या ‘झायलो’पुढे शरणागती पत्करावी लागली. पळसगाव वनपरिक्षेत्रातील हा सर्व परिसर यापूर्वी अनेक नर वाघांनी प्रसिद्ध होता.

गेल्या आठ ते नऊ वर्षांत या परिसरात कनकाझरी, मटकासुर, ताला, दागोबा आणि जोगा अशा नरांचे वास्तव्य होते. या परिसरात दाखल झालेल्या नवीन वाघांनी प्रत्येक वेळेस जुन्या व जाणत्या वाघांना आव्हान देऊन त्यांना हद्दपार केल्याचा येथील इतिहास आहे. साहजिकच ‘झायलो’ची एन्ट्री ‘दागोबा’ वाघाच्या एक्झिटला कारणीभूत ठरली.

या वाघाच्या संदर्भात व्याघ्र प्रकल्पाच्या पळसगाव बफर क्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी भरभरून बोलतात. त्या म्हणतात, ‘माझे क्षेत्र साधारण दहा हजार हेक्टरहून अधिक आहे. हा भलामोठा वाघ शिवनी वनक्षेत्रातील सिरकडापासून पळसगाव, कोलारा, बेलारा व मदनापूर या माझ्या सर्व क्षेत्रात फिरत असतो. तो आकाराने मोठा आहे. अतिशय देखणा आहे.

या परिसरात असणाऱ्या वीरा, शर्मिली, जुनाबाई, महाराणी तसेच एका नवीन मादीसोबत तो पाहिला गेला आहे. या सर्व वाघिणींना ‘झायलो’पासून पिल्ले झाल्याचे लक्षात येते. कधी हा वाघ पाळीव जनावरे मारत असला तरीही नीलगाय, रानडुक्कर आणि चितळ या तृणभक्षी प्राण्यांनाही तो आपली शिकार करत असल्याचे आमचे निरीक्षण आहे.

या वाघाचा आवाजही अतिशय जबरदस्त आहे. तो आपले क्षेत्र राखण्यासाठी भरपूर चालत असल्याचे दिसते. सकाळी तो जर सिरकाडामध्ये दिसला तर दुपारी तो जुनाबाई परिसरापर्यंत आलेला असतो.’

‘झायलो’ अतिशय देखणा, बलदंड आणि पीळदार शरीराचा आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच त्याची शरीररचना पाहायला मिळते. मोठे तोंड, मानेखाली व चेहऱ्याच्या बाजूला आलेले केस आणि चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास... विशेषतः पावसाळ्यातील त्याचे पोट व छातीकडील थुलथुलीत भागाचा एक व्हिडीओ माझ्या बघण्यात आला.

बफर क्षेत्रामध्ये दिसणारे हे वाघ जंगली तृणभक्षींच्या मागे कदाचित कमी जात असावेत, असे त्यांच्या शरीराकडे बघितल्यानंतर लक्षात येते. हे सर्व वाघ गावाच्या क्षेत्रात राहत असल्याने, त्यांचे लक्ष पाळीव प्राण्यांकडे जास्त असल्याचे बघायला मिळते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव आणि शिवनी या वनक्षेत्रात सर्वाधिक पाळीव प्राण्यांचा मृत्यू होतो, हे वनविभागाकडे असलेल्या त्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीवरून लक्षात येते.

साहजिकच या परिसरात गावांची आणि तेथील जनावरांची संख्याही जास्त असल्याने येथील वाघांना आकाराने मोठे असणारे पाळीव प्राणी खाद्य म्हणून अधिक सहजतेने मिळते. त्यामुळे सुमारे पाच ते सहा वर्षांचा हा वाघ या पाळीव जनावरांच्या भरवशावर चांगलाच भारदस्त झालेला वाटतो.

नागपुरातील वन्यजीव छायाचित्रकार व फिल्ममेकर श्रीहर्ष गजभिये यांनी ‘झायलो’चा लहानपणापासून मागोवा घेतला आहे. ते सांगतात, ‘छोटी मधू’ने तिन्ही पिल्लांना वाढवण्यासाठी कमालीची मेहनत घेतली. इतर नर वाघांपासून ती त्यांना दूर ठेवून मोठे करण्यात यशस्वी ठरली. ‘झायलो’बद्दल बोलायचे झाल्यास तो अत्यंत उत्कृष्ट पोहणारा आहे.

२०२१ च्या हिवाळ्यात मी त्याला इरई धरणात सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतर धरणाच्या पाण्यातून पोहून जाताना बघितलेले होते. एक अतिशय देखणा आणि उत्तम असा हा नर वाघ आहे. मला या वाघावर फिल्म करायची आहे, बघू कसे जमते ते...’

यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात नागपुरातील छायाचित्रकार कार्तिक चिटणीस याने आपला अनुभव सांगितला. तो म्हणाला, ‘आम्ही पाहुण्यांना घेऊन दुपारच्या सफारीत मदनापूर क्षेत्रात फिरत होतो. आम्हाला एका पाणवठ्यावर ‘जुनाबाई’ वाघिणीने चांगले दर्शन दिले. तिला पाहून आम्ही सर्व जण आनंदात होतो. परतीच्या मार्गावर असताना एका ठिकाणी सांबराचे कॉलिंग सुरू झाले.

आम्ही थांबून आवाजाचा अंदाज घेत असतानाच वाघ समोरच्या बाजूने थेट आमच्याकडे चालत आला. सुमारे २० ते २५ मिनिटे आम्ही त्याच्यासोबत होतो. पर्यटनाची वेळ संपू लागल्याने आम्ही त्याला सोडून जंगलाच्या बाहेर पडलो. यावेळेस या देखण्या वाघाचे अतिशय सुरेख असे दर्शन आम्हाला झाले.’

‘झायलो’च्याच क्षेत्रात त्याची बहीण ‘बेल’ जी T१७९ या नावाने ओळखली जाते. तीही तिथेच पर्यटकांना दर्शन देत असते. पळसगाव वनपरिक्षेत्रातील मदनापूर, बेलारा, कोलारा, पळसगाव आणि सिरकडा या पर्यटन क्षेत्रात आज ‘झायलो’ वाघाने आपला दबदबा निर्माण केला आहे. पर्यटकांना सहजतेने दर्शन देणारा हा वाघ आज या परिसरातील बफर क्षेत्राचा हिरो झाला आहे.

sanjay.karkare@gmail.com

(लेखक निसर्ग अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.