तालिबान, अफगाणिस्तान आणि ‘मराठ्यां‘चे पानिपत..

Taliban
Talibansakal media
Updated on

तालिबान, अफगाणिस्तान आणि ‘मराठ्यां‘चे पानिपत..

तब्बल 20 वर्षानंतर तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर आपला कब्जा केला. अफगाणिस्तानवर कब्जा करून, तालिबानने पुन्हा एकदा जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. कधी एके काळी फार शांतताप्रिय असणारा देश, आज आगीच्या वणव्यात धगधगतो आहे. जगण्यासाठी धडपड करतो आहे. गेली अनेक वर्षे अमेरिकेच्या सैन्यामागे लपलेला तालिबान, अमेरिकेने सैन्य मागे घेतल्यानंतर थोड्याच कालावधीत अफगाणिस्तानवर 15 ऑगस्ट रोजी, म्हणजेच आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिथे स्वतःचा झेंडा फडकवला. तालिबानने यावेळेस कुठलेही जास्त कष्ट न घेता, अगदी सहज आपले वर्चस्व अफगाणिस्तानवर प्रस्थापित केले.

नुकतीच, तालिबानने पत्रकार परिषद घेवून आपले आगामी धोरण काय असेल यावर भाष्य केले. ही, पत्रकार परिषद घेत असताना, तालिबान्यांच्या मागे भिंतीवर असलेल्या फोटोने जगाचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला कुठला फोटो आहे हे लक्षात नाही आले. पण, नंतर कळले की तो फोटो अहमद शहा अब्दालीचा आहे. आपल्याकडे क्रूर समजल्या जाणार्‍या अहमद शहा अब्दालीला अफगाणिस्तानात देव मानल्या जाते. मुळात देव कुणाला मानायचे आणि कुणाला नाही मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, यानिमित्ताने आपले आणि अफगाणिस्तानचे नाते अगदी प्राचीन काळापासून आहे, यात काही शंका नाही.

Taliban
102 व्या स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत तालिबानींचा गोळीबार; अनेकांचा मृत्यू

खरंतर, तालिबानने अहमद शहा अब्दालीचा फोटो भिंतीवर लावायला पाहिजे का?

पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि अफगाण सैन्यात झाले होते, हे इतिहासामध्ये आपण शिकलो आहोत. मराठा आणि अफगाण सैन्याचे हे युद्ध 14 जानेवारी 1761 रोजी झाले होते. ह्या, युद्धात अफगाण सैन्याची धुरा अहमद शहा अब्दालीने सांभाळली होती. आपल्यासाठी शत्रू असलेल्या अब्दालीला मात्र 'बाबा-ए-कौम' किंवा 'राष्ट्रपिता' अशा पदव्या अफगाणिस्तानने बहाल केल्या आहेत. तालिबानच्या बातम्या येऊ लागल्या तेंव्हापासुन आपले मराठी लोक, मुघलांशी आपण लढलो तसे अफगाणिस्तानी तालिबानशी का लढत नाही आहेत, असे म्हणून अफगाणिस्तानला हिणवत आहेत. मुळात इथे प्रश्न पडतो, अशी तुलना कशासाठी? हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो... एके काळी ज्यांच्याशी आपण युद्ध केले, त्याच्याशी आपण आपल्या सैन्याची तुलना का करत सुटलो आहे ? तो काळ किती वेगळा होता आणि आताचा काळ खूप वेगळा आहे.

अफगाणिस्तान मध्ये देव मानला जाणार्‍या, अहमद शहा अब्दालीने, नादीर शहाच्या खुनानंतर इराणच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानला सोडवले होते, आणि स्वतःला राजा घोषित केले. अहमद शहा अब्दाली राजा झाला तेंव्हा त्याचे वय फक्त 25 वर्षे होते. अफगाणिस्तानच्या दक्षिण प्रांतात असलेल्या कंदाहार या ठिकाणी तर, विनयशीलता आणि त्याने केलेले करिश्मे यासाठी तो प्रसिद्ध आहे. खूप कमी वेळात त्याने अफगाणी लोकांचे मन जिंकले होते, इतक्या कमी वेळात मिळविलेल्या त्याच्या यशाची कोणी कल्पनाही केली नव्हती. अफगाणी आणि पठाण लोकांचा अब्दाली हा अतिशय महत्वाचा कबिला आहे. अफगाण कबिल्या मध्ये असलेले वैर दूर करून सर्वांची एकजुट त्याने केली, आणि एका यशस्वी अफगाणिस्तान राष्ट्राची पायाभरणी केली. त्याच्या जीवनात त्याने लढलेले जवळपास सर्वच युद्धे तो जिंकला आहे.

अहमद शहा अब्दालीचे अंगभूत असलेले गुण ओळखून, त्याकाळी साबिर शाह नावाच्या एका सुफी संताने त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी, 'दुर-ए-दुर्रान' हा किताब बहाल केला होता. 'दुर-ए-दुर्रान' चा अर्थ म्हणजे, मोत्यांमधील सर्वोत्कृष्ट मोती. हा किताब बहाल झाल्यानंतर, अहमद शहा अब्दालीच्या कबिल्याला 'दुर्रानी' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याने जिंकलेल्या साम्राज्याला, इतिहासकार 'दुर्रानी' साम्राज्य म्हणतात. अहमद शहा अब्दालीने तेथील लोकांना दुर्रानी साम्राज्याच्या निमित्ताने एक नवी ओळख मिळवुन दिली होती. अहमद शहा अब्दालीने स्थापन केलेल्याच राष्ट्राला आपण, अफगाणिस्तान असे संबोधतो.

Taliban
तालिबानी चांगले, त्यांना उगाच बदनाम केलंय - पाकिस्तान

दिल्लीजवळ पानिपत मध्ये लढले गेलेले पानिपतचे तिसरे युद्ध अहमद शहा अब्दालीच्या आयुष्यातील सर्वात मोठे युद्ध होते. मराठे आणि अफगाण दोघेही साम्राज्य विस्ताराच्या महत्वाकांक्षेने पछाडले होते. खरंतर, या युद्धात एकापाठोपाठ एक युद्ध जिंकल्यामुळे मराठ्यांची जिंकण्याची महत्वाकांक्षा जबरदस्त होती. या युद्धात, सुरुवातीला अहमद शहा अब्दालीला मराठ्यांपासून धोका आहे, असे वाटू लागले होते. परंतु, उत्तर भारतातील बरेचसे प्रांत अहमद शहा अब्दालीच्या साम्राज्याचा भाग होते, त्यामुळे पानिपतचे तिसरे युद्ध लढणे साम्राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अब्दालीसाठी आत्मसुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते, असे अफगाणी नागरिकांचे म्हणणे आहे.

पानिपतच्या झालेल्या या तिसर्‍या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, हजारो सैनिक या युद्धात मारल्या गेलेत. 'मराटाई वहाल' असे या युद्धाला अफगाणिस्तानात आजही एका प्रांतात संबोधल्या जाते. कंदाहार भागात, पश्तून भाषेत ही एक म्हण म्हणून प्रचलित आहे. अहमद शहा अब्दालीने आपल्या 25 वर्षाच्या काळात अफगाणिस्तानला एका नव्या उंचीवर नेवून ठेवले. त्यांच्या विकासात मोलाचे योगदान बजावले. त्याच्या, कारकिर्दीबद्दल सांगितल्या जाते की, त्याने कधीच बेजबाबदारपणे राज्यकारभार केला नाही. उलट, संयमी आणि समंजसपणे सगळया गोष्टी हाताळल्या. तेंव्हापासून आजतागायत अहमद शहा अब्दालीला अफगाणिस्तानात देव मानण्यात येते.

कारण, अहमद शहा अब्दालीने नागरिकांमध्ये आत्मसन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत केली. सामान्य नागरिकांच्या मनात तो जिवंत आहे. तरुण असो की वयोवृद्ध प्रत्येकजण त्याची आराधना करतो. अफगाणिस्तानात एक वर्ग असा आहे, जो अहमद शहा अब्दालीला संत म्हणून पूजा करतो. फक्त अफगाणिस्तान नाही तर, पाकिस्तानातील पश्तून प्रांतातील लोकांचीही हीच भावना आहे. कंदाहार मध्ये त्याचा एक मकबरा आहे. कंदाहार त्याने जिंकलेल्या साम्राज्याची राजधानी होती. अनेक लोकांसाठी हे तीर्थक्षेत्र म्हणून महत्वाचे ठिकाण आहे.

Taliban
नाकावाटे कोरोना प्रतिबंधक लस ‘डेल्टा’वर प्रभावी

अहमद शहा अब्दाली हा फक्त, योद्धा नव्हता तर अनेक मुघल शासकांप्रमाणे लेखणीवर सुद्धा त्याचे प्रेम होते. लेखक आणि एक उत्कृष्ट कवी म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याने लिहिलेले संपूर्ण साहित्य हे, पश्तून भाषेत संकलन करून ठेवले आहे. सर्वच, वयोगटातील अफगाणी लोक त्याचे वाचन करतात. "अब्दालीला कायमच संत बनायचं होतं. आध्यात्मिकतेकडे त्यांचा कल होता आणि ते जन्मजात लेखक होते." असे मत त्याच्याबद्दल भारतातील ब्रिटीश साम्राजाशी संबंध असणारे इतिहासकार एलफिंस्टन व्यक्त करतात.

इतिहासाच्या या भागाकडे पाहिल्यावर लक्षात येते की, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव केल्यानंतर, अहमद शहा अब्दाली अगदी सहजपणे भारतातच राहू शकला असता आणि दिल्लीत राहून सगळया भारतावर शासन करता आले असते. परंतु, त्याने तसे न करता आपल्या मायदेशी तो परतला. आपल्या साम्राज्याच्या सीमा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने त्याने हा निर्णय घेतला होता.

अहमद शहा अब्दालीने त्याच्या सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या कवितेमध्ये लिहिलेले आहे...

"मैं दिल्ली के तख़्त को भूल जाता हूं,

जब मुझे अपनी ख़ूबसूरत अफ़ग़ान सरज़मीं की पहाड़ियां याद आती हैं..."

कदाचित याच कारणामुळे, अफगाणिस्तान मध्ये त्याच्याबद्दल अभिमान असावा.

स्पष्टपणे सांगायचे झाले, तर अफगाणिस्तानात स्वतंत्र अफगाणिस्तान असे सरकार कधीच नव्हते. तुर्क, मंगोल, पर्शियन, मुघल, सोव्हिएत, अमेरिकन आणि आता पाकिस्तानी, चिनी हे प्रदेश नियंत्रित करणार आहेत. कदाचित अब्दाली हा एकमेव स्वतंत्र अफगाण नेता होता ज्याने भरीव नियंत्रण स्थापित केले होते. प्रत्यक्षात त्याने सर्व अफगाणांना एकत्र केले. जमातींची जनगणना केली. अफगाणिस्तान हा शब्द सुद्धा पहिल्यांदा त्याच्या मृत्यूनंतर वापरला गेला होता.

मराठ्यांच्या दृष्टिकोनातून इतिहास सोडला तर, अफगाणिस्तानात चांगले व्यक्तिमत्व असणार्‍या व्यक्तीचा तालिबानने भिंतीवर तालिबानने फोटो लावावा का? मुळात, धर्मांध धर्मांधता कोणत्याही देशाला बुडवते. धर्माचे रक्षक म्हणून घेणारे तालिबानी, अहमद शहा अब्दालीने अफगाणिस्तानमध्ये ज्याप्रमाणे शासन केले, त्याप्रमाणे कधीच करू शकणार नाही. कारण, तालिबान हे गुंड प्रवृत्तीने आपले राज्य स्थापन करू पाहताहेत. एक, अहमद शहा अब्दाली होता, ज्याने सगळया अफगाणी लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. अफगाणिस्तानात प्रचंड बदल घडवून आणला, आणि आज तालिबान जे करत आहे त्यात खूप फरक आहे.

Taliban
नायजेर हादरले! अंदाधुंद गोळीबार, 14 मुलांसह 37 जणांचा मृत्यू

अहमद शहा अब्दालीने केलेल्या कारभाराने, असे दिसते की एखादा राजा आपल्या सैन्याला आशीर्वाद देत आहे परंतु, तालिबानकडे पाहिले की फक्त क्रुरता दिसते. कोणी इस्लामिक राष्ट्रासाठी लढत आहेत तर कोणी हिंदू राष्ट्रासाठी लढत आहेत, पण दोघेही मानवतेचा नाश करत आहेत. मानवतेपेक्षा कुठलाही धर्म सर्वश्रेष्ठ नसतो, हे स्वतःला धर्माचे कट्टर रक्षक म्हणून घेणार्‍यांना कधी कळणार आहे ? अहमद शहा अब्दालीचा फोटो लावुन, आपल्या दहशतीची सुरुवात करणार्‍या तालिबान्यांनी एकदा अहमद शहा अब्दालीने केलेल्या राज्य कारभाराचा सुद्धा अभ्यास करायला हवा होता.

जवळपास गेली तीन दशके अफगाणिस्तानच्या नागरिकांचे प्रश्न अनुत्तरित आहेत. युद्ध, भूक, बेबंदशाही, भीती आणि छळ यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तरुणाईचे भविष्य अंधारात आहे. हिंसाचार, आणि रोजचे बंदुकीचे आवाज ऐकत, व्यक्तिगत आयुष्यातील जीवनात धडपड करत जीवन जगण्याची, आशा कायम टिकून ठेवण्यासाठी धडपडणारे अफगाणी नागरिकांचे असे जगणे म्हणजे फारच शोकांतिका आहे. शेजारील राष्ट्र म्हणून आपल्या भारतावरही त्याचा परिणाम होणारच आहे.

भीतीयुक्त शांततेत असणारा अफगाणिस्तान मनातून कधी शांत होईल, हे येणारा काळच ठरवेल. मराठे पानिपतमध्ये सर्व शक्तिनिशी लढले त्यामध्ये जिंकणे हेच त्यांचे ध्येय होते. हरल्यावरवर ही जिंकल्याचा मान मराठ्यांच्या नावे राहिला.. आणि आता मराठ्यांना आरक्षनासाठी कोणती भूमिका घ्यावी लागते त्याचे फायदे तोटे कुणाला कसे होतात हे पाहून मन चक्रावून जाते.

मुख्य विषय एका राजाचे फोटो भिंतीला लावुन, आम्ही कुणाकडून प्रेरणा घेतो हे दाखवण्यापेक्षा त्या राजाने ज्या प्रमाणे लोकांच्या मनात स्थान निर्माण केले, त्याप्रमाणे स्थान तालिबानने निर्माण केले तर बरे होईल. नाही का? अत्याचारी तालिबानने अतिशय सुंदर देश असणारा अफगाणिस्तान फारच भितीदायक करून टाकला. आता तुम्हीच ठरवा अहमद शहा अब्दालीचा फोटो तालिबान्यांनी भिंतीवर लावायला पाहिजे का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()