आयुष्यात स्त्री-पुरुषाची असलेली अनेकविध नाती त्यांच्या परस्पर असलेल्या भावनांमधून उमलत जातात. एखादवेळेस त्याचं प्रतिबिंब मनावर कोरलं जातं, तर काही वेळेस त्याची छबी मनातून उतरते.
आयुष्यात स्त्री-पुरुषाची असलेली अनेकविध नाती त्यांच्या परस्पर असलेल्या भावनांमधून उमलत जातात. एखादवेळेस त्याचं प्रतिबिंब मनावर कोरलं जातं, तर काही वेळेस त्याची छबी मनातून उतरते. अगदी खोल मनातून आलेल्या भावनांचा कल्लोळ कथांमधून प्रकट होताना ‘ती’च्या आत असलेल्या भावना कथारूपातून बाहेर पडतात. बालवयापासून चाळिशी ओलांडलेल्या ‘ती’च्या मनाचा ठाव घेणारा कथासंग्रह म्हणजे अमृता देसर्डा यांचा ‘आत आत आत.’ मनामध्ये वयानुरूप येणाऱ्या भावना व्यक्त करणारं हे पुस्तक जणू ‘ती’च्या अंतरंगाचा आरसाच असल्याचं भासतं.
महिलेच्या भावविश्वात अशा अनेक गोष्टी असतात की, त्या कायम मनाच्या एका कोपऱ्यात जतन केलेल्या असतात. त्या कोणाला सांगाव्याशाही वाटत नाहीत आणि मनातून त्या पुसल्याही जात नाहीत. अगदी बालपणापासून तिच्यामध्ये असलेली भीती ती कितीही मोठी झाली तरी पुसली जात नाही. बालपणीचा अल्लडपणा, प्रत्येक गोष्टीबद्दल असलेलं नातं आणि खेळता खेळता निर्माण झालेला वस्तू, झाडांबद्दलचा आपलेपणा ‘ती’ला खूप आधार देणारा वाटतो. या सगळ्यात समाजात वावरताना चांगले- वाईट खोलवर झालेले परिणाम सांगणारी या पुस्तकातील पहिली कथा आहे ‘पायजमा’. एकूण १८ कथांनी स्त्रीभावनांचं चित्र मांडलं आहे. शालेय जीवनातील ‘ती’ची स्वप्नं, उमलत्या वयात चूक नसताना सहन करावा लागणारा त्रास, त्यातून होणारी घुसमट व्यक्त करणाऱ्या कथा पुस्तकात आहेत.
बालपणीच्या खेळाची मजा काही वेगळीच असते. या खेळामध्ये मोठ्यांचं अनुकरण करणं हा भाग असतो, त्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींचं वागणं पाहूनच त्यांचा खेळामध्ये समावेश केला जातो. नातेसंबंधांमधील बारकावे माहीत नसलेल्या वयात खेळातून त्याचं अनुकरण होतं आणि त्यातूनच मनात असलेल्या भावनांचं प्रकटीकरण होण्यास सुरुवात होते. याचं चित्र ‘घर घर’ या कथेतून समोर येतं. तर, मनामध्ये सतत नवीन गोष्टींबद्दल जाणून घेण्याची असलेली उत्सुकता अनेक प्रश्न निर्माण करणारी असते. अशा वेळेच्या भावनांचं बारकाईने केलेलं निरीक्षण ‘मीनास पत्र’, ‘रेवाची रोजनिशी’ या कथांमधून उलगडताना आपल्याला दिसतं. मुलांच्या कोमल मनावर घरातील वादाचे पडसाद उमटतात. आई-बाबांच्या भांडणात ती भांबावून जातात. अशा वेळेस त्यांना दिलासा देणारं कोणीही नसतं. केवळ एकांतात विचार करून त्यांच्यामध्ये अवेळी होत असलेले बदल त्यांचं बालपण हिरावून घेत असतं. या सगळ्यात शिक्षकांचं मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्या मनावरचं ओझं कमी होतं, हे सांगणारी ‘रेवाची रोजनिशी’ कथा भावस्पर्शी आहे.
आई-बाबांच्या नात्याबद्दल असलेलं कुतूहल, त्यांच्याशी इतर कोणी साधलेली सलगी, ही त्या बालमनाला न खपणारी असते. त्यातच परगावी असलेले वडील जेव्हा घरी येतात, तेव्हा इतरांचं त्यांच्याकडे असलेलं आकर्षण लहानग्यांना आवडत नाही. अशा वेळी त्यांच्या जिवाची होणारी उलघाल ‘देवघरातलं गुपित’ या कथेत वाचावयास मिळते. कुमार अवस्थेतून वयात येताना शरीरात होणारे बदल ‘ती’ला संभ्रमावस्थेत टाकणारे असतात. नक्की आपल्याबाबतीत काय होत आहे, असे प्रश्न तिला पडतात. त्यांचं निरसन व्यवस्थित न झाल्यास होणाऱ्या बदलाकडे ती सकारात्मकतेने पाहू शकत नाही, हे अनुभवायला मिळतं ‘पाळी’ या कथेतून. भावाबहिणीचं असलेलं नातं कसं एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करणारं असतं हे ‘चिठ्ठी’ या कथेत मांडलं आहे. याशिवाय ‘नीराची प्रश्नावली’ या कथेतूनही बालमनाचा ठाव घेता येतो. तर, जसजसं वय वाढत जातं, तसतसं आपलं कोण आणि परकं कोण याची समज येते. परक्यांनी आपल्या घरामध्ये येणं-जाणं न खपणाऱ्या मुलांना मात्र त्यांच्याबाबत असलेल्या मर्यादा पाळल्या गेल्या नाही, तर त्यांना ते रुचत नाही. अशा वेळेस सर्वस्व असलेल्या आईने एखाद्याशी केलेली सलगी न पटणारी असते, तर तिचं वागणं असं का आहे, ‘ती’च्या मनामध्ये नक्की काय घडतं आहे अशा अनेक प्रश्नांनी कौमार्य अवस्थेतील वेढलेलं मन उलगडतं ‘तिऱ्हाईत’ या कथेतून.
निरीची मिनी, अचूक नेम, कणीस, तहान-भूक या कथांमधून स्त्री-पुरपषाच्या नातेसंबंधांतील बारकावे टिपले आहेत, तर योग्य वयात विवाह न झाल्यास होणारी घालमेल, ‘ती’च्या स्वभावात होणारे बदल, पती-पत्नीचे नातेसंबंध, योग्य वयात विवाह न झाल्यास मनामध्ये झालेला भावनांचा उद्रेक या सगळ्याचा ऊहापोह यातील कथांमध्ये मांडण्यात आला आहे. मंगळसूत्र, अंशूल या कथांतून ‘ती’ची स्वप्नं डोकावतात. मीही कणखर आहे, वेळप्रसंगी कुटुंबाची जबाबदारी लीलया पार पाडण्यासाठी सर्व पातळ्यांवर तयार असते, हा ‘ती’चा आविर्भाव पहायला मिळतो ‘हातम’ या कथेतून. याशिवाय ‘आधार’ या कथेमध्ये उतारवयातील ‘ती’च्या मनाचा ठाव घेतला आहे, तर या कथासंग्रहाचा कळस चढवणारी कथा आहे ‘मोहोर’. बालपणापासून उतारवयापर्यंत ‘ती’ने निभावलेल्या भूमिका, तिच्या भावनांचा पसारा या ‘आत आत आत’ या कथासंग्रहातून मांडण्याचा उत्कट प्रयत्न देसर्डा केला आहे.
पुस्तकाचं नाव : आत आत आत
लेखिका : अमृता देसर्डा
प्रकाशक : सारद मजकूर,
पुणे (८८८८८९५२२६)
पृष्ठं : १६०, मूल्य : २००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.