ध्यास आरोग्याचा

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
Education
EducationSakal
Updated on
Summary

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. यावेळी ‘आशिष ग्रामरचना’ या संस्थेविषयी....

राज्यात १९७२ मध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळे मराठवाड्यातील, विशेष करून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. यामध्ये कुपोषण, गरोदर मातांचे व नवजात बालकांचे मृत्यू अशा गंभीर समस्या होत्या. तसंच, ग्रामीण भागात मुलींचं कमी वयात लग्न करण्याचं प्रमाण सर्वाधिक होतं. कमी वयात लग्न केल्याने किशोरवयीन मुलींना अकाली येणारं मातृत्व, त्यामुळे माता व नवजात बालक मृत्यूचं प्रमाण जास्त होतं.

१९७६ मध्ये एका ध्येयवादी वैद्यकीय पदवीधराने सर्वांत भीषण दुष्काळ अनुभवलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड गावातील पाच खाटांच्या रुग्णालयात आरोग्याच्या समस्यांचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने, तसंच नागरिकांमध्ये जनजागृती व सामाजिक प्रबोधन करण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांनंतर त्या तरुणाला समवयस्क आणि समविचारी दोन डॉक्टर, एक पोषणतज्ज्ञ आणि लोकसंख्याशास्त्रज्ञ यांची एक टीम येऊन मिळाली आणि ‘आशिष ग्रामरचना’ या संस्थेची स्थापना झाली.

संस्थेच्या अंतर्गत ‘इन्स्टिट्यूशन ऑफ हेल्थ मॅनेजमेंट’ या नावाने प्रशिक्षण केंद्र सुरू करून, सुमारे साठ हजार लोकसंख्या असलेल्या ५२ गावांमध्ये त्यांनी ‘दाई’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक ग्रामीण भागातील प्रसूती सेवकांच्या प्रशिक्षणात (दाई प्रशिक्षण) पुढाकार घेतला. त्यांच्यामार्फत माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर सर्वसमावेशक आरोग्य आणि विकास प्रकल्प राबविला. असा प्रकल्प राबविणारी ‘आशिष ग्रामरचना’ देशातील पहिली संस्था होती. पुढे या प्रशिक्षण प्रकल्पाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार झाला आणि याची सुरुवात करणारा तरुण वैद्यकीय पदवीधर होता तो म्हणजे, आशिष ग्रामरचना संस्थेचे संस्थापक डॉ. अशोक दयालचंद.

समाजातील वंचित घटकांना सार्वजनिक आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने माता आणि नवजात बालकांचं आरोग्य, कुपोषण, स्वच्छता, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग, किशोरवयीन मुलींसाठी जीवनकौशल्य शिक्षण, प्रजनन व लैंगिक समानता या प्रमुख विषयांवर आशिष ग्रामरचना आणि इन्स्टिट्यूशन ऑफ हेल्थ मॅनेजमेंट कार्य करते. संस्थेचं कार्य खेड्यापाड्यांतील आणि शहर परिसरातील तरुण पुरुष आणि महिला यांच्यासाठी आहे.

१९८६ मध्ये संस्थेने सार्वजनिक आरोग्य व्यवहारासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरू केलं. १९९० पर्यंत संस्थेने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण केंद्र म्हणून स्वतःची स्थापना केली. भारत व साउथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल को-ऑपरेशन (SAARC) आणि आफ्रिकन देशांमधील दहा हजारांहून अधिक स्वयंसेवी संस्था आणि सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे.

संस्थेने १९९६ मध्ये पुणे शहरात आपल्या उपक्रमांचा विस्तार करून, पुणे शहर परिसरातील वस्त्यांसाठी सार्वजनिक आरोग्य मॉडेल तयार केलं. २००५ मध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) धोरण तयार करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्समध्ये काम करण्यासाठी IHMP ला आमंत्रित करण्यात आलं होतं. २०२० मध्ये संस्थेने शहरी भागातील वस्तीपातळीवर राहणाऱ्या नागरिकांच्या आजारांचं निदान करून, योग्य औषधोपचार आणि संदर्भ सेवा प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक क्लिनिकल पॅथॉलॉजी प्रयोगशाळा आणि मोबाईल वैद्यकीय युनिट सुरू केलं आहे. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात ५० वस्त्यांमध्ये अत्याधुनिक क्लिनिकल पॅथॉलॉजी प्रयोगशाळा आणि मोबाईल वैद्यकीय युनिटचं काम सुरू आहे. यामध्ये गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व योग्य निदान करून औषधोपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

१९९८ मध्ये संस्थेनं किशोरवयीन मुलींसोबत अधिक जवळून काम करण्याची गरज ओळखली व कमी वयात लग्न आणि अकाली मातृत्व विकृतीचं प्रमाण कमी करून, माता व बालक यांचा मृत्युदर कमी करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, किशोरवयीन मुलींसाठी जीवन-कौशल्य कार्यक्रम सुरू करण्यात आला. संस्थेला आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

संस्थेचे प्रमुख उपक्रम

१. अविवाहित किशोरवयीन मुलींसाठी जीवनकौशल्यं उपक्रम - भारतात दररोज १५ हजार ६०० मुलींचं लग्न सरासरी वयाच्या १५ व्या वर्षी होतं. अशी लग्नं टाळण्यासाठी संस्था मराठवाड्यातील खेड्यापाड्यांत आणि शहरी वस्त्यांमध्ये जीवनकौशल्य शिक्षणाद्वारे अविवाहित किशोरवयीन मुलींना सक्षम बनवत आहे. जीवनकौशल्य उपक्रमांतर्गत मुलींमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण करून, त्यांना खंबीर बनवणं आणि त्यांना लग्नासाठी आपल्या वयासंदर्भात कुटुंबामध्ये परखड मत व्यक्त करण्याची प्रेरणा देणं; तसंच स्वतःचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी स्वतःमधील क्षमता विकसित करण्यात मदत करणं आदी बाबींवर संस्था काम करते.

संस्थेचे समाज आधारित शिक्षक त्यांच्या गावात आणि वस्त्यांमध्ये पाक्षिक वर्ग चालवतात. या वर्गात मुलींना किशोरावस्थेत त्यांच्या शरीरात होणारे बदल, लैंगिक आणि प्रजनन आरोग्य, पोषण, वैयक्तिक स्वच्छता आणि प्रथमोपचार इत्यादी अनेक विषय शिकविले जातात.

२. विवाहित किशोरवयीन मुलींसाठी लैंगिक प्रजनन आरोग्य स्वास्थ्य कार्यक्रम - पंधरा वर्षांखालील मातांचा गर्भधारणा आणि बाळंतपणादरम्यान मृत्यू होण्याची शक्यता पाच पट जास्त असते आणि गर्भधारणेदरम्यान गर्भपात आणि गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. अशा वेळी मुली कमी वजनाच्या बाळांना जन्म देतात. अशा बाळांमध्ये विकृतीचं व मृत्युदराचं प्रमाण जास्त असतं. संस्थेच्या माध्यमातून वरील समस्या दूर करण्यासाठी मराठवाड्यातील खेड्यांमध्ये आणि शहरी भागातील वस्त्यांमध्ये विवाहित किशोरवयीन मुलींसाठी जनजागृतीपर लैंगिक आणि प्रजनन आरोग्य कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये गर्भधारणा टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, दोन जन्मांमधील अंतर वाढवणं आणि प्रजनन क्षमता सुधारणं अशा गोष्टींचा समावेश आहे.

३. किशोरवयीन मुलं आणि तरुणांमध्ये लैंगिक समानतेविषयी जनजागृती करणं व प्रशिक्षण देणं - ग्रामीण भागात पौगंडावस्थेतील मुलींचं लग्न त्यांच्यापेक्षा जास्त वयाच्या तरुणांशी केलं जातं. यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलींना छेडछाड, विनयभंग आणि लैंगिक आणि घरगुती हिंसाचाराचा अनुभव येतो. वरील समस्या टाळण्यासाठी आणि मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये सकारात्मक वृत्ती आणि बदल घडवून आणणं आणि लैंगिक आणि घरगुती हिंसाचार आणि लैंगिक असमान वर्तनाचं प्रमाण कमी करण्यासाठी संस्थेअंतर्गत मुलं आणि तरुणांना गटात्मक आणि वैयक्तिक समुपदेशन करण्यासाठी समुपदेशनपर व लैंगिक समानतेसाठी जनजागृतीपर उपक्रम राबविला जातो.

संस्थेचं कार्य मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ५३ गावांमध्ये व औरंगाबाद जिल्ह्यातील ३६ गावांमध्ये सुरू आहे. वरील प्रकल्पांसोबतच संस्थेअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी व महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी रोजगाराभिमुख शिलाई प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येतात. जास्तीत जास्त महिलांची गरज लक्षात घेऊन, संस्थेला शिलाई प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक स्तरावर अनुक्रमे चार शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी मदतीची व निधीची आवश्यकता आहे. एका प्रशिक्षण केंद्रात साधारण १० शिलाई मशिन असतात आणि एका बॅचमध्ये वीस महिला प्रशिक्षण घेऊ शकतात. एका प्रशिक्षण केंद्रातील किमान १० शिलाई मशिनचा खर्च साधारण एक लाख पंचवीस हजार इतका आहे. तसंच, संस्थेच्या पुणे शहर परिसरातील ५० वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या मोबाईल वैद्यकीय सेवा उपक्रमासाठी इंधन खर्च व औषधांसाठी सामूहिक मदतीची व निधीची आवश्यकता आहे.

कशी कराल मदत...

‘आशिष ग्रामरचना’ या संस्थेला आपलं कार्य व उपक्रम ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरजू महिला व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामूहिक मदतीची व निधीची गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘आशिष ग्रामरचना’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, ‘आशिष ग्रामरचना’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८०-जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क - ८६०५०१७३६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.