एखादं तंत्रज्ञान कमालीचं यशस्वी होतं आणि एखादं दुर्लक्षित राहतं. असं का होतं याच्या तपशिलात आपण जसजसं जाऊ तसतसं लक्षात येतं की, लोकांच्या रोजच्या वापरात येणारं किंवा लोकांना उपयोगी पडणारं किंवा उद्योग-व्यवसायात कमालीचा फेरबदल घडवणारं तंत्रज्ञान यशस्वी होतं.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एका तंत्रज्ञानाची चर्चा सतत सुरू होती. हे तंत्रज्ञान पुढचं जग बदलेल, असं मांडलं जात होतं. विशेषतः उद्योगजगतात उलथापालथ घडेल, असं सांगितलं जात होतं. हे तंत्रज्ञान होतं थ्रीडी प्रिंटरचं.
कोणत्याही वस्तूची आता ‘छपाई’ होईल...वस्तूंची निर्मिती अधिक सोपी होईल आणि ती वाढेलही...त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल, असं या अंदाजाचं स्वरूप होतं. थ्रीडी प्रिंटरचं तंत्रज्ञान आलं आणि स्थिरावलं.
ते तेव्हाच्या अपेक्षेइतकं आजही विस्तारलेलं नाही. हे तंत्रज्ञान जरूर महत्त्वाचं होतं आणि आहेही. तथापि, ते लोकप्रिय ठरलं नाही. सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर राहिलं. उद्योगाच्या एका परिघापुरतं मर्यादित राहिलं.
गेल्या दशकभरात अनेकदा स्वयंचलित मोटारींची चर्चा झाली. ‘गुगल’सारख्या विख्यात कंपनीनं स्वयंचलित मोटारींची आणि ट्रक्सची चाचणीही घेतली. स्वयंचलित मोटारींमुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि मनुष्यहानी टळेल, असं सतत सांगितलं गेलं.
या क्षेत्रात संशोधनासाठी मोठा पैसा ओतला गेला. स्वयंचलित मोटारी माणसांना निश्चित ठिकाणी वेळेत घेऊन जातील...वेळेची मोठी बचत होईल...असं बरंच काही बोललं गेलं. स्वयंचलित मोटारींबद्दलच्या कायदेशीर त्रुटी, तंत्रज्ञान सहजी उपलब्ध होण्यात आलेले अडथळे अशा कारणांमुळे स्वयंचलित मोटारी प्रयोगशाळेतच अडकल्या.
गेली पाच वर्षं ‘मेटा’नं (फेसबुक) आभासी वास्तव (व्हर्चुअल रिअॅलिटी) तंत्रज्ञानाबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढवल्या. आभासी जगात सैर करण्याची अनोखी संधी हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देईल, अशी अपेक्षा होती.
खेळ म्हणून (गेमिंग) विकसित होऊ घातलेलं हे तंत्रज्ञान उद्योगांवरही परिणाम करण्याची शक्यता मांडली गेली. बांधकामक्षेत्रापासून ते पर्यटनव्यवसायापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या फायद्या-तोट्याचा विचार होऊ लागला.
हे तंत्रज्ञान किमान आजअखेर अपेक्षेइतकं लोकप्रिय झालेलं नाही. ते जरूर अस्तित्वात आलं. तथापि, व्यावहारिक उपयोगापासून अद्याप दूर असल्यानं लोकप्रियतेत कमी पडलं. व्हर्चुअल रिअॅलिटी रोजच्या वापरात आलेलं तंत्रज्ञान नाही.
मोबाईल फोनसारखं उपकरण तंत्रज्ञानाला पुढं घेऊन जातं. स्मार्टवॉचसारखं उपकरण तेच काम करतं. गुगल मॅपसारखी सुविधा जिओ पोझिशनिंग (जीपीएस) तंत्रज्ञानाला, परिणामी उपग्रह दळवणवळणक्षेत्राला, नव्या उंचीवर नेतं.
वाहननिर्मितीच्या क्षेत्रात रोबोटिक्सनं ही भूमिका बजावली. वैद्यकीय उपकरणनिर्मितीच्या क्षेत्रातही रोबोटिक्स उपयोगाचं ठरलं. एरवी वेळखाऊ, किचकट वाटणाऱ्या गोष्टी तंत्रज्ञानाचा वापर करून सोप्या होतात तेव्हा ते लोकप्रिय बनतं.
खर्चिक बाबी स्वस्त बनतात, तेव्हा तंत्रज्ञान उद्योगस्नेही ठरतं. यांपैकी काहीही न करणारं तंत्रज्ञान महत्त्वाचं असूनही विशिष्ट मर्यादेत राहतं. एखाद्या टप्प्यावर त्यात आमूलाग्र बदल घडतो आणि मग त्यातून विकासाची नवी वाट धरली जाते.
लँडलाईन फोन ते मोबाईल फोन यादरम्यान एक शतक होतं. लँडलाईन फोन हे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेलं तंत्रज्ञान होतं. सन १८७६ ते १९८१ या काळात दूरसंचारक्षेत्रात विकास होत होता. तारायंत्रांपासून ते दूरचित्रवाणीपर्यंतचे टप्पे गाठले गेले होते.
भारतासारख्या ठिकाणी रेडिओ, लँडलाईन फोन, टीव्ही ही चैन समजली जाण्याचा काळ फार जुना नव्हे; अवघ्या चार दशकांपूर्वी होता. तंत्रज्ञानानं विकासाचा पुढचा टप्पा गाठला आणि मोबाईल फोनची निर्मिती झाली.
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात हा फोनही चैन होता. गेल्या दोन दशकांत या तंत्रज्ञानात विलक्षण प्रगती झाली. संवाद सुलभ झाला. छायाचित्र, व्हिडिओ, ऑडिओ यांचं मूल्यवर्धन झालं. बँकिंग मोबाईलवर आलं आणि शब्दशः खिसा मोबाईलवर आला. या साऱ्या प्रगतीमुळे मोबाईल फोनचं तंत्रज्ञान कमालीचं लोकप्रिय बनलं.
प्रत्येक तंत्रज्ञान लोकांचे श्रम, आर्थिक गुंतवणूक कमी करण्याचे प्रयत्न करतं. ज्या त्या क्षेत्रातला एखादा प्रश्न सोडवण्याचं काम करतं. तरीही प्रत्येक तंत्रज्ञान यशस्वी होतंच असं नाही. आज जग आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या भविष्याकडे डोळे लावून बसलं आहे.
‘लाख दुखों की एक दवा’ अशा स्वरूपाचं वर्णन अनेकदा ‘एआय’च्या बाबत होतं आहे. हे तंत्रज्ञान यशस्वी झालं तर नेमकं काय होईल यावर काथ्याकूट सुरू आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं या आठवड्यात याच विषयावरचा एक छोटेखानी निबंध प्रसिद्ध केला. ‘एआय’ समाजावर तिहेरी परिणाम करेल असा अंदाज या निबंधात संशोधकांनी मांडला.
‘एआय’मुळे उत्पादनक्षमतेवर, आर्थिक विषमतेवर आणि उद्योगांच्या केंद्रीकरणावर परिणाम होईल असे हे तीन अंदाज.
एआय’मुळे उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा स्वीकार झपाट्यानं होणं आवश्यक असल्याचं या निबंधात म्हटलं आहे. सध्याचं उद्योगजगत या तंत्रज्ञानाकडे सावधपणे पाहत आहे. आर्थिक लाभ दिसला नाही तर उद्योगजगत या तंत्रज्ञानापासून दूर राहण्याचा धोका आहे,
याकडे निबंधातून लक्ष वेधण्यात आलं आहे. ‘एआय’मुळे सामान्य कामगाराची कार्यक्षमता वाढेल आणि त्याचा आर्थिक लाभही वाढेल, असं संशोधकांना वाटतं. कामगारांमध्ये नसलेली, कमी असलेली कौशल्यं ‘एआय’ भरून काढू शकतं आणि त्यातून कामगारांना आर्थिक लाभ होईल अशी एक शक्यता त्यांना दिसते.
त्याबरोबरच, महागडे असे रोजगार ‘एआय’कडे जातील अशीही शक्यता त्यांना वाटते. असं घडलं तर, उच्च श्रेणीच्या कामगारांमध्ये आर्थिक अस्थैर्य निर्माण होण्याची भीती आहे. वर्षानुवर्षं उद्योग विशिष्ट भागातच केंद्रित आहेत. अमेरिकेतल्या आयटी उद्योगाचं केंद्रीकरण सिलिकॉन व्हॅलीत (कॅलिफोर्निया राज्यात) झालं.
महाराष्ट्रासारख्या राज्यात पश्चिम महाराष्ट्रात उद्योगांचं केंद्रीकरण आहे. जगभरात सर्वत्र अशी केंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू असते. या प्रक्रियेला ‘एआय’ अधिक गती देण्याची शक्यताही संशोधक मांडतात. ‘एआय’ अधिक विस्तृतपणे स्वीकारलं गेलं तर आणि लोकांना सहज उपलब्ध झालं तर, उद्योगांचं विकेंद्रीकरण होऊ शकतं.
संशोधक सर्व प्रकारचे ‘जर-तर’ तपासून पाहत असतात. नाणेनिधीच्या निबंधातच नव्हे तर, सर्वसाधारणपणे ‘एआय’बद्दलच्या साऱ्या संशोधनांमध्ये साऱ्या शक्यता समोर मांडल्या जात आहेत. या शक्यता एका बाजूला,
दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानाचा रोज होत असलेला विकास आणि तिसऱ्या बाजूला आपण सामान्य वापरकर्ते अशी जगाची रचना होत आहे. नजीकच्या भविष्यात, म्हणजे अगदी पाच ते सात वर्षांत, या रचनेत स्थिरता येत जाईल. ‘एआय’च्या भविष्याला त्या स्थिरतेपासून खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. तोपर्यंत त्याच्या यश-अपयशाबद्दल ठामपणानं भाष्य हे निव्वळ मनोरंजन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.