Marathi Abhijat Bhasha : मराठीच्या संपन्नतेवर राष्ट्रीय मोहोर

marathi language abhijat darja : मराठी माणसाला आपलं राज्य हवं होतं. म्हणूनच राज्याची भाषा मराठी व्हायला हवी होती.
Marathi Abhijat Bhasha
Marathi Abhijat Bhashasakal
Updated on

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती १९६० मध्ये एक मे या दिवशी झाल्यावर मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना झालेला आनंद अवर्णनीय होता. त्यासाठी मोठी चळवळ करावी लागली. तिला यश आले होते. मराठी माणसाला आपलं राज्य हवं होतं. म्हणूनच राज्याची भाषा मराठी व्हायला हवी होती. १९६० मध्ये या त्याच्या इच्छेला मूर्त रूप आले.

त्या दिवसानंतर मराठी भाषा बोलणाऱ्यांच्या जीवनातील मराठी भाषक या नात्यानं त्याला आनंद देणारा दिवस ठरला तो दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर २०२४. या दिवशी मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त झाली.

याचा अर्थ मधल्या काळात मराठीला प्रतिष्ठा नव्हती असा नव्हे. या प्रतिष्ठेच्या अलंकारानं मराठी भाषा केव्हाच मढवली गेली आहे. प्रसिद्ध वैयाकरण वररुची कात्यायन यानं फार पूर्वी प्राकृत भाषांमधील प्रकृष्ट भाषा म्हणजे महाराष्ट्री असा निर्वाळा दिला व तो वस्तुस्थितीला धरूनच होता.

मात्र या वस्तुस्थितीचा उलगडा व्हायला मध्यंतरी अनेक वर्षांचा काळ जावा लागला. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या संधिकाळात राजारामशास्त्री भागवत यांनी वररुचीच्या ‘प्राकृत प्रकाश’ ग्रंथाच्या आधारे दावा केला, की वररुची त्याच्या ग्रंथात महाराष्ट्री भाषा इतर प्राकृत भाषांची प्रकृती आहे असं म्हणत महाराष्ट्रीचं व्याकरण सिद्ध व शौरसेनी, पैशाची इ. भाषांचे व्याकरण सांगताना त्यांच्या त्यांच्या चलनाचे नियम ज्या ठिकाणी वेगळे आहेत, तेवढेच सांगतो व ‘शेषं महाराष्ट्रिवत्’ असा शेरा मारून मोकळा होतो.

आता यात भागवतांचा दावा तो काय ? हे तर वररुचीनं सांगितलं आहे, असं कोणाला वाटेल. इतकंच काय पण ‘लाघव’ नावाच्या गुणधर्माच्या प्रेमात असलेला कोणताही व्याकरणकार असंच करणार याकडंही तो लक्ष वेधील. असं वाटण्यात व करण्यात गैर काहीच नाही. भागवत या व्याकरणिक वस्तुस्थितीच्या आधारे जो निष्कर्ष काढतात तो महत्त्वाचा आहे. मुख्य म्हणजे तो राजकीय आहे. महाराष्ट्री भाषा ही अन्य प्राकृताची प्रकृती आहे. महाराष्ट्री भाषा ही अन्य प्राकृताची प्रकृती आहे याचाच अर्थ या भाषा महाराष्ट्रीतून निघालेल्या आहेत. यापेक्षा वेगळा असूच शकत नाही. वररुची हा शुद्ध व्याकरणकार होता. त्याला ऐतिहासिक व्याकरणाशी वा भाषाशास्त्राशी देणेघेणे नव्हते. त्याने त्याचे काम चोख बजावले. भागवत त्याकडे ऐतिहासिक दृष्ट्या पाहतात.

भागवतांचा निष्कर्ष असा आहे, की ज्याअर्थी अन्य प्राकृत भाषा या महाराष्ट्री भाषेतून उगम पावल्या आहेत, त्याअर्थी त्या त्या भाषा उत्पन्न करणाऱ्या लोकांचा महाराष्ट्री बोलणाऱ्या लोकांशी संबंध आला असला पाहिजे. तो कोठे आणि कसा आला ? भागवतांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्री प्राकृत बोलणाऱ्या लोकांनी म्हणजेच मराठ्यांनी उत्तरेकडं राज्यं स्थापन केली. तिथं जाताना ते आपली भाषा घेऊन गेले. त्यांची ही म्हणजेच महाराष्ट्री आणि तेथील स्थानिक लोकांच्या भाषा यांच्यातील देवाणघेवाणीचा परिपाक म्हणजेच अन्य प्राकृत भाषा !

राम गणेश गडकरी ‘भागवतांची धराच हिंमत’ असा सल्ला देतात. परंतु या हिंमतबहादूर माणसाच्या पावलावर पाऊल टाकून पुढं जायची हिंमत असलेले अभ्यासक फारसे निपजले नाहीत. उलट त्यांनाच ‘विक्षिप्त’ समजून मोडीत काढायचा पायंडा पडला. अपवाद ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा. केतकर त्याच्यातही पुढे गेले. केतकरांनी वररुची प्रभुतींची व्याकरणं व विशेषतः गुणाढ्याची बृहत्कथा यांच्याच आधारे मराठ्यांच्या पराक्रमाचा आणि प्रतापाचा इतिहास मांडला.

महाराष्ट्राचा सातवाहनपूर्व एवढंच काय पण अगदी बुद्धपूर्व इतिहास त्यांनी अक्षरशः खोदून काढला. नंद-मौर्य काळात भरभराटीस आलेल्या मगध राज्याची पाटलीपुत्र ही राजधानी तारापूरजवळील चिंचणी नावाच्या गावातील एक ब्राह्मणानं वसवली हा त्यांचा दावा अद्‍भुत असला, तरी पुराव्यावर आधारित होता. हे राजकीय किंवा भूराजकीय मुद्दे बाजूस ठेवू. भाषेच्या आणि साहित्याच्या पातळीवर त्यांनी मांडलेले कयासही तितक्याच मोलाचे होते. राजारामशास्त्री यांची निरीक्षणं अन्य प्राकृत भाषांविषयीची होती.

केतकरांनी आता संस्कृतकडं मोर्चा वळवला. त्यांचं म्हणणं असं, की संस्कृतमध्ये नाटकं लिहिली जाण्यापूर्वी महाराष्ट्रीमध्ये नाटकं लिहिली गेली. संस्कृत नाटकांमध्ये महाराष्ट्री सर्रास आढळते. केवळ संस्कृतात लिहिली गेलेली नाटकं दुर्मीळच आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे संस्कृत साहित्यशास्त्रातील सिद्धांत हे महाराष्ट्री प्राकृतमधील साहित्याला समोर ठेवूनच मांडले गेले आहेत. संस्कृतसाहित्यशास्त्रकार त्यांच्या सिद्धांताची विशेषतः सर्वश्रेष्ठ अशा ध्वनिकाव्याची उदाहरणे देताना महाराष्ट्रीतील कविता उद्धृत करताना हा त्यासाठीचा मोठा पुरावा होय.

आपल्या विद्वानांनी राजारामशास्त्री यांची गणना ज्या कोटीत करून त्यांना मोडीत काढले, त्याच म्हणजे विक्षिप्त या कोटीत केतकरांनाही बसवले !

अत्यंत नम्रपणे सांगतो, की २०१० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मी ‘साप्ताहिक सकाळ’मधून ‘गर्जा महाराष्ट्र’ ही लेखमाला लिहिली. तिच्यातील मांडणी मुख्यत्वे भागवत-केतकरांच्या आधारेच केली गेली होती. त्यात जे मुद्दे मांडले आहेत ते मराठीचे अभिजात्य सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठरावेत असेही मी नम्रपणे म्हणेन. पुढे या लेखमालेचा ग्रंथही सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केला.

या मांडणीतून असे निष्पन्न होतं, की जर संस्कृत ही अभिजात भाषा असेल तर महाराष्ट्री प्राकृत ही सुद्धा तितकीच अभिजात भाषा होय.

पण या सगळ्याचा मराठी भाषेच्या अभिजात दर्जाशी काय संबंध ?

मराठी भाषा ही महाराष्ट्री प्राकृताचे ऐतिहासिक अवस्थांतर होय. मराठी म्हणजे महाराष्ट्रीय. आताही मराठीला अभिजात दर्जा मिळाला तसाच प्राकृतलाही मिळाला आहे हे अत्यंत उचित म्हणावे लागते.

महाराष्ट्री/ महाराष्ट्र हे शब्द मराठी भाषेचे पर्यायी शब्द म्हणून निदान शंभर वर्षांपूर्वीपर्यंत वापरले जाते होते. जसं गुजरात आणि गुजराती, राजस्थान आणि राजस्थानी त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि महाराष्ट्री असं हे दृढ नातं आहे. महाराष्ट्री बोलणाऱ्या लोकांचा देश तो महाराष्ट्र आणि मराठी ही महाराष्ट्रीय असेल, तर मराठी बोलणाऱ्या लोकांचा देश म्हणजे महाराष्ट्र.

सतराव्या शतकातील तुकोबांच्या अभंगांचं वर्णन करताना त्यांच्या शिष्या बहिणाबाई सिऊरकर यांनी या अभंगांसाठी ‘तुकाराम वेद’ हा शब्दप्रयोग केला. म्हणजेच त्यांनी तुकोबांच्या मराठी भाषेतील कृतींना संस्कृतभाषेतील रचनांचा दर्जा दिला. अर्थात हा भाषिक मुद्दा स्वतः बहिणाबाईंनाही पुरेसा अवगत होता. म्हणूनच त्या असेही म्हणाल्या, की ‘महाराष्ट्र भाषेत वेदांताचा अर्थ। बोलला लोकांत सर्वद्रष्टा।।’ सर्वद्रष्टा - द्रष्टा याचा संस्कृतमधील एक अर्थ ऋषी.

महाराष्ट्री प्राकृत आणि मराठी यांच्यातील हे नातं लक्षात घेतलं म्हणजे महाराष्ट्री भाषेचा इतिहास हा मराठीच्या इतिहासाचा हिस्सा ठरतो. आणखी नेमकेपणानं सांगायचं झाल्यास तो मराठीचा पूर्वेतिहास ठरतो. त्यामुळंच मराठी अभिजात असल्याचा दावा करता येतो.

हा मुद्दा लक्षात असल्यामुळंच मी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडं शालेय स्तरावर महाराष्ट्री प्राकृत भाषेच्या समावेशाची आग्रहपूर्वक विनंती केली, ती त्यांनी मान्य करून त्यासाठी अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके सिद्ध करण्यासाठी एक समिती नेमली, योगायोगानं समितीचं अध्यक्षपद माझ्याकडं आलं. आजमितीला हा विषय इ. ११ वी १२ साठी उपलब्ध आहे. मात्र त्याचा लाभ घ्यायला अद्याप कोणी पुढं आलेलं दिसत नाही, हेही अखेर नमूद करायला हवं.

आणखी एक मुद्दा दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने पंचवीसेक प्राकृत जैन ग्रंथ प्रकाशित केले.

राज्य असो की भाषा, त्यांच्या इतिहासात चढउतार होत असतात. तसा प्रकार महाराष्ट्री-मराठीच्या बाबतीतही घडला. सातवाहन राजसत्तेनं आपली मानलेली महाराष्ट्री देशभर पसरली. तथापि सातवाहनांच्या अस्तानंतर ती काहीशी मागं पडली. अशा वेळी जैन धर्मीयांनी तिला आपली धर्मभाषा मानून तिच्यात ग्रंथरचना केली. त्यातून तिचा विकास झाला. यादव काळात पुन्हा एकदा तिला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. या टप्प्यावर येईपर्यंत तिला ‘मराठी’ हे नामाभिधान प्राप्त झालं होतं. या मराठीला यादव राजांनी राजाश्रय दिला. महानुभव व वारकरी संप्रदायांनी जैनांप्रमाणेच तिला धर्मभाषेची प्रतिष्ठा दिली. तेराव्या शतकात तिच्यात ‘लीळाचरित्र’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ हे महाअभिजात ग्रंथ निर्माण झाले.

युरोपीय भाषांमधील पहिलं काव्य मानल्या गेलेल्या दांते यांच्या इटालियन भाषेतील ‘डिव्हाइन कामेदिया’ या रचनेच्या पूर्वी ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली होती हे सांगितलं म्हणजे मराठीचे सामर्थ्य लक्षात येईल. भगवद्‍गीता या संस्कृत भाषेतील ग्रंथावरील संस्कृतेतर भाषेमधील पहिले भाष्य म्हणजे मराठीतील ‘ज्ञानेश्वरी’ अशीही ओळख सांगता येईल. महाराष्ट्र भूमी हीच एक नगरी समजून ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगुरु निवृत्तिनाथ यांना प्रार्थना केली -

‘मराठीचिये नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळु करी।

देणे घेणे सुखचि वरी। ही देई या जनां।।’

ज्ञानेश्वरांची ही प्रार्थना फलद्रूप झाली असे ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या कोणाच्याही लक्षात येईल. ‘लीळाचरित्र’ हेही महानुभवांची ब्रह्मविद्या होय. महानुभव संप्रदायाचे भाषिक योगदान लक्षात घेऊन राज्य सरकारनं महानुभवांचे तीर्थक्षेत्र ऋषिपूर येथे स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले ते याच वर्षी. माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्राच्या अधिकृत स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली आहे. तसं झालं तर ती या वर्षातील हॅटट्रिक ठरेल.

आणखी एका मुद्द्याकडं लक्ष वेधायलाच हवे. तीन ऑक्टोबर या तारखेला आश्विन शुद्ध प्रतिपदा ही तिथी होती. घटस्थापनेचा दिवस म्हणून ती सर्वज्ञात आहेच. या दिवशी संत मुक्ताईंची जयंती आणि संत बहिणाबाईंची पुण्यतिथी. बहिणाबाईंच्या महाराष्ट्र मराठीबद्दलच्या मताचा उल्लेख वर केला आहेच. बहिणीबाईंचीच ‘ज्ञानदेवे रचिला पाया - तुका झालासे कळस’ मराठीच्या वाड्‍मय इतिहासाचे सूत्रही सांगितलं आहे.

आपल्या ‘ताटीच्या अभंगा’मधून मुक्ताईंनी संत कोणाला म्हणावे यांचे सविस्तर विवरण केले आहे. ‘संत’ शब्द संस्कृतमधून आलेला असला व त्याचा समावेश असलेली सुभाषितवजा वाक्ये संस्कृतभाषेत आढळत असली, तरी संत या संकल्पनेचे विवरण करून तिला मनुष्यकोटीतील एक आदर्श नमुना म्हणून मांडण्याचं कार्य मराठी भाषेत झाले व ते मुक्ताईंनी केले.अशा भाषेला अभिजात न समजण्याचा करंटेपणा कोण करू शकतो ?

(लेखक हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.