मानवतेचा मानस...!

मी नवी मुंबईहून नाशिकच्या मार्गाला लागलो. रस्त्यामध्ये काही पाड्यांना भेटी देत सायंकाळपर्यंत नाशिकला जावं, हा बेत करून मी जात होतो.
Farmer
Farmersakal
Updated on

मी नवी मुंबईहून नाशिकच्या मार्गाला लागलो. रस्त्यामध्ये काही पाड्यांना भेटी देत सायंकाळपर्यंत नाशिकला जावं, हा बेत करून मी जात होतो. शहापूरजवळच्या एका पाड्यावर थांबलो. तिथल्या काही शेतकरी बांधवांशी बोलत होतो. निवडणुका, सरकार, स्थानिक पातळीवरील राजकारण आणि त्यात भरडली जाणारी ही सगळी पाड्यावरची माणसं आहेत, हे मी अनुभवत होतो. त्या पाड्यावर मी काही शेतकऱ्यांशी बोलत असताना एक छोटासा टेम्पो त्या गावात आला. टेम्पोला पाहून सगळे लोक हातामध्ये तांब्या, बाटली, ग्लास घेऊन टेम्पोच्या दिशेने जात होते.

मी माझ्या बाजूला उभ्या असलेल्या शेतकऱ्याला म्हणालो, `ही मंडळी अशी पळतात का?’ ते म्हणाले, `काही नाही, दूध आलेय. ते दूध आणण्यासाठी जात आहेत.’ मला वाटले, की दूध विक्रीसाठी कोणीतरी घेऊन आले असेल, पण तसे नव्हते. ते दूध तिथे मोफत वाटले जात होते. मी माझ्या बाजूला असलेल्या माणसाला परत म्हणालो, की ही माणसे फुकट दूध देतात का, पैसे घेत नाहीत? तो म्हणाला, ‘मानस’ नावाचा शेतीचा फार्म आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या गाईचे दूध रोज काढून आसपासच्या आदिवासी पाड्यांवर, गावांमध्ये वाटले जाते.

मला त्या व्यक्तीचे ऐकून आश्चर्य वाटले. मी त्या टेम्पोवाल्याला म्हणालो, `तुम्ही हे दूध रोज वाटप करता का?’ ते म्हणाले, `नाही, दोन ते तीन दिवसांत आम्ही दूध एकत्रित जमा करून वाटप करत असतो.’ तुमचा फार्म कुठे आहे? मी पुन्हा त्याला विचारले, तो म्हणाला, `१५ किलोमीटर अंतरावर आहे.’

मी त्या फार्मचा पत्ता घेतला आणि तिथे लोकांशी बोलून त्या फार्मच्या दिशेने निघालो. शहापूरवरून पुढे जाताना साजिवली येथे भातसा धरणाच्या अगदी जवळ असलेले हे `मानस कृषी शेती’ असा मोठा बोर्ड लावलेला आहे. मी ओळख सांगून आतमध्ये प्रवेश केला.

एका झोपडीमध्ये एक व्यक्ती आदिवासी महिलांना धान्य वाटप करताना मी पाहिले. मी तिथं गेलो आणि मागे चुपचापपणे उभा राहिलो. सर्व महिलांना धान्य दिल्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘‘ ज्या गरजू आणि कुपोषित बालकांच्या आई आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे धान्य देण्याचे काम करत असतो. आपल्या अवतीभवती असलेल्या अनेक गरजवंत महिला यांना या संदर्भात सांगा.’ त्या महिलांनी डोक्यावर बॅगा उचलल्या आणि त्या आपल्या घराच्या दिशेने निघाल्या.

त्यातल्या मी दोन महिलांशी बोलत होतो, त्यामध्ये गीता नावाची महिला मला म्हणाली, `या जमान्यात कोण कोणाला मदत करते बाबा, ही माणसे पुढाकार घेऊन काहीतरी चांगले काम करतात,’ दुसऱ्या जमुनाबाई म्हणाल्या, `गेल्या अनेक वर्षांपासून ही माणसे धान्य वाटप करण्याचे काम करतात. याच शेतामध्ये पिकलेले, इथेच देण्याचे काम त्यांनी हाती घेतले.

प्रत्येक वेळेला धान्य देण्यासाठी येणाऱ्या महिला वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या भागातल्या असतात. काळ नेहमी आम्हा गरिबाची परीक्षा घेतो. कधी आजारपण लहान मुलाभोवती असते, कधी म्हाताऱ्या माणसाचा जीव जातो. अशा स्थितीत ही माणसे देव म्हणून आमच्या आसपास असणाऱ्या सर्व पाड्यांवर जातात. सर्वांना भेटून मदत करतात. मी कुपोषणामुळे चार मुलांना मुकले. आता आई-बाबा आणि अपंग असलेल्या पतीला मी सांभाळते.’

जी व्यक्ती धान्य वाटप करत होती त्या व्यक्तीजवळ जाऊन मी त्यांना नमस्कार केला. त्यांच्याशी बोललो. त्यांच्याकडून तिथे चालणाऱ्या सगळ्या उपक्रमाविषयी माहिती घेतली. मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांचे नाव व्यंकटेश जोशी (९४२३१३६६०४), ते ‘मानस’चे संचालक होते.

मूळचे नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे असणारे जोशी यांनी त्यांच्या अनेक सहकारी मित्रांच्या मदतीने २५० एकर शेतीत सजीव शेतीचे प्रयोग करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात स्वतःला वाहून घेतले. जगात शेतीबाबत होणारे सर्व प्रयोग येथे होतात. देशभरातून शेतकरी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

गुजरात येथून गिरनार महाराज यांच्याकडून आणलेल्या पाचशे गीर गाई आहेत. या गाईचे दूध विक्रीसाठी नाही तर आसपासच्या गावांतल्या गरीब, कष्टकरी यांना वाटण्यासाठी आहे. गोमूत्रापासून पिकासंदर्भात असणारी सर्व औषधे येथे तयार केली जातात. विहिरीत गोमूत्र सोडले जाते आणि ते पुन्हा झाडांना दिले जाते.

शंभर एकर शेती येथे पडीक आहे, त्याचे कारण ती जमीन गाईंना चरण्यासाठी ठेवली आहे. गाय, अग्निहोत्र, जैविक खत ही ओळख या प्रकल्पाची आहे. जोशी माझ्याशी बोलत होते आणि मी त्यांचे सारे ऐकत होतो. सारा प्रकल्प जोशी यांनी मला फिरून दाखवला.

एका व्यक्तीची ओळख करून देताना जोशी मला म्हणाले, हे व्यंकटेश कुलकर्णी, माझे मावस भाऊ आणि गुरुसुद्धा आहेत. या प्रोजेक्टचे चेअरमन आहेत. त्यांनीच मला मुंबई दाखवली. मी कुलकर्णी सर यांना नमस्कार केला. एखाद्या साधूच्या चेहऱ्यावर जसे तेज असते तसे तेज कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर होते.

जोशीकाका काही माणसांशी बोलत होते, त्या वेळी मी कुलकर्णी यांच्याशी वेगवेगळ्या प्रयोगांविषयी बोलत होतो. कुलकर्णी म्हणाले, शेतीसाठी देशी गाय खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी जिथे शेती आहे तिथे गाय महत्त्वाची आहे. त्याशिवाय शेतीसाठी प्रसन्न वातावरणही महत्त्वाचे आहे, त्यासाठी अग्निहोत्र आवश्यक आहे.

अनादी काळापासून शेतीतून निघणाऱ्या धान्यातून आमच्या पिढ्या धष्टपुष्ट तयार झाल्या. कित्येक माणसे १३० वर्षांपर्यंत जगायची, पण आता सारेकाही सत्त्वहीन, रासायनिक खताचं खाऊन पन्नाशीत माणसांना जगणं नकोसे झाले आहे. कुलकर्णी यांचे शेतीबाबत सारे प्रयोग जबरदस्त होते. तिथला सोनचाफा तर आयुष्यभर आठवणीत राहील असाच होता. जोशी पुन्हा आले आणि माझ्याशी बोलत होते.

ते म्हणाले, `माझे वडील नारायण जोशी स्वातंत्र्यसैनिक होते. ते प्रचंड धार्मिक होते. हातात येईल तेवढा तांदूळ ते घ्यायचे, तेवढाच शिजवून खायचे. माझे आजोबा गोविंद आबा भट गावाकडे ज्योतिषी होते, कुणाची गाय चोरीला गेली, घरातून माणूस निघून गेला, तो कुठे गेला, ते बरोबर सांगायचे. त्यांची कार्यपद्धती मी अवगत केली, असे मला जोशीकाका सांगत होते.

मी जोशीकाका यांच्या गाडीत बसलो. त्यांनी प्रोजेक्टवर जितके प्रशिक्षण सुरू होते तिथे आम्ही जाऊन आलो. द्राक्षे, डाळिंब, चिकू, भातशेती, भेंडी अशा सर्व पिकांबाबत प्रशिक्षण सुरू होते. दरवर्षी किमान सात ते आठ हजार शेतकरी येथून प्रशिक्षण घेऊन विषमुक्तीसाठी पुढाकार घेतात. जोशी, कुलकर्णी आणि अन्य मित्रांच्या सहकार्याच्या मदतीने सुरू झालेल्या या प्रयोगाच्या माध्यमातून येत्या दहा वर्षांत राज्यातले किमान अर्धे शेतकरी तरी विषमुक्त शेतीकडे वळवण्याचा ‘मानस’ या बंधूने आखला आहे.`

जोशी आणि कुलकर्णी बंधूंचा निरोप घेऊन मी परतीच्या वाटेने निघालो. जोशी काकांनी मला सोनचाफ्याची फुले बांधून देताना ते मला म्हणाले, तुम्हाला सोनचाफ्यांची फुले फार आवडतात. मला एकदम धक्का बसला, मी म्हणालो, तुम्हाला कसे काय माहिती. त्यावर जोशीकाका हसून म्हणाले, मी ज्योतिषी आहे, काकांच्या बोलण्यावर मीही हसलो.

त्या सोनचाफ्याचा सुगंध पुढचे चार दिवस माझ्या गाडीत आणि घरात दरवळत होता. त्यापेक्षाही जोशी, कुलकर्णी यांनी निःस्वार्थीपणे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना गायींच्या संवर्धनातून दिलेला विषमुक्त शेतीचा प्रयोग फार महत्त्वाचा होता. `जय किसान’चा नारा या बंधूंच्या समर्पक भावनेतून निनादणारा होता, बरोबर ना...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com