डॉ विजय भटकर
विज्ञान आणि तंत्रज्ञानात गेल्या दोन शतकांत प्रचंड प्रगती झाली आहे. परंतु, या प्रगतीचा उपयोग मुख्यत्वे मानवाच्या अहंकार, लोभ, नफा आणि सुखसोयींसाठीच झाला आहे, ज्याचा सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी, शाश्वत विकासासाठी, पर्यावरण आणि निसर्गाच्या जतनासाठी अपेक्षित तितका उपयोग झालेला नाही. यामुळं आज जगभरात अस्थिरता, अपुरी आरोग्य व्यवस्था, प्रदूषण, हिंसा, दहशतवाद, आणि युद्धं या समस्या अधिक तीव्र झाल्या आहेत. विज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्यानं प्रगती होत असताना मानवानं नैतिकता, तत्त्वज्ञान आणि निसर्गाशी असलेले आपले नाते आहे त्याची जाण ठेवली पाहिजे. दीर्घकाळासाठी याचे गंभीर परिणाम होत आहेत. जगात निर्माण झालेली अस्थिरता आणि सामाजिक असमतोल याचे प्रमुख कारण आधुनिक विज्ञानाचे एकांगी दृष्टिकोन आणि निसर्गाशी कमजोर झालेले संबंध आहे.