मागील लेखामध्ये आपण ध्येय ठरवताना लागणारे महत्त्वाचे मुद्दे समजून घेतले. ध्येयाचा हेतू एकदा ठरवला, की त्याबद्दलची स्पष्टता आपोआप येते. ही सर्व तयारी योग्यरित्या केली, की ध्येयाकडे वाटचाल खऱ्या अर्थाने चालू होते. आता गरज आहे पूर्वतयारीमधील पुढील टप्पा पार करायची. तो म्हणजे ‘ध्येयाचे स्पष्ट रूप.’
चिराग हा तीस वर्षीय तरुण, नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत होता. त्याची मानसिक तयारी पूर्ण झाली. व्यवसायाकरता लागणाऱ्या भांडवलाची व्यवस्था करण्यासाठी तो एका गुंतवणूकदाराकडे गेला. गुंतवणूकदाराने एकच प्रश्न विचारला, ‘‘तुम्हाला नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे?’’ चिरागने अगदी आत्मविश्वासाने सांगितले, ‘‘मला हॉटेलसंबंधित व्यवसाय सुरू करायचा आहे व त्यासाठी मला थोडेफार भांडवल हवे आहे.’’ गुंतवणूकदाराने ‘विचार करून कळवितो’ असे सांगितले व चिराग तिथून निघाला. असे अनेक दिवस गेले. चिराग कमीत कमी पाच ते सहा गुंतवणूकदारांना भेटला; पण त्याला यश मिळेना. शेवटी त्याने एका मित्राला हा प्रकार सांगितला. चिराग भेटून आलेला एक गुंतवणूकदार मित्राच्या परिचयातील असल्यामुळे चिरागचे नक्की काय चुकले हे विचारायचे ठरले.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
चिरागच्या मित्राने चिरागला एका वाक्यात सांगितले. ‘‘गुंतवणूकदाराचा अभिप्राय हा आहे, की ‘तुला नक्की काय करायचे आहे’ याचे स्पष्ट रूप गुंतवणूकदारांपर्यंत पोचत नाही. ‘हॉटेलसंबंधित व्यवसाय व थोडेफार भांडवल’ हे खूप अस्पष्ट वाटल्यामुळे चिरागच्या व्यवसायात गुंतवणूक करायची त्याला खात्री वाटत नव्हती.’’
चिरागसारखे आपलेही ध्येय सुरुवातीला ‘अस्पष्ट’ असते; पण त्याला ‘स्पष्ट रूप’ देण्याआधी आपण ते कसे पूर्ण करायचे याची प्रक्रिया चालू करतो. परिणामी, अस्पष्टता ठेवून केलेल्या क्रियेचा परिणाम अस्पष्टच येणार. याकरिता आपले ध्येय स्पष्ट आणि चांगले परीभाषित केले पाहिजे. आपल्याला मार्ग दाखविण्यासाठी ध्येयाची नाही तर ‘स्पष्ट’ ध्येयाची आवश्यकता आहे. ही स्पष्टता येण्यासाठी हे काही मुद्दे मदत करतील :
१. ध्येयाची स्पष्ट व्याख्या
वरील उदाहरणामध्ये नुसते ‘हॉटेलशी संबंधित’ असे ध्येय उपयोगाचे नाही. त्यामध्ये स्पष्टता हवी. उदाहरणार्थ, ‘मला एक महाराष्ट्रीयन पद्धतीचे उपहारगृह काढायचे आहे- ज्याची क्षमता वीस- पन्नास लोकांची असेल व त्याचे ठिकाण नियोजित जागी असेल. तसेच त्यासाठी सर्वसाधारण नियोजित रक्कम लागणार आहे,’ अशी स्पष्ट व्याख्या गुंतवणूकदारांना नक्कीच तुमच्यावर विश्वास ठेवायला मदत करते व तुम्हाला पुढील वाटचालींकरिता योग्य ठरते.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
२. ध्येयाचे मोजमाप
तुमच्या ध्येयाचे यश मोजण्यायोग्य हवे. उदाहरणार्थ, पहिल्या दोन वर्षांत नक्की किती नफा मिळविण्याचे लक्ष्य आहे, याची स्पष्टता घ्या. तो नफाच तुमचे यशाचे मोजमाप ठरेल. तुम्हाला योग्य वाटेल ते मोजमाप ठरवा; पण काहीतरी मोजण्यायोग्य हवे.
३. सर्वसाधारण कालावधी
आपल्याला नुसते ‘पुढील काही वर्षांत काहीतरी करायचे आहे’ हे पुरेसे नाही. एक कालावधी ठरवायला हवा. उदाहरणार्थ, ‘पुढच्या वर्षी’ असे न म्हणता ‘नोव्हेंबर २०२१’ म्हणणे आपल्याला अधिक वचनबद्ध करते; तसेच कधीपर्यंतचा कालावधीबरोबरच कधीपासूचा कालावधी हेही महत्त्वाचे. नुसते ‘पुढच्या वर्षी’ म्हटले व कधीपासून त्याचा विचार नसला, तर कायम एक वर्ष पुढेच ढकलत राहू. त्यामुळे ‘नोव्हेंबर २०२०’पासून सुरू करून ‘नोव्हेंबर २०२१’पर्यंतचा सर्वसाधारण कालावधी नमूद करणे आवश्यक.
४. हेतूचा पुनःतपास
ध्येयाची व्याख्या स्पष्ट, मोजमाप असलेली व सर्वसाधारण कालावधी असलेली तयार झाली, की ‘ध्येयाची व्याख्या’ व आपल्या ‘ध्येयाचा हेतू’ यांचा पुनःतपास करावा. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो व आपण योग्य दिषेने वाटचाल करत आहोत याची प्रचीतीही येते.
वरील सर्व मुद्दे अंमलात आणून ध्येयाला स्पष्ट रूप द्या. पुढील लेखामध्ये आपण ‘ध्येयाचे नियोजन’ याबद्दल माहिती घेऊ. लक्षात ठेवा, ध्येय ‘कसे पूर्ण करायचे’ याआधी ध्येयाचे ‘स्पष्ट रूप’ अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच परिणाम व मार्ग ‘स्पष्ट’ होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.