समुद्राला किनारा आहेही...नाहीही! (प्रवीण टोकेकर)

Titanic movie appreciation by Pravin Tokekar in Saptarang
Titanic movie appreciation by Pravin Tokekar in Saptarang
Updated on

कॅमेरॉननं ‘टायटॅनिक’ला ‘प्रत्यक्षात घडलेली कादंबरी’ असं म्हटलेलं होतं. खरं तर ती ‘वास्तवात आलेली एक गझल’ मानली पाहिजे. अन्यथा, सन १९९७ मध्ये आलेल्या चित्रपटानं आणलेला तो भावसमुद्राचा कल्लोळ, जगजितच्या १९७८ मधल्या गझलेत आधीच कसा ओळखीचा झाला असता? भावबंधांचं काही सांगता येत नाही. कुठूनही कुठंही जुळतात. तुटतातही.

...या समुद्राला किनारा आहे, त्या समुद्राला किनारा नाही.

तेरा मुजरिम हूँ मुझे डूब के मर जाने दे...

साथ चलना है तो फिर छोड दे सारी दुनिया
चल ना पाए तो मुझे लौट के घर जाने दे...

इन अंधेरों से ही सूरज कभी निकलेगा ‘नझीर’
रात के साये जरा और निखर जाने दे...

-नझीर बाकरी, उर्दू शायर

ज  हाज डौलानं पाणी कापत निघालं होतं. प्रवासी मंडळीही स्थिरस्थावर झाली होती. एकमेकांशी गप्पा रंगत होत्या. धंद्या-पाण्याच्या गोष्टी सुरू होत्या. रोझची आई रूथ, कॅल हॉक्‍लीच्या कुटुंबीयांचं मन रिझविण्यात पार गुरफटून गेली होती. कॅल मात्र मनातल्या मनात जळत होता. आपली वाग्दत्त वधू एका थर्ड क्‍लास अनोळखी तरुणाबरोबर थर्ड क्‍लास लोकांमध्ये पार्ट्या करतेय, जहाजभर हिंडतेय, हे कुठल्या शिष्ट माणसाला आवडलं असतं? जॅक डॉसनला इथल्या इथं बोटीतून फेकता आलं असतं तर त्याला हवं होतं; पण रोझला त्याची पर्वा नव्हती.

तिजोरीतून एक पेंडंट काढून ते रोझनं जॅकसमोर धरलं. चमकदार हिऱ्यांचं ते पेंडंट तिच्या होणाऱ्या पतीनंच तिजोरीत ठेवलं होतं. चमकदार हिऱ्याचा तो अलंकार भयंकर महागामोलाचा आहे, हे ओळखण्याइतका जॅक बुद्दू नव्हता. त्या हारातच होता तो ‘हार्ट ऑफ ओशन’ नावाचा हिरा...

‘‘ तू चित्रकार आहेस ना?..माझं चित्र काढ!’’
‘‘ठीक...काढू या!’’
‘‘हे पेंडंट घालून हं!’’
‘‘ठीक’’

‘‘आय मीन...फक्‍त हे पेंडंट घालून! मला तुझ्या पॅरिसपद्धतीचं चित्र काढून हवंय! तुमच्या त्या फ्रेंच मुली काढून घेतात ना तसं चित्र...काढशील?’’ तिनं बेधडक आपली इच्छा व्यक्‍त केली. मान खाली घालून जॅक सभ्यपणे चित्राची जुळवाजुळव करू लागला. 

...समोर एक अनावृत आणि अनिवार नवयौवना पहुडलेली. चित्रकार असला तरी जॅकही तरुणच होता. देहातल्या धमन्यांमध्ये अनावर धडका मारणारं तारुण्य रोखत त्यानं चित्राकडं लक्ष केंद्रित केलं. 

‘‘किती वेळ...! सुविख्यात चित्रकार मोने आहेस का तू?’’ ती खट्याळपणाने म्हणाली.

‘‘मोने लॅंडस्केप्स काढायचा...’’ त्यानं शांतपणे उत्तर दिलं.
* * *

वृद्ध रोझआज्जीच्या रोमहर्षक प्रेमकहाणीनं मंत्रमुग्ध झालेले ब्रॉक कोव्हेटचे साथीदार सुन्न झाले होते. रोझचं त्यांच्याकडं खरं तर लक्षसुद्धा नव्हतं. गेली कित्येक दशकं या साऱ्या आठवणी तिनं एकटीनं मनात साठवून ठेवल्या होत्या. त्या फक्‍त एकेक करत पृष्ठभागावर येत होत्या इतकंच.

‘‘चित्रासाठी मॉडेलिंग करताना..अं...संकोचल्यासारखं नाही वाटलं?’’ कुणीतरी

हळुवारपणे विचारलं.

‘‘ओह वाटलं तर...वाटलं ना; किंबहुना, त्याक्षणी माझं हृदय ज्या वेगानं धडधडलं होतं, तेवढं नंतर पाण्यातसुद्धा धडधडलं नाही...पण पुढं काही घडलं नाही. जॅक वाटला होता त्यापेक्षा खूपच प्रोफेशनल चित्रकार होता...’’ रोझआज्जीनं मनातल्या प्रश्‍नाचं उत्तरही देऊन टाकलं.

‘टायटॅनिक’च्या अंतर्भागाचं अचूक वर्णन करत आपल्या कहाणीकडं वळलेल्या रोझच्या डोळ्यात समुद्राचं निळंशार पाणी तरंगत होतं.
* * *

जॅक आणि रोझच्या प्रेमप्रकरणानं तिसरा वर्ग खूश होता; पण कॅल हॉक्‍लीची अवस्था भयानक झाली होती. आई, रुथ बक्‍काटरही अस्वस्थ झाली होती. पोर सगळा मनसुबा उधळणार, हे तिला दिसत होतं. प्रेम इतकं सोपं नसतंच. कसला ना कसला तरी बळी ते घेतंच. पुढच्या खडतर मार्गाची आज तरी रोझला पर्वा नव्हती. जॅक तर सडाफटिंग होता. तीन दिवसांच्या सहवासात त्यांनी प्रीतीच्या मार्गावर कित्येक योजनं अंतर सहजी कापलं होतं. तसल्या भारलेल्या वातावरणातच जोरदार धक्‍का बसला आणि त्या मृत्यूसमान हिमनगानं सारं विश्‍व उलटंपालटं केलं. त्यात कॅल हॉक्‍लीचं भद्रजनांचं विश्‍वही कोलमडलं आणि रोझचं भावविश्‍वदेखील.

कणा मोडलेली ‘टायटॅनिक’ भराभर बुडू लागली. आकांत उडाला. पहिल्या वर्गाची प्रवासी असल्यानं आणि त्यातही स्त्री असल्यानं रोझ छोट्या संकटकालीन होडीतून सटकू शकली असती; पण जॅक अडकला होता. त्याच्या सुटकेसाठी आकाश-पाताळ एक करताना रोझनं जिवाची पर्वा केली नाही. अखेर कलंडत्या बोटीतून थंडगार पाण्यात दोघंही पडले. हजारो सुया बोचणाऱ्या त्या वेदना दोघांनीही सहन केल्या. पाणी बर्फगार होतं. एका फळकुटावर रोझला झोपवून जॅक त्या तसल्या पाण्यात तरंगत राहिला. प्रेमाच्या आणाभाका घेत राहिला.

‘‘रोझ...रोझ...मला वचन दे!’’ तो म्हणाला. रोझ थंडीनं कुडकुडत होती. जॅक तर संपूर्ण पाण्यात होता.

‘‘मला वचन दे रोझ...प्रत्येकाला कधीतरी मरायचं असतं; पण तू नाही मरायचंस...निदान इथं तरी नाही. तू लग्न कर. स्थिर हो. भरपूर मुलं होऊ देत तुला. नातवंडं खेळव. संपूर्ण आयुष्य मज्जेत काढून आज्जी होऊन हसऱ्या चेहऱ्यानं जा! आत्ता मरण्याचं नावही काढायचं नाही...दे वचन...देशील, देशील?’’ जॅक बडबडत राहिला. त्याचा ओला, थंडगार हात कसाबसा हातात घेत रोझनं त्याला वचन दिलं, आणि तिची शुद्ध हरपली. 

...प्रीतीची एक वादळी गाथा लाटांवर हेलकावत राहिली.

जिथे सागरा धरणी मिळते, तिथे राहून रोझनं उरलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जॅकच्या आठवणीत व्यतीत केला. तिच्यासाठी टायटॅनिक अजूनही तरंगत होती. अजूनही त्या जहाजावरची आलिशान दालनं रंगीबेरंगी गर्दीनं फुललेली होती. हंड्या-झुंबरं उजळून निघालेली होती. तिच्या आगमनासाठीच जणू मेजवानी खोळंबली होती. मुख्य म्हणजे तिथल्या बाकदार, चकचकीत जिन्यावर रेलून तिचा जॅक तिची आतुरतेनं वाट पाहत होता...

जॅकला दिलेला शब्द रोझनं आयुष्यभर कसा पाळला? जॅक डॉसन हे नाव कुठल्याच दस्तावेजात का नाही? ‘हार्ट ऑफ ओशन’ नावाच्या दुर्मिळ हिऱ्याचं काय झालं? खरं तर हे प्रश्‍न पडले काय आणि नाही पडले काय, एकच. समोर उलगडणारी प्रेमकहाणी या ठार व्यवहारी कुतूहलाच्या पल्याड घेऊन जाणारी आहे.

* * *

‘‘मला विचाराल तर ‘टायटॅनिक’ ही एक कादंबरीच आहे; पण प्रत्यक्षात घडलेली...’’ दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉननं एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्याच्या या विधानावरूनच त्याचा दृष्टिकोन उघड होतो. जहाजफुटीच्या कहाण्या कॅमेरॉनला लहानपणापासूनच भुरळ घालायच्या. त्यात ‘टायटॅनिक’ म्हणजे त्याच्या मते ‘माउंट एव्हरेस्ट ऑफ शिपरेक्‍स हिस्टरी’! केवळ अभ्यासू कुतूहलापोटी त्यानं ‘टायटॅनिक’चे अवशेष बघून येण्याचा खटाटोप सुरू केला. सन १९९५ मध्ये काही तंत्रज्ञांनी खोल समुद्रात यांत्रिक कुपीत बसून उडी मारली होती, ‘टायटॅनिक’ची काही दृश्‍य टिपण्याचा प्रयत्नही केला होता; पण नंतर खुद्द जेम्स कॅमेरॉन त्यांच्यासोबत उतरला. 

‘रोमिओ-ज्युलिएट स्टोरी ऑन टायटॅनिक’ असलं काहीतरी सूत्र त्याच्या डोक्‍यात घोळत होतं. अर्थात व्यक्‍तिरेखा अजूनही धूसरच होत्या. ‘ट्‌वेंटिएथ सेंचुरी फॉक्‍स’चे अधिकारी आणि पीटर चेर्निनसारखा तगडा फायनान्सर त्याला आर्थिक साह्य करायला तयार झाले. कारण यानिमित्तानं कॅमेरॉनसारखा जबरदस्त दिग्दर्शक बांधून ठेवता आला असता. मग कॅमेरॉननं दुर्घटनेच्या मुळाशी जायचं ठरवलं. जिवंत राहिलेल्या प्रवाशांचे नातलग गाठले. त्यांचे फोटो मिळवले. दुर्घटनेची तपशीलवार, वेळेबरहुकूम माहिती कागदावर टिपून घेतली. नकाशे तयार केले. सहा-आठ महिने त्याचा हा अभ्यास सुरू होता. तेवढ्यासाठी त्यानं एक टीम जमवली. एक वेगळं ऑफिस थाटलं. संशोधनावरच भरपूर खर्च केला. ‘टायटॅनिक’च्या अपघातातल्या किस्से-कहाण्या आणि जिवंत राहिलेल्या व्यक्‍तींच्या धांडोळ्यातून कॅमेरॉनला जॅक डॉसन सापडला. रोझसुद्धा अशीच गवसली. पैशाची सोय झाली होती. त्यामुळे त्या आघाडीवर कुठलीच अडचण नव्हती. मधल्या काळात कॅमेरॉननं पटकथा लिहून काढली. जॉनी डेपला जॅक डॉसनचा सळसळता रोल द्यावा असं त्याच्या भारी मनात होतं; पण जॉनी डेपनं चक्‍क नकार दिला. ही लव्ह स्टोरी त्याला फारच टिपिकल वाटत होती. गरीब मुलगा, श्रीमंत मुलगी. टायटॅनिकचा अपघातसुद्धा जुनाच...पण गडी नंतर पस्तावला. ‘आयुष्यातल्या महान चुकांपैकी एक चूक म्हणजे टायटॅनिकला नकार दिला ही...’ अशी झडझडून कबुली जॉनी डेपला नंतर द्यावी लागली. मॅथ्यू मॅक्‍नॉघीनंही भूमिकेसाठी प्रयत्न केला; पण ते जमलं नाही. त्याला एक सहायक भूमिका तेवढी मिळाली. लिओनार्दो डिकॅप्रिओचं नाव कुणीतरी कॅमेरॉनला सुचवलं. त्यानं त्याला ऑडिशनसाठी बोलावलं; पण डिकॅप्रिओनं ती सीरिअसली दिलीच नाही. स्टुडिओत येऊन तो उगीच टंगळमंगळ करत राहिला. त्याच्या त्या बेछूट वागण्यावरच कॅमेरॉन बेहद्द खूश झाला म्हणे. सगळे शिष्टाचार, व्यवहार, व्यावसायिकतेचे नियम धुडकावून लावणारं डिकॅप्रिओचं वागणं हा त्याच्या भूमिकेचा आत्मा ठरला. 

चित्रपटाची सुरवात आणि शेवट शंभर वर्षांच्या रोझच्या दृश्‍यानं होतो. म्हातारी रोझ आपली प्रेमकहाणी सांगतेय, अशीच चित्रपटाची मांडणी आहे. वृद्धावस्थेतल्या रोझसाठी ग्लोरिया स्टुअर्टची निवड कॅमेरॉननं केली. तेव्हा ग्लोरियाआज्जी फक्‍त ८७ वर्षांच्या होत्या. त्यांना शंभरीतला मेकप करावा लागला. या आज्जीबाईंनीही आपली छाप सोडली. चित्रपटातल्या अन्य व्यक्‍तिरेखाही कमालीच्या सुस्पष्ट आहेत.

चित्रपट वास्तवाला धरून असलाच पाहिजे हा कॅमेरॉनचा हट्ट होता. त्यासाठी त्यानं बुडालेल्या टायटॅनिकचं चित्रण महत्प्रयासानं केलंच; पण जहाजाचे तपशील मिळवून तसेच्या तसे महागडे सेट उभारले. एक पंचेचाळीस फुटी जहाजही उभारलं आणि बुडवलंही. चित्रिकरणाच्या वेळी अनेक अडचणींचे प्रसंग आले. सिनेमॅटोग्राफर रसेल कार्पेंटरनं सगळं जिद्दीनं निभावून नेलं; पण अनेक कलावंत आणि कर्मचारी कॅमेरॉनच्या जाचाला कंटाळून सोडून गेले. ‘जिम कॅमेरॉन हा हिटलर आहे हिटलर’ अशी टीका झाली. कारण, जहाजफुटीच्या दृश्‍यांचं चित्रण एका विशाल टाकीत होत असे. पाण्याचे लोंढेच्या लोंढे सोडावे लागत. जवळपास सगळाच क्रू कायम भिजलेल्या अवस्थेत असे. साहजिकच अनेकांना पडसं झालं. तापानं कर्मचारी फणफणले. दोन-चार अपघातही झाले; पण जिम कॅमेरॉन थांबायला तयार नव्हता. शेवटी भडकून केट विन्स्लेटनं जाहीर केलं की ‘मरेस्तोवर पैसा मिळाल्याशिवाय यापुढं या जिम्यासोबत काम नाही करणार मी!’’ कॅमेरॉन म्हणाला, ‘बये, तसा रोल आला तर नक्‍की तुला देईन मरेस्तोवर पैसा!!’

चित्रपटासाठी व्हीएफएक्‍सचं तंत्रज्ञानही खूप वापरण्यात आलं. अर्थात कॅमेरॉन त्यात निष्णात होता. ‘अबिस’, ‘टर्मिनेटर’सारखे लाजबाब चित्रपट त्यानं आधी दिले होते. अथक परिश्रम करून कॅमेरॉननं ही प्रेमगाथा सादर केली आहे.

कॅमेरॉनच्या तपशीलबाज कामगिरीच्या तोडीचं काम- खरं तर कांकणभर सरसच- केलं ते जेम्स हॉर्नरच्या अफलातून संगीतानं. या संगीताची मोहिनी पुढली शंभर वर्षं टिकेल. 

Every night in my dreams 
I see you, I feel you, 
That is how I know you go on 

Far across the distance 
And spaces between us 
You have come to show you go on
 

 ...सेलिन डायॉनच्या भावभीन्या सुरांनी सजलेले हे शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात, मनामनात पोचले. या शीर्षकगीतासाठी हॉर्नरनं जीव ओतला होता. आजही हे गाणं कुठंही कानावर पडलं की मन थबकतं. ऐकत राहतं. सुरांचा ओलावा किती जादूभरा असतो याचा हे गाणं म्हणजे मूर्तिमंत साक्षात्कार आहे. इंग्लिश न जाणणाऱ्या माणसालाही त्यातली प्रीती कळेल. या गीतात समुद्राची गाज मिसळली आहे. सेलिन डायॉनला पहिल्यांदा हे गाणं तितकंसं आवडलं नव्हतं; पण हॉर्नरसाठी तिनं ते म्हटलं. त्यानं पुढे इतिहास घडवला. अनेक विक्रम या गाण्यानं मोडले. त्याच्या कितीतरी आवृत्त्या निघाल्या. या गाण्यामुळे अनेक जोड्या जमल्याची उदाहरणं आहेत! 

पण जेम्स कॅमेरॉनला असली गाणी वापरून कुठलाही बाजारू प्रकार करायचाच नव्हता. अभिजात संगीताच्या काही बेजोड थीम्स त्यानं चित्रपटात वापरल्या होत्याच. ‘टायटॅनिक’साठी खास केलेल्या या रचना हीदेखील जगभरच्या अभिजात संगीत वाद्यवृंदांसाठी एक पर्वणी असते. इंटरनेटवर हे संगीत उपलब्ध आहे. 

‘माय हार्ट विल गो ऑन...’हे गाणं जेम्स हॉर्नरनं गुपचूप तयार केलं. विल जेनिंग्जला सोबत घेऊन लिहून घेतलं. एक दिवस मूड बघून कॅमेरॉनला ऐकवलं. सात-आठ वेळा ऐकल्यानंतर कॅमेरॉन मिटल्या डोळ्यांनीच म्हणाला : ‘शेवटी तू जिंकलास, जेम्स!’ हे गाणं पुढं चित्रपटाचं शीर्षगीत झालं.

‘टायटॅनिक’नं अनेक विक्रम मोडले हे तर आधी सांगितलंच. त्या वर्षीचे तब्बल दहा ऑस्कर पुरस्कार ‘टायटॅनिक’ घेऊन गेला. टायटॅनिकच्या अनेक किस्से-कहाण्या इंटरनेटवर वाचायला, पाहायला मिळतात. त्याही तितक्‍याच रंजक आहेत. त्यातली एक तर थक्‍क करणारी आहे. ‘टायटॅनिक’च्या दुर्घटनेत दगावलेल्यांच्या दफनभूमीतल्या स्मृतिपाषाणावर चक्‍क ‘जे. डॉसन’ असं नाव कोरलेलं आहे. हा जे. डॉसन मात्र टायटॅनिकमधला जॅक नव्हता. चित्रपट रिलीज झाल्यावर दफनभूमीकडं गर्दी व्हायला लागली. तेव्हा हा योगायोग आढळून आला.

कॅमेरॉननं टायटॅनिकला ‘प्रत्यक्षात घडलेली कादंबरी’ असं म्हटलेलं होतं. खरं तर ती ‘वास्तवात आलेली एक गझल’ मानली पाहिजे. अन्यथा, सन १९९७ मध्ये आलेल्या चित्रपटानं आणलेला तो भावसमुद्राचा कल्लोळ, जगजितच्या १९७८ मध्ये आलेल्या गझलेत आधीच कसा ओळखीचा झाला असता? भावबंधांचं काही सांगता येत नाही. कुठूनही कुठंही जुळतात. तुटतातही.

...या समुद्राला किनारा आहे, त्या समुद्राला किनारा नाही.
(उत्तरार्ध)

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.