मोडून गेल्या जुनाट वाटा...

आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लहान असताना आपलं कंडिशनिंग झालेलं असतं त्याचप्रमाणे आपण मोठे म्हणजे जाणते, जबाबदार आणि प्रौढ होत जातो.
to develop skills of children various games played conditioning
to develop skills of children various games played conditioningSakal
Updated on

आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लहान असताना आपलं कंडिशनिंग झालेलं असतं त्याचप्रमाणे आपण मोठे म्हणजे जाणते, जबाबदार आणि प्रौढ होत जातो. पुढे आपल्याला नात्यांची विविध लेबलं लागत राहतात आणि लहानपणी शिकवलेल्या व शिकलेल्या अनेक गोष्टींची री जशीच्या तशीच ओढली जाते.

- विशाखा विश्वनाथ

नुकताच फेसबुकवर एक व्हिडीओ पाहण्यात आला. मुलांचा कौशल्य विकास व्हावा, या दृष्टीने विविध खेळ खेळवले जातात, त्यातल्या कुठल्याशा खेळाचा तो व्हिडीओ होता. ज्यात समोर रांगेने पाण्याच्या बाटल्या किंवा चालताना अडथळा निर्माण होईल, अशी कुठली तरी वस्तू ठेवलेली होती.

ती कुठल्या पद्धतीने ठेवलेली आहे हे दाखवून एका मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधली व नंतर त्याला तिथून चालायला लावलं. हे एवढं पाहून झाल्यावर, ‘डोळ्यांवर पट्टी बांधलेली असताना, अडथळ्यांचा अंदाज घेत तो मुलगा किती सफाईदारपणे चालतो’ हे पाहायला मी फारच उत्सुक होते आणि तेवढ्यात त्या खेळात शिक्षकाने एक ट्विस्ट ॲड केला.

चालण्यासाठी निश्चित केलेल्या त्या वाटेवरचे सगळे अडथळे दूर करून टाकले. अर्थात हे ज्यांच्या डोळ्यावर पट्टी नव्हती त्या सगळ्यांनाच दिसू शकत होतं. डोळ्यावर पट्टी असलेला तो मुलगा मात्र समोर अडथळे आहेतच, असा समज करून सावध पावलं टाकत चालत होता आणि इतर विद्यार्थी त्याला मोठमोठ्याने हसत होते.

अर्थात या इतर विद्यार्थ्यांना तो मुलगा वेडा वाटत होता; तर या सावधपणे चालणाऱ्या मुलाला वाटत होतं की तो अडथळे पार करताना चुकतोय म्हणून सगळे त्याला हसताहेत. या एकूण हसण्याच्या आणि सावध पावलं टाकण्याच्या चढाओढीत तो व्हिडीओ संपला खरा; पण पाहताना अनेक विचारबीज माझ्या मनात पेरून गेला... गजलकार जयदीप जोशी यांचा फार आवडता आणि जवळचा वाटणारा, ‘नवा रस्ता निवडल्यावर असे होते... प्रशंसा व्हायच्या आधी हसे होते’ हा शेरदेखील अगदी तडक आठवला.

माणसं मोठी, प्रौढ, ज्येष्ठ होतात तेव्हा कित्येक वाटा तुडवतात; पण या वाटा तुडवत असताना प्रत्येक माणसावर संस्काराचा पगडा असतो. अगदी आजच्या भाषेत सांगायचं झालं तर लहान असताना आपलं कंडिशनिंग झालेलं असतं त्याचप्रमाणे आपण मोठे म्हणजे जाणते, जबाबदार आणि त्यानंतर प्रौढ, ज्येष्ठ होत जातो.

पुढे फक्त कुणाचा मुलगा आणि मुलगी असण्यापलीकडे आपल्याला भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, प्रियकर, प्रेयसी, नवरा, बायको, आई, वडील ते पार आजी-आजोबा अशी लेबलं लागत राहतात आणि लहानपणी शिकवलेल्या, शिकलेल्या अनेक गोष्टींची री जशीच्या तशीच ओढली जाते. उच्चशिक्षण घेण्यासाठी निवडायचं क्षेत्र, घरातलं वातावरण, सोयरीक जुळवण्याची पद्धत या सगळ्याच गोष्टींमध्ये कंडिशनिंग महत्त्वाची भूमिका बजावतं.

मध्यमवर्गीय पालक असतील, तर त्यांचं लहानपणी झालेलं सुबत्तेबाबतचं कंडिशनिंग हे सरकारी नोकरी, चार जोडी कपडे हे असतं. तेच घेऊन ते आपल्या मुलांना मोठं करतात आणि मुलं ही जशी मोठी होत जातात तसं आई-वडिलांनी दाखवलेल्या चौकटीपलीकडचं त्यांना काही वाटेत लागलं तर त्याला अडथळा समजून सावध पावलं टाकत राहतात.

रुळलेलं, मळलेलं, परंपरेने पूर्वापार आपल्यापर्यंत चालत आलेलं सगळं जसं पूर्ण टाकावू नसतं, तसंच जसंच्या तसं स्वीकारार्हही नसतं. त्यातला शिकवणीचा आणि संस्कारांचा पाया हलू न देता दरवेळी, आयुष्यातल्या नव्या मुक्कामावर पोहोचल्यावर नव्या गोष्टींची त्यात भर घालत राहायची असते.

आपल्या जुन्या धाटणीच्या विचारपद्धतीमुळे किंवा कंडिशनिंगमुळे आपण घाबरत घाबरत पावलं टाकतो, नव्या सगळ्यालाच अडचण, अडथळा समजतो... कदाचित वरकरणी अडथळा वाटणारी गोष्ट अडथळा नसतेसुद्धा. वर उल्लेख केलेल्या त्या व्हिडीओत मुलाच्या डोळ्यावर आहे तशीच पट्टी आपल्या ही डोळ्यावर असल्याने आपल्याला समोर अडथळे नसले, तरी ते आहेतच असं समजून सतत घाबरत पावलं टाकतो. त्यामुळे खरं तर दोन गोष्टी होतात...

पहिली म्हणजे, आपलं कंडिशनिंग कसं झालंय, हे ठाऊक नसणारी माणसं आपण बिचकत चालतोय म्हणून आपल्याला हसतात किंवा समोर अडथळाच आहे, असं समजून चालल्याने उत्तम संधी आपण गमावून बसतो. माणसाने सावध जरूर असावं व सावध आणि भित्रे असण्यातली पुसट सीमारेषा प्रत्येकाला जरूर ठाऊक असावी.

कित्येकदा हव्या हव्याशा वाटणाऱ्या माणसाकडे नेणारी वाटही अशीच असते. किंबहुना जे आपल्याला खुणावतं, बोलावतं त्या सगळ्याकडेच नेणारी वाट अशीच असते. परंपरा, संस्कार या सगळ्यांचा पगडा आपल्यावर इतका दांडगा असतो की समोर जे आहे ते आपलंच आहे, त्याला आपलं म्हणता येणार आहे; पण मी त्याला आपलं म्हटलो तर चार लोक हसतील किंवा काय म्हणतील, ही भीड बाळगून कधीच आपण सरसर दोन पावलं पुढे टाकत नाही.

कदाचित आपल्याला हसताना दिसणारे चार लोक हे मी वर उल्लेख केलेल्या व्हिडीओतल्या इतर विद्यार्थ्यांसारखेही असूच शकतात. ज्यांना वाटत असतं, अरे काय वेडा माणूस आहे हा... सगळं हाताशी तर आहे फक्त याने जरा धैर्य दाखवायला हवं. सगळं याचंच आहे.

वेडा कुठला, उगाच भितोय म्हणूनही हसू शकतात ही शक्यताच आपल्या लक्षात येत नाही....आणि खूपदा हे असंच असतं. मैदान आपलं असतं, नशिबाने आणि आपल्या कर्माने संधी आपल्या वाट्याला आलेली असते,

अशा वेळी ‘टेंपल रन’मध्ये कॉईन गोळा करत ट्रेनवरून धावणाऱ्या पोरासारखं नसेलही; पण रुबाबात, ऐटीत, स्वतःवर स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून पावलं टाकायची असतात आणि जुन्या वाटेला नवं वळणं देत, ‘मोडून गेल्या जुनाट वाटा...’ म्हणत व्हायचा तो बोभाटा होऊ द्यायचा असतो.

vishakhavishwanath11@gmail.com(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.