एकीकडं आयपीएलची धामधूम संपली होती. त्याच वेळी वेस्ट इंडीज-अमेरिकेतील ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी वातावरण तयार होत होतं पण या दरम्यान ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिन होऊन गेला आणि याचा क्रिकेटशी संबंध आला.
क्रिकेटवर अपार प्रेम करणाऱ्या, क्रिकेटपटूंना देवाचं स्थान देणाऱ्या आपल्याकडील या क्रिकेट भक्तांनी निश्चितच दखल घेतली नसेल, पण या या दिनानिमित्त सादर करण्यात आलेल्या एका अहवालातील माहिती थक्क करणारी... डोळे उघडणारी आणि पुढच्या पिढीसाठी धोक्याचा इशाराही देणारी आहे.
क्रिकेट हे आपल्या देशात सर्वाधिक विकलं जाणारं प्रॉडक्ट. मग द्विराष्ट्रीय सामने असोत, आयपीएल असो... विश्वकरंडक स्पर्धा असली तर लोकप्रियतेची कसदार ‘कीक’ लईच भारी ठरते.
सध्याचं हे युग मार्केटिंगवर सर्वाधिक आधारलेलं असताना ज्याची चर्चा जास्त तिथं आपलाही झेंडा रोवण्याची अहमहमिका असते. काही सेकंदाच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये मोजले जातात. शेवटी या जाहिरातींमुळंच प्रक्षेपण हक्कांची कोटींच्या कोटी उड्डाणे होत असतात हे खरं असलं, तरी कोणत्या जाहिराती दाखवल्या जातात हे महत्त्वाचं असते.
राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि संशोधन संस्थेनं ३१ मे या जागतिक तंबाखू विरोधीदिनी सादर केलेला अहवाल गंभीर दखल घेण्याजोगा आहे. गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा झाली.
कमालीची झेप घेणाऱ्या भारतीय संघाच्या हातून अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळं करंडक हिरावला पण या स्पर्धेच्या दरम्यान दाखवण्यात आलेल्या जाहिरातींमधील ४१ टक्के जाहिराती धूररहित तंबाखूच्या होत्या. राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि संशोधन संस्था अर्थात ICMR यांचा हा अहवाल होता.
आपल्या देशात २० कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात आणि ८० टक्के लोकांच्या निधनास तंबाखू हे कारण ठरले आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आलंय. डब्ल्यूएचओ (WHO) आणि भारताच्या सिगारेट व तंबाखू प्रतिबंधक कायद्यानुसार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाहिराती करणं हा गुन्हा आहे तरीही तंबाखूशी संबंधित कंपन्या चारशे कोटींपेक्षा जास्त रक्कम प्रतिवर्षी जाहिरातींसाठी खर्च करत असतात.
प्रत्यक्ष जाहिराती करता येत नसल्यामुळे वेलची किंवा पान मसाला यांच्या नावाखाली जाहिराती केल्या जातात पण त्यांचे मूळ प्रॉडक्ट हे तंबाखू किंवा सिगारेट हेच असते. या जाहिराती चित्रपटांतील सुपरस्टार आणि माजी दिग्गज क्रिकेटपटूंद्वारे केल्या जातात हे आक्षेपार्ह आहे.
ही सर्व पार्श्वभूमी सांगायचा मुद्दा एवढाच, की प्रत्येक जण त्यांनी तयार केलेल्या प्रॉडक्टची जाहिरात करू शकतो पण येथे क्रिकेट हा जो खेळ आपल्या देशात धर्म समजला जातो, सर्वस्व समजला जातो, त्या क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा अशा जाहिरातींचा भडिमार होतो तेव्हा मात्र गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होतात.
सुनील गावसकर आणि कपिलदेव यांच्यासारखे राष्ट्रीय आयकॉन अशा जाहिरातींमधून दिसतात, तेव्हा आपण नव्या पिढीसमोर कोणता आदर्श ठेवणार आहोत ? असा प्रश्न सामान्य क्रिकेटप्रेमींना पडणे स्वाभाविक आहे.
शेवटी पैसा कोणाला नकोय, तुमच्या लोकप्रियतेनुसार जाहिरातदार प्रस्ताव घेऊन येत असतात. पण कोणत्या जाहिराती स्वीकारायच्या हे तुमच्या हातात असते, शेवटी तुम्ही नव्या पिढीचे आदर्श आहात आणि त्याचा प्राधान्यक्रम जपणं महत्त्वाचे असते.
तंबाखूच्याच अप्रत्यक्ष जाहिरातीच कशाला पण ऑनलाइन गेमिंगचा उद्योगही गेल्या काही वर्षांपासून फोफावलेला आहे. पूर्वी एकदोन कंपन्या होत्या आता तर पेव फुटले आहे. प्रत्येक सामन्यावर ऑनलाइन गेमिंग केले जाते. लाखो-करोडोंची उलाढाल होत असते. तेथे खेळणाराही मालामाल आणि कोण किती धावा करणार, विकेट घेणार याचा अचूक अंदाज बांधत पैसे लावणाराही मालामाल या मार्गाने क्रिकेटच्या लोकप्रियतेचा फायदा घेणे योग्य नाही.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन ही सर्वांत मोठी, प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकणारा पुल्लेला गोपीचंद हा आपला खेळाडू, आता तो राष्ट्रीय प्रशिक्षक आहे. बॅडमिंटन खेळात आता आपल्याकडे सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, सात्त्विक साईराज-चिराग शेट्टी, एच. एस. प्रणोयसारखे विश्वविख्यात खेळाडू आहेत पण त्या काळी गोपीचंद हा तसा एकमेव चेहरा होता.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर त्याच्याकडे शीतपेयाची एक कंपनी जाहिरातीसाठी करार करण्यास गेली. पण शीतपेय हे आरोग्यासाठी हानीकारक आहे त्यामुळे मी त्याची जाहीरात करणार नाही, असे सांगत त्याने चालून आलेली लक्ष्मी नाकारली होती. मुळात त्या काळी बॅटमिंटनपटूला जाहिरात मिळणे हेच मोठे होते.
बरं गोपीचंद काही श्रीमंत आणि गडगंज संपत्ती असलेला खेळाडू नव्हता. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्याला अकादमीसाठी जागा दिली, तरी त्यावर अकादमी उभारण्यासाठी गोपीचंदला कर्ज काढावे लागले होते, पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले होते. त्याने ठरवले असते तर ती जाहिरात करून त्याने पैसे मिळवले असते परंतु समाजहिताला सर्वाधिक प्राधान्य देणारा गोपीचंद खराखुरा आदर्श खेळाडू ठरतो.
आपल्या देशात असो वा परदेशात असो भारतीय क्रिकेटचे सामने हे वर्षभर सुरू असतात. आयपीएल दरवर्षी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वकरंडक आलटून पालटून होत असतात त्यामुळे अशा जाहिराती होत राहणार मात्र आपण क्रिकेटप्रेमी म्हणून अशा जाहिरातींकडे पूर्णतः दुर्लक्ष करणे हेच आपल्या हाती आहे. पाहू या किती जण हा मार्ग अवलंबतात...
आयुष्यात कधीही तंबाखूच्या जाहिराती करू नकोस असा साधा सोपा आणि महत्त्वाचा सल्ला मला माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाल्यावर वडिलांनी दिला होता. मी त्या प्रमाणे वागलो तुम्हीही तसेच करू शकता, चांगल्या भविष्यासाठी तंबाखूपेक्षा आपण उत्तम आरोग्य जगू या.
- सचिन तेंडुलकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.