‘राजा’ नको का कुणाला?

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर युनायटेड किंगडमच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी त्यांचे चिरंजीव राजे चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक सोहळा
Today coronation of King Charles III long-suffering monarch to succeed Queen Elizabeth II throne of United Kingdom
Today coronation of King Charles III long-suffering monarch to succeed Queen Elizabeth II throne of United Kingdomsakal
Updated on
Summary

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर युनायटेड किंगडमच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी त्यांचे चिरंजीव राजे चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक सोहळा

- मालिनी नायर

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर युनायटेड किंगडमच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी त्यांचे चिरंजीव राजे चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक सोहळा आज (६ मे) होत आहे. अनेक मान्यवर, प्रसिद्ध व्यक्ती आणि जागतिक नेत्यांनी समारंभाचे निमंत्रण नाकारले आहे. एवढेच नाही तर खुद्द ब्रिटिश जनतेलाही राजे चार्ल्स किंवा त्यांच्या या समारंभाविषयी विशेष आस्था दिसत नाही. लंडनमध्ये राजेशाहीविरोधी गट अनेक दिवसांपासून राज्याभिषेकाला विरोध करत आहेत. हे सर्व आश्चर्यकारक आहे.

राजेशाहीची संस्था जगभरातील अनेक समाजांचे अविभाज्य अंग आहे. राजेशाही ही अशी शासन पद्ध ती असते ज्यात राजा किंवा राणी ही एकच व्यक्ती शासक असते. तिलाच सर्वाधिकार असतात आणि ही सत्ता वंशपरंपरागत पद्धतीने एकाच कुटुंबात हस्तांतरित होते.

आपण इतिहासात पाहिले तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था घडवण्यात या सम्राटांचा महत्त्वाचा वाटा असतो. २०२१ पर्यंत २८ देशांमध्ये राजेशाही होती. यात युनायटेड किंगडम, स्पेन, जपान, थायलंड, नेदरलँड, नॉर्वे,

स्विडन, डेन्मार्क, बेल्जियम, मोरॉक्को, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कतार, कुवेत, स्वित्झर्लंड, भुतान, तोंगा, लेसोथो, समोआ, पपुआ न्यू गिनी, सोलोमन आयलँड, तुवालू, सेंट किट्स आणि नेव्हिस, अँटिग्वा आणि बारबुडा, ग्रेनाडा आणि सेंट लुसिया यांचा समावेश आहे.

ब्रिटिश राजेशाहीला फार दीर्घ आणि सुप्रसिद्ध इतिहास आहे. या राजेशाहीने ब्रिटिश संस्कृती, राजकारण, अर्थव्यवस्था आणि युनायटेड किंगडमच्या समाजाला आकार देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

राणी एलिझाबेथ द्वितीय या १९५२ मध्ये सिंहासनाधिष्ठित झाल्या. त्यांची कारकीर्द सात दशकांपर्यंत चालली. आपल्या कारकिर्दीत राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी युनायटेड किंगडममध्ये अनेक बदल होताना पाहिले. ब्रिटिश साम्राज्याचा अस्त, तंत्रज्ञान युगाचे आगमन, बहुसांस्कृतिकतेचा उदय, कोविडसारखे संकट या सर्व गोष्टींच्या त्या साक्षीदार राहिल्या.

राजे चार्ल्स हे अद्याप सिंहासनावर बसायचे आहेत, पण त्याआधीच त्यांची कारकीर्द ही वादविवादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राजे चार्ल्स हे ब्रिटिश साम्राज्याचे मागच्या तीनशे वर्षातील सर्वात वयोवृद्ध राजे ठरतील. ते स्पष्टपणे पर्यावरणवादी भूमिका घेतात. आपल्या सत्तेचा वापर हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

राजेशाहीची लोकप्रियता कमी होणे हे केवळ युनायटेड किंगडमपुरते मर्यादित नाही. अनेक देशांमध्ये राजेशाहीबद्दल लोकांचा बदललेला दृष्टिकोन दिसून येतो. ही लोकप्रियता घटण्याचे कारण काय आहे हे पाहू या. राजेशाहीमुळे होणारे आर्थिक परिणाम हा या व्यवस्थेवर होणाऱ्या टीकेतील महत्त्वाचा मुद्दा आहे.

विशेषतः युनायटेड किंगडममधील राजेशाही व्यवस्था जपून ठेवणे हे अतिशय महागडे आहे. ब्रिटिश राजघराण्यावर होणारा खर्च हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. २०२१ मधील आकडेवारीनुसार राजघराण्यावर प्रतिवर्षी ३४५ दशलक्ष युरो इतका खर्च केला जातो.

हे पैसे अर्थातच करदात्यांचे असतात. या खर्चामुळे युनायटेड किंगडमच्या अर्थव्यवस्थेवर मोठा बोझा पडतो. देशात गरिबी, बेघरपणा आणि बेरोजगारीसारख्या समस्या महत्त्वाच्या असताना राजघराण्याच्या जीवनशैलीवर पैसे खर्च करण्याची गरज नाही, अशी अनेक करदात्यांची भावना आहे. सध्या तर युनायटेड किंगडम हे आर्थिक संकटाला तोंड देत आहे.

महागाई आणि एकूणच जीवनशैलीचा वाढता खर्च याचे ओझे वाढत असताना हा विचार आणखीनच महत्त्वाचा ठरतो. आणखी एक टीकेचा मुद्दा म्हणजे राजघराणे समाजापासून तुटलेले आहे. राजघराणे हे सामान्य नागरिकांच्या वास्तव जीवनापासून कोसो दूर आहे.

ते समृद्ध जीवनशैलीचा आनंद उपभोगतात आणि त्यांच्या विशेषाधिकारांमुळे ते समाजापासून वेगळे ठरतात. राजघराण्याला लोकांची नाडी समजत नाही. आपल्या समृद्ध जीवनशैलीसाठी जी जनता पैसे मोजते, त्यांच्याविषयी राजघराण्याला काडीमात्र पर्वा नाही, असे अनेकांना वाटते.

राजेशाही ही एक कालबाह्य संस्था आहे. आधुनिक जगात ज्यांना काही जागाच नाही अशा परंपरा धरून ठेवणारी अशी ही संस्था आहे. या संस्थेची आजच्या काळातील प्रासंगिकता फारच थोडी किंवा काहीच नाही. असा अनेक लोकांचा दृष्टिकोन असल्यामुळे राजेशाहीचे जनमानसातील आकर्षण लोप पावत आहे.

अनेकानेक लोक उदारमतवादी आणि आधुनिक होत आहेत. समता आणि मानवता यांना मूल्यव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळू लागले आहे. राजेशाही ही एक जुनी परंपरा आहे, जिला धर्मात महत्त्वाचे स्थान आहे.

ज्यात लोकांनी राजघराण्याला सर्वोच्च स्थानी मान्यता द्यावी, अशी अपेक्षा केली जाते. या प्रकारच्या पारंपरिक मान्यता अनेक समाजाच्या धर्मनिरपेक्ष चरित्राशी जुळत नाहीत. नपेक्षा राजेशाही ही या समाजापासून पूर्णतः वेगळी पडते.

ब्रिटिश राजेशाहीने अनेक शतकांपासून जगभरातील लोकांना आकर्षित केले आहे. तथापि, बदलत्या मूल्यव्यवस्थेमुळे राजेशाहीविषयीचे आकर्षण फिके पडू लागले आहे. सांप्रत काळात राजेशाहीचे महत्त्व आणि तिच्याविषयीचा समज यात बदल घडून आला आहे.

आपण जर राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्यरोहण सोहळ्यावेळी असलेल्या उत्साहाची तुलना राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाशी केली तर हा बदल आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून राजकुमार चार्ल्स कसे काम करतील, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

तथापि त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याविषयी दिसणारा निरुत्साह हे दर्शवतो की ब्रिटिश राजघराणे हे आता पूर्वीसारखे सत्तेचे केंद्र राहिले नाही. तरुण पिढीचा राजेशाहीविषयीचा दृष्टिकोन बदलत आहे. नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ब्रिटनमधील १६ ते २४ वयोगटातील केवळ ३७ टक्के तरुण हे राजेशाहीच्या बाजूने आहेत.

त्याउलट ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ६४ टक्के व्यक्ती या राजेशाहीच्या बाजूने आहेत. यासह मार्च महिन्याच्या शेवटी रिपब्लिक ग्रुपच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणात आपण राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाबद्दल फारसे उत्सुक नसल्याचे ५२ टक्के लोकांनी म्हटले आहे.

सर एल्टन जॉन आणि एड शीरन यांसारख्या ख्यातनाम सेलिब्रिटींनी राज्याभिषेक समारंभात सादरीकरण करण्यास नकार दिला आहे. या समारंभाला उपस्थित राहण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नकार दिला आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी तिथे उपस्थित राहतील. यावरून ब्रिटिश समाजाच्या या पारंपरिक संस्थेबद्दलचा मोहभंग आणि दृष्टिकोन आपणास दिसून येईल.

आधुनिक, बहुसांस्कृतिक समाजात राजेशाहीच्या भूमिकेविषयी चिंता वाढत आहे. ब्रिटनमधील वैविध्यपूर्ण समाजाशी संपर्क नसणे आणि त्यांचे प्रतिनिधित्व करण्यात अपयशी ठरल्याबद्दल राजेशाहीवरील टीका वाढत आहे.

लोकांचे मत बनवण्यात प्रसारमाध्यमांची वाढती भूमिकाही लोकांच्या या दृष्टिकोनामागील एक कारण आहे. माध्यमे अथकपणे राजघराण्याचे चित्रीकरण करतात, पण याचा दुहेरी परिणाम होतो. यामुळे राजेशाहीची अधिक समीक्षा होऊ लागली आहे.

यामुळे या संस्थेबद्दल एक प्रकारची नकारात्मकता वाढीस लागली आहे. अनेक गैरव्यवहारांच्या केंद्रस्थानी राजघराणे असल्यामुळे ही भावना वाढत आहे. राजकुमार हॅरी यांच्या नुकत्याच आलेल्या पुस्तकाने राजघराण्यातील गोंधळावर चांगलाच प्रकाश टाकला आहे. आणि राजकुमार विल्यम्सचे बेकायदेशीर प्रकरण कसे विसरता येईल?

राजवाड्यातील कौटुंबिक मूल्यांची रचना किती मोडकळीस आलेली आहे हे यामुळे लोकांना समजले. कोणत्याही नैतिक मार्गदर्शनासाठी राजघराण्याकडे आता पाहिले जाऊ शकत नाही. त्यामुळे या सिंहासनावर बसणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांना आधीसारखे प्रेम आणि आदर उरला नाही. राजेशाहीने तिला इतके मोहक बनवणारी तिची आभा गमावली आहे.

याशिवाय ब्रिटिश समाजाचे बदलते स्वरूप, बदलती मूल्ये आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाचाही तो परिणाम आहे. सरतेशेवटी काय की आधुनिक, लोकशाहीवादी समाजाच्या उद्दिष्टांच्या दृष्टिकोनातून राजेशाही विजोड ठरते.

राज्याचा प्रमुख म्हणून राजाची पारंपरिक भूमिका अनावश्यक समजली जाऊ लागली आहे. राजेशाही पूर्णपणे रद्द करण्याची मागणी वाढत आहे. हे केव्हाही घडण्याची शक्यता आहे. तूर्तास तरी ब्रिटिश राजेशाही २१ व्या शतकात आपली प्रासंगिकता शोधण्यासाठी धडपडत आहे.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी अनेक वर्षांपासून लोकांमध्ये राहत जनता आणि जगभरातील लोकांमध्ये स्वीकारार्हता मिळवली होती. अभूतपूर्व सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देश त्यांच्याकडे एक निर्णायक व्यक्ती म्हणून पाहत होता.

यादृष्टीने राजाकडे जे कर्तृत्व हवे असते ते त्यांनी प्राप्त केले होते असे म्हणावे लागेल. अर्थात राजे चार्ल्स तृतीय यांच्याकडे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व, दृष्टिकोन आणि शैली आहे. ज्याच्या आधारे ते आपली कारकीर्द घडवतील.

इतिहास घडवण्यात राजेशाहीने महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी तिची लोकप्रियता सद्यकाळात लोप पावत आहे. हे जगभरातच घडत आहे. ब्रिटन त्याला अपवाद नाही. राजघराण्यांच्या जीवनशैलीवरील खर्च, समाजापासून संपर्क तुटणे आणि कालबाह्य परंपरा अशी अनेक कारणे यासाठी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.