कोरोनाच्या समुद्रमंथनातून एकीकडे मजुरांचे होणारे हाल, त्यांचे मृत्यू यासारखे हलाहल बाहेर येत असताना यातून निश्चितपणे अमृतदेखील बाहेर पडेल अशी स्थिती आहे. पण, त्याकरिता या संकटाच्या पलीकडे आपल्याला पूर्वसुरींच्या विचार परिप्रेक्षात बघावे लागेल. मी या ठिकाणी महात्मा गांधींचा आवर्जून उल्लेख करतो आहे, कारण पुन्हा एकदा गांधी विचार तपासण्याची आणि त्यांनी दिलेल्या दिशेने जाण्याची संधी कोविड-19 ने आपल्याला दिली आहे. आपण आज अशा अवस्थेत आहोत ज्याला शून्य अवस्था म्हणता येईल. स्वातंत्र्यापूर्वी देशाला कोणत्या दिशेने जावे लागेल याबद्दलची गांधींची मते सर्वज्ञात आहे. एक प्रसंग सांगितला जातो. स्वातंत्र्यानंतर एका पत्रकार परिषदेत गांधीजींना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, स्वातंत्र्य मिळाले आहे तर आता आपला लढा आता कोणाविरुद्ध असेल? यावर उत्तर देताना गांधींनी बाजूला बसलेले जमनालाल बजाज यांच्याकडे बोट दाखवले. याचा अर्थ असा होता की भांडवलदारांच्या विरुद्ध आम्हाला लढावे लागेल हे गांधींना सूचित करायचे होते. फेब्रुवारी 1932 मध्ये चार्ल्स पेत्राश या ब्रिटिश पत्रकाराने गांधींची मुलाखत घेतली. त्यात त्याने गांधींना विचारले होते, तुमच्या देशातील संस्थानिक, भांडवलदार, राजे महाराजे आणि उद्योगपती यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती कशी मिळवली असे आपल्याला वाटते? गांधीजींनी क्षणाचा विलंब न लावता उत्तर दिले, सामान्य माणसाचे प्रचंड शोषण करून.
भांडवलदारांविरुद्ध बापू का लढायचे म्हणताय? कारण स्पष्ट आहे. भांडवलवादाचे अंतिम ध्येय हे नफाखोरी आहे. (काही सन्मान्य अपवाद) नफाखोरीतून समाजात वाढत जाणारा आर्थिक असमतोल त्यांना नको होता; किंबहुना तेच गांधी आणि नेहरू यांच्यातील मतभेदाचे कारण होते. ब्रिटिशांच्या पूर्वी भारताची अर्थव्यवस्था साचेबद्ध असली तरी प्रत्येक हाताला काम देणारी होती. ग्रामीण व्यवस्था स्वयंपूर्ण होती. उत्पादनाचा आपला जागतिक वाटा 23% च्या आसपास होता. हे अमेरिकन अर्थतज्ज्ञ मॅडिसनने सिद्ध केलंय. एक लक्षात घेतले पाहिजे की बापूंना पश्चिमेच्या प्रकाशातला विकास नको होता. नेहरूंच्या विकासाच्या केंद्रस्थानी व्यक्ती होती (Atomized Individual) तर गांधीच्या केंद्रस्थानी समूह (community). याचा अर्थ नेहरू चुकले असा होत नाही. तत्कालीन परिस्थितीत त्यांना ते योग्य वाटले. संविधानसभेच्या अंतिम पर्वात यावर जोरदार चर्चा झाली आणि पर्यायाने गांधीचे विकासाचे मॉडेल नाकारले गेले. गांधीजींची मानसकन्या मीराबेन (Madeleine Slade) यांनी बापूंच्याच आदेशाने उत्तराखंड येथे बापूग्राम आणि पशुलोक या समूह गावांची स्थापना केली. अनेक कुटुंबांना एकत्र आणून तिथे वसवले गेले. समूह शेतीचा प्रयोग करण्यात आला. भारताच्या पायाभरणीची सुरुवात ग्राम जीवनापासून झाली पाहिजे हे बापूंचे म्हणणे होते. त्यांच्या स्वयंपूर्ण गावाच्या कल्पनेत स्वदेशीचा अंतर्भाव आहे. मद्रास येथे 14 फेब्रुवारी 1916 ला मिशनरी संमेलनात दिलेल्या भाषणात त्यांनी स्पष्ट केलंय की माझ्या आजूबाजूला जे तयार होतं त्याचा आधी वापर करावा. आपल्या गरजा त्यानंतर पंचक्रोशीत आणि नंतर देशांतर्गत उत्पादनातून भागविता येतील. आपली गरज पूर्ण होण्याकरिता विदेशातून आयात करावी लागत असेल तर आपण स्वयंपूर्ण कसे होणार? ते पुढे असेही म्हणाले आहे की Nature can fulfill everyone's need not Greed.
उपभोक्तावादातून होणारे पर्यावरणाचे शोषण त्यांना माहीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा बापूंच्या विचाराने काही व्यवस्थात्मक बदल करण्याची संधी आपल्याला आहे. पुन्हा एकदा ग्रामजीवन स्वयंपूर्ण आणि समृद्ध कसे होईल याकडे लक्ष द्यावे लागेल. मागील निवडणुकीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आम्ही फिरत असताना प्रत्येक गावातील शेतकऱ्याची पांदण रस्ते द्या एकमुखी मागणी होती. आज सत्तर टक्के शेतकरी वर्गाला त्यांचा माल बांधापासून रस्त्यापर्यंत आणणे कठीण आहे. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांत आपण ग्रामीण भारताला किमान पायाभूत सोयी तरी दिल्या काय? चोवीस तास वीज नाही. शेवटच्या गावात वीज पोहोचायला 2020 उजाडले. फळे आणि फुलांची शेती करणाऱ्याला त्याच्या शेताजवळ कोल्ड स्टोरेज असावे हे किती वर्षांपासून आपण ऐकतोय. मग बापू काय वेगळं मागत होते? शहरे फुगत गेली आणि गावे भकास झाली. शहरी माणसांसाठी मेट्रो तर ग्रामीण भागासाठी साधी बैलगाडीदेखील नाही. साठ टक्के भारत जेथे राहतो त्याची आम्ही उपेक्षाच केली कारण त्याला राजकीय आवाज नाही एवढेच.
उद्योग हे केंद्रस्थानी असतील आणि असलेच पाहिजे. पण, त्यांचे विकेंद्रीकरण ही आपली गरज असेल. सारे उद्योग पुणे, मुंबईच्या आसपास एकवटल्याचे परिणाम आपण बघतो आहोतच. बापूंचा गाव हा सर्व सोयींनी युक्त असा होता. आपण पुन्हा ते साधू शकलो तर खेड्यातून शहराकडे जाणारे लोंढे आणि त्यांचे दुर्दैवी स्थलांतरदेखील भविष्यात टळेल. मध्यम आणि लघु उद्योगांना बळ आणि ग्रामीण भागात सेवाक्षेत्राचा विस्तार आपल्याला प्रगतीकडे नेईल हे निश्चित. बापूंच्या मार्गाने जाण्याची ही आपल्याला शेवटची संधी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.