अटलांटा शहराची मनसोक्त भटकंती

अटलांटा शहर बऱ्यापैकी मोठं आहे; पण त्याची लोकसंख्या आहे अवघी सहा लाख. जगातील सहावं मोठं एक्वेरियम तिथे आहे. अटलांटाला तुम्ही कधी भेट दिली तर तिथला डॉल्फिन शो बघायला विसरू नका.
travel tourism through city of atlanta
travel tourism through city of atlantaSakal
Updated on

- विशाखा बाग

जागतिक महासत्तेचं केंद्र आणि त्याचबरोबर जगातील सर्वांनाच ज्या देशाचं आकर्षण आहे तो म्हणजे, अमेरिका. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेला जाण्याचा योग पुन्हा एकदा जुळून आला. आधी न्यूयॉर्क शहराला कामानिमित्त भेट दिली आणि त्यानंतर माझ्या शाळेतील मैत्रिणीकडे अटलांटा शहरात आठ दिवस मी मुक्कामालाच होते.

एक तर खूप वर्षांनी मैत्रीण भेटल्यामुळे आठ दिवससुद्धा गप्पा मारायला कमी पडले आणि अनेक वर्षांपूर्वीच्या शाळेच्या आठवणीही जाग्या झाल्या. मैत्रीण भेटल्यामुळे अर्थातच मनाला गारवा मिळाला होता, परंतु जून ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये अमेरिकेत प्रचंड उन्हाळा असतो. त्या उन्हाचा त्रास मलासुद्धा झाला. त्या महिन्यांमध्ये अमेरिकेत तापमान ४० अंशांपर्यंत जातं. अमेरिकेतला उकाडा आणि उष्ण हवामान या महिन्यांमध्ये सहन होत नाही, हे मात्र शंभर टक्के खरं.

संपूर्ण अमेरिका देशातच तसं म्हटलं तर सार्वजनिक वाहतूक ही विमान आणि रस्त्यांवरूनच होत असते. आपल्याकडे आणि युरोपमध्येसुद्धा ज्या प्रमाणात रेल्वेचं जाळं सोयीस्कररीत्या संपूर्णपणे पसरलेले आहे तसं अमेरिकेमध्ये मात्र नक्कीच नाही. अमेरिकेत रस्ते वाहतुकीवर सर्वात जास्त भर देण्यात आलेला आहे. प्रचंड मोठे, रुंद आणि उत्कृष्टरीत्या बांधलेले मोटर वेज आणि हाय वेज यांचं जाळं संपूर्ण अमेरिकाभर आहे.

मी मात्र न्यूयॉर्कमधून अटलांटाला विमानानेच गेले. अटलांटाच्या टूरमध्ये एक खूपच आनंदाची गोष्ट अशी होती, की अटलांटाला आल्यापासून ते पुन्हा विमानतळापर्यंत संपूर्ण आठ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरवण्याची जबाबदारी माझ्या मैत्रिणीने आणि तिच्या यजमानांनी घेतली होती.

अर्थात एक दिवस तिथल्या मेट्रोने मी अटलांटा शहरात फिरले; परंतु शहरातील बस सेवा मात्र मला अजिबातच आवडली नाही. लंडनमध्ये बरेच दिवस राहत असल्यामुळे तेथील अतिशय सुयोग्य सार्वजनिक वाहतूक सेवेची सवय झाल्याने अटलांटा आणि न्यूयॉर्कमधील सार्वजनिक वाहतूक सेवेतील उणिवा बऱ्यापैकी जाणवल्या.

अटलांटामध्ये कुठेही बस स्टॉपला व्यवस्थित नाव नाही. कोणत्या बस तिथे थांबतात त्याबद्दलची माहिती नाही. बस कुठून कुठे जाणार आहे याबद्दलचा नकाशासुद्धा नाही. वेळेवरच बस येतील, याची शाश्वतीही नाही. संपूर्ण अमेरिकेत खासगी वाहनांना आणि कारला महत्त्व देण्यात आलेले आहे.

जॉर्जिया राज्याची राजधानी असलेलं अटलांटा शहर तसं बऱ्यापैकी मोठं आहे. शहराची लोकसंख्या साधारण सहा लाख आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं आणि जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटी तिथे असल्यामुळे शहराला बऱ्यापैकी महत्त्व आलेले आहे. ‘वर्ल्ड ऑफ कोकाकोला’ हे पर्यटकांबरोबरच शहरातील सर्वांचं आवडीचं ठिकाण.

येथील म्युझियम तर बघायचे होतेच; परंतु संपूर्ण जगातील वेगवेगळ्या चवींचे कोकाकोला इथे आपल्याला चाखायला मिळतात आणि तसं करण्याची सर्वात जास्त इच्छा अर्थातच मलासुद्धा होती. ऑनलाईन तिकीट आधीच काढल्यामुळे ठरलेल्या वेळेत तिथे पोहोचले.

२० एकर एवढ्या प्रचंड मोठ्या जागेत ‘कोकाकोला’चं म्युझियम पसरलेलं आहे. या ठिकाणी अगदी कोकाकोला तयार करण्याची सुरुवात कशी झाली, कुणी केली, त्याचा फॉर्म्युला काय, पूर्वी कोणत्या पद्धती होत्या अशा संपूर्ण इतिहासाबरोबर इथे एक छोटंसं थिएटर, मुलांसाठी वेगवेगळे ऑडिओ-व्हिडीओ शो असं बरंच काही तिथे बघायला मिळतं.

संपूर्ण म्युझियम शांततेत बघणं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण अशा दालनात येतो जिथे अनेक देशांमधील ‘कोकाकोला’चे वेगवेगळे ब्रँड्स आपल्याला चाखायला मिळतात. इथे पुन्हा एकदा आपल्याला तिकीट दाखवावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तितक्या वेळा हव्या तितक्या प्रकारचे कोकाकोला आणि इतर पेयं प्यायला मिळतात.

असं असलं तरीही सहा-सात प्रकारच्या कोकाकोलानंतर आपण जास्त काहीही पिऊ शकत नाही. त्याच परिसरात बाजूला जॉर्जिया एक्वेरियम आहे. जगातील सहावं मोठं एक्वेरियम म्हणून ते ओळखलं जातं. या म्युझियममध्ये सात वेगवेगळ्या प्रकारच्या गॅलरीज आहेत ज्यामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि जलचर बघायला मिळतात.

या एक्वेरियममध्ये एकूण ४२ हजार क्युबिक मीटर पाणी साठवलेलं आहे. डॉल्फिन शो हे इथलं एक महत्त्वाचं आकर्षण आहे. त्याचबरोबर व्हेल शार्क, बेलुगा व्हेल, कॅलिफोर्निया सी लायन आणि टायगर शार्क अशा प्रकारचे वेगळे मासेसुद्धा बघायला मिळतात. अटलांटाला तुम्ही कधी भेट दिली तर येथील डॉल्फिन शो बघायला विसरू नका.

अटलांटा शहराजवळच भव्य स्वामिनारायण मंदिरसुद्धा बांधलेलं आहे. या ठिकाणीसुद्धा मी भेट दिली. प्रचंड मोठ्या आवारात पसरलेलं हे मंदिर नक्कीच बघण्यासारखं आहे. याशिवाय येथील दुकानात भारतीय खाद्यपदार्थ, पूजा साहित्य आणि पुस्तकही मिळतात. इथेच भारतीय पद्धतीचा कॅफेटेरियासुद्धा उपलब्ध आहे.

त्यानंतर एक दिवस आम्ही जवळच फक्त पर्यटनाचं केंद्र म्हणून वसवल्या गेलेल्या बवेरियन स्टाईलच्या ‘हेलेन’ या गावाला भेट देण्यासाठी गेलो. गाव अतिशय आकर्षक आहे. पर्यटनाचं केंद्र म्हणूनच ते विकसित करण्यात आलेलं आहे. गावाची लोकसंख्या फक्त साडेपाचशे आहे. चित्ताहुची नदीच्या काठावर वसलेले हे गाव युरोपियन स्टाईल किंवा जर्मन पद्धतीच्या लाकडी घरांसाठी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं.

या गावात काचेपासून तयार होणाऱ्या अनेक सुंदर-सुबक सुशोभीकरणाच्या वस्तू आणि दागदागिने तयारही केले जातात अन् विकलेसुद्धा जातात. गावातूनच नदी वाहते. या नदीत वेगवेगळ्या खेळांचा अनुभवसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आम्ही गेलो होतो तेव्हा नदीच्या पाण्यात मोठे मोठे प्लास्टिकचे टब टाकून त्यामध्ये बसून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्याचा आनंद अनेक पर्यटक घेत होते. नदीचे पाणी अतिशय स्वच्छ होतं. नदी फारशी खोल नसल्यामुळे या खेळाचा आनंदसुद्धा घेता येत होता.

gauribag7@gmail.com (लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com