गुंता सोडवायची क्लृप्ती

आपल्या नात्यात कधी ना कधी गुंता होतोच. तो कसा सोडवावा कळतच नाही. नीट करायला जावं तर शेवटचं टोक सापडतच नाही.
trick to untangle
trick to untanglesakal
Updated on

- विशाखा विश्वनाथ

आपल्या नात्यात कधी ना कधी गुंता होतोच. तो कसा सोडवावा कळतच नाही. नीट करायला जावं तर शेवटचं टोक सापडतच नाही. गुंता सोडवण्याच्या प्रत्येकाच्या खास क्लृप्त्या असतात. त्या आपल्या आपणच शोधायच्या असतात. आपल्या बालपणातल्या आठवणीत त्या सापडण्याची शक्यता अधिक असते.

इयर फोन्सचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत; तरीही वायर असलेले टिपिकल इयर फोन्स वापरणं सगळ्यात जास्त सोयीचं वाटतं. चार्जिंगचं टेन्शन नाही की इयर पॉड कानातून पडतील, अशी सतत वाटत राहणारी भीती नाही. हेड फोन्सचं असलेलं डोक्यावरचं ओझं पेलणंही नाही. वायर तुटण्याची रिस्क मात्र आहे. सोबतच वायरचा झालेला गुंता सोडवण्याची आयती टाईमपास करण्याची संधीही आहे आणि मला ते आवडतं.

म्हणूनच कदाचित आजवरच्या दहा-बारा इयर फोन्समधले जवळपास सगळेच वायरचे आहेत. आता वापरत असलेलेही त्याच प्रकारातले. परवा ऑफिसमध्ये असंच एडिट करता करता अचानक इयर फोन काढले आणि हातात घेतले... का कुणास ठाऊक; पण हाताच्या शेवया करतात त्या संपूर्ण प्रक्रियेची आठवण आली. एका कॉर्पोरेट ऑफिसमधून मी थेट माझ्या मामाच्या घरात पोहोचले...

पुढच्या खोलीत निळ्या नक्षीदार जाळ्या, अडचण वाटावा असा अडनिड्या ठिकाणी असलेला खांब, त्याला लागून असलेला लोखंडी पलंग, साखळदंडाचा झोका, ढेप आणि चुणीच्या गोण्या, एक रुपयाचं-दोन रुपयाचं दूध घ्यायला येत राहणारी माणसं-मुलं आणि वाजवीपेक्षा जरा जास्त असणाऱ्या माशा, असं झरझर सगळं दिसूच लागलं समोर.

त्यात उन्हाळ्यातल्या दुपारी करायचा वाळवणाचा कार्यक्रम, लग्नसराई असेल तर बस्ता पाहायला जाणं... बाप रे बाप, किती नी काय काय आठवत राहिलं. त्या वाळवणाच्या कार्यक्रमात शेवया करणं एकदम खास असायचं. कारण शुभ्र दिसणारे कणकेचे गोळे ते तारेइतक्या बारीक शेवया, असा बदल पाहणं-अनुभवणं, तो घडवणाऱ्या बायका तासन् तास पाहणं वगैरे फार भारी होतं.

हाताच्या पंजावर-बोटावर लीलया कणिक खेळवणाऱ्या बायका आणि त्यांच्या बोटांची लयबद्ध हालचाल पाहणं कुठल्याही नर्तिकेने हस्तमुद्रा मोठ्या खुबीने करून गाण्यातली गोष्ट चित्ररूपात उभी करण्यासारखं वाटायचं... गाण्यातल्या जागा जशा बारीक बारीक असतात आणि त्या गाताना गायिका ज्या खुबीने दाखवते, ताना, मुरक्या अन् हरकती घेते अगदी त्याच खुबीने त्या बायका शेवया बनवायच्या.

तुपाचा हात लावून ताटात शेवई लांबवत लांबवत जाणं, ती सुकू नये आणि बसू नये म्हणून काळजी घेणं आणि विशेष म्हणजे ती पुरेशी लांब झाल्यावर हातावर घेता येईल अशा हिशेबाने तिचं दुसरं टोक दिसेल असं वेगळ्या बाजूला नेऊन सोडणं यात कसब होतंच; पण अशा नाजूक चार-पाच शेवया हातावर घेणं आणि त्या लांबवणं मोठ्या हुशारीचं काम होतं, असं मला आजही वाटतं. ते एक टोक सापडणं, अशा पाच शेवया एकत्र हातावर घेण्यासाठी लागणारी एकाग्रता आणि झरझर चालणारा हात लाभलेल्या या बायका, त्यांची वाळवणाचे पदार्थ करण्याची पद्धत, त्या वेळच्या गप्पा, गॉसिप किंवा एकाग्रतेने फक्त मन लावून आपली आपण शेवया घडणारी आणि आयुष्याचे गुंते सोडणारी बाई, दोन्ही भूमिकांतल्या दोघी सारख्याच.

शेवया असूदे किंवा इयर फोन किंवा नातं... सगळ्याला गाठी पडतात. कधी ना कधी गुंता होतोच. पार तुटेपर्यंत ताणलं जातं. गुंता कसा सोडवावा हे अजिबातच कळत नाही. सैरभैर व्हायला होतं. चित्त थाऱ्यावर राहत नाही. सगळं नीट होण्याची वाट पाहावी तर ते होत नाही... नीट करायला जावं तर शेवटचं टोक कुठलं होतं ते सापडतच नाही आणि मग धीर सुटत जातो. अशा अनेक वेळा प्रत्येकाच्या आयुष्यात येत राहतात.

तेव्हा नेमकं काय करावं याचं ठराविक वा पारंपरिक असं कुठलंच उत्तर नसलं, तरी प्रत्येकाची गुंता सोडवण्याची आपली एक पद्धत मात्र नक्की असते आणि त्यात संवादाचा भाग फार मोठा असतो. ज्याच्या जोरावरच प्रत्येकीची स्वतंत्र कार्यप्रणाली ठरत असते. नातं, माणूस, प्रसंग, औचित्य आणि ठिकाण या सगळ्यावरून नात्याला बसलेली गाठ, त्यातले गैरसमज हे सगळं दूर करण्यासाठी लागणारा वेळ बदलत जातो.

यात शेवया बनवणं हे फक्त एक उदाहरण म्हणून असलं, तरी कडकडीत उन्हात वाळवणाचा घाट घालणाऱ्या बायका, त्यांच्या पदार्थ करण्याच्या पद्धती आणि ते फसले तर किंवा बिघडताहेत असं वाटत असेल, तर किंवा बिघडू नयेत याची काळजी म्हणून प्रत्येकीच्या स्वतःच्या खास क्लृप्त्या असतात. त्यामुळे पदार्थ बिघडत तर नाहीच; पण मेहनतीचं चीज होतं. ज्या त्यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीने आत्मसात केलेल्या असतात. शोधलेल्या असतात.

तशा आपलं जगणं सोयीस्कर होईल अशा क्लृप्त्या आपल्या आपणच शोधायच्या असतात. मला नेहमी वाटतं अशा क्लृप्त्या आपल्याला आपल्या बालपणातल्या आठवणीत सापडण्याची शक्यता अधिक असते. म्हणून शक्य होईल तेव्हा आणि शक्य होत नसेल तर स्वतःला बालपणातल्या नॉस्टॅल्जियामध्ये अधूनमधून ढकलून देता आलं पाहिजे. कारण स्वतःतील लहान ‘मी’ला सगळं स्वच्छ नजरेने दिसतं आणि उत्तर चटकन सापडतं. मग गुंता झाल्यावर चिडचिड होत नाही आणि पटकन निसटलेलं टोकही सापडत. हातातून निसटू पाहणारं काही सहज मुठीत स्थिरावतं.

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.