- केतन पुरी, ketan.author@gmail.com
धाराशिव जिल्ह्याला प्राचीन वारसा लाभलाय. भारत आणि रोम या दरम्यान प्राचीन काळी जो व्यापार चालत असे, त्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गावर आजच्या मराठवाड्यातील प्रतिष्ठान (पैठण), भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर) सारखी गावं वसलेली होती. महाराष्ट्रातील दोन हजार वर्षांपूर्वीचं शहर म्हणून इतिहासात नोंद असलेल्या तेरविषयी अनेक अभ्यासकांनी-साहित्यिकांनी-पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी लिखाण करून ठेवलंय. तेर म्हणजे ऐतिहासिक गोष्टींनी संपन्न असलेलं एक वैभवशाली नगर. या गावात असणाऱ्या मंदिरांचा काळ हा जवळजवळ पाचव्या-सहाव्या शतकापर्यंत मागे जातो.