तुला पाहते रे

जन्मत:च दृष्टिहीनता असणं अथवा नंतरही काही कारणानं दृष्टिहीन होणं हे मोठं दुर्दैव तर खरंच. उजेड कसा असतो याची कल्पनासुद्धा मनातल्या मनात करणं अशक्य. सृष्टीनं निर्मिलेल्या नद्या, डोंगर, झाडी, मनुष्य, प्राणी, चंद्र, तारे इत्यादींचे निरनिराळे आकार, त्यांचे विविध रंग यांचा अंदाज कसा लागणार त्या दुर्दैवी जीवाला?
तुला पाहते रे
Updated on

- डॉ. कैलास कमोद

तुला पाहते रे, तुला पाहते

जरी आंधळी मी तुला पाहते

तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे

तुला पाहते रे, तुला पाहते

जरी आंधळी मी तुला पाहते...

जन्मत:च दृष्टिहीनता असणं अथवा नंतरही काही कारणानं दृष्टिहीन होणं हे मोठं दुर्दैव तर खरंच. उजेड कसा असतो याची कल्पनासुद्धा मनातल्या मनात करणं अशक्य. सृष्टीनं निर्मिलेल्या नद्या, डोंगर, झाडी, मनुष्य, प्राणी, चंद्र, तारे इत्यादींचे निरनिराळे आकार, त्यांचे विविध रंग यांचा अंदाज कसा लागणार त्या दुर्दैवी जीवाला?

पापण्या मिटलेल्या असोत की सताड उघड्या, डोळ्यांसमोर फक्त काळोख नि काळोखच; परंतु अशा अंधत्वातसुद्धा स्वत:ला भाग्यवान समजून, आहे त्यातही आनंद शोधणारे दृष्टिहीन खरोखरीच थोर म्हणायला हवेत. एखादा डोळस जोडीदार मिळाला तर आणि तो समोरचं दृश्य वर्णन करून सांगू लागला तर अंध व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून त्यावर हास्य विलसू लागतं. ‘अनुराग’ सिनेमातला नायक अंध नायिकेला सांगतो...‘तेरे नैनों के मैं दीप जलाऊँगा...अपनी आँखों से दुनिया दिखलाऊँगा’(गीतकार : आनंद बक्षी)...

हे ऐकत असताना नायिका आनंदून जाते. ‘तुला पाहते रे, तुला पाहते...’ या गाण्यात डोळस नायकाशी संवाद साधताना अंध नायिकेची प्रतिभा अशीच फुलून आली आहे.

एका गुंड दादानं पळवून आणलेल्या लहान मुलीला अंध करून तिच्याकडून रस्त्यावर नाचगाणी करवून तो पैसे मिळवत असतो. ती सुमन आता तारुण्यात आली आहे. हार्मोनिअम चांगलं वाजवून, चांगलं गाणं गाऊ शकणारा एक माणूस दादानं तिच्या जोडीला दिला आहे. हा सखाराम तिला गाणंही शिकवतो. सुमन साधारणत: सतरा-अठरा वर्षांची तरुणी, तर सखाराम एक गरीब,

दुर्बल, सत्शील आणि निर्मळ मनाचा साधारणत: पन्नाशीतला मध्यमवयीन पुरुष. तिला तो दिसत नाही; पण गाण्याकरता रोज मिळणाऱ्या त्याच्या सहवासातून तिच्या तारुण्यसुलभ भावना जागृत होतात आणि ती त्याच्याकडं आकृष्ट होऊ लागते. त्याचा स्पर्श, त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटू लागतो. तिच्या दृष्टीनं तो पुरुष आहे; परंतु स्वच्छ मनाचा सखाराम मात्र आपल्या कन्येच्या वयाच्या त्या तरुणीकडं पित्यासारख्या नजरेतून पाहत असतो.

तुझ्या संगतीचा जिवा ध्यास लागे

तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे

तुझ्या गायनीं मी सुखी नाहते रे

तुला पाहते रे, तुला पाहते...

ती त्याला सांगते... मी आंधळी जरूर आहे; पण तुझी एक छबी माझ्या काळजात घर करून बसली आहे. ती छबी मला दिसत असते. माझ्या अंत:चक्षूंनी मी तुला पाहत असते. तू हसलास तरी माझ्या मनात प्रीतीचे भाव जागृत होतात. तू गायिलेलं गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा मी सुखात न्हाऊन निघत असते.

किती भाग्य या घोर अंधेपणीही

दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही

उणे लोचनांचे सुखें साहते रे

तुला पाहते रे, तुला पाहते...

दृष्टीची उणीव आहे तरी मी त्यातही सुखच शोधत असते. अंधपणातही माझं भाग्य थोर आहे. झोपलेली असते तेव्हाही मला स्वप्न दिसत असतं. मी जागी असते तेव्हाही स्वप्नच पाहत असते, हे माझ्यासारख्या आंधळीचं किती मोठं भाग्य आहे.

या पंक्ती ऐकताना किंवा वाचताना अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहतात. दृष्टिहीन व्यक्ती अशा सकारात्मक आणि आशादायी दृष्टिकोनातून विचार करू शकते ही कल्पनाच मोठी रोमांचकारी आहे!

दृष्टी आणि चक्षू हे वेगळे आहेत. ती त्याला पाहते ते तिच्या अंत:चक्षूंनी. त्याही पुढं जाऊन ‘ईश्वर आणि भक्त’ तसंच ‘नदी आणि समुद्र’ यांची उदाहरणं देऊन कवीनं फारच मोठी भरारी मारली आहे.

भक्तानं कधीही ईश्वराला पाहिलेलं नाही तरीही तो (भक्त) ईश्वराची आराधना, त्याच्या प्राप्तीची इच्छा करतच असतो. कुठं तरी दूरवर उगम पावलेली नदी समुद्राच्या दिशेनं वाहत वाहत जाते. समुद्र कसा आहे... गोड आहे की खारट...लहान आहे की विशाल...हे नदीला ठाऊक नसतं. समुद्राच्या प्रेमाखातर ती त्याच्याकडं धावत सुटते. धावत असताना खडकावर आपटते, दरीत कोसळते, वाकडीतिकडी वळणं घेते...तरीही ती समुद्राला कडकडून आलिंगन देऊन त्याच्यात विलीन होते. तशीच भक्तासारखी किंवा नदीसारखी भावना अंध तरुणीची त्या पुरुषाविषयी आहे.

कधी भक्त का पाहतो ईश्वराला?

नदी न्याहळी का कधी सागराला?

तिच्यासारखी मी सदा वाहते रे

तुला पाहते रे, तुला पाहते रे...

या गाण्याच्या प्रत्येक ओळीसाठी गीतकार ग. दि. माडगूळकरांच्या उत्तुंग प्रतिभेला त्रिवार वंदन करावंसं वाटतं. कविकल्पनेची भरारी किती अनंत असू शकते ते या गीताच्या शब्दाशब्दातून जाणवतं. ‘तुझी मूर्त माझ्या ‘उरी’ राहते’ या पंक्तीला ‘माझ्या हृदयी’ अथवा ‘माझ्या पुढं’ असे शब्द न वापरता त्यांनी ‘माझ्या उरी’ हा उचित शब्द वापरला आहे. संगीतकार सुधीर फडके अर्थात् बाबूजी यांनी चाल इतकी श्रवणीय दिली आहे की, गदिमांच्या शब्दलतेवर जणू संगीताची फुलं उमललीत!

संपूर्ण गाण्यात तबल्याचा ठेका मजा आणतो. प्रील्यूड, इंटरल्यूड म्युझिकसुद्धा तसंच आकर्षक. शब्दवेलीवर उमललेल्या फुलांवर सुगंध ओतला आहे तो गायिका आशा भोसले यांनी. ‘तुला पाहते रे, तुला पाहते...जरी आंधळी मी तुला पाहते’ या ओळींचा उच्चार करताना त्यातल्या गेयतेची रंगत ऐकवत त्यांनी उच्चारांमधली स्पष्टता जपली आहे. प्रत्येक ओळीत त्यांनी ही किमया साधली आहे. त्यामुळं सर्वसामान्य रसिकापर्यंत गाणं सहज पोहोचतं. त्याला ते समजतं. तो ते गुणगुणायला लागतो.

अंध तरुणीच्या भूमिकेत सीमा ( तोपर्यंत त्या ‘सीमा देव’ झालेल्या नव्हत्या) सहज वावरल्या आहेत. त्यांच्या नेत्रांच्या हालचाली अंध स्त्रीला साजेशा आहेत. त्यांचा नाचसुद्धा रस्त्यावर नाचणाऱ्या मुलींसारखा आहे. ठिगळं लावलेल्या कपड्यांवरून त्यांची अवस्था समजून येते. पेटी वाजवणाऱ्या माणसाच्या, सखारामच्या, भूमिकेत आहेत स्वत: दिग्दर्शक राजा परांजपे. तरुणी लगट करू लागते तेव्हा अवघडल्यासारखा चेहरा करत त्यांनी केलेला मुद्राभिनय उत्कृष्ट. धोतर, टोपी, अंगरखा असा वेश पेहरून त्यांनी सखारामची ‘गरीब; पण सच्चा’ अशी व्यक्तिरेखा खूप छान साकारलीय. गाण्याच्या शेवटच्या भागात सुमनचे आई-वडील तिला अचानक पाहतात आणि तिला ओळखतात. तेव्हा त्यांची दुरून दिसणारी संशयी नजर पाहून सखाराम हळूच तिला सोडून पळ काढतो तेव्हाची त्याची भेदरलेली मुद्रा लाजवाब. कुसुमच्या आई झाल्यात अभिनेत्री माई भिडे. त्यांचाही काही सेकंदांचा अभिनय तसाच उत्कृष्ट. त्या काळातली महागडी इम्पाला कार बाळगणाऱ्या श्रीमंत बापाच्या भूमिकेत आहेत दस्तुरखुद्द ग. दि. माडगूळकर. जुन्या मुंबई-पुणे रोडवरच्या लोणावळ्याचं चित्रीकरण आहे.

राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला १९६० या वर्षातला ‘जगाच्या पाठीवर’ हा चित्रपट उत्कृष्ट तर होताच; परंतु त्यात एकाहून एक सरस अशा गीतांची मेजवानी होती. आधीच उंच असलेली गदिमांची प्रतिभा ‘जगाच्या पाठीवर’मध्ये आणखीच बहरून आली होती. ‘नाचनाचुनी अति मी दमले...थकले रे नंदलाला’ या गीतातली नर्तकी हे माणसाचं रूपक आहे, तर नंदलाला हे भगवंताचं नाव आहे. देवानं माणसाला घडवून पृथ्वीवर धाडलं; पण काम-क्रोध-लोभ-मद-मोह-मत्सर यांसह जगणारा माणूस जीवनाला वैतागतो, कंटाळतो. जीवन जगणं सोपं नाही हे लक्षात आल्यानं तो आपल्या जन्मदात्या ईश्वराला ‘थकले रे नंदलाला...’ असं सांगतो. ‘उद्धवा, अजब तुझे सरकार...लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार...’ या गीतातून त्यांनी, पृथ्वीवर ज्याचं राज्य आहे त्या ईश्वरालाच ‘तुझं हे सरकार चांगलं नाही...इथला राज्यकारभार तू नीट सांभाळत नाहीस’ असं सुनावलं आहे. ‘एक धागा सुखाचा...शंभर धागे दु:खाचे...जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’ या गीतातून, माणसाच्या आयुष्यातल्या सुख-दु:खांचं वर्णन त्यांनी केलं आहे. ‘जग हे बंदिशाला, कुणी न येथे भला-चांगला...जो तो पथ चुकलेला’ या गीतातून जगाची आजची परीस्थिती त्यांनी लिहिली आहे. प्रत्येक गाणं हे एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. याशिवाय, ‘बाई मी विकत घेतला श्याम...’, ‘धक्का लागला गं मघाशी कुणाचा...’ आणि ‘का हो धरला मजवर राग’ ही लावणीही या सिनेमात होती. सगळ्या गीतांना अतिशय श्रवणीय संगीत देऊन स्वत: सुधार फडके यांनी आणि आशा भोसले यांनी ही गाणी आपल्या आवाजात सजवली होती. साठच्या दशकात लग्नमंडप, सत्यनारायणपूजा, गणेशोत्सव अशा सार्वजनिक कार्यक्रमांतून लाऊडस्पीकरवरून या गाण्यांच्या रेकॉर्डस् सर्वत्र वाजत असायच्या.

पूर्वी दैनंदिन जीवनात सामान्य माणसांच्या जगण्यामध्ये आपलं काम करणं, खाणं-पिणं, निद्राधीन होणं याव्यतिरिक्त अन्य व्यवधानं नसायची. त्यामुळं माणसाच्या जीवनात भावनांना महत्त्व असायचं. साहजिकच, आज नव्वदीत असलेल्या पिढीला भावेल अशी भावनाप्रधान गीतरचना तेव्हा असायची. ‘माणसानं सत्प्रवृत्त असावं’ अशीही अपेक्षा त्या काळातल्या सिनेमांतून आणि गीतांतून असायची. तेच सूर समोर ठेवून गदिमांनी ही गाणी लिहिलीत. धन्य ते गदिमा आणि धन्य ते बाबूजी.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.